धर्म - दिव्यांची आमवस्या....
धर्म - दिव्यांची आमवस्या....


खरे तर तिथीनुसार या दिवसाचे अधिकृत नाव ‘आषाढी अमावस्या’ असे असले तरी "गटारी अमावस्या" हे नाव माणसांचे गैर वर्तन पाहता एवढे समर्पक आहे की, जुने नाव लोकांच्या पार विस्मरणातच गेले आहे. कॅलेंडरवरही ‘गटारी अमावस्या’ असे छापले जाते, त्यावरून याची कल्पना यावी.
आषाढी अमावास्या “ तमसो मा ज्योतिर्गमय ”, असा संदेश देणारी, मंगलमय अशी मानली जाते. हा दिवस ‘ दिव्यांची अमावास्या’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दीपपूजा केली जाते. कणिक वापरून केलेले गोडाचे दिवे या दिवशी केले जातात. देशावर काही ठिकाणी बाजरीचेही दिवे केले जातात. दूधा-तुपा सोबत गोडाच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी जिवती पूजनही करतात.
श्रावणमास सुरू होण्यापूर्वी येणारी ही अमावस्या दीपपूजनाचा दिवस म्हणून पण ओळखली जाते. पूर्वीच्या काळी अंधारात आधार देणार्या मिणमिणत्या पणतीपासून ते लामणदिवा- कंदीलापर्यंत सगळ्या दिव्यांची ह्या दिवशी पूजा केली जात असे. आदल्या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची स्वच्छता करून त्यांना लख्ख करून ठेवलं जायचं. मग आजच्या दिवशी सगळ्या दिव्यांना पाटावर मांडून त्यासमोर रांगोळी काढून, गंध- फुलांनी त्यांची मनोभावे पूजा केली जात असे. गुळ- फुटाणे- लाह्या यांचा नैवेद्य दाखवून ‘दिव्याची कहाणी’ वाचून ह्या पूजेची सांगता होत असे. ह्या सगळ्या दिव्यांमधे मान असतो तो गुळ घालून केलेल्या कणकेच्या दिव्यांचा. हे दिवे वाफेवर बनवून नंतर पुजेत मांडले जातात.तसंच ह्या पुजेसाठी बाभळीची फुलं वापरली जात असत... अशाप्रकारे, काळामिट्ट अंधार उजळून टाकणार्या ह्या चिमुकल्या सूर्यदूतांची पूजा करून त्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जात असे. या दिवसाची एक राजा आणि त्याच्या सुनेची ‘साता उत्तरी सुफळ संपूर्ण’ कहाणीही वाचायला मिळते. पण गेल्या काही वर्षांत आपण मात्र या अमावस्येला गटारी ठरवून, जणू काही भरपेट मांसाहार आणि मद्यसेवन करून गटारीत लोळण्यासाठीच असलेली अमावस्या असे तिला रूप देऊन टाकले आहे. आषाढी अमावस्येनंतर श्रावण सुरू होतो, त्यामुळे मांसाशन वर्ज्य मानले जाते. पुढच्या महिन्याभरात ते मिळणार नाही, ते आताच वसूल करून घेण्याकडे आपला कल असतो.. मांसाहार हा कदाचित आहाराचा अपरिहार्य भाग असेलही; पण मद्यसेवन हा अपरिहार्य भाग कसा असू शकतो….?
दुसरा दिवस म्हणजे श्रावण महिना.. हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे...श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जैन धर्मियांची परंपरा आहे.
श्रावण महिना हा प्रेम आणि प्रजनन काळ मानला जातो. ह्या काळात मासे तसेच इतर पशु, पक्ष्यांमध्ये गर्भधारणेची संभावना असते. कुठल्याही गर्भवतीची हत्या करणे हे हिंदू धर्मात पाप मानले जाते... कुठल्याही गर्भवती जीवाला खाल्ल्याने मानवाच्या शरीरात काही हार्मोनल समस्या देखील उद्भवू शकतात. पावसाळ्यातील वातावरण हे दमट, ओलसर असते. या वातावरणात मांसावरील बॅक्टेरिया वेगाने वाढतात. उन्हाळ्यात उष्णता, सूर्यप्रकाश यामुळे बॅक्टेरिय़ा वाढू शकत नाही. मात्र पावसाळ्यात हे जीवाणू आणि विषाणू वेगाने वाढतात. त्यामुळे पावसाळ्यातला म्हणजेच श्रावणातला मांसाहार हा अनेक रोगांना आमंत्रण देणारा ठरू शकतो... तसेच ह्या काळात मासे प्रजनन करत असल्याने जर मासे खाणं चालू ठेवले तर माशांच्या प्रजाती संपून जाण्याची देखील भीती असते. त्यामुळे वर्षभर खाण्यासाठी नवे मासे जन्मावेत, यासाठी श्रावणात मासे खाणं वर्ज्य मानले जाते... पावसाळ्यात शरीराचे तापमान वाढणे शरीरासाठी खूप घातक ठरू शकते. त्यामुळे पचनात व्यत्यय येऊ शकतो, हृदया संबंधी आजार होऊ शकतात, शारीरिक दुखणे उद्भवू शकते. त्यामुळे ह्या महिन्यात मद्यपान करणे वर्ज्य मानले जाते... तसेच श्रावण महिन्यात ब्रम्हचर्य पाळण्याचेदेखील सुचविले जाते. कारण ह्या महिन्यात स्त्रिया खूप मोठ्या प्रमाणात उपवास आणि पूजा- अर्चना करतात. त्यामुळे त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो, त्या कमकुवत होतात. अश्या स्थितीत गर्भधारण करण्यासाठी त्या शारीरिक दृष्ट्या सक्षम नसतात, तसेच होणारे बाळ देखील शारीरिक दृष्ट्या कमकुवत असते. त्यामुळे ह्या काळात शरीर सुख उपभोगणे देखील वर्ज्य मानले जाते... ठराविक वातावरण, जंतू, ऍलर्जीच्या सान्निध्यात असण्यामुळे कालांतराने शरीरात ठराविक बदल घडून येतात. ज्यानं शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते. यामुळे उर्वरित पावसाळ्यात आजारी पडण्याचा धोका कमी होतो.