Vitthal Jadhav

Drama Others children

3  

Vitthal Jadhav

Drama Others children

लळा

लळा

7 mins
1.4K


'सर, हॅलो सरs'

'हॅलो.'

'सर, मी म्हादूची आजी बोलतेय.'

'कोणता महादू?'

'तुमचा विद्यार्थी...?'

'हाँss हाँss हाँ s बोलाs बोला.'

'म्हादू कालपास्न साळात जायनाय'

'का? काय झालय महादूला? काही आजारीय की काय?'

' नाय, आज्यारी-बिजारी न्हाय. पण जरा अंगात आणल्यावाणी करतोय. साळाचं नाव काढलं की तोंड मोडीतूय. डोंगराला पळतोय. नाहीतर मग नुसतंच भण्याभण्या हिंडतूय.'

' लागला का पहिल्यासारखं करायला?'

'हावं ना ..'

'तिथं आहे का महादू? फोन द्या बरं त्याच्याकडं.'

'त्यो घेत नाही. तिथं कुडाच्या आड लपून बसलाय. तुम्हाला तर माहितीय त्यो कसाय? अर्ध्या डोक्याचाय. जन्मताच बाप सोडून गेलाय. विना मायेचं पाखरू त्ये. आय बी जरा कमी डोक्याचीचय.'

' आता काय म्हणतोय महादू?'

' तुम्ही एकदा येऊन जा. महादूकडं. तुम्ही आणला होता त्याला ठेप्याला. त्याला जपत व्हतात. पण आताचे मास्तरलोक त्याच्या काय ओळखीचे वाटत नाहीत का काय? कुणास ठाऊक? पण त्यो सारखं बुजाल्यावाणी वागतोय? कुणाशी बोलत नाही. घरीबी थांबत नाही आणि शाळेतबी थांबत नाही. येळावर घासटुकडा खात नाही. सार्ख हिंडफिऱ्या कुत्र्यावानी फिरतय भण्याभण्या. त्याला पहिल्यासारखी फिट येतीय परत. घडीबर येऊन जावा. त्याला जरा समजून सांगा. तुमच्या भाषेत म्हणजे ठेप्यावर येईल उल्साक.

 महादू असला तर द्या त्याच्याकडं. मी बोलतो त्याला' मास्तर बोलत होते.

'त्यो तिकडंच कान पाडून ऐकतूय. मला असं जावा लागतय रानावनात. त्याची काळजी वाटते. त्यो घरात कुणालाबी जुमानित नाही. आता तळंबी आटलय. उल्सक डबकाड तेवढं. मासे थोडेफार हायीत. तेवढे झाले की मग संपलंच सम्द.'

'मी बघतो. इकडच्या शाळेवरून सुट्टी मिळाली की येऊन जाईल एखाद दिवस.'

'बघा, जमलं तर. काल तर म्हणत होता, त्याला तुमच्याच शाळेत जायचंय. तुमची बदली झाल्यापासून थाऱ्यावरच नाही. तुमची आठवण काढून रडतंय. त्याला खूप समजावलं पण त्याच्या काय डोक्यात उजेड पडानाय.'

' पडन् पडन् उजेड. लहान लेकरूय. त्याला काय कळतय अजून. हळुहळू नव्या सरची ओळख होईल. रूळलं शाळेत. रोज पाठवीत जा. लक्ष ठेवा त्याच्याकडं. जरा अवखळय तुमचा नातू. थोडा मानसिक स्थिरपण नाही.'

' बघते, पण तुम्ही येऊन जा. आमचं गरीबाच ऐका. त्यानं जरा धोसरा काढलाय म्हणून म्हणाल्येय.'

'बरं बघतो. ठेवू का?'

'ठेवा..'

'...'

