Sunita madhukar patil ( मधुनिता )

Romance Tragedy Fantasy

4.0  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Romance Tragedy Fantasy

बकुळफुले

बकुळफुले

8 mins
224


बकुळीची फुले सुकली तरी त्यांचा गंध काही हरवत नाही. ' 'सावी'... सावी देखील ह्या बकुळ फुलांसारखीच नाही का? आपल्या साऱ्या आयुष्याला गंधाळून टाकणारी. बकुळीच्या झाडाखाली शतपावली करता करता सारा दरवळ वसंतराव आपल्या श्वासात भरून घेत होते. चालता चालता त्यांची नजर तुळशी वृंदावणात तेवणाऱ्या दिव्याच्या मंद ज्योती कडे गेली.


आजही इतक्या घाई गडबडीत वसूने तुळशीत निरंजन लावलं होतं. बहुतेक चुकून जर ते तिने लावलं नसतं तर त्यांना नक्कीच आश्चर्य वाटलं असतं कारण लग्न झाल्यापासून तिने आजवर यात कधीच खंड पडू दिला नव्हता. आज वसुधा म्हणजेच वसंतरावांच्या पत्नीची एकसष्टी होती. मुलांनी चांगल्या जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं आणि वसुधा नेहमीप्रमाणे स्वतःच्याच वाढदिवसाच्या पार्टीत राबत होती. तिचा तो स्वभावच होता, तिला नुसतं बसून राहणं म्हणजे एक प्रकारची शिक्षाच वाटायची तिला आणि या सगळ्यातून वेळ काढून ती निरंजन लावायला मात्र विसरली नव्हती.


दिवसभर घर माणसांनी भरून गेलं होतं. पार्टी संपल्यानंतर वसुधा सगळी आवराआवर करण्यात गुंतली आणि वसंतराव बाहेर शतपावली करण्यासाठी अंगणात आले होते. बाहेर येताच बकुळीच्या फुलांच्या मंद गंधाने ते भारावून गेले आणि हा बकुळीचा दरवळ येताना सावीच्या आठवणी सोबत घेऊन आला. हळूहळू सावीच्या आठवणींची आंदोलने त्यांच्या मनात फेर धरू लागली.


सावीला ही बकुळफुले किती आवडायची आणि म्हणूनच आपल्यालापण. तिच्यासाठीच तर आपण यांचा बहर कधी ओसरू दिला नाही पण या सगळ्यात वसुधा...! तिला काय हवं, आपण कधी विचारलंच नाही आणि जरी विचारलं असतं तर तिने सांगितलं असतं का? वसू या निरांजनातल्या ज्योतीप्रमाणे आयुष्यभर अखंड तेवत राहिली, प्रकाश देत राहिली आणि स्वतःला जाळत राहिली. पण आपल्याला मात्र नेहमी या बकुळीच्या फुलांनीच मोहिनी घातली. 


" काय झालं, सावीचा विचार करताय का?" वसुधाच्या आवाजाने वसंतराव एकदम दचकले.

" अं, हो... नाही." वसंतराव चाचपडत होते.

" हो... नाही काय?" 

" अंग काही नाही, बस ना इथे मला तुझ्याशी थोडंस बोलायचं आहे." दोघे पारावर मांडी घालून बसले.

" सावीबद्दल... बोलायचं आहे का?"

" हो माझी सावी. नाही...नाही, आपली सावी!" वसंतराव थोडे ओशाळले. 

" हां तर, सावी म्हणजे ना आनंदाचा खळखळ झरा, सावी निळा जांभळा मोरपिसारा, सावी चैतन्य, सावी घमघमणारा मोगरा. आपली सावी तर तुला माहितीच आहे. सावीला ना ही बकुळफुले फार आवडायची. लहानपणी ती कुठूनतरी बकुळीचं एक रोपटं घेऊन आली आणि या इथे अंगणात तिने ते लावलं. मी तिला म्हटलं, हे झाड इथे का लावलसं अगं... तुला आवडतं तर तुझ्या अंगणात लावायचं ना. तर हसून म्हणते कशी, ' तुझ्या अंगणात लावलं काय किंवा माझ्या अंगणात लावलं काय, एकच तर गोष्ट आहे.' आणि लाजत धावत घरी पळून गेली. तिथून पुढे ती रोज न चुकता झाडाला पाणी घालू लागली, त्याची काळजी घेऊ लागली, निगा राखू लागली ह्या बकुळासोबत तीही दिवसेंदिवस वाढत होती. आकार घेत होती."

" हे भले मोठे ऐटीत मिरवणारे बकुळीचे झाड आणि त्याला लागणारी नाजूकशी फुले म्हणजे जणूकाही एक एक नक्षीदार कुडीच भासायची. नुसतं रुपानेच नाही तर सुगंधानेही गर्भश्रीमंत अशी ही बकुळीची फुले संध्यासमयी हिमवर्षावाप्रमाणे झाडाखाली सुगंधी सडा घालत आणि त्याला पाहून सावी हरखून जायची आणि मी सावीला पाहून." वसंतराव बोलता बोलता अचानक थांबले.


सावी म्हणजे सावित्री वसंतरावांच्या शेजारी राहणाऱ्या देवकरांची एकुलती एक लेक. दोघांचे वडीलदेखील शाळेपासूनचे मित्र. सुंदर, गोरीपान, चाफेकळी नाकाची, नाजूक आणि रेखीव डोळ्यांची सावी, लांब सडक केसांच्या दोन वेण्या झुलवत बकुळीच्या पाराजवळ येऊन उभी राहायची. पारावर कॉलेजचा अभ्यास करत बसलेला वश्या तिच्या पैंजणांच्या रुणझुणीने शहारून जायचा.


" अहो, थांबलात का, बोला ना." वसुधाच्या आवाजाने वसंतराव पुन्हा भानावर आले.

"अं, हो...!"

" एक दिवस नेहमीप्रमाणे मी असाच पारावर अभ्यास करत बसलो होतो. ती अशीच आली नेहमीप्रमाणे हातात पेढा घेऊन. तिला पहायला कोणी पाहुणे आले होते. मंडळींची पसंती झाली होती. यंदा दिवाळीनंतर बार फुटणार अशी बातमी घेऊन आली होती ती. हे ऐकून माझ्या काळजात चर्रर्र... झालं गं. काळजाला तडे गेले की काय असं वाटलं. पण मी फक्त तिच्याकडे पाहतच राहिलो. पुढे काय बोलावं मला काही सुचलचं नाही."

“ वश्या अरे वेड्या, असा पाहतेस काय? मला कधी बघितलं नाहीस होय. ऐक ना, मी लग्नानंंतर सासरी गेल्यावर, हा बकुळ नीट जपायचास बरं. ही जवाबदारी तुझी. मी येईन ना दरवेळी माहेराला, तेव्हा लांबूनच याचा दरवळ माझ्यापर्यंत पोहचला पाहिजे बरं. ए वश्या... ऐक ना! जपशील ना रे?” ती बोलत राहिली आणि मी आतून सुन्न होऊन फक्त हो म्हणत राहिलो. त्यावेळी तिच्या डोळ्यात ना काहीतरी विलक्षण भाव जाणवले होते. जे मला काहीतरी सांगू पाहत होते. तिचे डोळे पाण्याने गच्च भरलेले होते.

" ती गेली लग्न होऊन पण दरवेळी माहेरी आली की पायावर पाणी घेऊन आधी ह्या बकुळीच्या झाडाखाली यायची आणि ओंजळीत फुलं घेऊन त्याच्या दरवळीने ऊर भरून घ्यायची. जणू काही पुन्हा माहेरी येईपर्यंत त्याची साठवण ती श्वासात करून घेत होती."


वसुधा लक्ष देऊन ऐकत होती.


" वर्षभरातच ती पहिल्या बाळंतपणाला माहेरी येणार आहे अशी बातमी मला कळली. एक विचित्र अशी बैचेनी जाणवली गं मला. याआधी मला अशी बेचैनी कधीच जाणवली नव्हती. घरी आईबाबांनी माझ्या लग्नासाठी मुली बघणं सुरु केलं होतं. आईला पसंत पडलेल्या मुलीला मी न पाहताच होकार दिला, आणि पुढच्या दोन महिन्यांतच तू लग्न होऊन आपल्या ह्या घरी आलीस." 


लग्न झालं आणि लौकिक अर्थाने वसंतराव संसारी झाले पण त्याचं मन ह्या बकुळफुलांमध्येच अडकून राहिलं होतं. वसंतरावांनी बोलता बोलता एक कटाक्ष वसुवर टाकला. ते तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्याचा एक असफल प्रयत्न करत होते.


वसुधा गरीबाघरची लेक. जेमतेम दहावीपर्यंतच शिक्षण झालेलं. आई लहानपणीच वारलेली. शांत स्वभाव वसंतरावांना शोभेशी होती. काहीशी सावळी, केसांची लांबसडक वेणी पाठीवर नागिणीसारखी डोलायची. चारचौघीत उठून दिसेल असं काही नव्हतं पण तिचे डोळे मात्र विलक्षण सुंदर, पाणीदार आणि काळजाचा ठाव घेणारे होते. त्यात एक वेगळाच करुणाभाव आणि आद्रता होती.

इतकी वर्षे नेटाने संसार केला तिने. एक मुलगा आणि एक मुलगी असं पदरी पडलेलं दान तिने मनापासून सांभाळलं, त्यांना मोठं केलं.  


" वसुधा, इतक्या वर्षानंतर मला एक गोष्ट तुझ्याजवळ कबुल करायची आहे गं. आजवर कधी हिम्मत नाही झाली. इतकी वर्षे मनावर एक ओझं होतं पण आज ते ओझं कमी करून रित व्हायचं आहे मला." वसंतराव वसुधाचा हात हातात घेऊन भावविव्हळ स्वरात बोलत होते.

" ठाऊक आहे मला तुम्ही काय सांगणार आहात ते." वसुधा त्यांच्या डोळ्यात पहात बोलली.

" काय?" वसंतराव आश्चर्याने वसू कडे पहात होते.

" हेच की तुमचं सावीवर प्रेम होतं आणि आजही आहे. ही गोष्ट मला खूप आधीपासून माहिती आहे वसंतराव." वसंतराव आ वासून वसूकडे पहातच राहिले.


" तुम्हाला आठवतंय सावी दरवर्षी सुट्टीत पोरांना घेऊन माहेरी यायची. घरी आली की वहिनी वहिनी करत दिवसभर माझ्याभोवती घिरट्या घालायची. आम्ही दोघी मिळून याच बकुळीच्या पारावर बसून गप्पा मारायचो. संसाराची सुखदुःख वाटून घ्यायचो. पण तुम्हाला माहीत नाही तिच्या गप्पांमध्ये नेहमी वश्याच असायचा. वश्या.. असा, वश्या.. तसा, वश्याला अमुक आवडतं, वश्याला तमुक आवडतं, वश्या... वश्या आणि वश्याच फक्त. तेंव्हाच मला जाणवलं की सावीच्या काळजाचा एक कप्पा वश्या व्यापून आहे आणि त्या कप्प्याला मला अजिबात धक्का लागू द्यायचा नव्हता म्हणून मग मी ही तिकडे शिरकाव करण्याचा जास्त प्रयत्न केला नाही. तिचा तो कप्पा अबाधित कसा राहील हेच पाहिलं. तिच्या त्या कप्प्यामुळेच मला तिच्याकडून तुम्हाला समजून घ्यायला, तुमचा स्वभाव जाणून घ्यायला, तुमच्या आवडी निवडी जाणून घ्यायला खूप मदत झाली."


"माझी आणि तुमच्या सावीची जमलेली गट्टी मात्र तुम्हाला काही रुचायची नाही. तीळ पापड व्हायचा तुमचा. तुमच्या चेहऱ्यावरून ते स्पष्ट जाणवायचं मला. काय बरोबर ना!" वसुधा वसंतरावांकडे पाहून गोड हसली.

" हो ना...काय गुळपीठ जमलंय दोघींचं असं वाटत रहायचं सारखं आणि आतल्या आत कुढत रहायचो. हा बकुळ सुद्धा माझा उरला नव्हता. त्यावर तुम्ही दोघींनी कब्जा केला होता. सावीने हा गंधभारीत ठेवा तुला देऊन टाकला की काय असं वाटायचं मला." वसंतराव नजर चोरत बोलले.

" सावी सासरी परत गेली की तुमची होणारी चिडचिड कळायची मला. अशीच रागराग करत, चिडचिड करत अनेक वर्षे गेली. लोकांच्या दृष्टीने नजर लागेल असा आपला संसार होत राहिला आपला. मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली." वसुधा तुळशी वृंदावणातल्या तेवणाऱ्या मंद दिव्याकडे पाहत बोलली.

" आणि एक दिवस बातमी आली सावी गेली कायमची आपल्याला सोडून...!" वसुधा शांत आवाजात बोलली.

" सावी अशी कशी जाऊ शकते? सावी म्हणजे चैतन्य, सावी म्हणजे आनंद. सावी गेली यावर माझा विश्वासच बसत नव्हता. तरीही मी कसंबसं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होतो. त्यातून होणारा माझा त्रागा मला आतून तोडत होता पण तू...! तुझं काय?"  

" सावीच्या जाण्याने तू पुरती कोलमडून गेलीस. कित्येक घटका तू एकटीने या बकुळीच्या बुंध्याशी बसून घालवल्यास. अगं मला राहून राहून प्रश्न पडायचा. काय बोलत असशील तू या बकुळीशी. माझ्याविषयी बोलत असशील का? माझ्याविषयी जर बोलत असशील तर काय वाटेल सावीला. राहून राहून मनात हाच विचार येई." विनायकरावांनी डोळ्यात दाटलेल्या आसवांना मोकळी वाट करून दिली.


एक दिवस अचानक वसुच्या मनात काय आलं कोण जाणे तिने आपली तुळस उचलली आणि बकुळीच्या सावलीत नेऊन मांडली.सावीच्या मरणानंतर हळव्या झालेल्या वसुधाला या बकुळानेच सावरले होते. 

संसाराची चाळीस वर्ष ह्या कोरड्या माणसासोबत तिने कशी काढली असतील हे देखील एक कोडंच पडलं होतं वसंतरावांना. त्यांनी कधी तिच्यावर ना हात उगारला ना कधी शिव्या घातल्या, ना कधी चढ्या आवाजात बोलले होते. पण कधी मायेने जवळही घेतलं नव्हतं. ना कधी तिच्यातल्या अन्नपूर्णेचं कौतुक केलं होतं. दोन जीव एकत्र आले आणि निर्सगाने आपलं काम चोख पार पडलं इतकंच. त्यांना आता तिच्या त्या करुणेने भरलेल्या डोळ्यांना ताठ नजरेने नजर द्यायची देखील हिंमत होत नव्हती. एक अपराधभाव मनात घर करून गेला होता.

सावी आयुष्यभर बकुळ बनून दरवळत राहिली आपल्या सभोवताली. पण त्या धुंदीत मी माझ्या तुळशीला कसा विसरलो!

ना कधी पाणी घातले, ना कधी तिची निगा राखली, ना कधी दिवा लावला. आयुष्यभर ताठ मानेने फिरणाऱ्या वसंतरावांच मन निराशेने भरून गेलं होतं.

इतक्यात त्यांचं लक्ष तुळशीपाशी लावलेल्या निरांजनाकडे गेलं. तेल संपल्याने ते विझलं होतं. तेल संपलं होतं तरी त्यात वात अजून होती. पुन्हा पुरेसं तेल घातलं, वात पेटवली अन वाऱ्यापासून जपलं तरी हा प्रकाश या काळोख्या रात्रीसाठी पुरेसा होता.

वसंतरावांना आता अर्धवट राहिलेले हिशोब पूर्ण करायचे होते. निरांजन जरी विझलं असलं तरी आता वसंतराव अंतर्बाह्य उजळून निघाले होते. 

घरात जाताच वसुधाने एक लाकडी कोरीव काम केलेली छोटीशी पेटी आणून वसंतरावांच्या हातात दिली. वसंतरावांनी पेटी उघडताच त्यांना एक डायरी नजरेस पडली.

" अगं वसू, ही तर सावीची डायरी. तिला डायरी लिहायची सवय होती. मला कधी या डायरीला तिने हात लावू दिला नव्हता मग ही तुझ्याकडे कशी आली?"

वसंतरावांनी त्या डायरीवरून हळुवार प्रेमाने हात फिरवला.

" सावीने दिली होती. ती आपल्याला सोडून जायच्या आधी शेवटच्या वेळी माहेरी आली होती त्यावेळेस. ही देताना ती काहीतरी असंबद्ध बडबडत होती. ही तुझी आहे. यावर फक्त तुझा हक्क आहे आणि बरचं काही. फार हळवी झाली होती. बहुतेक तिला कळून चुकलं होतं की आता आपले जास्त दिवस नाहीत."

" तिच्यानंतर मला सावरणारी, तिच्या वश्याची मला तिच्या नजरेनी नव्याने ओळख करून देणारी ही बकुळफुले."

वसंतरावांनी डायरीचं पाहिलं पान उघडलं. आत सुंदर मोत्यासारख्या अक्षरात लिहलं होतं 'बकुळफुले'.


वसंतरावांनी डोळ्यातील आसवे टिपत वसुधाला जवळ घेतलं. तसा बकुळ फुलांचा दरवळ त्यांना अंतर्बाह्य सुखावून गेला.

(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance