Vitthal Jadhav

Romance Tragedy Classics

3  

Vitthal Jadhav

Romance Tragedy Classics

डुकरं आली हो रानी!

डुकरं आली हो रानी!

5 mins
192


  ग्यानबाचं लगीन हिवतात झाल्त. येती जाती झाल्ती. सोळावाबी जोरात वाजविला व्हता. पाव्हणे रावळे समदे आल्ते. नवनवं व्हत सारं. हळद फिटून सव्वा महिना झाला असन नाही त् उल्सक मागपुढं असन.  

  ‘रानात भुईंमूंग पेर, मोकळं रान ठिवून काय करशील?' म्हणून म्हतारीनं घायटाच उठिला व्हता. नाही म्हणायला उपट्या पेरावा का पसऱ्या या इच्चारातच सताठ दिवस गेले. लयी उशीर व्हऊनबी भागत नाही. पुढं उन्हाळ्यात पाण्याची तकलीब. म्हणून आताच रान नीट करावा. घोळून वसाऱ्या काढावात. मोलानी माण्संबी मिळत न्हायीत. सारे ऊस तोडायला पळत्येत. इथं रिक्षात बसून लेबर आणावा लागतय. या ईचारात ग्यानबा. सूर्य उगायच्या टायमाला मेव्हणा दारात हजर. चहापाणी झाल्यावर म्हणाया लागला, ‘दाजी, सुमा आक्काला नेऊ का? आजीचं वरीसराध हायी. तव्हा न्याया आल्तो.'

  ग्यानबाला खालीवरचं झाल. चिपाड मोडून काडीनं दात टोकराया लागला. ‘बरं नेवा पण लवकर धाडा परत.'  

  'तुमीबी या ना मागून. म्हंजी दोघबी संगच येतान् परत.’

  ‘इथं लई पंच्याईत झालीय. रान नीट करून घोळायचय. तणतोडा, कास्याबी येचावा लागत्यान्. भूईमूंग पेरायचाय. काम पडल्येत खंदाडीभर. कत्ताडीचं बघावा लागतय. न्हायी जमणार. घेऊन जावा. घेऊन यावा.'

  सुमनची लगबग सुरू व्हती. पिशीत काहीबाही भरलंं. कव्हा एकदा माहेराला जाते असं झाल्तं. सासूच्या पाया पडली. गाडीवर बसली. भूर्रकन् निघून गेली. ग्यानबा तिची पाठमोरी आकृती पाहतच व्हता.

  शिरूरचा रस्ता धरला. आन् खाटकन् दोन ब्याच्या पिशा. एक सुपरफास्फेट. टमटम मधी घेऊन आला. बैल बारदाना कवाच संपला हुता. नवनाथ शेळक्यांनी ल्हानं ट्रॅक्टर नवच घेतलं व्हत. त्याच्याकडं नंब्र लागले व्हते. लोक चकरा मारीत व्हते. पण गुंजाईस करून देतो मण्ला. तापाची ताप उरकून जाईन. 

  ट्रक्टरनं नांगरट केली. मोघडीलं. कास्याबी येचल्या. ‘कशी येयना कायनू सुमन, आजुन?' म्हतारीनं ग्यानबाला विचारलं. ’इथं काम पडल्येत. कुठं जाऊन बसली. कुणास्टोक? घरी थांबली. घरचं भाकरी कालवनाचं बघितलं तरी ते काय थोडय का? पावण्याला फोन तरी कर एखादा.’

  ’चट येईन. राहु दी.’ मनात होतं, बोलावं पण बोलता येयना. पोटात एक, ओठात भलतच अशीगत झाल्ती. शेळक्यांनी ट्रॅक्टरनीच पेरूनबी दिलं. वसाऱ्याबी काढल्या. दाताळ्यान् रान घोळीलं. ढेकळं निबार व्हते. हातापायाच्या बोटाला जिभाळ्या लागल्या. बी मातीत पडलं. त्यावर पाणी सोडलं तव्हा कुठं जिवात जीव आला. 

    सकाळ झाल्ती. ब्याला कर आले असतील असं वाटत हुत. भूईमूंग टर्र उगला असंन का ते बघायला पायजे. मोरंडीतून म्हसूबाच्या वाटणीकडं गेला. लिंबाच्या बांधाव गवत उगल्याल. पँट वर धरली. दैवर पडल्याल व्हतं. चिखलानं भरल्याले पाय गवताला पुसले. 

  डोळे बारीक करून समोर नजर टाकली. सगळ्या वसाऱ्या खुरंदाळल्या व्हत्या. रेघा रेघा पाडल्या व्हत्या. शेंगदाणे उकरून नेल्ते. कशाचे तरी पावलं उमाटले व्हते. कुठतरी उल्सक बी दिसत व्हत. सम्दे कष्ट वाया गेल्ते. काय करावं सुचेना. डोकं सुन्न झालं. डोक्याला हात लाऊन वसारीतच बसला. स्वप्नांचा चुराडा झाला. घरी गेला. म्हतारीला सांगावा त् तिचा बीपी वाढन. काय करावा? तेवढ्यात एक धुसर आकृती घराकडं येताना दिसली. बहुतेक सुमन असनं. म्हणून डोळे वाटाकडं लागले. ती एकटीच कशी येईन? कुणीतरी सोबत आसनच की. बरं जाऊ द्या. पण लई तरमाळीलय तिनं. 

   गणूबा रानातूनच आल्ता. ‘गणपा, आरं लयी बेकार झालय बघ.' 

  ‘कारं, काय झालं?'

  ‘भूईमूंग पेरला व्हता.'

  ‘मंग’

  ‘उकरीलाय कशानु कायनी.’

  ’आरं, तिकडं किन्हीकडं रानडुकरं आल्येत म्हणं.'

  ‘डुकरं कुठं काय करत्येत? हारणं खात्येत म्हणून ऐकून होतो.'

 तेवढ्यात रघूबी आला. ‘आरं, सम्दे रानं खुर्दांळल्येत. पीकाची पार नासाडी केलीय. ऊसबी मोडल्येत. रातीच झालय ह्ये.’

  ‘आज रातच्याला जाऊ रानात. निबार काठ्या घ्या. उजेडाला घ्या कायीतरी. न्हायीतं काहीच वाचायचं न्हायी. लई बेक्कार जात असती ती.’ गणूबा सोंडगे सांगत व्हता. सर्वजण पांगले. तव्हा ग्यानबाच्या न्याहारी वखूत टळून गेल्ता.

  ‘वाढ बरं, मला भूक लागलीय.' म्हणत आईकडून वाढून घेतलं. पयला घास तोंडात घातला. सुमन दारात अचानक उभी. मागून तिचा बाप, ह्याचा सासरा. हातात पिशी. सुमनच्या अंगाव नवीकोरी पिवळी साडी. उन्हात खुलून दिसत व्हती. ग्यानबाचं डोळेच दिपले. आता पाव्हण्याला बोलावा का सुमनला पहावा. आपण तर जेवाया बसलोय. जरा तारांबळच उडाली. थोडासा लाजला. सासऱ्याला ‘जेवा.' म्हणला. तस सुमननं बापाला पाणी आणून दिल. ग्यानबाच्या पुढ पिलाटीत, भाकर चार कोर मोडून ठिवली. तव्हाच त्यानं तिरक पाहिलं तिच्याकड. पाव्हणा जेवला.   

  'येतो बरं का जावाई. तिकडंबी लयी काम पडल्येत. हे डुकरं काही सुदरू देयनात. पिकच वर येवू द्यायनात. रातच्याला राखायला जावा लागतय. साताठ जण जातोत घोळक्यानं.' सासरा जावयाला सांगत व्हता. जणू आपल्याच मनातलं बोलतूय असं झाल्त. मनकवडा. त्यो इव्हायाला, यहीणीला, लेकीला बोलून निघता झाला.

   रानातले डुकरं हाकलिले पायजेत. साताठ जणाची टोळी केली. अंधार पडला. जेवणावळ झाली. अंगाव घोंगडी, चादरी घेतल्या. हातात काठ्या. उजेडाला बॅटरी, कंदील घेतले. ग्यानबानं रानडुकरं पाहिले नव्हते. सुमनकडं नजर टाकली. ती हासली. मालक डुकरं हुसकायला चाललेत. एव्हाना तिच्या लक्षात आलं. सगळे रानात पोहोचले. हीव वाजत होतं. अंगाव काळी रग घेऊन ग्यानबा ऊसाच्या कडीला बसला. तसाच डोळा लागला. काहीतरी खुसफूस झाल्याचा आवाज आला. नक्कीच डुकरं असत्येन. सारे सावध झाले. आवाजाच्या दिशेने पळाले. एक डुक्कर मातीत नाक खूपसीत होतं. शेंगदाणे उकरून खात होत. सरळ पळत व्हत. खो-खो खेळल्यागत. सगळे धावले. डुकराला चाहूल लागली. ते पळाल. तोपर्यंत दोनतीन आले. ते पळविले. घुसले ऊसाच्या कटात. ग्यानबा रग पांघरून झोपलेला. अंधार गुडूप होता. कुणीतरी अंधुक पाह्यलं. ‘हीकाय हेच त्ये डुक्कर इथं येवून बसलय. ऊस खायचा बेत दिसतोय. 'टाक टोला. हाण्.' वल्या बिलायताचा टोला ग्यानबाच्या अंगावर पडला. मोठ्यानं वरडला. ‘आरं, तू हायीस. व्हय. आम्हाला वाटलं. डुक्करचय. लागलं कारं?’ त्यांच्या बोलण्यानं डुकरं पळाली. अंगाव वळ उमटले होते. बिलुक्सा हाणलं व्हतं. सकाळी सुमनने वळावर हळद घातली.

