बंधन!
बंधन!
संध्याकाळी राजू , आई आणि बाबांना आणायला स्टेशनवर गेला . येताना त्याने आई बाबांना रुपा बद्दल सारं काही सांगितलं . ते दोघेही मुलाच्या ह्या कृतीने समाधानी झाले पण काळजीत पडले . उद्या जर तिच्या गावाकडचे कोणी आलेच तर राजुच्या जीवाला काही धोका नको व्हायला .आधीच मुलीला गमावलं आहे .दोघांनी ही भीती राजुला बोलून दाखवली .
राजू त्यांना आश्वासन देत म्हणाला , " आपण तिची सोय करून देवू . तिला आपला आधार वाटतो आहे . तिच्या बद्दल सारं काही कळून सुध्दा आपण जर तिला पुढे मार्ग नाही दाखवला तर अजून एका सरूचा बळी जायला वेळ नाही लागणार ."
" तिच्याशी बोलून तिला पुढे काय करायचे आहे ते ठरवू ." राजू त्या दोघांना म्हणाला.
घरी आल्यावर राजुने त्यांना रुपाची ओळख करून दिली . रूपाने त्या दोघांना वाकून नमस्कार केला .
मुलीवर चांगले संस्कार आहेत हे त्यांच्या अनुभवी नजरेने पटकन हेरले .तिला तोंडभरून आशीर्वाद देत दोघे आत गेले .आई आवरून स्वयंपाकाला लागली . रूपा सुध्दा तिच्या मदतीला आत गेली . रूपाने आईला बसायला सांगून , " मला सांगा काय करायचे ते आणि तुम्ही कुठे काय ठेवले आहे ते फक्त दाखवा . मी करते सगळं . " असे म्हणून आईच्या सांगण्यानुसार तयारीला लागली .
आईने सूचना दिल्या तश्या तिने व्यवस्थित समजावून घेत , आई सोबत गप्पा मारत अगदी कमी वेळात पटपट हात चालवत छान स्वयंपाक बनवला .
जेवताना लक्षात आले ती सुगरणसुध्दा आहे . खुप चवदार आणि व्यवस्थित स्वयंपाक बनवला होता रूपाने . खुप लाघवी होती रूपा.कमी वेळात तिने आई आणि बाबांना आपलंसं करून घेतलं.
दुसऱ्या दिवशी राजुने आईला रूपा साठी थोडे कपडे आणि तिच्या गरजेचे सामान आणायला सांगितले. असेच दोन तीन दिवस गेले . रूपा आणि आई छान रुळल्या होत्या एकमेकात. बाबांना पण खुप आवडला रूपाचा निरागस स्वभाव .
रात्री झोपताना आई बाबांना म्हणाली , " गुणी आहे पोर .परिस्थितीने खुप मोठा आघात केला आहे तिच्यावर .काय होणार पुढे हीचे देव जाणे !"
" हो ! नशिबात जे असते ते कोण टाळू शकतो ? " बाबा हताश होत म्हणाले .
" मला वाटतं तिला दुसरीकडे कुठे पाठवण्यापेक्षा आपली सून करू घेतली तर ? अशी गुणी सून शोधून सापडणार नाही . स्वभाव शांत आहे , तिला तरी कुठे कुणाचा आधार आहे ? पुढे जावून लग्न करायचे झाले तर मिळणारा नवरा कसा मिळेल कोण सांगू शकतो ? तिच्या पाठीशी कोणी नाही म्हणल्यावर आपल्या सरू सारखा तिला त्रास दिला तर काय करेल बिचारी ? "
आई खुप काळजीच्या स्वरात बाबांना म्हणाली .
" तुझे खरे आहे , पण राजू तयार झाला पाहिजे ना . मुलगी मला सुध्दा व्यवस्थित ,सुसंस्कारी वाटते .आपण अजूनही तिची पूर्ण चौकशी केलेली नाही , असा लगेच काही निर्णय घेणे योग्य नाही. उद्या जर काही अडचण निर्माण झाली तर आपल्याला जगणे मुश्किल होईल .अजून थोडा वेळ जाऊदे .बाहेरून आपण तिची सगळी माहिती काढू.माझा एक मित्र आहे आटपाडी गावात .त्याच्या कडे दोन दिवसात जाऊन सगळी माहिती घेवू , ही जे सांगते ते खरे का खोटे ते पण कळेल ." बाबा निर्धाराने बोलले .
" जोवर खरं काही कळत नाही तोपर्यंत तू कोणाला काही बोलू नको ." बाबा आईला समजावत म्हणाले .
राजुने रुपाला विचारले की, " पुढे काय करायची इच्छा आहे ? "
रुपा म्हणाली , " मला पोलीस फोर्स जॉईन करायची होती . मी आणि गावातली माझी एक मैत्रीण एके ठिकाणी चौकशी करू आलो होतो . मेन सेंटर हैद्राबादला आहे . तिथे प्रवेशासाठी त्यांची एक परीक्षा द्यावी लागणार होती जी पुढच्या महिन्यात आहे .माझ्या आईची इच्छा नव्हती पण दादा तयार झाले होते यासाठी .
