STORYMIRROR

Vitthal Jadhav

Tragedy Others

3  

Vitthal Jadhav

Tragedy Others

गाव अक्की

गाव अक्की

8 mins
191

      सूर्य मावळतीला चालला होता. किरणं तिरपी झाली होती. गडद ढगांची किनार सोनेरी झाली होती. काळ्याकुट्ट अंधाराची चाहुल लागलेली. डोंगराआड गेलेला सूर्य उद्याच दिसणार होता. कडुसं पडलं. सवसांजला जो तो घर जवळ करण्याचा प्रयत्न करत होता. बैलं दावणीकडं वढ घेत होते. सरपण काटक्या मोडून ठेवल्या होत्या. त्या घराकडं नेल्या म्हणजी चुलीचं रातचं आन उद्याच भागणार होत. पाखरं घरट्याकडं निघुन गेली. नदीकाठावर हुंदडणारा थवा शांत. किलबिल बंद झाल्ती. नाही म्हणायला शेडा तेवढा वाजवून झाल्ता. गावतल्या चुली पेटल्या होत्या. ढणाढणा जाळ लागला होता. लालबुंद हार पडला होता. काठवटीत पीठ मळलं गेल. तवा तापला. भाकरी तव्यावर गेली. चर्र आवाज झाला. पाणी फिरवलं गेलं. उलथानं भाकरीच्या खाली गेलं. तव्हा भाकर पलटली. पुन्हा चर्र आवाज झाला. चुलीला लागलेल्या भाकरी फुगल्या होत्या. यरवाळीच काढलेल्या सरपणाचा फायदा झाला होता. जनावराचे गोठे शांत झाले होते. गंजीच्या पेंढ्याबी झाकड पडता अडकित्यात कापून ठिवल्या होत्या. त्याचा बंडल चऱ्हाटात बांधला होता. तसाच ठिवला होता. पहाटं पहाटं टाकायला व्हईन म्हणून. खायला मिळालं तरच दुभतं जनावर धार काढून देणार होते. काळजी होती. व्याप होता. चिंता होती.

       काळोख दाटत होता. भविष्याचा आणि अंधाराचा. रात्रीच्या काळोखात काय व्हतय कुणास ठाऊक? जीवाला घोर लागून ऱ्हायला होता. गायकवाडाच्या घरात लगबग होती. चलबिचल वाढली होती. माणसं कावरी बावरी झाली होती. चिमणीचा प्रकाश तेवढा मिनमिनत होता. रातकिडे कर्रकर्र आवाज करत होती. अंधारामुळे आकाशात चांदण्याचा तेवढा प्रकाश होता. घरात कुणीतरी जन्माला येणारेय याची जाणीव झाली होती. कळा सुरू झालेल्या. डॉक्टर जवळ करण्यासारखी परिस्थिती नव्हती. शिरूरचा दवाखाना पंधरा किलोमीटर. रस्ता खराब. इतके की गाडी आदळूनच डिलेवरी व्हावी. खड्डे इतके फायद्याचे! गाड्या नाहीत. तिथंही सोय नाही. घोरपड्याच्या म्हातारीला बोलवलं. लई अनुभवी म्हतारी! 

   " अगं, जरा दम धरं." म्हणतच तिनं सुरूवात केली. ती पहाटेपर्यंत जागीच व्हती. बाळाच्या रडण्याचा आवाज आला. ' मुलगी झाली' म्हणत म्हातारी तिच्या घरी निघुन गेली. पण इकडं बाळंतीण गप्पगार पडली. एक नाही की दोन नाही. हूँ की चूँ करीना. आता उठेल. मग उठेल. पण काहीच प्रतिसाद दिसेना. लेकराचा आवाज ऐकून तरी उठल अस वाटलं होत. हातपाय चोळले परंतु नाहीच उठली. आरडा उठला. रडण्याचा आवाज येवू लागला तेंव्हा सकाळचे सहा वाजले होते. होत्याचे नव्हते झाले. माय गेली. तिन्ही लेकरं उघड्यावर आले. तिन्ही मुलीच होत्या. आता मुलगा होईल असं वाटलं होत. पण तस काही घडलं नाही.

   सकाळ झाली. आहेव बाईला वाटं लाऊन सगळे परतले. जवळ दवाखाना असता तर जीव तरी वाचला असता. पण तसे घडलं नाही.

 ' तिन्ही पोऱ्हीचं कस व्हईल. अस सोडून जायचं नव्हत् नाss... निदान लेकराचा तरी इचार करायचा ना... ' -अस म्हणत तिच्या आईनं हंबरडा फोडला. सगळे समजावत होते. ती थोडच ऐकणार होती! 

   पाव्हणे 'वाईट झालय.सुटली बिच्चारी!' म्हणत होते. ते पांगले. जिकडं तिकडं. तिन्ही मुली उघड्यावर आल्या होत्या. दहावा, तेरावा झाला. त्यांना आजी घेऊन गेली. मामाकडं त्या राहू लागल्या. लहान बाळ कसं सांभाळायचं हा प्रश्नच होता. मामी त्रास काढत होती. तिला भाकरी तुकड्याचा त्रास होताच. तिचे दोन अन् नणंदेचे तीन, पाच लेकराचा प्रपंच वढायचा होता. नंदाव्यान महिन्याच्या आत दुसरं लग्न केलं. त्या बाईच्या नवऱ्याचही अकाली निधन झालं होत. 

तिलाबी एक लहान लेकरू होत. तिच एक अन् पहिलीचे तीन असे चार लेकरं सांभाळण्याच्या बोलीवर हे जमलं होतं. बरं झालतं. पण नंतर खटके उडायला लागले. नवरा बायकोचे जमेना. नवरा थोडी थोडी करता करता चांगलीच प्यायला लागला. संसाराचा इस्कोट झाला. 

   तिन्ही बहिणी मामाकडं राहू लागल्या. मामाची परिस्थिती हलाखीची पण पोटातल पोट करून सांभाळीत होता. पोरी वाढत होत्या. काही दिवस शाळात गेल्या. पण शिकल्या नाहीत. मग मोलमजुरी करून खाऊ लागल्या. जगत होत्या कशातरी. बाप त्यांच्याकडं फिरकत नव्हता. आला कधी तर पिऊन यायचा. दोनचार शिव्या हासाडायचा. निघुन जायचा. एक दिवस अचानक तो गेल्याची बातमी धडकली. पिऊन धडकला वाहनाला. खल्लास ! 

   गंगा, राधा, आक्की निराधार झाल्या. बाप गेला. माय लहानपणीच गेली. लहानी आय विधवा. तिचं तिलाच सुधरना. तिचेबी लेकरं होते. 

   पोऱ्ही मामीला बिलगुन राहत होत्या. लोकाच्या इथं कामाला जात होत्या. चपळ होत्या. मामानीच पुढाकार घेतला नि मोठी गंगा उजवून दिली. पोर्ग गवंडीकाम करीत व्हतं. रोजची मिळकत होती. घरी एकदीड एकर रान होतं. तिचं बर चाललं होत. मधली पण लग्नाला आलती. तिला थळ बघितलं. पाव्हण्याच्या नात्यात देऊन टाकली. 

  ल्हानी तीन नंबरची आक्की. वाटल होतं एखाद्या नोकरदाराला द्यावी. पण मामाची तेवढी ऐपत नव्हती परत आक्कीला शिक्षणपण नव्हत. स्थळ काही चांगले येत नव्हते. बरं लेकराला मायबाप न्हायी. मामा-मामीच मायबाप झालेले. त्यांना दोनतीन चिलीपिली होतीच ना! वळायला. खायला काळ आन् भूईला भार झाल्ता नुस्ता. अशा अवस्थेत कुणाच्या तरी हवाली करून देण्याशिवाय पर्याय नव्हता.

