STORYMIRROR

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Inspirational

4  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Inspirational

छंद जगण्याचा

छंद जगण्याचा

7 mins
344

छंद जगण्याचा...


काय होईल या पोराचं काहीच कळत नाही बघ. मलाही आता माझाच जीव नकोसा झालाय ही सारखी सारखी डॉक्टर वारी करून. कितीतरी वेळा सांगितलं नको तसे चाळे करत ट्रेनने येऊ नकोस पण, नाही.

आई बापाचं ऐकायचं नाही असं ठरवलेलंच आहे याने तर आम्ही तरी काय करणार.

...................................................................


साधारण झोपडी. झोपडी कसली ?

चार बांबू चौकोन करून ठोकलेले होते. छप्पर म्हणून नारळाच्या झाडाच्या सावळ्या टाकलेल्या होत्या. त्याखाली लाकडाच्या कमी जास्त लांबीच्या पट्टया होत्या त्यांना या सावळ्या तारेच्या साहाय्याने बांधून घेतलेल्या होत्या. आतल्या बाजूने बांबूच्या बाजूने आणि संपूर्ण झोपडीला मध्यम आकाराचे दगड ठेऊन त्यावर कुठूनतरी सिमेंट आणि रेती आणून भिजवून तशीच हाताने थापून घेतली होती. पाहताना त्यावर हाताची बोटे सपशेल दिसत होती. यामुळे बाहेरचे पाणी आत येत नव्हते. बाहेरच्या बाजूने कैक रंगांचे जाडसर कापड आणि प्लास्टिक कागदाचे तुकडे एकत्र करून शिवलेली ती ताडपत्री म्हणून झोपडीच्या चारी बाजूने एक समांतर गुंडाळलेली होती. एकदा जोराचा वारा जरी आला तरी अख्खी झोपडी नेस्तनाबुत होऊन तो वारा जिकडे जाईल तिकडे घेऊन गेला असता. परंतु एक भलेमोठे जवळ जवळ दोनशे एक वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड बाजूलाच असल्याने तेव्हढा धोका मात्र नव्हता. 

रंगी बेरंगी असलेली ही झोपडी मात्र बाकीच्या पन्नास साठ झोपड्यांमध्ये उठून दिसायची. समोरून येणारे जाणारे अगदी कुतूहलाने पाहत राहायचे इतकी छान दिसायची.


या घरात राहणारी फक्त तीन माणसे. रामदास काका, त्यांची पत्नी म्हणजेच रेणुका काकी. तिला सगळेच काकी म्हणायचे. अगदी म्हाताऱ्या माणसांपासून ते लहानग्या बाळांपर्यंत. रामदास काका जवळच्याच एका सोसायटीत सिक्युरिटी म्हणून काम करत होते. तर रेणुका काकी झोपडीच्या समोर असलेल्या इमारतींमध्ये धूनी भांडी करायच्या. यातूनच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. रेणुका काकी नावाप्रमाणेच रेणुका होत्या. काही मनाविरुद्ध झाले की पेटून उठायच्या, समोर असलेल्या माणसाला ठेवायच्या नाहीत. त्यांचं रूप पाहून भले भलेही तिच्या तोंडाला लागायचे नाहीत. यामुळेच कोणाची बिशाद नव्हती त्यांच्यासमोर दादागिरी करण्याची.

पण तिचं मन मात्र खूप मायाळू होतं. प्रेमळ होतं. दुखल्या खुपल्यास सर्वांच्या मदतीला धाऊन जायची.


अशा या दुर्लभ उभयतांचा एकुलता एक मुलगा मुकुंद. नेहमी पुस्तकात डोकं घालून बसणारा. कधीही बाहेर जाऊन पोरांबरोबर न खेळणारा. खेळलाच तर दहा मिनिटे, नाहीतर अभ्यास आणि आपले वाचन बरे, यातच सदा सर्वकाळ रमणारा. 

अनेक कादंबऱ्या, कथा, कविता वाचून त्यालाही नेहमी वाटे, आपणही एक कथा किंवा कविता लिहू. काही दिवस असेच गेल्यावर त्याने एक कविता लिहिली आणि उत्सुकतेपोटी एका पेपर वाल्याकडे जाऊन त्याला छापायला सांगितली. पेपर वाल्याने आपल्या मालकाला दाखवली त्यांना ती आवडली आणि चक्क ती कविता दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून आली होती. मुकुंदला कोणीतरी येऊन ही बातमी सांगितली आणि मुकुंदने धावत जाऊन तो पेपर घेऊन आला. पटापट पेपरची पाने चालत त्याची नजर साहित्य नावाच्या पुरवणीवर येऊन खिळली. त्याला खूप आनंद झाला होता. पहिलाच केलेला प्रयत्न आणि पेपरमध्ये छापून आलेली कविता यामुळे त्याला वेगळाच आनंद झाला होता. त्याने आपले नाव निरखून पाहिले तर स्पष्ट आणि ठळक अक्षरांत लिहिले होते. 

मुकुंद रेणुका रामदास पराडकर. 

पुन्हा पुन्हा आपले नाव तो न्याहाळत होता. आई, बाबा घरी आल्यावर त्याने त्यांना आपली कविता दाखवली. दोघेही खुश झाले. पोराचं नाव पेपर मध्ये आलंय म्हणून रेणुका काकी सर्वांना दाखवत फिरत होती.

पण इकडे बाप लेकाचं घरात वेगळंच चाललं होतं. 


काका:- अरे पोरा आपली परिस्थिती नसून पण तुला शिकवलंय त्याचं सोनं कर म्हणजे झालं. आम्हाला दुसरं काही नको, फक्त तू तुझ्यापुरतं मिळवलंस तरी बास. आम्ही आमचं बघू कसंतरी. आता वीस वर्षाचा झालायस, काहीतरी काम धंदा कर आणि स्वतःचं तरी पोट भर.


मुकुंद:- बाबा तुम्ही काळजी करू नका. मला या सगळ्याची जाणीव आहे. मी आजपासूनच कामाला सुरवात करणार आहे.


तेव्हढ्यात रेणुका काकी आल्या आणि दोघांचा संवाद तिथेच थांबला.


चला आता जेवून घ्या. अहो पोरानं आज आपलं नाव काढलं बघा. सगळी माणसं पोरगा काहीतरी करून दाखविल असं म्हणत होते. 

एकमेकांना आनंद देत आणि घेत जेवण आटोपले तसा मुकुंद बाहेर पडून गेला तो थेट *यशवंत समाचार* या वृत्तपत्राच्या कार्यालयात. तिथल्या मालकांना भेटून चर्चा करून असे ठरले की अशी रोज एक कविता पेपरसाठी लिहून द्यायची त्याचे महिण्याकाठी ५००/- रुपये मिळतील. मुकुंद ठीक आहे म्हणून घरी आला. उद्याची कविता त्याने आजच लिहायची असे ठरवले आणि एका रात्रीत त्याने तीन भन्नाट कविता लिहिल्या. सकाळी उठून तीन दिवसाच्या कविता पेपर मालकाकडे देऊन काम शोधण्यास निघाला. 

बारावी पर्यंत शिकलेला मुलगा. मिळेल ते काम करू असा विचार करून चालत असताना त्याला एक माणूस कट्ट्यावर बसून काहीतरी लिहीत असताना दिसला. 

न लाजता त्याने विचारपूस केल्यावर कळले की, तो एक व्यवसाय करतो पण त्याला योग्य माणूस मिळत नाहीय. मुकुंद ने विचार करून मी तुम्हाला मदत करू शकतो असे म्हणाला. त्या माणसाने विश्वास ठेवून त्याला काम दिले. वर्षभरातच त्यांच्या व्यवसायाला चांगले दिवस आले. मुकुंदच्या पगारात वाढ करण्यात आली. पेपरमध्ये छापून आलेल्या कवितांचे पैसेही वेळेवर येत होते. काका, काकी आणि मुकुंद खूप आनंदात जगत होते.

