Prabhakar Pawar

Tragedy

3  

Prabhakar Pawar

Tragedy

दोर

दोर

4 mins
719



"मालतेय !. .बाय उठ गं. .शाळेला जायचं हाय ना तुले. ."


मालती डोळे चोळीतच उठली. .आणि तिने पार्वतीला विचारले. .


"माय बा गेला का गं रानात. ."


पार्वती चुलीत फुंकर मारतामारता बोलली. .


"कवाच गेलं. .आताला भाकर्‍याची वाट पायत असलं. ."


पार्वतीचे ऐकून मालतीने पांघरूण फेकून दिले अंगावरचे. .आणि धावत बाहेर आली. .बैलांच्या गोठ्यात तसेच घराच्या आजूबाजूला शोधाशोध केली. .तिला जे शोधते आहे ते मिळाले नाही. .मग ती धावत निघाली. .


पार्वती पाहत होती सारे. .पण जशी ती धावत सुटली. तशी मालती मागे धावायला लागली. .


"मालतेय बाय काय झाल. .अगं थांब. ."


गावातली माणसं दोघा मायलेकींना धावतांना पाहत होती. .काही मोकाट माणसं त्यांच्या मागे धावायला लागली. .मालती वावरा जवळ पोहचली होती. .तिचा बाप महादेव दोर आंब्याच्या फांदीला बांधून खाली वाकवत होता. .आता त्याने फांदी वाकवून दोर खाली दगडाला बांधला होता. .मालती धावत गेली आणि मागून तिने त्याच्या गळ्यात हात टाकले. .त्याच्या गालाला मुका घेतला आणि रडायला लागली. .महादेवला समजल नाही. .मुलगी का रडते आहे. .


"काय गं वासरा. .काय झालं गं. का रडाया लागलीसा ?. .एव्हढा उर फुटोतसो कश्यापायी धावलीसा. ."


मालती हातानी अश्रू पुसून म्हणाली. .


"काय नाय रं. .मले तुह्यी जाम आठव आली. ."


महादेव हसला. .आणि म्हणाला मालतीला. .


"मंग लगीन झाल्याव काय करसील गं. ."


मालती लटक्या रागात हसली. .


"जा म्या लगीनच नाय करणार ?. ."


पार्वती लांबून सारे पाहत होती. .तिला पण अप्रूप वाटले. .पण तिने लगेच आवाज दिला. .


"होय. .होय बस झालं बापलेकीच पेरीम. .चल गं तुले येणी घालायची हाय. शाळेला जायाच हाय. ."


मालती आईचीच्या जोडीला माघारी घरी वळली. .चालता चालता मालती काल शाळेत घडलेला प्रसंग आठवीत होती. .


शाळेत हजेरी घेतांना. .गुरूजींनी नाव पुकारले. .


"मंगेश गफाट. .मंगेश गफाट. ."


शेवंती उभी राहयली आणि म्हणाली. .


"गुरूजी त्यो नाय आला आज. ."


गुरूजी:- का गं. .


शेवंती:- त्याचा बा कालच्याला बाभळीला फास घेऊन लोंबला. .आता दोनतीन दिस त्यो येत नाय. .


शेवंतीचे ऐकून सर्व वर्ग सुन्न झाला. .गुरूजीनी पण हजेरी गुंडाळून ठेवली. .मालतीच्या छातीत कालवाकालव झाली. .तिच्या डोळ्यापुढे तिचा शेतात उभा असलेला बाप दिसत होता. .संध्याकाळी शाळेतून आल्यावर तिने पहिला दोर लपवून ठेवला. .तिने ऐकले होते. .मंग्याच्या बापाच्या अंगावर खूपक्तर्ज होते. .आणि माझ्या बापाच्या डोक्यवर पण कर्ज अहेच की. .


तिला उठण्या अगोदर माहदेव शेतावर आला होता. .तिला लपवून ठेवलेला दोर सापडला नाही. .म्हणून ती शेतावर धावत आली होती. .ती परत मागे फिरली बापाचे दोराचे काम झाले होते. .ती दोर घरी घेऊन आली. .


आता ती रोज सकाळी शाळेत जातांना. .आणि संध्याकाळी घरी आल्यावर लपवल्याला दोर तपासून पाहायची. .पार्वतीच्या आणि महादेवच्या तिच दोर लपवण्या मागचे कारण लक्षात आले होते. .म्हणून ते दोर कामासाठी वापरला. .तरी पुन्हा त्याच जागेवर नेऊन लपवून ठेवत असत. .


आज रात्री महादेव बैचन दिसत होता. .तो बाजाराला जाऊन आला होता. .सकाळीच गावातली गाडी माल भरायला आली होती. .जवळ पास अर्धी गाडी महादेवच्या मेथीच्या जुड्यातच भरली होती. .मालतीला झोपून दिल्यावर पार्वतीने हळूच विषय घेतला. .


"धनी केव्हडं आलं व मालाचं. ."