   अक्कीला पाव्हणे आल्ते. उसतोडीला जात होत पोर्ग. पण ऊस तोडीत नव्हतं. ऊसतोडीच्या कोप्या जिथं असत्यात. तिथं ह्याचं चहाचं हाॅटेल लागतं. चहाचं हाॅटेल सिजनेबल. सहा महिने तिकडं कारखान्यावर साताऱ्याकडं अन् सहा महिने बंद मग मिळल ते काम करायचं. अशा या स्थळाला मामा व्हय म्हणाला. अक्कीचं लग्न ठरलं. नवरदेवानं हुंडाबी मागितला. कमीजास्त करून मामानी जमविलं. अक्कीला मायबापाची आठवण आली. दोघांपैकी एकही जिवंत नव्हतं. मामानं सांभाळ केला होता. मामी देवासारखी होती. म्हणून बरं झालं न्हायीतर कोण कुणाचे लेकरं सांभाळतय ह्या काळात. वखूद वळखून अक्की ' हाँ ' म्हणाली. लग्नाला तयार झाली. मनात लई इचार येत. पण लेकीच्या जातीला कोण विचारतय? तिचं मन, तिच्या आशा, आकांक्षा केंव्हाच गुंडाळून ठेवलेल्या गाठोड्यात. तव्यावर भाकर करपल्यागत. समाजव्यवस्था तशी बनलेली. मुलगी म्हणजे जुगारावर लावलेली सोंगटी होय. अशी गत झाली होती. तिच्या मनातील विचार शुन्य होते. 

   अक्कीचे हात पिवळे झाले. सासरला नांदायला गेली. तव्हा मामी गळ्यात पडत धाय मोकलून रडली होती. काही दिवस मजेत गेले संसाराचे. अक्की आनंदात होती. असेल नसेल ते सावरून घ्यायची. हळदीच्या पिवळ्या साडीवर खुलून दिसायची. बोलताना डोळ्यावरच्या बटा सावरून धरायची. स्वभावाला गोड, साऱ्या घरादाराला सांभाळून घ्यायची. स्वयंपाकात हुशार होती. कोणतीच बाजूनं कमतरता नव्हती. संसार मजेत चालला होता. शेजाऱ्या पाजाऱ्यांना हेवा वाटायचा. अशी सून आपल्याला मिळायला पाहिजे होती. कामाला वाघिण निघाली. स्वयंपाक, घरच्या कामातबी बाजिंदी होती. दिवसामागून दिवस लोटत होते. एकेक दिवस आनंदात जात होते. नवरा कारखान्यावर हाॅटेल घेऊन जाणार होता. 'त्याच्याबरोबर पाठवित्येत का नाही कुणास ठाऊक?' हा एक प्रश्न तिला एकांतात सलायचा. नेलं तर बरं व्हईल असं उगीचच वाटायच. मन सारख सैरभैर व्हायचं. 

  दिवाळी दसरा जवळ येत होता. ऊसतोड कामगारांचा संप झाला होता. मुकादमांनी संप केला होता. लवादानं भाववाढ केली होती. संप मिटला होता. मॅनेज झाल्त सगळं वरच्यावर. गाड्या कारखान्यावर निघाल्या. ट्रक, ट्रॅक्टर , भरून निघाले. रांगा लागल्या होत्या. इकडं कापूस येचायला माणूस भेटत नव्हता. तिकडं सगळ्या रस्त्याने लेबर चाललं होत. तिकडं फुल्ल हाॅटेल चालल. असाच बेत होता. अक्कीचा नवरा तिला न्यायला तयार होता. हाॅटेलचं सामान भरलं होत. मुकादमाला सांगितलं होत. जागा पक्की होती. गेल्यावर्षीचीच. त्यामुळ जास्त झंझट व्हणार नव्हती. सात आठ दिवसापुरता सीदापाणी घेतलं होतं. अक्कीला हे सगळं नविनच होत. पण नवऱ्याच्या सुख दुःखात सहभागी व्हावा लागतय. गाडीचं बिऱ्हाड गाडीत बरं असतय असबी होत. झालही तिच्या मनासारखंच. 

    दोन- तीन महिने सुखात गेले. नवऱ्याची संगत जरा वेगळीच वाटायला लागली. ब्याटाडाला फुर्रसान गुतल्यागत झाल्तं. कळाल तव्हाच मनात चर्र झाल. झाडाची पानगळ व्हावी. झाडावरची पाखरं एकाएकी उडून जावित. वावटळीत सापडल्यागत झालं. नवरा नको त्यांच्या नादाला लागला होता. एकदम शाॅक बसावा असं झालय. धाब्यावर जायचा. ढोसून यायचा. शिवीगाळ करायचा. 'हाकलून देईन!' म्हणायचा. 

   एक दिवस अक्कीचा नवरा मित्रांसोबत गेला होते. भरपूर ढोसली. कुणाचीतरी गाडी नेली होती. तोल गेला. एका भरधाव ट्रकने धडक दिली. चिंधड्या झाल्या. बोटीबोटी वेचली. अक्कीनं हंबरडा फोडला. धाय मोकलून रडली. मुकादमान शव गावाकडं आण्ल. अंत्यविधी झाला. अक्कीन दहा दिवस अन्नपाणी घेतल नाही. तब्येत ढासळली. दवाखान्यात सलाईन लावली. डॉक्टरनी वेगळच सांगितले. 'पाचवा महिनाय' म्हणून सांगितलं. अक्की पुन्हा एकदा हादरली. गाव सोडल... मामाकडंच ऱ्हातीय आता. मामालाबी हे कोडं सुटना काय कराव ? तेबी कळंना. दिवस लोटत व्हते. विधवा म्हणून. लोकं कसनुसे बघत.दुसरं कुठच जमायचा प्रश्न नव्हता. बाळाला जन्म द्यायचा का नाही? यावर बरच मंथन झाल. अक्कीनं निर्धार केला. 'बाळाला जन्म देईन मोठा करीन. त्याच्या आधारान जगेन! लोकं हिनवायला लागले. 'आधी आईबापाला गिळलं. आता नवऱ्यालापण संपविल. पोरीतच काहीतरी दोष आहे. उष्टी हळद अंगलाय. दुसाट्याचा नवरदेव पत्कारीन.' असं काहीबाही बोलायचे. अक्की गुमान ऐकून घ्यायची. दिवस सरले. अक्कीनं गोंडस बाळाला जन्म दिला...

  'हे देवा, मी काय पाप केलयं. माझ्याच नशिबी असं का यावं? लहानपणी नकळता बाप गेला. माय गेली. नवरा गेला. आता माझ्या आयुष्याच कसं होईल, देवा!' असं स्वतः शीच बोलत धुमसून रडायची. गावातले टोळन तिच्याकडं तिरक्या नजरेन बघायचे. 

     तरी मामा म्हणाला होता, ' काळजी करू नगस अक्के. बघू काही व्हईल त्ये. परत तुझे हात पिवळे करून दिईन. पण त्वा हिंमत हारायची न्हाय. सम्द ठिक व्हईल बघ.'

   अक्की अशी उदासवाणी राहत असलेली मामाला सहन व्हईना. अक्कीच दुसरं लग्न करून देण्याचा बेत आखला होता. दुसाट्याचा नवरदेव पाहिला होता. चालून आल्त स्थळ. पहिली अशीच अपघाती गेली होती जणू. एका दृष्टीने बरं होत. अक्कीचं एकाकीपण निघुन जाईल. 

     अक्कीला मामानं विचारल, ''अक्के बघ. त्यो वडगावचा पाव्हणा इचारतोय. मला त् बरं वाटतय. तुहा इचार सांग. आयुष्याचा इचार करं. न्हायी म्हणू नकू '' 

  अक्की ताडकन बोलली, '' मामा, आता म्या इचार बदललाय."

   "काय?" - मामा.

   " अशीच ऱ्हाईन मी आयुष्यभर. कुठबी मोलमजुरी करीन. पोराला मोठं करीन. मह्या अन्नापाण्याची तजबीज लागू देणार न्हाय. तुह्या घराचा आधार दी. मप्ल येगळं राहीन बघ, मामा. मामीलाबी तरास व्हणार नाही. लेकराकड पाहून जगन. "

   अक्कीचा निर्धार पाहून मामाला तिचा अभिमान वाटला. मामाने तिला चार पत्र्याची खोली बांधली. घराच्या बाजुलाच तिला वेगळं ठेवल.

     अक्की मोलमजूरीला जायला लागली. लहान बाळ दुडूदुडू धावयला लागलं. त्याच्याकड बघितल की अक्की सारं दु:ख विसरून जायची. चेहऱ्यावर आनंद दिसायचा. पण तो दीर्घकाळ टिकत नव्हता. गावातली कुणाची जोड देवाला, सासरी निघाली की तिच्यात खळबळ व्हायची. नवऱ्याची आठवण आली की गलबलून जायची. पुन्हा सावरायची. सुगीच्या दिवसात कामही भरपूर मिळायच. कुणातरी बायामाणसाच्या वसांगळी जावा लागायच. रातच्याला लवकर घर गाठावं लागायचं. विधवा बाई एकटी दिसली की लोकांच्या नजरा लगीच दुषित व्हत्यात! म्हणून जपावं लागायच स्वत:ला...

   अक्कीचं पोर्ग हळुहळू मोठ होत होत. शाळेतबी जायाला लागलं. मास्तरची शाबासकी त्याला मिळू लागली. 

   "सगळ येतय त्याला. सगळ समजत त्याला. हुशारेय तुमचा मुलगा." अस जिल्हा परिषद शाळेतल्या साखरेबाई तिला म्हणाल्या. तव्हा आपण एवढे कष्ट उपसतो, त्याच काहीच वाटलं नाही तिला. "बरं व्हईन् मव्हा ल्योक साहेब झाला तर." - मनाशीच बोलायची.

   दहावीपर्यंतच पोराचं शिक्षण झाल. पंधरा वर्षाचा काळ कसा लोटला तेच कळले नाही. गावात आशा वर्करच्या जागा निघाल्या होत्या पण अक्कीच शिक्षण नव्हतं. साऱ्या गावाचा इचार झालता. सरपंच कबुल झाले. मग भातावाल्या बाईच्या जाग्यावर अक्कीला घ्यायच ठरलं. मुलांना भात खाऊ घालणाऱ्या बाई बारावी सायन्स होत्या. त्यांना आशा वर्कर म्हणून घेतलं. अन् अक्कीला दुपारचा पोषण आहार शिजवायला. अक्कीची अडचण दूर झाली. दोन तीन शेळ्या केल्या. दुपारून त्या वळायच्या. अक्की आता गाव अक्की झाली. लहानापासून म्हताऱ्यापर्यंत सगळे अक्की अक्की करायचे. देवळातला स्वयंपाक असो नाहीतर कुणाचं लहान मोठा स्वयंपाक अक्की हजर. महाराजांच्या दिंडीचं स्वयंपाक नियोजन अक्कीकडंच. बोलका मनमिळाऊ स्वभाव. त्यामुळं अक्की कुणाच्याबी सुख दु:खाला हजर असायची. पोराला पुण्याला शिकविलं. तरी अक्कीनं हिंमत सोडली नाही. लढत राहिली. संघर्ष केला. गाव अक्कीन लहान थोरांची मन जिंकली होती. 

   अक्कीचा मुलगा चैतन्य नोकरीला लागला. तिनं साऱ्या गावभर पेढे वाटले. पाव्हणे आले. अक्कीच्या मामानेच जमविलं. वाजून दिलं. वरमाई व्हऊन लग्नात मिरत होती इकडं तिकडं. अक्कीच अखंड काम चालूच होतं. येती जाती झाली. पोराचा सोळावा झाला. पोर्ग सुनाला घेऊन जायचं म्हणू लागलं. अक्की म्हणाली, ''जा की घेऊन मग. मला त् न्हायी जमणार. इथं लेकरात बरं वाटतय. पोटापुरतं भागतय माझ."

पोराचा पसारा भरला. टेम्पोत.. पोर्ग चैतन्य आणि त्याची बायको टेम्पोच्या तोंडात बसले. टँपो धुराळा उधळीत निघुन गेला. पुण्याच्या दिशेने. गाव अक्की टेम्पोच्या वाटेने एकटक डोळ्याने पाहतच राहते... मव्हा ल्योक येईन म्हणते.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy