Pandit Warade

Tragedy

3  

Pandit Warade

Tragedy

भरती बंद आहे

भरती बंद आहे

4 mins
1.3K


भरती बंद आहे


मे! कडक उन्हाळ्याचा महिना. त्यातल्या त्यात औरंगाबादचा उन्हाळा वर्णावा तेवढा कमीच. अस्सा भयंकर उन्हाळा की असं वाटतं दिवसभर पाण्यातून उठूच नये. पाण्याची टंचाई नसती ना तर खर्च लोकं तेही करायला कचरले नसते.


अशाच उन्हाळ्याचा 'तो' दिवस. ऊन 'मी' म्हणत होते. वारा कुठे संपावर गेला होता की काय कोण जाणे. एखादया तरी झाडाचं पान हलावं ना? पण छे! कुठंच पान हलताना दिसत नव्हतं. जीव गुदमरत होता, नकोसा वाटत होता. बंगल्यातले लोक पंखे लावून बसले होते, उगीचच इकडची हवा तिकडे करत.


अशा कडक उन्हात डांबररोडचे सौंदर्य खूपच प्रेक्षणीय असते. जणू आपलं प्रतिबिंब पाहून घ्यावं.


अशा डांबर रोडवर आपलं प्रतिबिंब पाहण्या साठीच की काय कोण जाणे, त्या रोडवर 'तो' एकटाच चालत होता. फाटकासा शर्ट, फाटकीशी पॅन्ट, पायात चप्पल होती. परंतु वितळलेल्या डांबरचा आस्वाद घेण्यासाठी त्याने तिचे तळवे फाडून ठेवलेले होते. तो होता एक सुशिक्षित बेकार. त्याचं नांव होतं, 'रामचंद्र गणपतराव देशमुख'. शिक्षण एस एस सी पास. घरी विशेष काही नव्हते. फक्त होती काय ती 'प्रतिष्ठा' आणि तीच तर जिथं तिथं आडवी येत होती.


एस एस सी पास होऊन महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती. पण करणार काय? घरची परिस्थिती नाजूक. बरं कुठं हॉटेल मध्ये काम करून शिकावं म्हटलं तर प्रतिष्ठा आडवी येते. 'काय तर म्हणे देशमुखांचा मुलगा अन् हॉटेलमध्ये काम करतो' अखेर एस एस सी वरच समाधान मानावे लागले. तोच तरुण आज प्रतिष्ठा वगैरे सर्व झुगारून कुठंतरी नोकरी करण्याचा विचार करत होता. आणि तिच्याच शोधात उन्हातान्हातून चालती फिरती तपश्चर्या करत दीनवाणा फिरत होता.


फिरता फिरता एक कंपनी लागली मध्येच. वाटलं , 'जाऊन तर बघावं'. गेला गेटजवळ.


"क्या है?" वाचमननं विचारलं.


"यहाँ कुछ काम मिलेगा?" त्यानेही मोडक्या तोडक्या हिंदीत विचारलं.


"काही शिकला आहेस का?" वाचमन हिंदीवरून चक्क मराठीवर घसरला.


"होय" असं म्हणून कागदपत्रांची फाईल त्याने उघडली आणि त्यात काही तरी चाळू लागला.


"किती शिकला आहेस?"


"एस एस सी पास."


"मराठी वाचता येतं का?"


"अं?" प्रश्नाचा रोख न समजून ती गडबडला.


"ती पाटी वाच". असे म्हणत वाचमनने गेटवरच्या बोर्डाकडे निर्देश केला.


'भरती बंद आहे'. पाटीवरील अक्षरं डोळ्याचे पडदे फाडून, मनाचे पडदे फाडून हृदयाला कापत गेले. जड अंतःकरणाने फाईल सावरून तो पुढे चालू लागला. 'भरती बंद आहे'. पुन्हा एक बोर्ड त्याच्याकडे डोळे वटारून पहात होता. 'जाऊ द्या अशा ठिकाणी पुन्हा जाणेच नको' असा विचार करत त्याने त्या बोर्डला मागे टाकले.


दुसरी एक कंपनी दिसली, जिच्या गेटवर कसलाच बोर्ड नव्हता. खूप बरं वाटलं. 'निदान भरती बंद आहे असा बोर्ड दाखवून बेकरांचा अपमान तर होत नाही ना?' त्याने विचार केला आणि गेटजवळ जाऊन गेटमनला विचारू लागला.


"क्यों साब, यहाँ कुछ काम मिलेगा?"


"काय काम करशील?" तुच्छतेने पहात गेटमनला विचारलं.


"जे सांगाल ते" तो उत्तरला.


"जे सांगितलं ते करशील?" गेटमन.


"सांगून तर पहा."


"मग सर्वप्रथम इथून जाण्याचं काम कर. म्हणे काम द्या. इथं काय बापाची ठेव आहे तुमच्या?" असं म्हणून गेटमन वळून आपल्या स्टुलवर जाऊन बसला.


त्याच्या काळजावर कुणी तरी घाव घालत आहे. असं त्यास वाटू लागलं.


तो भटकत होता आणि 'भरती बंद आहे'चे बोर्ड त्याला वाकुल्या दाखवत होते, वेडावून म्हणत होते....


"अरे वेड्या, या गेट वरच्या बैलांना एक हिरवी पेंडी (नोट) चारली तर तुला मॅनेजरची भेट घेण्याची परवानगी मिळेल. आणि बरंका, मॅनेजर याही पेक्षा खादाड आहे हं. त्याला एका पेंडीनं भागणार नाही, त्याला चांगला भारा लागतो. चांगल्या चारपाच नोटा हातात कोंबल्या तरच तुला नोकरी मिळेल, तात्पुरती का होईना."


कुठून आणाव्यात नोटा? नोटांसाठीच तर ही धडपड आहे. पोट भरण्यासाठी नोटा पाहिजेत आणि नोटा मिळवण्यासाठी सुद्धा नोटांच पाहिजे? मग त्यापेक्षा या जीवाला या जगातूनच नाहीसे केले तर? बरं होईल. 'ना रहेगा बांस ना बजेगी बांसरी' एक सुशिक्षित बेकार तरी कमी होईल.' असा विचार करत तो रणरणत्या उन्हात वणवण फिरत होता.


तो ठिकठिकाणी फिरत होता. ठिकठिकाणी बोर्ड लटकत होते अन् 'भरती बंद आहे' म्हणून त्याला सांगत होते....


'अरे, तुझी भरती फक्त एकाच ठिकाणी हॊईल. होय! त्या यमदेवाच्या दरबारात तुझी भरती नक्की होईल. थाटामाटाने तो यमराज तुला घेऊन जाईल. जा अन् आत्महत्या नावाचा यज्ञ समारंभ उरकून टाक त्या यमदेवाला प्रसन्न करण्यासाठी'.


'होय! आत्महत्याच करावी. फार चांगला उपाय आहे हा. नाही तरी हा जीव ठेऊन काय उपयोग?' असा विचार करत तो रोडवर इकडे तिकडे फिरू लागला. तेवढ्यात एक ट्रक समोरून येतांना दिसला. त्या ट्रकच्या स्वरूपात त्याला साक्षात यमाचं दर्शन झाल्यासारखं भासलं. खूप बरं वाटलं. ट्रक जवळ आला तसं दिल अंग झोकून, घेतले डोळे झाकून. पण? पण डोळे झाकून घेतले म्हणून काय कायमचे मिटणार आहेत? इथेही त्याचं दुर्दैव आड आलं. एकदम एक तरुण ट्रकपुढे पडतांना पाहून ट्रक ड्रायव्हरने ब्रेक लावून ट्रक थांबवला, अन् रागातच ओरडला.....


"मरना है क्या बे साले?"


".........." उत्तर नाही.


"मरना है तो अकेला मर, हमे लेकर क्यों मरता है?" असं म्हणून ट्रक ड्रायव्हरने खाली उतरून त्याला बाजूला लोटले अन् ट्रक स्टार्ट करून आला तसा निघून गेला.


बिचाऱ्याचं मन मेल्याहून मेलं झालं होतं. मात्र शरीर मरायला तयार नव्हतं. त्यानं तसंच रस्त्यावर झोपण्याचा विचार केला.


तो रस्त्यावर झोपला, परंतु त्याची योजना काही सफल होईना. जे वाहन येई ते त्याला तसेच सोडून बाजूने निघून जाई. त्याला झोप यायला लागली. दिवसभर फिरून थकलेला होताच. अपमानाच्या चटक्यांपुढे शरीराला बसणारे डांबराचे चटकेसुद्धा जाणवत नव्हते. त्याला झोप लागली अन् एक स्वप्न पडायला लागले.-----


यमराज पृथ्वीवरील दौरा आटोपून परत निघाला होता. हा ही त्याच्या मागोमाग निघाला. मन मात्र केव्हाच यम दरबारात पोहोचले होते, चित्रगुप्ताच्या वहीतील नोंदी पाहण्यास उत्सुक झाले होते. परंतु त्याला काय माहीत, त्या नोंद वहीत त्याच्या नावावर बरेच काही लिहायचे बाकी आहे म्हणून? तो हळू हळू यम दरबाराजवळ पोहोचला. अन् काय आश्चर्य? त्या गेटवर सुद्धा एक बोर्ड लटकलेला दिसत होता....

'भरती बंद आहे'.

********


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy