डॉ. आनंदीबाई जोशी भाग - २
डॉ. आनंदीबाई जोशी भाग - २
यमू अर्थात यमुना, लाडाने सारे तिला यमूच म्हणत. यमू सोन्याचा चमचा मुखात घेऊन जन्मास आली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण, यमूच्या वडिलांना त्यांच्या पूर्वजांकडून कल्याणजवळील गावे मिळाली होती. त्या काळी राजे खूश झाले की गावे, जमिनी इनामदारीत देत असत. यमूला चार भाऊ आणि पाच बहिणी असा मोठा परिवार लाभला होता. तरीही प्रत्येक मुलगी ही तिच्या वडिलांच्या काळजाचा तुकडाच असते, यमूसुद्धा तिच्या वडिलांची लाडकी होती. तिच्या बालमनाला पडलेले प्रश्न ते चुटकीसरशी सोडवून द्यायचे. ते काही असे...
यमूच्या घरी देवांची पूजा करण्यासाठी भटजीबुवा यायचे, तसं पहायला गेलं तर त्यांच्याकडे बरीच नोकर मंडळी होती, प्रत्येक कामासाठी नेमून दिलेली. यमू चार वर्षांची असेल, आपल्या बाहुल्यांशी खेळण्यात गुंग असणाऱ्या यमूने पाहिलं, भटजीबुवा देवांना अंघोळ घालत आहेत, खसाखसा चोळून आणि तरीही देवबाप्पा रडतं नाही की ओरडतदेखील नाही! मग, त्याच देवाला पुन्हा दुधाने अंघोळ घालून, चंदन, हळद कुंकू लावत आहेत…
हे पाहताच तिच्या लक्षात आलं, तिच्या निर्जीव बाहु
ल्या आणि देवांमध्ये काहीच फरक नाही! ती कावरीबावरी झाली, चिमुकल्या पावलांनी धावतपळत ती वडिलांपाशी पोहचली आणि म्हणाली, "बाबा! देवबाप्पाला चालतं का हो माणसांकडून अंघोळ करून घेणं?" हे ऐकून यमूचे वडील चपापलेच, घडलेला एकंदरीत सारा प्रकार ऐकून ते म्हणाले, "त्या मूर्ती देव नाहीत बाळ, माणूस जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा त्यांचे विचार, मन एकाग्र राहण्यासाठी त्या मूर्तींचा आसरा घेतो, त्यातल्या काही मूर्ती प्रेम दर्शवतात तर काही न्याय अन काही सर्जनात्मक शक्ती. बाळ, तू या मूर्तींशिवाय देवाची प्रार्थना करू शकशील का? यावर यमू पटकन बोलली, "नक्कीच करू शकते." यावर यमूच्या वडिलांनी म्हटलं, "मग, तू कधीच यांचा विचार करणार नाहीस, या मूर्ती तुझ्या काहीएक कामाच्या नाहीत."
या चिमुकल्या यमूने अवघ्या चार वर्षांची असताना जे बोललं ते आयुष्यभर निभावलं. यावरूनच दिसून येतं, यमू किती दृढनिश्चयी वृत्तीची होती. ते म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात! असंच काही इथे लागू होते. तिच्या निश्चयानेच तिने अवघ्या हिंदुस्थानातील स्त्रियांना उडण्यासाठी पंखच दिले जणू!