पण... म्हणतात ना, चवदार ताकात माशी पडावी तशी पडलीच.


कामावरून घरी येताना मुकुंद ट्रेन मधून पडला आणि त्याचे दोन्ही पाय दुखावले गेले. बरोबर असणाऱ्या इतर मुलांबरोबर वेडे चाळे करत असताना त्याचा पाय घसरला होता. खूप वेळा काका, काकींनी सांगूनही तो ऐकायचा नाही त्याचाच हा परिणाम. आज पाच वर्ष झाली मुकुंद चालू फिरू शकत नाही. गेल्या पाच वर्षांत रामदास काकांनी खूप दवाखाने केले, हॉस्पिटल केले. जो जे औषध सांगेल ते औषध केले पण मुकुंदच्या पायांवर कसलाच परिणाम होत नव्हता. 

परंतु मुकुंद हरला नव्हता. त्याचं लिखाण चालूच होतं. आता तो कथाही लिहायला लागला होता. पेपरमध्ये त्याच्या लिखाणाची मागणी वाढत चालली होती. कैक वर्तमान पत्रांतून त्याची लेखणी तळपत होती.


एक दिवस अचानक सकाळी सकाळीच एक सुटबुट घातलेला माणूस मुकुंदच्या नावाने हाका मारत उभा ठाकला. कोण आवाज देतंय म्हणून काकी बाहेर आल्या.

कोण हवाय तुमासणी ? 

पायापासून डोक्यापर्यंत समोरच्या माणसाकडे बघत काकूंनी प्रश्न केला. 

मोठा माणूस हाय, बघा जाऊन भायर. 

आत येऊन काकांना जणू काकींनी दमच भरला होता. काका बाहेर आले आणि विचारले. कोण पाहिजे तुम्हाला ?

मी वैभव धनावडे, साहित्यसंपदा या साहित्य प्रणाली मधून आलो आहे.

 मी लेखक आणि कवी आहे. 

मुकुंदला माहीत आहे. 

साहित्य, लेखक, कवी हे शब्द मुकुंद कडून काकांनी कितीतरी वेळा ऐकले होते. त्यामुळे त्यांनी लगेच वैभव सरांना आत येण्यास सांगितले. मुकुंदच्या हट्टापायी आणलेली एक खुर्ची होती. ती खुर्ची वैभव सरांना बसण्यासाठी काकांनी पुढे केली. समोरच मुकुंद लोखंडाच्या खाटेवर समोर पाय सोडून बसला होता. सरांकडे विचित्र नजरेने पाहत होता. यांना कुठेतरी पाहिलं आहे हे तो आठवत होता पण नक्की कुठे व कधी याचा थांगपत्ता लागत नव्हता.

नमस्कार मी वैभव धनावडे. 

इतकं म्हटल्यावर मुकुंद हसला आणि म्हणाला. सर मी तुम्हाला ओळखतो. आपलं बरंच लिखाण मी वाचलं आहे. आपल्या कविता तर खूपच छान असतात, विशेष म्हणजे व्यक्तीविश्वात नेऊन ठेवणाऱ्या असतात. 


मुकुंद बस झालं माझं कौतुक. मी काय सांगतोय ते नीट ऐक. तुझ्या नेहमी वर्तमान पत्रात आलेल्या कविता आम्ही वाचत असतो. तुझी या झोपडीपासून पाहिल्या कवितेची झालेली सुरवात आम्हाला म्हणजेच आमच्या संपूर्ण साहित्यसंपदाच्या टीमला खूप आवडली. रोज येणाऱ्या कविता आणि तुझं लेखन आम्ही वाचतो;

आणि आम्हाला ते मनापासून आवडते. म्हणूनच आम्ही तुझ्या लिखाणाचं एक काव्य पुस्तक आमच्याच साहित्यसंपदा प्रकाशनाकडून प्रकाशित करायचे ठरवले आहे. त्याचे जे काही मानधन येईल ते तुला देण्यात येईल काळजी करू नकोस. फक्त आम्हाला तुझ्या परवानगीची गरज आहे.

मुकुंदने लगेच परवानगी दिली आणि आपल्या नावाचं आपलं पुस्तक येणार या विचारानेच तो आनंदून गेला.


रेणुका काकींनी आग्रह करून सरांना जेवण करण्यास भाकरी आणि डांगर वाढले. सरांनीही ती भाकरी आवडीने खाल्ली. साधाच पण पंचपक्वानांना लाजवेल असा पाहुणचार करून सरांनी मुकुंद, काका आणि काकिंचा निरोप घेतला.


वैभव धनावडे सर असे आहेत की, ते सतत कोणा ना कोणाला मदत करत असतात. कुणालातरी मार्ग दाखवत असतात. आपल्यामुळे कोणीतरी आयुष्यात काहीतरी करु शकला. याचेच त्यांना समाधान असते.


झालं पुस्तक येणार म्हणून मुकुंदच्या अंगात एक वेगळेच बळ संचारले होते. तो अजून जोमाने लिखाण करत होता. त्याची लेखणी आता बड्या बड्या साहित्यिकांच्या नजरेखालून जात होती आणि तितकीच प्रसंशेलाही पात्र ठरत होती. बघता बघता पुस्तकाची पहिली आवृत्ती आली. वैभव सरांनी पोस्टाने ती मुकुंदला पाठवली होती. आपल्या नावाचे पुस्तक बघून त्याला वेड लागेल की काय असंच वाटत होतं. काका, काकी आपले आनंदाश्रू ढाळत मुकुंदला जवळ घेऊन त्याला प्रेमाने थोपटत होते.

त्याचे तोंडभरून कौतुक करत होते. ज्यांना माहीत पडेल ते येऊन त्याला भेटून जात होते. शाबासकीची थाप पाठीवर पडत होती.


मुकुंद मध्ये थोडा बदल होत होता, स्वतःहून चालण्यास धडपड करीत होता. शरीराची आणि त्याची मानसिक स्थिती आता स्थावर होत होती. दोन तीन महिने गेले आणि मुकुंद सरावाने दोन पायांवर उभा राहिला होता, तेही कुणाच्याही मदतीशिवाय. काय आश्चर्य !! 

काका, काकी त्याच्याकडे डोळे वटारून बघताच बसले होते. मुकुंद हात पुढे करून म्हणत होता, आई, बाबा मी बरं झालो. मला चालायला येतंय, माझे पाय ठीक झालेत. काकिंनी डोळे पुसत त्याला काळजाजवळ ओढून घेतले, त्याचे पापे घेतले. 

अरे किती आनंद, आनंदच आनंद. सगळे रडत तर होतेच पण फक्त आनंदात. 

काकांनी त्याला अक्षरशः उचलून घेतले. आपला पोरगा ठीक झाला, पायावर उभा राहिला म्हणून बाहेर येऊन जगाला ओरडुन सांगत होते. 

त्यांच्या बोलण्यातून एका बापाची माया, प्रेम बघून त्या जवळ असलेल्या चिंचेच्या झाडालाही गहिवरून आले होते.

काकांनी तसेच मागे वळून पाहिले, त्यांना त्यांची ती मोडकळीस आलेली झोपडी आज खळखळून हसताना दिसली. आणि काकांचे डोळे मात्र आनंदाश्रुने भरले होते.


वाचन आणि लेखन इतकं समृद्ध असतं की मरणालाही दारातून मागे पाठवण्यास भाग पाडू शकते. फक्त त्याच्याकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational