Daddy's little princess!!!
Daddy's little princess!!!
कावेरी सकाळी जरा उशिराच उठली. चहा-नाश्ता झाला, तिच्या आईची जेवणाची तयारी सुरू झाली. ती उगीचच इकडून तिकडे, तिकडून इकडे करत होती. तिच्या मनात अजून विचारांचा गोंधळ चालू होताच. ती मध्येच वर्तमानपत्र चाळत होती. एवढ्यात फोन वाजला, तिची आई किचनमधून बाहेर आली, कावेरीने फोन उचलला आणि कानाला लावला. आई खुणेनेच कोणाचा फोन आहे हे विचारात होती. काल पाहायला आलेल्या मुलाचा आहे का? विचारत होती. कावेरीने मानेनेच आईला, हो प्रतिकचाच फोन असल्याचं सांगितलं आणि त्याच्याशी बोलू लागली. दोन मिनिटात दोघांचं संभाषण संपलं. तिची आई तिला, काय झालं? काय बोलला तो हे विचारात होती.
"तो आज भेटायचं बोलला होता ना!!! भेटायला जातेस ना तू? कुठे भेटणार आहात तुम्ही दोघे आणि किती वाजता? अगं!!! सांग ना... बाई..." कावेरीच्या आईची चिडचिड होत होती.
"अगं आई, दमाने घे. जवळच्याच The cafe cream या कॉफ़ी शॉपमध्ये भेटुयात बोलला असं सांगितलं आहे त्याने." कावेरीची चिडचिड होत होती.
आई तशीच कावेरीच्या बाबांना ही बातमी सांगायला गेली. पण ती अजुनही त्याच अस्वस्थ मनःस्थितीत टीव्हीचा रिमोट घेऊन बसली होती. काय बोलायचं काय नाही. खूपच डोक्यात विचा्रांचं काहुर माजलं होतं.
ती तयार झाली आणि कॉफी शॉपकडे निघाली पण घरातून निघताना तिला थोडा उशीरच झाला. आईच्या सुचना काही केल्या संपत नव्हत्या. ती कॅफेमध्ये गेली पण तो कुठे दिसतच नव्हता. मग शेवटी तिने त्याला फोन लावला, रिंग जात होती, कपाळावरचा घाम पुसत ती त्याने फोन उचलायची वाट बघत होती…
तेवढ्यात मागून आवाज आला, “हाय... सॉरी सॉरी मला थोडा उशीरच झाला, तुम्हाला खूप वेळ वाट तर बघावी नाही लागली ना?” तिने मानेनेच नकार दिला. मग त्याने कोपऱ्यातील एक टेबल निवडलं जेणेकरून दोघांना व्यवस्थित बोलता येईल. दोघेही अगदी जुजबीच बोलत होते. ऑफिस कसं चाललंय? वगैरे वगैरे…
ती जास्त बोलत नव्हती. प्रतिकने कॉफी ऑर्डर केली. ती कुठून बोलायला सुरूवात करू याचाच विचार करत होती… तो पण जरा शांत स्वभावाचा होता त्यामुळे मुद्यावर कोणीच यायला तयार नव्हते. सगळा कसा प्रोफेशनल ऑफीसमधल्या एटीकेट्सप्रमाणे चालू होते. तो तिची चलबिचल न्याहाळत होता. तिची घालमेल त्याच्या लक्षात येत होती. तो शांतपणे कॉफी पीत होता…
“कॉफी गार होतेय, नाही आवडली का तुम्हाला? दुसरी सांगू का तुमच्यासाठी?” प्रतिकने विचारले.
तिने नको सांगितलं आणि कॉफीचा कप तोंडाला लावला. शेवटी त्यानेच विषय काढला. “मला माहीत आहे हे असं भेटून एकमेकांना पारखणे खूप कठीण काम आहे. पण माझ्यावतीने मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. आई-बाबाना तुम्ही पसंत आहात आणि मला पण."
कावेरीने आश्चर्याने त्याच्याकडे बघितले.
"मी काही मुद्दाम माझ्याबद्दल चांगलं सांगणार नाही तुम्हाला जे आहे ते खरंच सांगेन, मला कुठलंच व्यसन नाही. लग्न झाल्यावर आई-बाबांसोबतच राहणार ही एकच अट, कंपनी नवीन प्रोजेक्टसाठी काही महिन्यांसाठी बाहेर पाठवणार आहे. त्यामुळेच आईने हा बघण्याचा कार्यक्रम घाई घाईत ठरवला. एखाद्या मुलीला एका भेटीत “हो” बोलणे अशक्य आहे हे मला माहीत आहे. मी तुम्हाला विचार करण्यासाठी पूर्ण वेळ देतोय. तुम्ही तुमचा वेळ घ्या. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता."
एव्हाना तिचं दडपण थोडं कमी झालं होतं, ”आमच्या घरीपण सगळ्यांना तुम्ही आवडलात, मी एक सरळ साधी मुलगी आहे, एकत्र कुटुंब पद्धत मला खूप प्रिय आहे आणि आवडतेदेखील. लग्नानंतर मी माझ्या नवर्याची यशस्वी साथ देऊ शकेन असा विश्वास आहे मला. मला हा कांदे-पोहे प्रकार आवडत नाही. कदाचित मी मानसिकदृष्ट्या तयार नव्हते एवढ्यात लग्नासाठी. आई-बाबांसाठी मी या कार्यक्रमासाठी तयार झाले. तुम्ही स्पष्टपणे सगळ्या गोष्टी मला सांगितल्या तरीही मला थोडा वेळ हवा आहे एखाद्या निर्णयावर पोहोचण्यासाठी, प्लीज़!!!"
“माझी काहीच हरकत नाही, टेक युवर टाइम. कुठल्याही दबावाखाली आणि दडपणाखाली कोणताही निर्णय घेऊ नये याच मताचा मीदेखील आहे. चला मी तुम्हाला घरी सोडतो." प्रतिक तिला घरी सोडण्यासाठी निघाला. तो तिला घराबाहेरच सोडून निघून गेला.
आईच्या चेहर्यावरची उत्सुकता साफ दिसत होती तिला. ती काहीही न बोलताच आत आली आणि सरळ बेडरूममध्ये गेली. आई तिच्या मागे जाणार एवढ्यात बाबांनी तिला थांबवलं. आता काही नको विचारुस, जेवताना बोलू. ताट घे वाढायला. ती फ्रेश होऊन हॉलमध्ये आली, तिला माहीत होत, आता विषय नक्की निघणार. काय सांगू आई-बाबांना. प्रतिकला होकार देऊ? की नकार? द्विधा मनःस्थितीत होती कावेरी.
जेवताना शेवटी बाबांनी विषय काढलाच. “हे बघ बेटा मुलगा आवडला नसेल तर सरळ सांगून टाक, कोणी तुला काही बोलणार नाही. शेवटी हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, तुला संसार करायचा आहे. सगळ्या गोष्टी तुझ्या मर्जीने होतील. कोणी तुला जबरदस्ती करणार नाही..." आणि बाबांनी एक कटाक्ष आईकडे टाकला.
“असं काही नाही बाबा, मुलगा छान आहे, त्याच्या घरचे पण चांगले आहेत… पण...” कावेरी अडखळली.
"पण काय आता?" आईचा आवाज चढला होता.
"अगं थांब गं!! बोलू दे तिला, ओरडतेस काय सारखी माझ्या बाळावर?" कावेरीच्या बाबांनी आईला गप्प केलं.
"बाबा!!! मला लगेच नका ना पाठवू दुसरीकडे, थोडे दिवस राहू द्या ना तुमच्यासोबत, तुमच्या सगळ्यांच्या मायेच्या पंखाखाली, आईच्या कुशीत, तुमच्याकडून अजून बरेच लाड करून घ्यायचे आहेत मला. प्रतीक खूप चांगला मुलगा आहे यात काही वादच नाही पण आणखी थोडे दिवस थांबा ना. प्लीज़ बाबा!!!" म्हणत कावेरी रडू लागली.
"काय बोलतेस तू हे कावेरी, अगं!!! असं स्थळ परत भेटेल काय?" कावेरीच्या आईची चिडचिड होत होती.
"काय चाललंय तुझं? माझं बाळ सांगतंय ना थांबायला तर थांबूयात की. खूप गुणाची आहे माझी पोरगी, तिला पोरांची काय कमी आहे गं?" आता कावेरीच्या बाबांचा पारा चढत चालला होता.
"करा अजून करा लाड पोरीचे, बसवा अजून डोक्यावर. होऊ दे तुमच्या दोघांच्या मनासारखं. मी नाही म्हणून सांगून टाकते उद्या फोन करून पाहुण्यांना." कावेरीची आई चिडचिड करत होती.
कावेरीने डोळे पुसले, आईही पदराने आसवे टिपत होती आणि बाबाही पाणावलेल्या डोळ्याने माय-लेकीकडे बघत होते.