    मोबाईलचे बटन दाबत सरांचा मोबाईल खिशात गेला आणि डमाळे मास्तरचे डोकेच बंद पडले. एकेक क्षण आठवायला लागला. मास्तरची बदली पिंपळवंडी शाळेत झाली होती. तेव्हा शाळेची अवस्था अनाथासारखी होती. एक शिक्षक, खरपुडे सर डेपोटेशन करून जिल्ह्याच्या शाळेवर गेले होते. पुढाऱ्यांच्या उबीला असल्यामुळं बाकी मास्तरवर बैलांनं डरकावा तसे डरकाळी फोडत होते. मधल्या सुट्टीत जेवणावर ताव मारला की साप बेडूक गिळल्यावर पडतो तसे पाय पसरून पडणारे मास्तर होते. पालक ते आमचं पोर्गच न्हायी. असं ऊपऱ्यासारखं वागायचे. गावातले टगे पुढारी शाळा म्हणजे कुरण समजायचे. दोन रुपये फंड आला की चौकशी करायला यायचे. मास्तरबरं कोंबड्यागत झुंजायचे. पाणीयोजना आम्हीच आणली म्हणायचे. आमदाराचं वजन वापरायचे. दरवाजे खिडक्या तेच मोडायचे. तेच दुरुस्त करा म्हणायचे. गाव पुढारी शाळेत मुतारीसुद्धा पाडायचे. विटा काढायचे. घरी घेऊन जायचे. शाळेच्या भिंतीला पडवीत गुरं बांधायचे. बैलगाड्या सोडायचे. घरी घेऊन जायचे. चुलांगण खांदायचे. लग्न शाळेतच लावायचे. सगळे कोळसे, राख, पत्रावळ, खरकटे शाळेच्या मैदानात टाकायचे. शाळेला सुट्टी असली की पत्त्यांचे डाव शाळेतच बसायचे.गावात ऊसतोडीसाठी जाणारे बरेच लोक होते. स्मशानागत गाव भासायचा. काही पोर्ह त्यांच्याबरोबर कारखान्यावर जायचे. ऊस तोडायचे. ते साताठ महिने तिकडेच. ते गेले की मग काही आजा - आजीकडं राहायचे. काही चुलत्या मालत्याकडं राहायचे. राहिलेल्या पोरांना सरकारी भोजनावळी, हंगामी वसतिगृह सुरू व्हायचं. त्यात हे गाव पुढारी हात धुवुन घ्यायचे. मास्तरवर दबाव टाकायचे. कुलपं लावायची धमकी द्यायचे. डमाळे मास्तर तिथं गेले आणि त्यांनी शाळेचा कायापालट करावयाचे ठरविले. शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेतली. त्यांना चांगल्या शाळांची माहिती दिली. चांगल्या लोकांशी संवाद साधला. मुलं हळुहळू बदलत गेली. नियमित शाळेला येऊ लागली. शाळेचा गणवेश बदलला. परिपाठ बदलला. तास नियमित होऊ लागले. लोक एकत्र यायला लागले. शिक्षक तळमळीने पुढे आले. शाळा उन्हाळ्यात रंगली. स्वतः हातात ब्रश घेऊन शाळा आकर्षक केली. मुलांना नाविन्य वाटले. गावात चर्चा व्हायला लागली. पेपरात बातम्या यायला लागल्या. नवीन उपक्रम सुरू झाले. गावचे तरुण मंडळ एकत्र आले. जुनी खोड बाजूला काढली. नवचैतन्य निर्माण झालं. संत, राष्ट्रीय नेते, कार्टून शाळेच्या भिंतीवर आली. खेळाच्या स्पर्धेत मुलं चमकली. चित्रकला, शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध परीक्षा यामध्ये मुलं क्रमांक मिळवत होती. एका शिक्षकाच्या कामामुळं हे घडत होतं. परिसरात शाळेचा दबदबा निर्माण झाला.

        महादू. भिल्ल वस्तीतला. त्यांचा मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय. शाळेत येत नव्हता. डमाळे मास्तरच्या ते लक्षात आले. महादू डोंगरावर जातो. महादू नदीवर जातो. महादू शिकारीला जातो. पण महादूचा पाय शाळेत कधीच रुतत नसे. तो पळायला लागला म्हणजे वार्याच्या वेगाने पळायचा. एका जागी बसने त्याला जमत नव्हतं. अंगात मळलेले कपडे. पोट छाती सताड उघडी. चड्डीला बटन नसायच. कुडाची हवा खाल्ल्यागत. तसा त्याचा वस्याट वास सुटलेला. दुसरे पोरं त्याला खंदुशावाणी करायचे. तो कोणाचच ऐकत नव्हता. आता इथे दिसला तर तो पाच मिनिटात डोंगरावर गेलेला असायचा. डमाळे मास्तरांनी हे हेरलं आणि त्याला हाक मारली.

' महादूss महादूss इकडे येs तुझ्याकडे काम आहे माझं.'

