बोचणारा पाऊस भाग 6
बोचणारा पाऊस भाग 6
बोचणारा पाऊस...भाग 6
आधीच्या भागात आपण पाहिले की,
अभिज्ञा लग्न होऊन अभिराजकडे गेली. गृहप्रवेश झाला, सगळ्या विधी झाल्या. घरच्यांनी त्याला फिरून येण्याबद्दल सुचवलं, अभिराजची इच्छा होती पण अभिज्ञा नाही बोलली. दोघेही मंदिरात दर्शनाला गेले, तिथून परतताना ती उर्वीकडे गेली. तिने उर्वीला सगळं सांगितलं, ती ही विचारात पडली.
आता पुढे,
“आय एम सॉरी अभिज्ञा, खरंच मला माफ कर ग. हे सगळं माझ्यामुळे झालंय. तू लग्नाला नाही नाही म्हणत असताना मी तुला फोर्स केला. मला खरच माफ कर.” उर्वी
“उर्वी, असं काय बोलतेस? यात तुझी काहीच चूक नाहीये तू तर माझा चांगलाच विचार करत होतीस. पण आता जे काही सत्य आहे ते मला जाणून घ्यायलाच हवं. अभिराज तर मला काही सांगत नाहीये. मलाच काहीतरी करावे लागेल.” अभिज्ञा
“अभिज्ञा जे काय करशील ते पूर्णपणे विचार करून कर आणि हो मी तुझ्यासोबत आहे. कधीही काहीही गरज पडली तर मला कॉल कर.” उर्वी
अभिज्ञा तिथून निघाली, अभिराज बाहेर कुणाशी तरी बोलत होता, त्याचं बोलणं संपलं आणि दोघे घराकडे निघाले.
घरी पोहोचल्यानंतर सगळे जेवणाच्या टेबलवर बसले होते.
“आई दादू वहिनी आलेत.” कनिका
“अरे बसा जेवायला.” माधवी (अभिराजची आई)
अभिराज जेवायला बसला, अभिज्ञा किचनमध्ये गेली.
“कनिका मला तुला काही विचारायचंय.”
“हा बोल ना वहिनी.”
“तुझा दादू ऑफिसला जातो ना ग.”
हे ऐकून कनिका हसायला लागली.
“तु का हसतेस कनिका? बोल ना, तुझा दादू काहीच करत नाही का?”
“वहिनी तुला काहीच कसं माहित नाही ग दादूबद्दल. तुला सगळ माहिती असायला हव ना. तो काहीही काम करत नाही, दिवसभर हुंदळत असतो. त्याला कोणी काही सांगितलं तर तो हेच म्हणतो मला काय गरज आहे काही करण्याची, कारण घरचे सगळे कमावते आहेत. काका, बाबा, मोठा दादा सगळे काम करतात फक्त हा आयत खातो.”
हे सगळं ऐकून अभिज्ञाचे डोळे पाणावले.
“काय झालं वहिनी? वहिनी बोल ना गं काय झालं?”
“तू चल माझ्या सोबत.” असं म्हणून अभिज्ञा कनिकाला तिच्या खोलीत घेऊन गेली.
तिने कनिकाला त्यांची पहिली भेट कशी झाली? तो कोणाच्या बंगल्यावर घेऊन गेला होता? सगळं सगळं सांगितलं. अभिराजने कधीच कुठला विषय काढलेला नव्हता, कधीच त्याने त्याच्या नोकरीबद्दल सांगितलं नाही,फॅमिली बद्दलची सांगितलं नव्हतं पण त्याच्या राहणीमानावर, त्याच्या वागण्यावरून असंच वाटायचं कि तो कुठला तरी चांगला कंपनीत जॉबला असेल, हा माझा खूप मोठा गैरसमज होता.”
“नाही ग वहिनी, तो खरच काही काम करत नाही, आळशी आहे तो.”
अभिज्ञाला खूप त्रास झाला, तिने जे काही स्वप्न रंगवली होती ती स्वप्न धुळीला मिळाली होती. त्या रात्री अभिज्ञा न जेवता झोपली.
दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ताच्या वेळेला अभिराजचे बाबा त्याला बोलले.
“अभिराज मला असं वाटतं तू माझ्या सोबत ऑफिसला यावसं, माझ्या देखरेखीखाली काम करावसं, त्यातून काही नवीन शिकावं असा दिवसभर घरी बसून काय करणार आहेस?
“पण बाबा..”
“हे बघ आता तुझं लग्न झालं, तुझी बायको घरात आली. तुझी जबाबदारी वाढली. तुला घरात काही ना काही हातभार लावावा लागेल.”
“पण बाबा, अभिज्ञाची नोकरी आहे ना, ती घरात हातभार लावेल.
“मग तू काय बायकोच्या जीवावर जगणार आहेस?.”
“पण मला कमवायची काय गरज आहे? तुम्ही सगळे आहात ना आणि आपल्याकडे पैशाची कमी नाही.”
अभिराज तिथून उठून गेला.
हळूहळू घरी कुरबुर सुरू झाली,
हा काहीच कमवत नाही, घरात बायको आणून ठेवली. आपलंच चुकलं आपण याला परवानगी द्यायला नको होती.
महिन्याभराने अभिज्ञाने ऑफिस जॉईन केलं. ती दिवसभर ऑफिसमध्ये असायची मग घरी येऊन काम करून झोपायची.
