STORYMIRROR

Sneha Kale

Drama Romance

2  

Sneha Kale

Drama Romance

भेटली ती पुन्हा

भेटली ती पुन्हा

25 mins
160

वर्ष २००४

१२ वी पास झाल्यावर काव्याने दुसऱ्या कॉलेजला प्रवेश घेतला.नवीन कॉलेज, नवीन वातावरण, नवीन मित्र मैत्रिणी.काव्या खूप खुश होती आधीच्या कॉलेजपेक्षा तिला हे कॉलेज खूप आवडलं होत.कॉलेजमध्ये प्रवेश करताच दोन्ही बाजूंनी झाडांच्या रांगा, लागूनच असलेले मोठं पटांगण, कँटीन,लायब्ररी, इतर ऍक्टिव्हिटीसाठी असलेला मोठा हॉल, दोन बिल्डिंगच्यामध्ये असलेला स्टेज जिथे डान्स किंवा इतर प्रोग्राम होत असत.सर्वकाही तिच्या मनासारखं होत. काव्याच कॉलेज सुरू झालं.नवीन असल्याने ती जास्त कोणाशी बोलत नसे.तसा तिचा स्वभाव बोलका नव्हता.जेवढ्यात तेवढ बोलायचं.लेक्चर अटेंड करायचे.ब्रेक मध्ये कँटीन मध्ये जायचं.असाच तिचा दिनक्रम असायचा.त्यामुळे कॉलेज सुरू होऊन एक महिना झाला तरी तिच्या कोणी मैत्रिणी झाल्या नव्हत्या.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फ्रेंडशिप डे साजरा होणार असल्याची नोटीस लावली होती.एव्हाना सगळ्यांची एकमेकांशी ओळख झाली होती.काहींची मैत्री ही झाली होती.फ्रेंडशिप डे तर एक निमित्त होत.दुसऱ्या दिवशी काव्या छान तयार झाली.पिंक कलरचा टॉप, डार्क ब्लू कलरची जीन्स,कानात ऑक्सिडचे कानातले,हातात ब्रेसलेट, कमरेपर्यंत मोकळे सोडलेले सोनेरी केस, हलकीशी लिपस्टिक.अगदी साधी तरी पण सुंदर आणि आकर्षक दिसत होती काव्या.कोणालाही भूरळ पाडेल असे व्यक्तिमत्त्व होते तिचे.

सकाळी सकाळी काही खायला होत नाही म्हणून एक फ्रूट खाऊन काव्या निघाली.आज फ्रेंडशिप डे साजरा होणार म्हणजे काय प्रोग्राम वगैरे असेल का, याचा विचार करत ती निघाली.कारण तिच्या जुन्या कॉलेजमध्ये फक्त एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधायचं आणि झालं एवढंच होत.आता बघू इथे कस करणार सेलिब्रेट ते.काव्याने आदल्या दिवशीच friendship band विकत घेतले होते.कोणी आपल्याला बांधलीच तर आपल्याकडे पण असायला हवी आणि एक छानसा friendship band रोहिणीसाठी. रोहिणी, वर्गात तिच्या शेजारी बसायची अगदी घट्ट मैत्री नाही पण छान जमायचं दोघींचं रोहिणी अभ्यासात जेमतेम होती. काही अडलं तर ती काव्याला विचारायची.एकदा रोहिणीचा फोन बंद झाला होता आणि तिला घरी फोन करून सांगायचं होत की extra lecture आहे म्हणून तिने काव्याच्या फोनवरून आईला कॉल केला होता पण खरतर तिला तिच्या बॉयफ्रेंड सोबत फिरायला जायचं होतं म्हणून तिने घरी खोटं सांगितलं होतं हे काव्याच्या लक्षात आलं होतं पण आपण कशाला कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात interfare करायचं म्हणून ती जास्त काही बोलली नाही तेव्हापासून त्याची ओळख झाली आणि हळूहळू मैत्री.

