ढग-आठवणी-पाऊस आणि...
ढग-आठवणी-पाऊस आणि...
मित्रांनो... बऱ्याच दिवसांनी पुण्यात सकाळपासूनच आकाशात काळभोर ढगांची गर्दी झालील होती... रोजच्या सारखे मी डॉक्टरांच कॉल संपवून बाहेर पडत असताना खिडकीच्या बाहेर दुपारच्या दोन वाजताही अगदी संथपणे वाहणाऱ्या थंड वाऱ्यावर झुलणारी पिंपळाची पाने पाहून खूपच सुखद वाटली. मग काम बंद करून बाहेर येउन उभा राहिलो, एक गरमागरम कांदा भजी प्लेट घेतला... एरवी मला लहानपण, शाळा, पाऊस यांच्याविषयी बोलणं विचित्र आणि मूर्खपणाच वाटत असे पण या प्रचंड शहरात, माणसांच्या गर्दीत, नऊ-नऊ, दहा-दहा मजली इमारतींमध्ये, आपण येउन अडकलो हे वाईट कि चांगले हे कळायला मार्ग नाही.
मित्रांनो...इथली झाडं, जमीन, माती, पक्षी, प्राणी हे आणि आपल्या घरातल्या गुळाला आणि साखरेच्या डब्ब्याला लागलेल्या मुंग्या... यांनाही माझ्यासाराखच श्वास कोंडल्यासारखं वाटत नसेल का...? हा विचारही मनात रेंगाळून गेला... खरं तर आपणही या निसर्गाचाच एक भाग... अगदी या पिंपळाच्या झाडासारखं पण यांच्यात आणि आपल्यात एक फरक आहे, ते हे की माझ्यापेक्षा ही ते कितीतरी निरागस आहेत, लहान मुलासारखं... आणि आपल्याला राग, लोभ, मत्सर, वासना, तिरस्कार, एकटेपणा, धिक्कार, स्वाभिमान, दुख, आनंद, इच्छा, अपेक्षा, दया,करुणा, आकांक्षा असल्या कितीतरी अर्थशून्य आणि असले मानवी भावना आपला पाठलाग स्वप्नातही सोडत नाहीत....
मित्रांनो... जेंव्हा जेंव्हा पाऊस पडतो ना तेंव्हा मनाच्या कुठल्यातरी कानाकोपऱ्यात जपून ठेवलेला, लहान
पणीचा खेड गाव... नुकत्याच उगवलेल्या गवताच्या हिरवट कोवळी पाने, पात्यांसारखा डोळ्यासमोर येऊ लागतात. आई, बाबा, आजी, आजोबा, भाऊ, बहीण शेणाने सारवलेल्या ओसरीत बसून उसाच्या रासाबाबत चर्चा करणारे... काका आणि काकी, घरातला स्वयंपाकाचा धूर, धगधगणारी चूल, घरात आणि आंगणात वावरणाऱ्या त्यावेळच्या चुलत भावाबहिणींचे चेहरे, शेजारपाजारच्या आज्या, एकत्र जमून पापड्या, कुरडया, शेवया करणाऱ्या प्रेमळ बाया, उगाच माझा गालाला गच्च पकडून मला चिडवणारी त्यावेळची ती अनोळखी बाई... गावातल्या मारुतीच्या पारावर जमणारी माणसे आणि त्याचं हसणं, वावरणं, खिदळणं... असं ते नितांत सुंदर आणि शुद्ध पवित्र... असं जग एका चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर येऊन जात...
मित्रांनो... खरं सांगायचं म्हणजे या निवडक आठवणी सोडल्या तर आपल्याजवळ काहीच नाही, मग कशाला हा बालपणीचा भव्य डोंगर डोळ्यासमोर आणून आठवून आठवून पाण्याने भरून टाकायचा...? त्यापेक्ष्या त्याला जपून ठेवाव... आपल्या आठवणींच्या सुन्न काळोखात... झाडांच्या मुळासारख आणि त्यापासून ओलावा घेत जगत राहावं... या असल्या भावनेचा दुष्काळ असलेल्या दरिद्री शहरातले निरर्थक उच्चारण करत...
मित्रांनो... अश्याच त्या आठवणीत भिजून जात असताना, तासभरनंतर म्हणजे तीनच्या सुमारास परत उन पडायला सुरवात झाली... आणि मी राहिलेलं काम करण्यासाठी हातातला थंड झालेला कांद भझी संपवून परत कामासाठी गाडीची किक मारली... आणि कामात रमून गेलो...