देवाच्या मूर्ती
देवाच्या मूर्ती
कशा एक एक मूर्ती घडवत असतो देव!
आज घरी येताना एक माणूस दिसला. त्याला पाय नव्हते. तो चाकांच्या पाटावर बसून चपला हातात घालून पुढे जात होता. ह्रदय चिरत गेलं ते दृश्य.
याला जीवन ऐसे नाव!
तो रोज काय पाहत असेल? समोरून भरधाव जाणाऱ्या गाड्यांची चाकं त्याला "वेगाची" जाणीव करून देत असतील! वेग नावाचं भौतिक परिमाणच पुसून टाकलंय देवाने त्याच्या आयुष्यातून! आपल्याच पावलांच्या वेगांचं कधीच अप्रूप नसतं माणसाला. पण ह्याला तर "पावलांचच" अप्रूप सोडायला लावलं नियतीने! समोरून कोणी बागडत जाणारा लहानसा जीव, त्याला "पाय" देऊन गेलाही असेल! पण, उसनी अवसानं जशी टिकत नाहीत, तशाच उसन
्या कल्पनाही!
आपल्याच पाटाखालची चाकं आणि हातातल्या चपला यापलीकडे आणखीन कोणाशी बोलणार तो त्याच्या मनातले चार शब्द? शरीर पांगळं झालं तरी मन थोडीच होतं? ते तर धावतच राहतं त्याच्या त्याच्या विश्वात! त्याच्या त्याच्या नादात!
देवाच्या अनेक कलाकृतींमधले हे काही फसलेले प्रयत्न,
दुसरं काय! तोही नक्की गाळत असणार त्याच्या जवळचे चार अश्रू या फसलेल्या प्रयत्नांसाठी!
आपण सगळेजण म्हणजे त्याच्याच मूर्त्या.!
काही मखरात सजतात, तर काही अडगळीत पडतात. शरीराइतकीच भंगलेली स्वप्नं उराशी जपत!
असो! याला जीवन ऐसे नाव!