डॉ. आनंदीबाई जोशी
डॉ. आनंदीबाई जोशी


मी लहानपणी पाहिलेलं भारतमातेच चित्र अजूनही ठसठशीत माझ्या लक्षात आहे.
भारताच्या नकाशात साकारलेली आमची "भारतमाता"!
हसतमुख चेहरा तरीही डोळ्यात रक्ताचे अश्रू, लांबसडक काळेभोर विखुरलेले केस, डोक्यावर सोन्याचा मुकूट, पांढरीशुभ्र साडी भारतवासियांच्या रक्ताने माखलेली, हातात सोन्याच्या बांगड्या अन करकचून बांधलेले साखळदंड, पायांवर हिंद महासागराचं पाणी जणू तिला शांतच करत होतं की तिच्या पायांना बरबटलेल्या रक्ताच्या थारोळ्याला स्वच्छ करत होतं? अशी ती आमची स्वातंत्र्यापूर्वीची भारतमाता! पण, मला तर ती त्या काळातल्या स्त्रियांचं प्रतिकच वाटली.
परमेश्वराने स्त्री-पुरुष दोघांनाही निर्माण केलं, पण, हिंदुस्थानात (स्वातंत्र्यापूर्वीचा भारत देश हा हिंदुस्थान म्हणूनच ओळखला जायचा) स्त्री नावाचं कोणी जिवंत पात्र अस्तित्वात आहे हेच त्या काळातल्या लोकांना माहित नव्हतं, अश्याच अविर्भावात ते जगत होते. मुलं जन्माला येताच, पहिला प्रश्न केला जायचा, "मुलगा झाला ना? यावर मुलगी ऐकताच, जणू कोणी मेल्याच्या अविर्भावात रडून दु:ख साजरं करायचे. जन्माला आलेल्या कळीला उमलण्याआधीच श्रापित ठरवून मोकळं व्हायचं अन्, कोवळ्या वयात लग्न लाऊन मोकळं व्हायचं! नुकतंच कोशातून बाहेर पडलेल्या त्या फुलपाखराला उडण्याआधीच पंख छाटून, वेगळ्याच विश्वात ढकलून दिलं जायचं, ज्या वयात बागडायला हवं त्या वयात घरच्या जबाबदाऱ्या टाकल्या जायच्या, का? कुलीन स्त्रियांनी हेच करायचं असतं, यातच मान असतो. चुकूनमुकून पुस्तकांशी मैत्री केली गेली तर अंग सोलवटून काढलं जायचं, कारण त्या काळी शिक्षण हा फक्त पुरुषांचाच ठेका होता आणि स्त्रियांसाठी ते पाप होत. मग, मान-सन्मान, प्रेम-आपुलकी मिळणं तर दूरची गोष्ट होती. मग, ती स्त्री उच्चवर्णीय असो वा निच्चवर्णीय! गोठ्यातल्या जनावरापेक्षाही वाईट अवस्था स्त्रियांची होती. त्या जनावराप्रमाणे फक्त मुले जन्माला घालणे, आणि मूकपणे सगळं काही सहन करणे या करताच जन्माला येतात असा समज समाजाने करून दिला होता. वर्षानुवर्षे या भाबड्या स्त्रियांच्या डोळ्यांवर पाप अन् पुण्याच्या नावाने अशी काही पट्टी बांधली होती की ती गांधारीच्या प्रणाची आठवण दिल्याखेरीज राहत नाही.
या विश्वात फक्त एकच गोष्ट शाश्वत आहे ती म्हणजे, "बदल", हेच एकमेव त्रिकालाबाधित सत्य आहे. ज्यांचे मन आणि आत्मा अश्या क्रूर गोष्टींच्या विरोधात पेटून उठले, त्यांनी पुढाकार घेऊन स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवला. कुप्रथांविरोधात बंड पुकारलं. स्त्रियांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. शेवटी कितीही चिखल असला तरीही 'कमळ' उमलायचं थांबत नाही.
असंच एक 'कमळ' या हिंदुस्थानात उमललं, ''श्री. गणपतराव अमृतेश्वर जोशी'' यांच्या घरी! दिनांक ३१ मार्च १८६५ रोजी! ज्या माऊलीच्या उदरी ते फुललं होत त्यांचं नाव होतं, ''सौ. गंगाबाई गणपतराव जोशी". हिंदू परंपरेनुसार या कमळाचं नामकरण करण्यात आलं, "यमुना". यमुना म्हणजे खेळकर, खळाळत वाहणारी, जीवनदान देणारी, पवित्र नदी! किती सार्थक आहे हे नाव, तमाम भारतीय स्त्रियांना जीवनदान अर्थात नवं आयुष्य देणारी, नावातच भविष्याचा अर्थ असाच काही दडून असावा!