पार्वतीला वाटले होते. .चांगले पैसे यायला हवेत जुड्या पण मोठ्या बांधल्या होत्या. .दोन अडीचशे काडी असेल. .पण महादेव म्हणाला. .


"साडे आठशे आलं. .चारशे रूपये गाडीला दिलं. .पन्नसचा च्यापाणी झाला. .उरलेलं खिशात हायीत. ."


"अरं देवा. .महिनाभर शिपली मेथी. .दोनदा गवात काढल. ."


महादेव ने तिला मध्येच थांबले. .


"नको आता हिसाब करू निज. ."


पार्वतीचे डोळे पाणावले होते. .तिच्या हुंदके देण्याने अंदाज आला होता. .


मालती जागीच होती. .ती हिशोब लावत होती. .जवळजवळ अडिच हजार मेथीच्या गड्ड्या होत्या. .आले साडे आठशे. .म्हणजे पैश्यात महिनाभर मेहनतीन उगवलेली मेथी दहा काड्या. .फक्त मेहनत करायची. बस्स. .कर्जात घेतलेले पैसे फिटायला मार्गच नाही. .


मालती सकाळी लवकर उठली. .महदेव झोपला होता. .तिने त्याच्या गालाला हात लावून बघितले. अंगात थोडी कणकण वाटत होती. .तेव्हढ्यात महादेव जागा झाला. .


"काय नाय झोप तू. ."


पण तो उठला. .कुणाशी काही बोलत नव्हता. .तयारी केली आणि शेतावर निघून गेला. .त्याला जातांना मालती पाहत होती. .


त्यानी दोर नेला नव्हता. .मग मालती तयारी करून शाळेत आली. .शाळा सुरू होऊन एखादा तास झाला होता. .पण आज मालतीचे लक्ष नव्हते. .आणि तिला अचानक आठवले. .बानी बैल कासर्‍याला पकडून नेले. .ती शाळेतूनच धावत सुटली. .मुलं पाहत होती. .शिक्षक विचारात पडले. ही अशी का धावत आहे. .


पायात मालतीच्या नवनागाचे बळ भरले होते. .आज दहा पीटी उषा एकत्र आल्या असत्या तरी ती भारीच होती. .आता ती वावरा जवळ आली होती. .


समोेरचे चित्र पाहिले आणि ती कोसळली. .मातीला घास मारू लागली. .डोक जमिनीवर आपटू लागली. .कारण समोरचे चित्र भयानक होते. .आंबा पानोपानी बहरला होता. .पण कैर्‍या लगडायच्या जागेवर बाप तिचा लोंबला होता. .


बाजूचा शेतकरी शांताराम अोरडत होता. .


"आरं धावा. .धावा महाद्यानी फास घेटला. ."


रानातले सारे शेतकरी गोळा झाले. .गावात सांगावा द्यायला एक जन गेला. .पर्वती दारापुढं सारवीत होती. .तिने ऐकले शेणात भरलेला हात घेऊन तशीच ती धावली. .


"धनी काय केलसा ह्या. ."


तिचा टाहोने आकाशाच्या काळजाला चीर पडली होती. .शेणाने भरलेल्या हाताने छाती पिटीत होती. .डोक झोडीत होती. .गावातल्या दोनचार बायकानी तिला आता धरले होते. .त्यांच्या अंगावरच तिची बेशुद्ध झाली. .अंत्या लोहारानी रस्त्यात पडलेल्या मालतीला खांद्यावर मारली होती. .तिच्या अंगातल त्राण जाऊन ती पण गार झाली. .


झाडाखाली बैल उभे होते. .पुढ्यात हिरवा चारा होता. .पण तोंड गप्प होते. .त्यांचे रवंथ करणे थांबले होते. .डोळ्याच्या कडा अोलावल्या होत्या. .अनमिष नेत्रांनी ते मालकाला लोंबलेला पाहत होते. .त्यांच्या गळ्यातला दोर मालकाच्या गळ्यात होता. .ते समोर फास घरणार्‍या मालकाला नाही वाचवू शकले. .कारण निसर्गाने त्यांना मर्यादा घालून दिली आहे ना ?. .मृत्यूला मिठी मारण्या अगोदर मालकांने त्यांना हिरवा चारा खाऊ घातला होता. .रोज मालक असाच करायचा. .अगोदर बेेैलांना चारापाणी द्यायचा आणि मग कोरड्या भाकरीचा तुकडा मोडायचा. .


का तर तो जगाचा पोशिंदा होता. .


दुसर्‍या दिवशी वर्तमान पत्रात बातमी झळकली. .शेतकर्‍याची आत्महत्या. .चहाचा पेला हातात घेऊन बातमी कुणी वाचली असेल. .पुन्हा चहाचा घोट घेऊन पान पलटलं असेल. .काय करणार वाचक तरी. .रोजरोज त्याचत्याच बातम्या किती वाचणार ? ?. .



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy