डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
वर्गात गुरुजी गणित शिकवत होते... सम आणि विषम संख्या... समसंख्या कोणती... विषमसंख्या कोणती ते उदाहरणसह समजावून सांगत होते.
गुरुजींनी विचारले : 'समजले का सर्वाना?... ' मुलांचे गुरुजींच्या शिकवणीकडे लक्षच नव्हते. त्यामुळे गुरुजी चिडले... सगळ्या मुलांना शिक्षा करायला लागले... भीमा नावाचा एक विद्यार्थी मात्र बाणेदारपणाने गुरुजींना, म्हणाला, 'मला गणित समजले आहे... माझे तर तुमच्या शिकवण्याकडेच लक्ष होते... मग मी शिक्षा का म्हणून घेऊ?...’
त्याच्या बोलण्याचा गुरुजींना राग आला. चिडून ते म्हणाले, 'तुला गणित समजलं?
हो गुरुजी.
तुझे लक्ष फळ्याकडेच होते ?
हो गुरुजी : मग हा घे खडू आणि फळ्यावर सम आणि विषम संख्याची पाच उदाहरणे लिहून दाखव.
... गुरुजींनी त्याचेकडे फेकलेला खडू भीमाने अलगद झेलला आणि तो फळ्याकडे जाऊ लागला... तेवढ्यात वर्गातील सगळी मुले उठली... धावपळ करत लगबगिने फळ्याकडे गेली आणि फळ्याच्या मागे ठेवलेले त्यांचे जेवणाचे डबे त्यांनी तेथून काढून दुसरीकडे ठेवले.... का? तर भीमाच्या स्पर्शामुळे त्यांचे डबे बाटतील... भीमाने ते पाहिले... तो मनात म्हणाला.. मी खालच्या जातीत जन्मलो असलो तरी मी पण माणूसच आहे ना ? मग यांच्या जेवणाच्या डब्यावर माझी सावलीसुद्धा पडू नये असे का वाटते यांना? कोणी शिकवले या मुलांना हे अवघड गणित ?
भीमाने फळ्यावर सम संख्या आणि विषमसंख्या अचूक पणे लिहिल्या ... गुरुजींनी शाबासकी दिली... परत आपल्या जागेकडे जाताना भीमा म्हणाला , 'गुरुजी... फळ्यावरचे गणित मला समजले पण फळ्यामागचे गणित मला नाही उमजले हो... समसंख्येचा हिशेब मला अचूक जमला पन 'विषम’ संख्याचा हिशेब मला नाही उलगडला हो...!'
भीमा म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891रोजी महू या गावी झाला वडिलांचे नाव सुभेदार रामजी सकपाळ आईचे नाव भीमाबाई....भीमाबाईचा पुत्र म्हणून भीमराव नाव ठेवले.
भारतरत्न डाॅ. आंबेडकर म्हणजे करोडो उपेक्षित दलितांचे प्रेरणास्थान करोडो भारतीयांचे स्फुर्तीस्थान विचारवंत समाजसेवक राजकाणी संपादक दलितांचे उद्धारक बुद्धीवादी समीक्षक अर्थतग्या घटनाकार संघटनकुशल इतिहास घडवणारे महामानव भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर!
पिढ्यानपिढ्या ज्यांच्या गळ्यातील निर्मितीचा आवाज गोठला होता तो मोकळा झाला डाॅ. आंबेडकरांमुळे परंपरेने, रूढीच्या साखळदंडात बांधून ठेवलेला कैदी मनोवृतीच्या माणसांच्या मानवमुक्तीचे प्रवेशद्वार म्हणजे डाॅ आंबेडकर!
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणारे मुक्ति मानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर!
भारतभूमीचे निळे बुद्ध कमळ समतेचे सत्य प्रज्ञेचे पाईक शील आणि करुणेचे महासागर दलितांचे लाचार अस्तित्व नाकारून त्यांना अस्मिता देणारे डाॅ. आंबेडकर!
माणसाच्या मुक्तीसाठी मन, मस्तक आणि मनगटाचा मिलाप घडवणारे महामानव डाॅ. आंबेडकर!
भारतभूमीच्या गावकुसाबाहेर विस्थापित झालेल्या मूलनिवासी, आदिमवासी, आद्यनिवासी अनंत आशा आकाक्षांना समाजकारण आणि राजकारणत 'प्रतिस्थापित' करणारे डाॅ. आंबेडकर!
जाति-धर्म-वर्ण भेदाच्या साखळदंडाच्या गुंतवळ्यातून शृंखला नसलेले स्वतंत्र माणसांचे जग निर्माण करणारे डाॅ.आंबेडकर!
परिवर्तनाची पायावाट निर्माण करणाऱ्या प्रकाशपावलांना पूर्ण, संपूर्ण, स्वयंपूर्णबनवणारे डाॅ. आंबेडकर!
नाशिकच्या काळाराम सत्याग्रहातून दलितमनात स्वातंत्र्य सूर्याची उगवती साकारणारे डाॅ. आंबेडकर!
एका हाताने आपले हक्क हिसकावून घेणारे आणि दुसऱ्या हाताने कर्तव्य करणारा सुजाण भारतीय नागरिक घडवणारे डाॅ. आंबेडकर!
दुःखाच्या रात्री कडाडत्या विजाना जन्म देऊन अंधारलेली मन उजळवून टाकणारे डाॅ. आंबेडकर!
14 एप्रिल म्हणजे मानवमुक्तीचा स्वातंत्र्यदिन आणि
6 डिसेंबर म्हणजे मुक्त मानवाचा प्रजासत्ताकदिन
अशी नवी परिभाषा पेरणारे डाॅ. आंबेडकर!