दुसऱ्याच दिवशी बाकीची चौकशी करायला आम्ही जाणार होतो .पैसे लागतील म्हणून दादा परत पाटलाच्या घरी गेले होते पैसे मागायला . पाटलाने पैसे दिले पण कसले तरी पेपर दाखवून अंगठा लावून घेतला पेपर वर .दादांना घाई होती , नंतर बघता येईल म्हणून दादा लगेच निघाले तिथून . दादांना काही कळलं नाही पण त्यांच्या मागे लगेच पाटील घरी आले आणि हे सगळं घडलं ."
बोलता बोलताच रूपाला आई भाऊ आणि वडिलांची आठवण आली . ती रडायला लागली .राजू पण निःशब्द झाला . तिचा आवाज ऐकून आई बाबा बाहेर आले . तिला रडताना पाहून दोघे तिच्या जवळ गेले .बाबा डोक्यावरून हात फिरवत म्हणाले , " काय झालं बेटा रडायला ? खंबीर हो आता , जे गेले ते परत नाही येणार पण त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मात्र तो वर बसलाय ना तो नक्की देणार . बाप्पा सोडणार नाही त्यांना . त्यांच्या पापाची फळं त्याला नक्की मिळणार बघ . सावर स्वतःला ."
आईने तिला पोटाशी धरले . तिच्या पाठीवर मायेने हात फिरवत त्या तिचे सांत्वन करत राहिल्या ." आम्ही तुला तूझ्या आई वडिलांप्रमाणेच आहोत .स्वतःला एकटी नको समजू , आम्ही आहोत तूझ्या सोबत ." तिचे डोळे पुसत आई म्हणाली .
रूपा जरा सावरली आणि डोळे पुसत निर्धाराने बोलली , " माझं घरटं उध्वस्त करणाऱ्यांना मीच शिक्षा देणार आहे . त्यासाठीच मी पोलीस फोर्स मध्ये जाणार आहे . मी ह्या घटनेने खरतर सैरभैर झाले होते पण तुम्ही सर्वांनी आधार दिला आहे त्यामुळे आता मी माझे स्वप्न पूर्ण करू शकते .मला माझा मार्ग सापडला आहे . मला अजून थोडी मदत करा .मी तुमच्या सर्वांचे उपकार कधीच विसरणार नाही . आता मला फक्त त्या सेंटर वर नेऊन सोडा . "
राजू आणि आई बाबांना तिचा खुप अभिमान वाटला . तिचं स्वतःच्या भविष्यासाठी असं ठाम असणं खुप आवडलं त्यांना .
मघाशी आलेल्या मनातल्या विचारांची त्यांना स्वतःलाच लाज वाटली . मुलींचे आयुष्य फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित नसते तर स्वतःच्या पायावर उभे राहण्याची त्यांनाही गरज असते .याची त्यांना जाणीव झाली .
दोघांनीही तिची पाठ थोपटली ," खुप छान आणि अगदी योग्य निर्णय आहे बाळा तुझा . आमचा तुला पाठिंबा आहे .मुलींनाही स्वप्न बघण्याचा अधिकार आहे , स्वतंत्र जगण्याचं अधिकार आहे ,याची जाणीव आम्हाला तुझ्यामुळे होत आहे . तूझ्या सारखा स्वतःच्या पायावर उभे रहाण्याचा निर्धार प्रत्येक मुलीने केला पाहिजे आणि पालकांनी त्या निर्णयाला पाठिंबा दिला तर कोणतीही मुलगी सासरी होणाऱ्या छळाने स्वतःचा जीव गमावणार नाही ." बाबा अगदी मनापासून बोलत होते .
मनात कुठेतरी स्वतःच्या मुलीला, सासरी तिच्या मनाविरुद्ध नांदायला पाठवण्याच्या अपराधाची सल टोचत होती .
एक जीव तर गेला होता आणि आता ह्या दुसऱ्या जीवाला जपण्याची धडपड हे आई बाप करत होते .
राजु मग रूपाने सांगितल्याप्रमाणे, हैद्राबादला जावून , सगळी चौकशी करून ,तिथे तिची रहाण्या खाण्याची व्यवस्थित सोय करून परत आला .
आठ दिवसांनी रुपाला सोडायचे होते .तिची सगळी तयारी ह्या तिघांनी अगदी मनापासून , मायेने करून दिली .
एक मुलगी लग्न करून उडण्याचे पंख छाटून ,अस्तित्वाची होळी करून , समाज मान्यतेने नांदायला पाठवली होती . त्याची सल मनात कायम होती .
आणि आज ह्या दुसऱ्या मुलीला समाजापासून लपवत , तिच्या उडण्याच्या भरारीला बळ देवून स्वतःचे अस्तित्व जपायला पाठबळ देत होते . याचा मनस्वी आनंद त्यांना आज होत होता .
मनातून सरूची माफी मागत ते रुपाची पाठवणी करत होते .
!! अशी ही अनोख्या बंधनाची कथा !!
!! न कुठले बंधन , न कुठले नाते !!
तरीही तिघे मनापासुन निभावत होते हे अनोखे कर्तव्य !!
