आईची युक्ती
आईची युक्ती


एक छोटंसं नगर होतं. त्या नगरात एक ब्राम्हण राहत होता. एके दिवशी त्या ब्राम्हणाला काही कामानिमित्त दुसऱ्या गावी जायचं होतं. त्यानं जायची तयारी केली, त्याची आई त्याला म्हणाली, ' अरे, तु प्रवासाला एकटा का जातोयस ? कुणाला तरी बरोबर घेवून जा ना. अगं आई वाट जंगलातून जातेय, पण घाबरण्यासारखं काहीच कारण नाही. त्या जंगलात कोणी हिंस्त्र प्राणी नाहीत, किंवा चोर डाकूही नाहीत. आई म्हणाली. अरे,तरीसुध्दा कुणी बरोबर असलं तर बरं होईल. ब्राम्हण म्हणाला, चिंता करू नकोस गं आई आणि घाबरू सुध्दा नकोस. हे बघ आई मी एकटा जाईन आणि काम पूर्ण करून उद्या संध्याकाळ पर्यंत वापस येईल. तरी सुद्धा ब्राम्हणाची आई घरा जवळच्या विहीरीजवळ गेली अन विहिरीतून एक खेकडा घेवून आली. अन मुलाला म्हणाली हे बघ तू एकटा जाणं हे काही बरं नाही. ह्या खेकड्याला तुझ्या बरोबर घेऊन जा.
आईच्या समाधानासाठी ब्राम्हणानं तो खेकडा घेतला. त्याने त्या खेकड्याला कापराच्या गोळ्यामधे ठेवलं, मग त्या गोळ्या पिशवीत ठेवल्या. आणि तो लगबगीने घरातून निघाला. ते उन्हाळ्याचे दिवस होते. दुपार होईपर्यंत त्या ब्राम्हणाला उकाडा अगदी असाह्य झाला. त्याच वेळी त्याला समोर एक मोठं झाड दिसलं, ब्राम्हणाने विचार केला या झाडाच्या सावलीत थोडावेळ विश्राम करावा. मग ऊन कमी झालं की पूढे निघावं. झाडाखाली जावून ब्राम्हणानं शिदोरी सोडली. गुळपोळी खाल्ली अन् झाडाच्या सावलीत जरा आडवा झाला. खूप थकल्यामुळे त्याला शांत झोप लागली.
त्या झाडाच्या डोलीत एक साप राहत होता. साप डोलीतून बाहेर आला आणि त्याने ब्राम्हणाला पाहिलं. ब्राम्हणाजवळची पिशवी पाहिली. त्या पिशवीतून कापराचा सुगंध येत होता. कापराचा सुगंध तर सापाला खूपच आवडतो. त्यामुळे साप पिशवीच्या दिशेने आणखी पूढे सरकला. तो पिशवीत शिरला व कापराच्या गोळ्या खाऊ लागला. हे पाहून खेकडा भडकला आणि त्याने सापाला नांगी मारली. शेवटी साप तडफडून तडफडून मरून पावला. काही वेळाने ब्राम्हणाला जाग आली. त्यानं छानपैकी दोन्ही हात वर ताणून आळस दिला आणि त्याचे लक्ष पिशवीकडे गेले, पाहतो तर काय पिशवीजवळ काळाझार साप मरून पडला होता. त्याने विचार केला या खेकड्यानेच तर सापापासून आपला जीव वाचवला. त्याने मनोमन खेकड्याचे आभार मानले.
तात्पर्य:-
कधीही आपल्या आईवडीलांचे व वडीलधाऱ्या माणसांचे ऐकले पाहिजे.