   सुमन म्हण्ली. ‘माह्या माहेराकडं थिमेट टाकत्येत डुकराला.' एवढंच ऐकलं. थिमिटचा पुडा आणला. वाळूत मिसळला. भुईमुगाच्या रानाला येढा घातला. रान रांगोळीगत. रोज नवे प्रयोग सुरू होते. पण डुकरं तेवढेच तरबेज झाले. माणसावर हल्ला केल्याचं कानावर येई. दिवाळीचे फटाके रानात नेऊन वाजवीत. ज्याच्याकडं नव्हते ते डब्बे, भांडे-बास्न वाजवीत.

  तरी डुकरांचा हैदोस चालूच होता. लोकांनी तारांचे कुंपन घातले. कुणी रातच्याला करंट सोडायच. पहाट झाली की काढून टाकायच. सोंडगेच्या पोरानं करंट सोडला तारीत. लगीला गेलं. झटका बसला ते अजुन दवाखान्यात होत. गावोगाव लोकं जमत. आमदारांच्या कानावर विषय गेला. दौरा झाला. बातम्या आल्या. सत्तेतल्या लोकांना चांगलं झापलं. लोकांची सहानुभूती मिळाली. अधिकारी आले.   

  ‘डुकरं पकडू. बंदोबस्त करू. जंगलात सोडू. ते वन्यजीव मध्ये मोडतात. त्यान्ला मारू नका.'

  'साहेब, आमच्या नुकसानीचं काय?' नाना पुढारी मधीच बोलला. 

  'एवढे फार्म भरा. वरं पाठवू. नुकसान भरपाई मिळल.' अधिकारी गेले. ज्याच्याकडं फार्म दिले. त्याने हजार, पाचशेने निघत्येन तसे गोळा केले. अधिकारी परत आलेच नाही ना पुढारी. कोणतीच भरपाई मिळाली नाही. बाबा गेला अन् दशम्याही गेल्या. 

   ग्यानबा दाढी कटींगला गावात गेला. त्यानं डब्यात केसं पाह्यले. त्याला शिंका याया लागल्या. आयडीया सुचली. जर रानात हे केसं टाकले. ते जर डुकराच्या नाकात गेले तर काय व्हईल? डुक्कर ठसकनं. एकाच्या आवाजाने इतर पळून जातील. ही आयडिया मात्र भन्नाट होती. त्याला मनोमन पटली. त्याने एका गोणीमध्ये ते केस भरले. घरी आला. भुईमूगाच्या रानांमध्ये सगळे केस पसरून दिले. वाट पाहिली. रातच्याला डुकरं येत. तोंड खुपसत. खाण्याच्या बेतात असत. एवढ्यात एका डुकराच्या नाकात केस जाई. ते मोठ्याने ठसके. त्याचा फुर्रफुर्र आवाज झाला की दुसऱ्या डुकराला कोणीतरी शत्रू आलाय असं वाटे. एकमेकाला भ्यायला लागली. डुकर पळून जायला लागली. ही आयडिया त्याने मात्र कोणाला सांगितली नाही. बाकी सर्वांच्या रानामध्ये डुकर येत. पण ग्यानबाच्या रानात कधीच डुकरं येत नसे. भुईमूग निघाला. उतार कमीच आला. तोपर्यंत आडतीत भाव उतरले होते. टपाव टाकीत. लिलाव करीत. आडत, हमाली काटून घेत. मातीमोल झाल सगळ. इकडं सुमनला महिन्याला दवाखान्यात न्यावा लागायचं.  


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance