चूक कोणाची
चूक कोणाची


सायलीचे लग्न... आईबापाचं स्वप्न.
सायलीचे बाबा त्यांच्या लहानपणी घर सोडून आलेले....
एका बागायतदार मालकाच्या शेतावर सालगडी म्हणून...
त्यांच्या काळात गरीब आईबापाकडं पोटाची खळगी भरण्यासाठी पर्याय नसायचा.
ते मुलांना लहानपणीच कुठे ना कुठे कामासाठी पाठवायचे.
सायलीच्या बाबांना असच पाठवले होते.
लहानाचे मोठे तिथेच झाले...
लग्नाचे वय झाल्यावर मालक आणि मालकीन बाईंनी त्यांच्या साठी एक मुलगी बघितली आणि लग्न लावून दिले.
शेतातील बंगल्याच्या शेजारीच एक खोपटं घालून दिले.
दोघेही नवराबायको दिवसभर शेतात राबायचे.
कष्ट करून दिवस काढत होते.
नंतर त्यांना एक मुलगी झाली....सायली.
मुलीच्या जन्माने त्यांचा संसार परिपूर्ण झाला होता.
एकुलती एक मुलगी... लाडाची.
ते स्वतः खूप राबायचे .....
पण मुलीला काही कमी पडू देत नव्हते.
दिवसभर शेतावर राबायचे...
थकून भागून यायचे पण मुलीच्या अवखळ खोड्यानी सगळा थकवा कुठच्या कुठे पळून जायचा.
बघता बघता सायली पाच वर्ष पूर्ण झाली.
आता तिला शाळेत घालावी असे वाटले.
आपली मुलगी शिक्षण घेऊन मोठी व्हावी ही वेडी आशा.
शीतल शाळेत जायला लागली.
पहिली ते दहावी गावात झाली.
आईबापानं शाळेसाठी काही कमी पडू दिले नाही.
पण त्यांच्या अति प्रेमाने आणि अति लाडाने ती आगाऊ नि उध्दट बनत चालली होती.
एकुलती एक असल्याने तेत तिच्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करायचे.. सगळे हट्ट पुरवायचे.
अकरावी साठी कॉलेजला प्रवेश घेतला.
त्याचवेळी तिला स्थळे पण येऊ लागली.
मग आईबापानं ठरवलं एखादे चांगले स्थळ आले की लगेचच लग्न करून टाकावे.
एखाद्या गरीब आईबापासाठी मुलीचं लग्न म्हणजे सगळ्यात मोठी जबाबदारी आणि मोठे स्वप्न असते....
हे काय वेगळे सांगायला नकोच.
एक स्थळ आले चालून...
नातेवाईकाच्या ओळखीचे कुणीतरी आणले होते.
बघण्याचा कार्यक्रम झाला...पसंती झाली...
लग्न पण ठरवले.
तारीख पक्की झाली. सायलीच्या आईबापाच्या अपेक्षेपेक्षा चांगले स्थळ होते.
मुलगा चांगला कंपनी मधे कामाला होता.
दिसायला देखील देखना होता.
घरची परिस्थिती तशी चांगली होती.
मुलाकडच्या लोकांना सायलीचे आईवडीलांची परिस्थिती माहिती होती. त्यामुळे त्यांनी लग्नाच्या सगळ्या खर्चाची जबाबदारी स्वीकारली.
सायलीचे लग्न झाले.
सायली सूनबाई म्हणून नवीन घरात आली.
तिच्या सासरच्या घरी माणसानी भरलेला परिवार होता.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
सायली नवी नवरी म्हणून घरात आली.
देवदेव पूजा अर्चना काय ते सगळं आटोपलं एकदाचं.थोड्याच दिवसात ती रुळली नवीन घरात.पण आधी सांगितले तसे, तिचा हेकेखोर पणा आहे तसाच होता.घरात कुणाशी पटवून घेत नव्हती.
सतत आपलच खरं करायची.
घरातील लोकांनी तिचा स्वभाव समजून तिच्याकडे दुर्लक्ष केले.
राघव ...सायलीचा नवरा कंपनीत जायचा.
अशीपण ती आजीला पसंत नव्हती,
भावकी आणि समाजाचा विचार त्या खूप करायच्या. सायलीच्या हेकेखोर स्वभावाने शेजारी पाजारी पण यायचे बंद झाले होते.
गीतांजली.. सायलीची जाऊ.
खूप प्रेमळ होती. सगळ्याशी मिळूनमिसळून वागायची.
गीताला कधीकधी सायलीला बोलणं खूप मनाला चटका लावून जायचं.
ती ऑफिसमध्ये जात होती पण घरासाठी.....
कुटुंब मोठे होते...
घर चालवण्यासाठी प्रत्येकाने काही न काही करणे गरजेचे होते म्हणून जात होती.... हौस म्हणून नाही.... हे कोण सांगणार त्यांना ?
आजीबाई ला सायलीचे वागणे अजिबात आवडत नवते.सायली सतत धुसफूस करायची आणि माहेरी आईजवळ चुगली करायची.तिची आईपण सायलीला समजवण सोडून उलट कान भरायची.....
एक दिवशी सगळे आपल्या कामाला निघून गेले.
राघव आठवडा सुट्टीसाठी घरीच होता...
सायलीने काही तरी सांगत त्याचे कान भरून रडायला लागली...
बायकोला रडताना पाहून राघव आजीला जाब विचारायला गेला. नाही नाही ते बोलला. आणि भांडण एवढे विकोपाला गेले की त्याने आजीवरच हात उगारला.
आजीला हे सहन नाही झाले ती तडक उठून निघून गेली.
सायली नि राघवला याचे काही नाही वाटले. राघव बायकोच्या पाठीमागे एवढा वेडा झालता की आपण काय करतोय याचे भान सुध्दा राहीले नाही त्याला.
आजी संतापाच्या भरात गेली होती...
डोक्यात एवढे विचार होते की रस्त्यावर पाठीमागून आलेली गाडी पण समजली नाही..आणि अपघात घडला.
आता मला सांगा,,,,,
यात चूक कोणाची होती..... सासरच्या माणसांना आपल समजून न राहणाऱ्या ,नवऱ्याचे मनात गैरसमज उत्पन्न करणाऱ्या सायलीची.....
मुलीला संस्कार न देता,,उलट तिच्या चुका पाठीशी घालून,,मुलीच्या संसारात ढवळाढवळ करणाऱ्या सायलीच्या आईची,,,,
राघवची....त्याने काहीच समजावून न घेता आजीच्या विरोधात उभा राहिला म्हणून त्याची.
की आजीची.... आजीनं घरातील वातावरण ढवळू नये म्हणून राघवला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.. ज्याच्या मुळे तिलाच अपमानित होऊन घराबाहेर जावं लागले.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
झालं ते झालं.
आजीला अपघात झाला.
आजूबाजूच्या लोकांनी आजीला दवाखान्यात नेले.
पण राघव आणि सायलीला अजिबात काही वाटत नव्हते.
थोड्याच दिवसात आजी बरी होऊन घरी आली.
पण आजीला धड उठता बसता देखील येत नव्हते.
सायली तर काय आजीची सेवा करणार नाही हे सगळ्यांना ठाऊक होते. म्हणून गीताने ऑफिसमध्ये सांगून महिनाभर सुट्टी घेतली.
त्याचवेळेस सायलीला दिवस गेले होते.
डॉक्टरांनी संपूर्ण bed-rest सांगितले होते.
आता काय करायचं.
गीताला सारख्या रजा घ्याव्या लागत होत्या.
त्यामुळे तिला ऑफिसमधून कामावरून काढून टाकण्यात आले. आता गीता सुध्दा घरीच होती. पण घरीसुध्दा ती बसून राहिली नाही. सतत काही ना काही करत असायची.
आजीची सेवा तर करत होतीच पण सायलीची काळजी सुध्दा घेत होती.
गीताच्या प्रेमळ स्वभावामुळे हळूहळू सायलीच्या स्वभावात पण फरक पडू लागला.
गीताचं वागणं, बोलणं, तिची माया, सायलीची काळजी घेणं या सगळ्यामुळे सायली अगदी भारावून गेली.
याच्या अगोदर गीता ऑफिसमध्ये असायची, त्यामुळे सायलीचा आणि गीताचा संपर्क तसा कमीच असायचा. त्यामुळे सायलीला तिच्या स्वभावाची फारशी ओळख पटली नव्हती.
परंतु आता दोघींच्या वाढत्या सहवासाने ते शक्य झाले होते. गीता सायलीला अगदी लहान बहिणी प्रमाणे कोणत्याही गोष्टी समजावून सांगत होती. छान नातं तयार झाले होते. जिकडे जाईल तिकडे दोघीही बरोबरच असायच्या. एकाच ताटात जेवायच्या पण....
द्रष्ट लागण्यासारखं झाले होते सगळं.
घरात छान खेळीमेळीचं वातावरण होते.
सगळेजण खूप खूश होते.
सासरे रिटायर्ड झाले.
आलेल्या पैशातून घर बांधले.
तोवर सायली बाळंतपणासाठी माहेरी गेली होती.
थोड्याच दिवसात गोड बातमी कळली.
सायलीला मुलगा झाला.
सगळ्याच्या आनंदाला अगदी उधाण आले. राघवला त्याची चूक समजली. त्याने आजीची आणि घरातील सगळ्याची पण माफी मागितली.
राघव सायलीचे सर्व हट्ट पूर्ण करायचा.
तिला काय हवंय नको ते बघायचा.
एक दिवस अचानक राघवची कंपनी बंद पडली.
राघवला काम सोडून घरी बसावे लागले.
घरात बसून चालणार नव्हते.
संसाराचा गाडा पुढे न्यायचा होता, त्यात बाळाची जबाबदारी होती.
राघवने एका ठिकाणी दुसरीकडे नोकरी स्विकारली. बऱ्यापैकी पगार मिळायचा.
सगळं सुरळीतपणे चालू होते.
पण,,,
चांगले झाले की ,नियती काही ना काही चमत्कार दाखवते.
असे काही तरी होते की,
होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही.
ड्रायव्हर म्हणून काम करीत असतानाच राघवला दारूचे व्यसन लागले.
तो पूर्णपणे नशेच्या आहारी गेला. ही गोष्ट फक्त सायलीला माहिती होती..
पण आता सगळं हाताबाहेर चालले होते.
त्याने कधीच कुणाचे ऐकलं नाही,कुणाचा विचार केला नाही,फक्त आणि फक्त स्वतः साठी जगायचा.
हो पण सायलीला फार जपायचा,तिच्यावर खूपच जीव होता .
एकदा राचवच्या गाडीला अपघात झाला.
अपघात एवढा भीषण होता की राघव जागीच ठार झाला.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
राघवच्या जाण्यानं सगळेजण दुःखी होते.
घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले होते.
सायली आता एकटी पडली होती..
मुलाकडे पाहून दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होती.
सासू सासरे पण थकले होते.
सायली दिवसरात्र राघवच्या आठवणीत झुरतच होती. गीता रोज सकाळी संध्याकाळी तिला फोन करून तिच्या संगे बोलत होती.
इतर वेळी मात्र तिला एकटेपणा खायला उठायचा. मग गीताने तिला काहीतरी काम करायला सुचवले.
सासू सासऱ्यानी पण परवानगी दिली. सायली एका कंपनीत जाऊ लागली.
थोडे दिवस सायलीने काम केले पण नंतर बंद केले.
या काळात सायलीचे आई वडील सारखे तिला भेटायला यायचे. त्यांना काय वाटले कुणाला ठाऊक.... त्यांनी सायलीचे दुसरे लग्न करून द्यायचे हा विचार बोलून दाखवला.
सासू सासरे काय बोलणार...त्यांचा मुलगा तर या जगात नव्हता..
सायलीचा पण नकार होता पण आई वडीलांच्या हट्टापायी तिचे काही चालेना.
गीताने सायलीच्या आई वडीलांना सांगितले जो निर्णय घ्यायचा तो विचार करून घ्या. बघून, पारखून, पुढील विचार करून काय करायचे ते करा.
सायलीच्या बाबांनी स्थळ आधीच ठरवले होते नवरा मुलगा बिजवरच होता. त्याची पहिली बायको आजारपणाने वारली होती आणि दोन मुली पण होत्या.
सगळी ठरवाठरव झाली आणि लग्न झाले.
सायलीच्या आणि राघवच्या मुलाला अधूनमधून आजीआजोबा कडे ठेवायचे ठरले. सायलीचा संसार पुन्हा सुरू झाला.
पण कशाचं काय....
नव्याचे नऊ दिवस म्हणतात न अगदी तसेच झाले.
थोडे दिवस सगळे छान वागले.. नंतर मात्र काही ना काही कारण करून वाद होऊ लागले. सासू जरा खाष्टच होती. नवरा पण आईबापाच्या ऐकण्यात होता. त्यांचे ऐकून तो सायलीला मारझोड करायचा. प्रसंगी तिला उपाशीपोटी पण ठेवायचे. आधीच्या घरी शितल निदान दोन घास तरी सुखाने खात होती. इकडे ते पण तिच्या नशिबात नव्हते.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या.. सायलीचा मुलगा आजीआजोबा कडे(राघवची आई बाबा)गेला होता.
सायली दिवस रात्री राबत होती.
घरातील, गोठ्यातील सगळं काम करीत शेतावर पण जायची. तरीही सासू तिला जाच करायची.
त्यातच भर म्हणून की काय....
नवऱ्याला नवीन बैलजोडी घ्यायची होती. काही पैसे कमी पडत होते म्हणून त्यांनी सायलीला माहेर हून पैसे आणायला तगादा लावला. माहेरची परिस्थिती खूपच बेताची होती.त्यामुळे तिने साफ नकार दिला. हे सासूला आणि नवऱ्याला सहन झाले नाही. खूप मारले तिला.... अर्धमेली झाली अगदी.
खूपच सहन केलं,सोसलं,आता शक्य नव्हतं...
शेवटी व्हायचे ते झालेच...
रात्री सगळी सामसूम झाल्यावर तिने घरातील तुळईला दोर गुंडाळून फास लावून घेतला.आणि स्वतःची सासरच्या जाचातून, छळातून सुटका करून घेतली.
आता उरला प्रश्न....
यात चूक कोणाची ?
सायलीचे दुसरे लग्न करून दिले..... मुलाची कोणतीही शहानिशा न करता.....मुलीला डोक्यावरचं ओझं समजून.... तिची जबाबदारी झटकली..... म्हणून तिच्या आई बाबाची.
आईबापाच्या आग्रहाखातर कोणताही विचार न करता ते म्हणतात त्या मुलाशी डोळे मिटून लग्न केले म्हणून.... सायलीची.
की नवरा आणि सासू सासरे,
ज्यांनी परक्याची लेक घरात आणली, तिच्या घरच्या परिस्थितीची जाणीव असुनही पैशाची मागणी केली, सतत तिला छळत राहिले, जाच करत राहिले म्हणून त्यांची.
की समाजात वावरणाऱ्या लोकांची...
विधवा, एखादी अबला दिसली की ती आपलीच प्रॉपर्टी आहे असं समजून तिच्याकडे वाईट नजरेने बघणाऱ्याची.की तिला कोणत्याही सण समारंभात कोणतेही मानाचे स्थान दिले जाऊ नये अशा जुन्या बुरसटलेल्या परंपरेची.
खरचं....
मिळेल का कधीतरी उत्तर...
चूक कोणाची ?
चूक कुणाची, याची की त्याची,
हेवेदावे करता करता,
जाणता अजाणता कसले हे सावट,
झाल्या साऱ्या वाटा मळकट,
चूकांनी केले सारे बरबट.