महादू जो पळाला तो काही आलाच नाही. शिक्षक लोक घाबरले. महादू काही केल्या परत आला नाही. त्याला शोधायला शाळेतील दोन- तीन शिक्षक आणि चार-पाच मुलांचा गट निघाला. महादूला सगळीकडे पाहिल. डोंगरावर पाहिल. तळ्यावर विचारलं. सारा माळ पालथा घातला. शेवटी दमले सगळे. सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. कारण त्याच्या आजीला अजूनही माहित नव्हतं. महादू हरवला होता. शाळेतून गायब झाला होता. त्याच्या आजीला काय उत्तर द्यायचं? कुठे असेल महादू? सगळे शिक्षक घाबरले. सूर्य कलला होता. शाळा सुटायची वेळ झाली होती. प्रत्येकाला घरी जायची गडबड होती. महादू सापडत नाही. साऱ्या गावात चर्चा झाली. आपलं काय होईल. असं प्रत्येक जण विचार करत होता. अचानक एका मुलाने बातमी आणली होती. ते धापा टाकत होतं. जीव निघून जावा अस झाल्त त्याला.

'सर महादू हायी!'

'कुठंय?' सगळे एका सुरात बोलले.

'हायी तिथं'

'आरं तिथं म्हणजी नेमकं कुठं?' शिक्षकांनी कुतुहलाने विचारले.

'चिंचाच्या दुबाळक्यात बसलाय. वरच्या बाजूला. पाल्यात लपलाय.'

'होय का?' - सर्वजण तिकडे धावली.

      महादू हिरव्या जर्द चिंचेच्या शेंड्यात. ऐटीत पाय सोडून बसलेला. वान्ह्यार बसल्यागत. कुणालाच सापडला नव्हता. सगळ्यांची हवा गुल झालेली. डमाळे मास्तरने नेमका हाच महादू हेरला होता. त्याला व्यवस्थित करायचा होता. महादू एक वेगळेच पात्र होतं. आगळं रसायन होतं. त्याला सांभाळणं एवढं सोपं नव्हतं. डमाळे मास्तर मात्र जिद्दीचे होते. शाळा सुधारत होती. पण अशी काही मुलं होती की शाळेचा आणि त्यांचा छत्तीसचा आकडा. मास्तरच्या रडारवर मात्र महादेव सर्वात पुढे असायचा. तो म्हणजे शाळेचा राजा. तो कधीही येणार, कधीही जाणार. त्याचा मालक तोच असायचा. वर्गात अजिबात बसायचा नाही. डमाळे मास्तर महादूला जवळ घ्यायचे. त्याला गोष्टी सांगायचे. त्याच्याशी सलगी करायचे. त्याच्याबरोबर खेळायचे. त्याला गाडीवर बसवायचे. चक्कर मारून आणायचे. त्याला रंगपेटी आणून दिली. चित्राची वही आणून दिली. त्याच्या समोर चित्र काढायचे. त्याला रंग द्यायचे. चित्रकलेची वही महादूने दोन दिवसात फाडून फेकून दिली. तर त्याला रागावले नाही. उलट महादूची कौतुकाने चौकशी केली. महादू गाणं म्हणायचा. मास्तर ऐकायचे. दुपारी जेवणाची सुट्टी व्हायची. मुलांना भात दिला जायचा. सर्व शिक्षक एकत्र जेवायला बसायचे. विद्यार्थी दुसऱ्या पडवीत बसायचे. सर घरून डबा आणायचे. मग महादूला मोठ्याने हाक मारायचे. चार दोन मुलांमध्ये महादूला हाक मारली की त्याच्या अंगावर मूठभर मास चढल्यासारखे व्हायचे. मास्तर मग त्याला जवळ बसवायचे. डब्यातली चपाती-भाजी त्याला द्यायचे. अप्रूप वाटायचं. खायचा. रानचं पाखरू जवळ आल्यागत झालं. दोघांची चांगली रास जुळली. मास्तर घरी जाताना. 'बाय सर' म्हणायचा. सकाळी पुन्हा वाट बघायचा. 'गुड मॉर्निंग सर' असा आवाज कानावर पडला की तो आवाज महादूचाच. महादू सकाळी लवकर हजर व्हायचा. सरच्या हातातला डबा घ्यायचा. चौकशी करायचा. ऑफिसमध्ये नेऊन ठेवायचा. मुलं कावरेबावरे व्हायचे. सरचा लाडका विद्यार्थी कोण? तर ‛येडा महादू’ असे कुजबुजायचे. डमाळे मास्तर कडून महादुला सन्मान मिळायचा. महादू हळूहळू मोठा होत गेला. त्याला आता कळायला लागले. पूर्वीसारखा वेड्यागत करत नव्हता. चांगला वागायला लागला होता. वळण लागले होते. डमाळे मास्तरांनी त्याला दिवाळीला कपडे घेतले. तो खूपच खूश झाला. महादेव शाळेत मस्तीत चालू लागला. सरचा लाडका म्हटल्यावर त्याला कोणी वाईट बोलत नसे. महादू बाराखडी शिकला. काना, मात्रा, वेलांटी, उकार शिकत होता. दहापर्यंत उजळणी काढता काढता शंभरपर्यंत उजळणी काढू लागला. अक्षरही वळणदार काढायचा. आवडीने लिहायचा. परिपाठाला, सर त्याला समोर घ्यायचे. त्याचा आत्मविश्वास वाढला होता. आपलं कोणीतरी शाळेत आहे. शाळा म्हणजे घर आहे. असं त्याला वाटायचं. एखादं काम सांगितलं रे सांगितलं की महादू पटकन पळायचा. काम पूर्ण होईपर्यंत त्याला चैन पडायचा नाही. पटरीवरून सरकलेली गाडी रुळावर आली होती. घरी सुद्धा आधीच ऐकत होता. बदल होत होता. उन्हाळ्याची सुट्टी लागणार होती. महादूच्या पोटात कालवाकालव होऊ लागली. नुकत्याच स्पर्धा पार पडल्या होत्या. रनिंग मध्ये महादूचा नंबर आला होता. बक्षीस पाहून खुश झाला होता. उन्हाळ्यात आपली शाळा आणि सर यांची भेट होणार नाही याची पुसटशीही कल्पना त्याला आली असावी. गुलाबाचं फूल सुकावं तसा त्याचा चेहरा झाला होता. घरी वेळेवर खायला मिळणार नव्हतं. हिडीस- फिडीस तर ठरलेलीच होती. डमाळे मास्तरला इतर सरांनी प्रश्न केला