एका रात्री अभिराज खुप उशिरा आला, अभिज्ञा झोपली होती.
त्याने चेंज केलं आणि तिच्या बाजूला जाऊन झोपला.
तिच्या गालावरून हात फिरवू लागला. त्याच्या स्पर्शाने तिला जाग आली.
त्याच्याकडे बघून ती पटकन उठून बसली.
“काय करतोस अभिराज?” अभिज्ञा थोडी चिडून बोलली.
“प्रेम करतोय माझ्या बायकोवर.”
“अभिराज दूर हो.” तिने त्याला दूर ढकलले.
तसा तो जोरात ओरडला.
“अभिज्ञा काय प्रॉब्लेम आहे तुझा? का असं वागतेस तु?
“माझा प्रॉब्लेम हा आहे की तू माझ्याशी खोटं बोललास, तू काहीच का सांगितलं नाही मला? तू लपवलय सगळं माझ्यापासून. का नाही सांगितलं की तू नोकरी करत नाहीस, तू काहीच करत नाहीस. का लपवलं सगळं माझ्यापासून. अभिराज खाली मान घालून उभा होता.
“असा ठोंब्या सारखा उभा राहू नकोस अभिराज, आज मला सगळं ऐकायचं आहे. तु जे काही वागलास माझ्याशी त्याचे मला उत्तर हवय. माझ्यापासून सगळं लपवलं. का? बोल अभिराज बोल.
“हो, हो सगळं लपवल मी तुझ्यापासून, तो बंगला माझ्या मित्राचा होता पण तरीही त्या वेळी तू विचारल्यावर मला काही सुचलं नाही तुला तो बंगला माझा वाटला आणि मला तुला काही कळू द्यायचं नव्हतं म्हणून मी गप्प बसलो. माझ्या घरच्यांशी पण भेट घडवून दिली नाही, माझ्या नोकरीबद्दल तुला सांगितलं नाही. कारण मला भिती होती हे सगळं ऐकल्यावर हे सगळं बघितल्यावर तू जर मला नकार दिलास तर..”
“तर.. तर काय.? मी तुला खरच नकार दिला असता.”
“असं बोलू नकोस अभिज्ञा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू जर मला नकार दिला असतास तर मी राहू शकलो नसतो. तुझ्या विना जगू शकलो नसतो. त्या रात्री पहिल्यांदा जेव्हा मी तुला बघितलं. ओली चिंब भिजलेली तू, चाफेकळी नाक, गालावर ओघळलेले अश्रू सगळ्याच्या प्रेमात पडलो मी. ते म्हणतात ना ‘लव ऍट फर्स्ट साईट’ तसंच काहीसं झालं. मी कधी तुझ्या प्रेमात पडलो मलाच कळले नाही. मला प्रत्येक क्षणाला तू हवी असायचीस. माझ्या नजरेसमोर मला फक्त तु हवी होतीस, माझ्या बोलण्याची तू असायचीच. माझ्या अवतीभवती फिरायचीस, मी जिथे आहे तिथे तू दिसायचीस. मी काही काही कारणे शोधून तुला भेटायला यायचो. तुझ्याशी बोलायचो. हे सगळ मी तुझ्यापासून लपवल कारण मला तुला गमवायचं नव्हतं. मी खोटं काहीच बोललो नाही.” असं बोलून अभिराज तिच्यासमोर गुडघे टेकून रडायला लागला.
“मला माफ कर अभिज्ञा, मला तुला फसवायचं नव्हतं, तुला त्रास द्यायचा नव्हता. पण मला तुला गमवायचं नाहीये, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मी खरच तुझ्याशिवाय नाही जगू शकत. अभिज्ञाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्याला उठवलं.
त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले,
“खरच माझ्यावर प्रेम करतोस?” त्याने होकारार्थी मान हलवली.
“माझ्यासाठी तु काहीही करू शकतोस?” त्याने पुन्हा होकारार्थी मान हलवली.
“मग आता तू मला प्रॉमिस कर की तू काहीतरी काम करशील, असा दिवसभर घरी रिकामा बसणार नाही.”
“मी प्रयत्न करेल, नक्की प्रयत्न करेल.”
दोघांनी एकमेकांना मिठीत घेतलं.
दुसऱ्या दिवशी अभिराज तयार झाला.
“अभिज्ञा आज मी नोकरी शोधायला जाणार आहे.”
“बेस्ट ऑफ लक डिअर.”
दोघेही सोबत निघाले. बाईक वर दोघांनी खूप गप्पा मारल्या. अभिज्ञा आनंदात होती अभिराजला जॉब मिळेल अस विश्वास तिला वाटत होता.
अभिज्ञाचं ऑफिस आलं.
“बाय, भेटू संध्याकाळी. बेस्ट ऑफ लक.”
“बाय.”
अभिराज दोन तीन ठिकाणी इंटरव्ह्यूला गेला पण काही होऊ शकलं नाही. संध्याकाळी तो परत तिला न्यायला आला.
“झालं काही काम.”
“नाही.”
“इट्स ओके, तू असा नर्व्हस होऊ नकोस, प्रयत्न करत रहा. तुला जॉब नक्की मिळेल.”
दोघेही निघाले.
वाटेत दोघांनी आईस्क्रीम खाल्लं. आईस्क्रीम खाताना अभिज्ञाचे डोळे भरून आले.
क्रमशः

