Shrikant Kumbhar

Others

5.0  

Shrikant Kumbhar

Others

शाळा, मित्र आणि आठवणी

शाळा, मित्र आणि आठवणी

6 mins
3.3K


माझे शालेय जीवन अर्थात विद्यार्थी असतानाचा कालखंड. माझ्या आजच्या आठवणींच्या आधारे सांगायचा म्हणजे ते तसे सोपे मुळीच नाही. माझ्या आताच्या परिस्थितीचा आलेख तसा घेतला तर. मी युवा तरुण नागरिकत्व व्याखेत सहजतेने बसत असल्यामुळे, वयाच्या २८ व्या वर्षी शाळेचे दिवस आठवण करणे तसे अवघडही नाही. पण तसेच मजकूरदृष्ट्या आठवणे, आणि ते आहे तसे मांडणे खूप कठीण असले तरी. भावनिकदृष्ट्या हे खूप आनंदाचे आहे. या सर्व आठवणी सुखद अशा माझ्या बालपणाच्या दिवसातल्या आहेत.


माझे वडिलांचा सोलापूर येथे स्वतःचा छोटासा व्यवसाय म्हणजे चारचाकी ढकलगाडी होती. त्यातून ते ऊसाचा रस गावभर फिरून विकत असत. या काळात सोलापूर तसा दुष्काळग्रस्त विभाग म्हणून ओळखला जायचा. अश्याच दुष्काळग्रस्त परस्थितीत माझ्या शालेय जीवनाचा प्रारंभ झाला. शांतिनिकेतन प्रशाला सोलापूर, १७ जून १९९९ माझा शाळेचा पहिला दिवस. त्यावेळी या भागात बऱ्याच भाषेचं मिश्रण असल्यामुळे माझ्या वर्गात बऱ्याच भाषेची मुलं शिकायला दाखल झाली होती. त्यातील काही मोजकी १५ ते १६ माझे मित्र बनले.


मला आठवतं त्यावेळी आजच्यासारख्या प्रगत शाळा तितक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या. पण त्यावेळी मोठ्या श्रीमंत घरातील वा साधारण परिस्थिती असलेल्या घरातील मुले असो. वा नोकरदार मंडळींची मुले असो या सर्वांची शाळा एकच. सरकारी शाळा किंवा मदरसा, या शिवाय लहान वयात घोकमपट्टी, उपायाने उजळणी आणि पाढे पक्के करून घेणाऱ्या खासगी शाळा असत. या शाळेतील भोसले–मास्तर रुद्रावतार धारण करूनच, छडी किंवा फोक उगारून भेदरलेल्या मुलांच्याकडून पाढे म्हणवून घेत. उजळणी करून घेत. तोंडाने अंक, पाढे, मुळाक्षरे न दमता म्हणवून घेण्याची पद्धत. छडी मास्तरांची अत्यंत आवडीचे असे. या मास्तरांनी छडीने आमच्या हातावर उमटलेले वळ, भोसले मास्तरांनी मुस्काडीत मारल्याची गालावरची पाच बोटाची खूण, घरी आल्यावार आमच्या पालकांना दाखवण्याची पद्धत नव्हती. उलट त्या काळच्या तमाम तीर्थरूपांचा आमच्या मास्तरांच्या टीचिंग विथ छडी या मेथडला पूर्ण पाठिंबा असे.


सोलापूर तसा मोठा प्रसिद्ध जिल्हा होता. इथली कापडदुकाने लग्नाच्या बस्त्यासाठी खूप प्रसिद्ध होती, इथे चादरीचा बाजार पण खूपच मोठा होता, त्यामुळेच वडिलांचं त्या बाजारपेठेत असणं महत्वाचं होतं, कारण लोकांची वर्दळ, आजुबाजूला व्यापाऱ्यांची दुकानं, समोर मोकळ्या जागेत चादरीच्या गाठी पडलेल्या असायच्या. या चदरीच्या आजुबाजूला आम्ही पोरं लपंडाव खेळायचो, मोकळ्या केलेल्या चादरीच्या गाठींवर लोळी-लोळी खेळायचो. रसवाल्याच्या पोराला सगळीकडे फिरण्याची, खेळण्याची परमिशन असायची कारण बाजारपेठेतील सगळ्या व्यापाऱ्यांचे बाबांशी रोजच काम असायचे. त्यांचे मुनीम लोक मला आणि पोरांना ओळखत. या ओळखीमुळे मार्केटयार्डमध्ये संध्याकाळी आणि सुट्टीच्या दिवशी आम्ही धिंगाणा, आरडाओरडा केला तरी कुणी रागवत नसत. मेहनती हमाल लोक पाहून हसत. खेळा रे खेळा पोरांनो, असेच त्यांच्या हसण्यातून आम्हाला कळायचे.


आमचे पारिवारिक डॉक्टर स्नेही कुटुंब होते. त्यांचा घरी गेलो की त्यांच्या मुलांच्यासोबत आम्ही दवाखाना-दवाखाना हा खेळ खेळायचो. त्यांच्याच दवाखान्यातील औषधी बाटल्या, इंजेक्शनच्या सिरींज, गोड गोळ्या, सिरप या वस्तू असत आणि आमच्या घरी ही मंडळी आली की आम्ही दुकान-दुकान हा खेळ खेळायचो. त्यावेळी काही छोटी नाणी, चाराणे- आठाणे, २५ पैसे, ५०पैसे बंद झाले होते, ही चिल्लर नाणी मिश्रधातूची होती, वापरातून बाद झाल्यामुळे त्यांची किंमत शून्य, मग ही चिल्लर नाणी, खोटे पैसे घेऊन आम्ही आमच्या दुकान-दुकान खेळायचो. खरे पैसे घेऊन आमच्या खेळात गम्मत आणीत. या पैश्यांनी एक मोठा धडा शिकवलाय. वापरात असाल, उपयोगाचे असाल तोपर्यंतच तुमची किंमत... निरूपयोगी झालात तर फक्त शून्य अस्तित्व.


या प्राथमिक शाळेतला एक वर्गमित्र पुढे पंढरपूरला २०१४ साली कॉलेजमध्ये क्लासमेट म्हणून पुन्हा भेटला. अलीकडची त्याची भेट सुमारे १० वर्षांपूर्वी झाली. असो. १९९९-२००९ पर्यंत तर सोलापूरला शाळा झाली. सोलापूर तसा २८ वर्षांपूर्वीसुद्धा एक मोठा जिल्हा होता, कर्नाटक - पुणे - मुंबई रेल्वेरूटवर “सोलापूर” हे रेल्वे स्टेशन. पहिली ते दहावी हे माध्यमिक शिक्षण या सोलापूर जिल्ह्यात झाले. त्यानंतर २०११ पासूनचे शिक्षण पंढरपूर येथे झाले. जडणघडण होण्याच्या या काळात अनेक भाडेकरू असलेल्या चाळीत राहताना अनेक व्यक्ती आणि कुटुंबांचा सहवास घडला. सामूहिक सहवासाचे बहुमोल संस्कार याच काळात झाले. एकट्याने रहाणे म्हणजे मोठीच भयानक शिक्षा, हे मनावर पक्के ठसले.


सोलापूरला जानेवारीमध्ये १४ तारखेपासून गड्डा यात्रा चालू होत असे. म्हणजे सोलापूर सिध्देश्वर यात्रा... खूप फेमस होती, या निमित्ताने महिना-पंधरा दिवस या यात्रेच्या परिसरात भटकंती करण्यात खूप मजा येत असे. यात्रा सुरु होण्याच्या दिवशी शहरातून मिरवणूक निघत असे.त्यात पहिला दिवस सिद्धेश्वर यांचे अक्षता. दुसऱ्या दिवशी होमहवन आणि तिसऱ्या दिवशी मध, दारूगोळ्यांच्या लखलखत्या दिव्यांचे प्रकाश... डोळ्यांचे पारणे फेडणारा असे. या मिरवणुकीसोबत शहरातील सोलापुरी बँड आणि सोलापुरी डी जे बँड यांची जुगलबंदी चालायची. एकेका चौकात घंटा-घंटा फिल्मी गाणी अशी काही वाजवत की रेडिओवरचे गाणे जसेच्या तसे ओठावर यायचे.


यात्रेच्या काळात दिवसा दोन नामांकित चादरीच्या कंपन्यांच्या मोठ्या सजवलेल्या गाड्या गावभर फिरायच्या. "पुलगम टेक्सटाईल" ट्रकवर काचेच्या मोठ्या पेटीमध्ये नक्षीदार भले मोठे चादरीचे विविध प्रकार त्यात दिसायचे, आणि तो गेला की दुसरी गाडी "गंगाजी चादर" येत असे. या गाडीत सोनेरी रंगात नक्षीदार काम केलेल्या चादरी असायच्या... हे चादर जाहिरातवाले ट्रकमधून १० नॅपकिन असलेली छोटी बंडले उधळीत जात, ट्रकमागे पळत असलेली पब्लिक हे नॅपकिन्स जमा करीत असे. 


कोर्ट, जिल्हा परिषद, तहसील, पंचायत समिती, मोठा दवाखाना... यांच्या भोवताली, विशेषतः मागच्या बाजूने फिरून... माचीस डब्या, सिगारेटची रिकामी पाकिटे... गोळा करण्याचा त्यावेळचा पोरांचा आवडता छंद. हा उद्योग मीपण केला... पण या सरकारी ऑफिसातील लोकांनी मला हा उद्योग करतांना पाहिले आणि थेट वडिलांना माझ्या उपद्व्यापाची कहाणी तिखट-मीठ लावून सांगितली, याचा परिणाम... वडिलांनी या काका लोकांना सरळ परवानगी दिली की, हा पुन्हा तिकडे दिसला तर... दोन मुस्काडात ठेवून द्या, आपोआपच हे क्षेत्र वर्ज्य झाले.


पतंगाच्या दिवसात... भारी पतंग, भारी मांजा, मांजा करण्यासाठी सिक्रेट फार्मुला हे कारनामे... मारामारीपर्यंत होणे अटळ होते. ते त्याच पद्धतीने झाले. काटलेल्या पतंगाचा मांजा गच्चीवर जाऊन लुटणे - हे कोणत्याही खजाना लुटीइतकेच थरारक होते. मांजा करणे म्हणजे हात आणि बोटे रक्ताळून जायची. पण मांजा बेस्ट झाल्याच्या खुशीत त्याचे काही वाटायचे नाही. बरं ते असो. मी शालेय जीवनात एक वाचक म्हणून घडलो, शाळेचे वाचनालय आणि श्री दत्त सार्वजनिक वाचनालय ही दोन ठिकाणे माझ्या अतिशय आवडीची होती. सोलापूरचे हे वाचन संस्कार माझ्यातील आजच्या साहित्यिक होण्याची सुरुवात होती. सातवी की आठवी या वर्गात असतांना मराठीत एक धडा होती - "हुंडाबळी एक श्राप की वरदान" याचे शाळेत नाटक सादर झाले. या नाटकात मी खोकल्या आजोबा झालो होतो, नाटक आणि भूमिका हे फक्त या निमित्ताने अनुभवले.


दहावी पास झालो आणि माझं शालेय जीवन संपलं... त्या पुढील शिक्षणासाठी मे SVCS Juniour College ला सोलापूरमध्ये प्रवेश घेतला. पुढे दोन वर्ष इथेच शिकलो. या वर्षात कॉलेजला झालेल्या प्रत्येक वक्तृत्त्व स्पर्धेत मी भाग घेतला. आपले भाषण इतरांपेक्षा नेहमीच वेगळे पाहिजे. हा अभ्यास मी या शाळेत शिकलो. HSC पास झालो आणि पुढे काय हा प्रश्न पडला. मी औषधनिर्माणशास्त्र शिकायचं ठरवलं.


सोलापूर जिल्ह्यात वाढलेलो मी एकदम गोपालपूर गावामध्ये आलो. सरकारी यादीला नाव लागल्यामुळे पंढपूर सोडून दुसरीकडे प्रवेश घेण्यास थोडा त्रास होत होता म्हणून तिथेच प्रवेश घेतला. आत्ता नवीन कॉलेज श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरचे कॉलेज ऑफ फार्मसी. माझे त्या वेळेसच्या वर्गातील १० मित्र, आज पुण्यात वास्तव्यास आहेत, २०१७ -२०१८ मध्ये एका मित्राच्या चौकस - उपद्व्यापामुळे आमचा एकमेकाला शोध लागला, आणि आम्ही आता २-३ महिन्यांनी आठवणीने भेटतो. या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये आम्ही इथले वर्गमित्र मिळून मुंबईला गेलो तिथे अजून १०-१५ मित्र... "बॅक बेंचर्स" हे टोपणनाव "शोधा म्हणजे सापडेल"... स्कीममुळे सापडले. आम्ही सर्व मित्रांनी शाळेच्या आठवणी जागवल्या... आणि मैत्रीचा सुवर्णमहोत्सव तिथे दहा दिवस साजरा केला. 


मित्रांनो... यात एक दिवस आम्ही आमच्या त्यावेळच्या दोन-तीन गुरूंना शोधून काढले. त्यांच्या घरी जाऊन आलो. गुरूंचे - खरोखर गुरुपूजन केले, सत्तरीच्या जवळ असलेल्या या गुरूंच्या आणि त्यांच्या कुटुंबीयाच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू पाहून आम्हालापण आमचे अश्रू अनावर झाले होते, या गुरुजनांसमोर त्यांचे माजी विद्यार्थी जे सगळे... २५ प्लस वयोगटातील, मोठ्या आदरयुक्त भावाने हात जोडून उभे होते. आम्ही मित्रांनी केलेला हा उपद्व्याप इतका आनंददायक असेल... कल्पना केली नव्हती... पहिली ते बी.फार्मसी होईपर्यंतच्या माझ्या पूर्ण शिक्षणकाळात माझे वडील शाळेत माझ्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये आले आणि त्यांनी सरांची भेट घेतली, असे १९९९ ते २०१५ .म्हणजे १६ वर्षांत कुठेही कधी घडले नाही.


मित्रांनो... एकच एक गाव आणि एकच एक शाळा, अशी दीर्घ आणि घट्ट मैत्री, असे मी अनुभवले... पण वेगवेगळी गावं, विविध कॉलेज, तऱ्हेतऱ्हेचे मित्र... आणि मैत्रीची विविध रूपेपण मी अनुभवली, या अनुभवांनीच मला घडवले.


Rate this content
Log in