'डमाळे सर'

'आँ.'

'तुमच्या महादूचं काय व्हायचं आता . उन्हाळ्याच्या सुट्टीत.'

'बघू ना..'

'न्याताय का त्याला तुमच्या गावाकडं?'

'उन्हाळ्यात शाळा रंगवायचं काम निघलं. गाववाले देतो म्हणाले पैसे. वर्गणी करून तर बघू की. मग शाळाला यावा जावा लागन.

'बघा'

'मग महादू आणि आम्ही.'

'व्हय..'

सगळे गप्प झाले. कोणीच काही बोलले नाही. एकदम शांत वातावरण झाले. एक मेचा झेंडा फडकला. आणि निकाल घोषित झाला. महादू पास झाला होता. वरच्या वर्गात गेला होता. तेव्हा डमाळे मास्तरांनी स्वतःच पेढे वाटले. पानगळती सुरू झाली होती. उन्हाचा पारा चढला होता. डोंगर बोडखे झाले होते. तलाव कोरडा ठाक पडला होता. भिंती निर्जीव दिसत होत्या. जनावर इकडून तिकडं चाऱ्यासाठी भण्याभण्या हिंडत होती. दुष्काळाची चाहूल लागली होती. माणसांना पिण्यासाठी पाण्याची टँकर सुरू झाले होती. डमाळे मास्तरांनी काळे हेडमास्तरला विषय काढला.

'आपण शाळा रंगवून घेऊ.'

'कशातून?' चष्मा डोक्यावर घेत हेडमास्तर बोलले

'वर्गणी करू.'

'बघू.' म्हणत एक मे संपला. सुट्टी लागली. शाळा रंगवायला काढली. पेंटर रोज यायचे. डमाळे मास्तर रोज यायचे. महादेवपण यायचा. एकेक चित्र भिंतीवर झालं की महादू त्यावर बोलायचा. डमाळे मास्तर, पेंटर यांना महादू पाणी आणून द्यायचा. त्यांच्यातच जेवायचा. उन्हाळा संपला. पाऊस थोडाफार पडून गेला. जोराचा वारा सुटला. पंधरा जून उजाडला आणि डमाळे मास्तर काही शाळेला आले नाहीत. दुसरेच कोणीतरी सर आलेत म्हणून गावात चर्चा झाली. शाळा उघडून सुरू होऊन आठ दिवस झाले. महादेव कावराबावरा झाला. त्याला मास्तरची आठवण येऊ लागली. डमाळे मास्तरची ऑनलाईन बदली झाली होती. त्यांच्या जागेवर त्यांच्या पेक्षा सिनियर सर आले होते. डमाळे मास्तर आता कधीच येणार नाहीत याची कल्पना महादुला आली होती.

सहा महिने झाले मास्तर आले नाहीत. म्हणून त्यांना हट्ट धरला. आजीकडे. आजीने समजूत घातली पण उपयोग झाला नाही. मास्तरही त्याच्याकडे धावले दोघांची भेट झाली. पण तात्पुरती... पुन्हा महादुला सोडून बदलीच्या गावाला निघाले.Rate this content
Log in

Similar marathi story from Drama