रोहिणी आणि काव्या सोबतच लायब्ररीत, कँटीनमध्ये जायच्या.पण दोघी सोबत असूनही रोहिणीचा फोन मात्र कायम सुरू असायचा.फोन आला की रोहिणी काव्याला पण विसरून जायची.ती सोबत आहे त्याचे देखील तिला भान नसायचे.सुरुवातीला काव्याला काही नाही वाटायचे.मग नंतर नंतर काव्या वैतागायला लागली.तिचा फोन आला की काव्या काहीतरी कारण सांगून बाजूला व्हायची.नव्या कॉलेजमध्ये ती एकुलती एक मैत्रीण होती. फ्रेंडशिप डे नंतर एक महिन्याने काव्याची अनुजाशी ओळख झाली.

रोहिणीच्या या वागण्यामुळे काव्याला खूप एकटं वाटायचं.एकटीच लायब्ररीत जायची.एकदा काव्या अभ्यास करण्यासाठी लायब्ररीत गेली होती.तिच्या शेजारी एक मुलगी येऊन बसली.ती आली तसा परफ्यूमचा भपका आला.काव्याने चोर नजरेने तिच्याकडे पाहिले.सिनेमातील नटी शोभावी अशी दिसत होती ती.तिच्या चेहऱ्यावरून आणि कपड्यांवरून ती उच्चभ्रू घरातली वाटत होती.थोडी गर्विष्ठ वाटत होती.

मुलगी- excuse me

काव्या- yes

मुलगी - do u have extra pen??

काव्या- yes i have.

(काव्याने पेन दिला)

मुलगी - thanks dear.

दोघी बराच वेळ शेजारी बसल्या होत्या पण दोघी एकमेकांशी एक शब्द ही बोलल्या नाहीत.

काव्याच्या पुढच्या lecture ची वेळ झाली आणि ती उठून निघून गेली.

कॉलेज सुटल्यानंतर काव्याला तीच मुलगी कॉलेजच्या बाहेर दिसली.तीच लक्ष नव्हतं.काव्यानेच तिला smile दिली.तेव्हा ती मुलगी काव्याच्या दिशेने येऊ लागली.

मुलगी - hi, I am Anuja.. Anuja Sarpotdar

काव्या- hi, I am Kavya Naik

मुलगी - सकाळी तुझा पेन दयायला विसरले,sorry हा.

काव्या - its ok, माझ्याही लक्षात नव्हतं.

अनुजा- चल बाय, उद्या भेटू.बाय द वे, which class?

काव्या - F.Y.B.Com. A division

अनुजा - me too. but B division

काव्या - nice to meet u.

अनुजा - same here.

दोघींनी हात मिळवले.अशी काव्याची अनुजाशी ओळख झाली.

अनुजा अभ्यासात जेमतेमच,दिसायला सुंदर. तिला मॉडेलिंग च्या क्षेत्रात करिअर करायचं होतं म्हणून ती स्वतःच राहणीमान, वागणं-बोलणं चांगलं ठेवायची.फॅशनेबल कपडे घालणं, केसांची ठेवण, नेहमी मेकअप मध्ये असायची.कॉलेजमधली बरीच मुलं तिच्या मागे होती.पण ती कोणाला भाव द्यायची नाही.तिला फक्त तीच ध्येय गाठायचं होत. काव्याने रोहिणीची अनुजाशी ओळख करून दिली. हळूहळू त्या तिघी चांगल्या मैत्रिणी बनल्या. अनुजाच्या वर्गात तिच्या बाजूला कार्तिकी बसायची. तिला कार्तिकी अजिबात आवडायची नाही पण अभ्यासात मदत करायची म्हणून अनुजा तिच्या सोबत बोलायची.कार्तिकी, तिच्या स्वभावाचा कोणालाच थांगपत्ता नसायचा. कधी तोंडभरून बोलायची तर कधी इतकी शांत असायची सोबत आहे की नाही हे सुद्धा जाणवायचे नाही.अभ्यासात हुशार होती.अनुजाने तिला देखील आपल्या ग्रुप मध्ये घेतलं. अश्या प्रकारे काव्या, रोहिणी, अनुजा आणि कार्तिकी या जणी एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या.चार जणी, चार वेगवेगळ्या स्वभावाच्या.पण तरीही त्यांची मैत्री होती.कुठेही गेल्या तरी एकत्र असायच्या. सगळ्या जणी असल्या तरी रोहिणीचा फोन मात्र सतत चालू असायचा.कधी कॉल, तर कधी messeges. तिघींना खूप आश्चर्य वाटायचे एवढं बोलत तरी काय असतात हे दोघ.रोहिणी सोडली तर तिघींपैकी कोणाचे boyfriend नव्हते.म्हणून त्यांना थोडं विचित्र वाटायचं.

रोहिणी स्वभावाने खूप चांगली होती पण दिसायला ठीकठाक, उंचीने कमी, सावळी आणि थोडी स्थूल होती.अनुजाला तर ती काकूबाई वाटायची.एवढ्या नावाजलेल्या आणि शिक्षणात अग्रेसर असलेल्या कॉलेजमध्ये शिकत असताना पण रोहिणी नेहमी पंजाबी ड्रेस घालून यायची, कधी फॅशनेबल कपडे घालून आलेली पाहिली नाही, हिचा कोणी कसा बॉयफ्रेंड बनू शकतो असा अनुजाला नेहमी प्रश्न पडे. त्या दिवशी काव्याने दोघींना सांगितले की उद्या रोहिणीचा वाढदिवस आहे.आपण तिला surprise देऊ या.

अनुजा - काव्या, ते सगळं ठीक आहे पण ती येणार आहे का कॉलेजला.कारण या couples च वेगळंच celebration असत.may be ती येणार पण नाही.

काव्या- अगं ती येईल कारण उद्या project submit करायचं आहे.थोडा वेळ आली तरी चालेल ना.आपण canteen मध्ये celebrate करू आणि मग तिला जायचं तर जाऊ दे.

अनुजा- हम्म, lets see.

काव्याने सगळं plan करून ठेवलं होतं, lecture संपल्यावर बाकीच्या मैत्रिणी रोहिणीला घेऊन canteen मध्ये येणार आणि काव्या तोपर्यंत जाऊन cake घेऊन येणार, अस ठरलं होतं.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे रोहिणीचा वाढदिवस तिघींना खूप छान साजरा केला.रोहिणी खूप खुश होती.तिला या तिघींनी surprise दिल तस तिने देखील त्यांना surprise दिल.आज कॉलेजमध्ये अंकित येणार होता. Celebration झाल्यावर रोहिणीने अंकितला कॉल केला. तो कॉलेजच्या जवळ पोचला होता.रोहिणी आपल्या मैत्रिणींना घेऊन कॉलेजच्या गेटच्या बाहेर आली.सगळयांनाच उत्सुकता होती.कसा असेल रोहिणीचा बॉयफ्रेंड.चौघी गप्पा मारत उभ्या होत्या.तेवढ्यात अंकित आला आणि रोहिणी 'happy birthday sweetheart', अस म्हणून एक गुलाबाचं फुल आणि एक गिफ्ट दिल. रोहिणीने thank u म्हणत फुल आणि गिफ्ट घेतलं.तिघी त्याच्याकडे बघतच राहिल्या. व्यायामाने कमवलेली पिळदार शरीरयष्टी,गोरा रंग, ५'८ उंची, चेहऱ्यावर गोड smile, डोळ्यांवर गॉगल.वयाच्या १८ व्या वर्षीच त्याने स्वतःच्या शरीरावर खूप मेहनत घेतली होती.परफेक्ट मॉडेल शोभेल असा होता तो.

काव्या तर पाहतच बसली.तो आला तेव्हा सार जग थांबलं होत तिच्यासाठी फक्त तो दिसत होता.एका सेकंदासाठी तिला वाटलं त्याला मिठी मारावी. दुसऱ्या क्षणाला ती भानावर आली.अरे हा काय विचार करतोय आपण? आपल्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे तो,वेडी कुठली आणि हे सगळं सिनेमात होत खऱ्या आयुष्यात नाही. तिच्या घरातलं वातावरण खूप कडक होत त्यामुळे कोणता मुलगा आवडणं तर दूरची गोष्ट मुलांशी मैत्री करण्याला देखील परवानगी नव्हती.

शाळेत असताना ही ती शांत होती दिसायला सुंदर मोहक असल्याने बऱ्याच मुलांनी तिला propose केलं होतं पण तिने कोणालाही आपल्या जवळ फिरकू ही दिल नव्हतं फक्त अभ्यास आणि अभ्यास. पण जेव्हा तिने अंकितला पाहिलं, ती विरघळली.अंकित आल्यावर रोहिणीने त्याची तिघींशी ओळख करून दिली तो देखील सगळयांना आधीपासून ओळखत असल्याप्रमाणे त्यांच्याशी गप्पा मारत होता.थोड्या वेळाने ती दोघे निघून गेली. इथे तिघींची कुजबूज सुरू झाली.किती फरक आहे दोघांमध्ये, अस म्हणत त्या तिघी आपापल्या घरी जायला निघाल्या. घरी जाताना सुद्धा अंकित तिच्या डोळ्यांसमोरून जायला तयार नव्हता.त्याचा विचार थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होती.पण विचार काय तिला स्वस्थ बसू देईना.

'अंकित किती भारी दिसतो. त्याने कस काय रोहिणीला पसंत केलं काय माहीत.रोहिणी जरा पण शोभत नाही त्याला.एकतर ती दिसायला पण साधारण आणि उंचीने पण कमी.म्हणतात ना प्रेम आंधळं असत,एवढे दिवस ऐकून होते.आज प्रत्यक्ष पाहीले. घरी आल्यावर फ्रेश होऊन काव्या जेवायला बसली.थोडसं खाऊन लगेच अभ्यासाला बसली.अभ्यास करताना पुस्तक तर डोळयांसमोर होत पण मन मात्र अजूनही अंकित भोवती पिंगा घालत होत.त्याच व्यक्तिमत्त्वच अस होत की कोणालाही तो आवडावा.विचार करत असतानाच तिने डोक्याला चापट मारली आणि 'बस झालं आता नको त्याचा विचार करू'.तीच मन काही पुस्तकात लागत नव्हतं मग तिने पुस्तक बंद केलं आणि झोपी गेली.

दिवसांमागून दिवस चालले होते.अंकित रोहिणीला भेटायला अधून मधून कॉलेजमध्ये येत असे. तिघींशी आता त्याची चांगली मैत्री झाली होती.कधी ते सर्वजण एकत्र फिरायला जात असत.अंकित खूप मनमोकळ्या स्वभावाचा होता.त्यामुळे या तिघींना कधी awkword वाटलं नाही. काव्याच्या मनात त्याने कधी घर केलं हे तिला देखील कळलं नाही.तो तिला आवडू लागला होता सतत त्याच्याशी बोलावं त्याला भेटावं,अस वाटायचं. तिला जाणीव होती की तो आपला कधीच होऊ शकत नाही म्हणून ती टाळायची त्याला पण तो स्वतः हुन फोन करायचा, गप्पा मारायचा.त्याच्या मनात काव्या फक्त एक मैत्रीण होती पण काव्या त्याच्यात गुंतत चालली होती. तिलाच कळत नव्हतं तिला काय होतंय.तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या तिला प्रेम ही भावना नवीन होती.

आता ते सर्वजण कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होते.या वर्षी जास्तीत जास्त वेळ अभ्यास करण्याचे ठरवले.त्याप्रमाणे सगळे भरपूर अभ्यास करत होते.शेवटच्या वर्षाचा निकाल लागला.सगळेच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. सर्वांची स्वप्ने आणि वाटा वेगळ्या होत्या.कॉलेज हा एक धागा होता जो या सर्वांना आजपर्यंत बांधून होता.पण आता कॉलेज तर संपलं.तसे सगळे आपापल्या मार्गाने निघून गेले. काव्या एका कंपनीमध्ये नोकरीला लागली.

साधारण ३ वर्षांनंतर, सकाळी काव्या ऑफिसमध्ये आली तेव्हा तिला कळलं की आज एका डिपार्टमेंट मध्ये इंटरव्ह्यू आहेत. इंटरव्ह्यू देऊन बाहेर पडणाऱ्या त्या व्यक्तीकडे काव्याच सहज लक्ष गेलं.त्या व्यक्तीला पाहून तिला खूप आनंद झाला.ती धावतच त्याच्याकडे गेली.'अंकित', आज इतक्या दिवसांनी ती अंकितला बघत होती.तिच्या डोळ्यासमोर कॉलेजचा तो दिवस आला ज्या दिवशी तिने पहिल्यांदा त्याला पाहिलं होतं.आजही तसाच होता तो.फक्त चष्मा लागला होता.

काव्या- what a pleasant surprise? कसा आहेस?? आणि रोहिणी कशी आहे??आता तर लग्न झालं असेल ना तुमचं!

अंकित- मी एकदम मजेत.तू कशी आहेस?

काव्या - मी एकदम मजेत..बाकी अजून काय चाललंय?

अंकित - काव्या, आपण नंतर बोलूया का? मी जरा घाईत आहे.

अस बोलून तो निघून गेला.

काव्याला आश्चर्य वाटलं.हा तोच अंकित आहे का जो नेहमी आपल्याला कॉल करायचा, msg पाठवायचा.छान मनमोकळ्या गप्पा मारायचा.असा काय वागला हा? नीट बोलला पण नाही आणि विचारलं त्याच उत्तर ही दिल नाही.माणसं इतकी कशी बदलतात, असा विचार करत ती तिच्या डेस्कपर्यत आली. ऑफिस सुटल्यानंतरही घरी जाताना तिच्या मनातून काही केल्या त्याचा विचार जाईना. तिला कॉलेजचे दिवस आठवले. किती गप्पा मारायचो आम्ही.खूप चांगले मित्र झालो होतो आणि आज आम्ही इतक्या वर्षांनी भेटलो तरी याला ना आनंद झाला ना माझ्याशी नीट बोलला.घरी गेल्यावरही त्याच्याच विचारात होती. कदाचित इंटरव्ह्यू च्या टेन्शनमध्ये असेल, उद्या येईलच ना ऑफिसमध्ये,अस समजून तिने त्याचा विचार सोडून दिला. दुसऱ्या दिवसापासून अंकितने ऑफिस जॉईन केलं.काव्याच्या शेजारच्या डेस्कवरच त्याला जागा देण्यात आली.काम सांगण्यात आले.अंकित सकाळी लवकरच ऑफिसला आला.काव्याने आल्यावर त्याला पाहिलं आणि खूप खुश झाली. तिने त्याला good morning विश केलं.अंकित ने पण तिला good morning म्हटलं आणि तो कॉम्प्युटर मध्ये डोकं घालून बसला.

आता मात्र काव्याला त्याचा राग आला एवढा कसला attitude आहे.अनोळखी असल्यासारख का वागतोय.काय बिनसलं आहे कोणास ठाऊक.जाऊ दे आता मी नाही बोलणार त्याला बोलायचं असेल तेव्हा बोलेल.अस म्हणून तिने यापुढे अंकितशी स्वतः हुन न बोलण्याचा निर्णय घेतला. अंकितला जॉईन होऊन १५ दिवस झाले होते.तरी म्हणावं तस अंकित आणि काव्याच एकमेकांशी बोलण झालं नव्हतं. एकदा अंकितला एका file संदर्भात काव्याशी बोलणे गरजेचे होते.नाईलाजाने त्याला काव्याशी बोलावं लागलं.सुरुवातीला तर काव्याने दुर्लक्ष केलं.पण ऑफिसच्या कामासंदर्भात होत म्हणून तिला त्याच्याशी बोलावं लागलं.ती त्यासंदर्भात त्याच्याशी बोलली आणि परत कॉम्प्युटर मध्ये डोकं घालून बसली.दोन दिवसांनी अंकित पुन्हा स्वतःहून काव्याशी बोलायला गेला.पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. 'आता आठवण आली का माझी' ,काव्या पुटपुटली.अंकितला आता कळलं होतं की काव्या आपल्यावर रागावली आहे.खरतर त्याला तिच्याशी बोलायचं होतं.पण ऑफिसमध्ये जॉईन झाल्यापासून तो तिला टाळत होता. कॉलेज पासूनची मैत्री असूनही अंकित तिच्याशी परक्यासारखं वागला.याच गोष्टीचा राग काव्याच्या मनात होता आणि हे अंकितला कळत होतं.

एके दिवशी ऑफिस सुटल्यावर गेटच्या बाहेर अंकित काव्याची वाट बघत उभा राहिला. काव्या गेटमधून बाहेर पडली,तिच अंकितकडे लक्ष गेलं पण तिने जाणूनबुजून बघून न बघितल्यासारखं केलं आणि ती चालू लागली तेवढ्यात, "काव्या",अंकित ने काव्याला हाक मारली.काव्याची पावले थांबली तस अंकित तिच्यासमोर येऊन उभा राहिला.

"मला तुझ्याशी बोलायचंय",अंकित अगतिक होऊन बोलत होता.

"बोला", काव्या चेहऱ्यावर काहीच भाव न आणता बोलली.

"इथे नको, समोरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसून बोलूया",अंकित.

रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर बराच वेळ दोघे फक्त बसून होते.मग काव्यानेच बोलायला सुरुवात केली.

"मला वाटत तुला काहीतरी बोलायचं होत म्हणून आपण इथे आलोय.मग बोलत का नाहीयेस.का माझा आणि स्वतःचा वेळ का वाया घालवतोयस?",काव्या खूप रागात बोलत होती.

काव्याचे रागावणे बघून अंकितने बोलायला सुरूवात केली.

"त्यादिवशी इंटरव्ह्यूला आलो तेव्हा थोडा टेन्शनमध्ये होतो आणि तू अचानक समोर आलीस, इतक्या वर्षांनी.खरंतर मला खूप आनंद झाला होता. मी बोलणार होतो तुझ्याशी पण तू रोहिणीचा विषय काढलास आणि मी नाही काही बोलू शकलो नाही", अंकितने आवंढा गिळला.

"म्हणजे", काव्या प्रश्नार्थक नजरेने अंकितकडे बघत होती.

"माझं लग्न झालंय पण रोहिणीशी नाही", अंकित म्हणाला.

"अरे देवा, तुमचं ब्रेक अप झालं की काय?", काव्या म्हणाली.

"हो, मी आणि कार्तिकीने लग्न केलं", अंकित म्हणाला.

"काय?", काव्या इतक्या मोठ्याने ओरडली की आजूबाजूची लोक त्यांच्याकडे बघायला लागली, तिला ओशाळल्यासारखं झालं.

"तू काय डोक्यावर पडलाय का तू?आणि कार्तिकीशी लग्न,खोटं-खोटं बोलतोयस ना तू? सकाळपासून कोणी भेटलं नाही का तुला? माझी मस्करी करतोयस",काव्या वैतागून म्हणाली.

"मला माहित होतं तुझा विश्वास नाही बसणार! पण हेच सत्य आहे",अंकितच्या डोळ्यात पाणी आलं.

काव्याला काय बोलावं हे सुचत नव्हतं.अनेक प्रश्न होते तिच्या मनात.

"अंकित, तुझं आणि रोहिणीच तर एकमेकांवर खूप प्रेम होतं.आम्ही तिघींनी बघितलंय तुम्हाला नेहमी एकत्र.Frankly speaking,तुम्ही जरा odd कपल होतात, पण आम्हाला खात्री होती, काही झालं तरी तुम्ही एकमेकांना कधी अंतर देणार नाही. एवढं सगळं छान चालू असताना ही कार्तिकी तुमच्यामध्ये कधी आली?", काव्याने तिची शंका बोलून दाखवली.

"सांगतो, कॉलेज झाल्यानंतर रोहिणीला नोकरी करता करता पुढचं शिक्षण घ्यायचं होत आणि मला फक्त नोकरी करायची होती कारण नोकरी असल्याशिवाय रोहिणी आणि माझं लग्न होणं अशक्य होतं. नशीबाने आम्हा दोघांना २-३ महिन्यात नोकरी मिळाली. तिने पुढच्या शिक्षणासाठी ऍडमिशन घेतल. नोकरी आणि तिचा अभ्यास, माझी नोकरी यामुळे आम्हाला एकमेकांना वेळ दयायला मिळायचा नाही. दररोज भेटणारे, गप्पा मारणारे आम्ही क्वचितच भेटत असू. फोनवर मात्र रोज बोलत होतो. अस वाटत होतं की आम्ही एकमेकांपासून लांब होतोय.असेच दिवस चालले होते.

साधारण 2 वर्षांनंतर माझ्या बाबांनी मला सांगितलं की त्यांनी माझ्यासाठी मुलगी बघितली आहे. मी घाबरलो. माझं रोहिणीवर प्रेम आहे हे मला घरच्यांना सांगावं लागलं. तिला घेऊन मी घरी आलो सगळयांना भेटवल, माझ्या घरच्यांनी आमचं नात स्वीकारलं नाही. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे आम्ही पळून जाऊन लग्न करण्याचा विचार केला. आम्ही जाणार त्या दिवशी माझ्या बाबांची तब्येत अचानक बिघडली, त्यांना हार्ट अटॅक आला.आम्हाला आमचा प्लॅन कॅन्सल करावा लागला. बाबा ऍडमिट असताना, त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं की त्यांनी माझ्यासाठी निवडलेल्या मुलीशी लग्न करावं. माझा नाईलाज होता. माझ्या निर्णयावर त्यांचं आयुष्य अवलंबून होत.भावनेच्या भरात मी त्यांना वचन दिलं.चार पाच दिवसांनी बाबांना घरी आणलं. त्यांची तब्येत थोडी सुधारल्यावर त्यांनी मला त्या मुलीबद्दल सांगितलं.ती कार्तिकी होती, मी तिला भेटायचं ठरवलं.तिला तर माझ्या आणि रोहिणी बदल माहीत होतं. मी मनातून सुखावलो होतो. ती नकार देईल मग बाबांना आमचं नात स्वीकारावं लागेल याच विचारात होतो मी. मी भेटलो तिला पण जे अपेक्षित नव्हतं ते घडलं. तिने सांगितलं मी आवडायचो तिला तिने मला वचन दिले की रोहिणीपेक्षा जास्त प्रेम करेन आणि खुश ठेवेन. आमचं लग्न झालं, मी सोडून घरातले सगळे खुश होते. सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं होतं. पण जसजसे दिवस जात होते तसं मला तीच वागणं खटकायला लागलं. तिचा स्वभाव खूप संशयी होता. मी कुठे ही गेलो की सारखी कॉल msg करायची. एकट्याने कुठे ही जाण्याची मुभा नव्हती. हळूहळू घरच्यांना ही आपली चूक कळून चुकली. बाबांना तर इतका धक्का बसला की त्यांना पुन्हा अटॅक आला.

मग मी ठरवलं की कसा का असेना आता आपले हेच नशीब म्हणून जगायचं.सगळ्यांना सुख मिळतेच असे नाही ना. तुला माहितीये माझं लग्न झालं आणि सहा महिन्यानंतर मला कळलं की रोहिणीच लग्न ठरलं. खूप वाईट वाटलं तेव्हा आमचं खरच खूप प्रेम होते एकमेकांवर. पण आज आम्ही दोघेही वेगळे झालो होतो. नंतर काहीच बातमी नाही कळली. मी पण खूप टेन्शनमध्ये असायचो. लग्न झालंय म्हणून राहतोय बाकी काहीच नाही. एकतर माझ्या मनाविरुद्ध लग्न झालं आणि त्यातही ती अशी वागते. अस बोलून तो रडवेला झाला, काव्याला त्याच लहान मुलासारखं रडणं बघून वाईट वाटलं. ती त्याला समजवू लागली.

काव्या-हे बघ तू अस रडू नकोस.जे झालं ते तुमचं नशीब होत.आता ते बदलता येणार नाही.

त्या वेळी काय बोलायचे हे तिला सुचत नव्हते.तिने त्याला समजवल आणि तिथून निघाली.

काव्याला खूप वाईट वाटत होते. अंकितची अवस्था तिला बघवत नव्हती. कॉलेजमध्ये असताना एकदम डॅशिंग असणारा अंकित खूपच अगतिक झाल्यासारखा वाटत होता.दुसऱ्या दिवसापासून काव्या आणि अंकित पूर्वीप्रमाणे बोलायला लागले. ऑफिसमध्ये एकत्र काम करणं,नंतर सोबत घरी जाणं, लंच कधी डिनर एकत्र करणं, हे सर्व सुरू होत.अंकित आता पूर्वीसारखा आनंदी राहू लागला होता. दिवसेंदिवस कार्तिकीचा संशयीपणा आणि चिडचिड वाढत होता. पण अंकितने ठरवलं होतं की तिच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या आनंदाचा विचार करायचा आणि काव्यासोबत तो आनंदी होता तर काव्यालाही आपला जुना मित्र पुन्हा भेटला म्हणून ती ही आनंदी असायची. काव्या आणि अंकितच्या मैत्रीला आता दोन वर्षे झाली.

एकदा ऑफिसमध्ये कामानिमित्त सगळयांना उशिरापर्यंत थांबावे लागणार होते.अंकित सोबत होता म्हणून काव्या निर्धास्त होती.तो तिला घरी सोडायला येईल, असे त्याने तिला सांगितले होते.सगळ्यांची कामं संपेपर्यंत रात्रीचे ८ वाजले. कामात सगळे इतके गुंतून गेले की वेळेचा पत्ताच लागला नाही. ऑफिसमधले एक एक जण आता निघायला लागले.काव्या अंकितला म्हणाली की आता आपण पण निघायला हव.अंकितने 'फक्त 10 मिनिटं थांब', असा हाताने इशारा केला.काव्या पण होकारार्थी मान हलवून त्याची वाट बघू लागली. थोड्यावेळाने दोघे निघाले.अंकित आणि काव्या दोघे बाईकवर बसले.काही अंतर गेल्यावर अंकितला कॉल आला.त्याने बाईक रस्त्याच्या कडेला लावली आणि कॉल पाहिला.कार्तिकीचा कॉल होता. ती खूप रागावली होती, आधीच ती संशय घेत होती आणि आज तर अंकितने तिचे एक ही कॉल घेतला नाही.खूप बडबडली त्याला.तसा अंकितचा चेहरा पडला.मागे बसलेली काव्या बाईकवरून उतरली. अंकितला पाहून तिला खूप वाईट वाटले.अंकित पण बाईक वरून उतरला. जवळच एक कट्टा होता तिथे जाऊन उभा राहिला. पौर्णिमेचा चंद्र आकाशात चमकत होता.तो कट्टयाजवळ उभा राहून चंद्राकडे एकटक बघत होता.काव्याने थोडं पुढे जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला.तस अंकितने काव्याला घट्ट मिठी मारली.अंकितच्या अश्या अचानक वागण्याला काय प्रत्युत्तर द्यावे या संभ्रमात पडली काव्या.आज तो दुःखी होता, त्याला सांत्वनाची गरज होती.कधी काळी काव्या ज्याच्या प्रेमात होती आज त्याने तिला मिठीत घेतलं होतं.मग ते अनावधानाने का होईना, एका क्षणासाठी ती सार काही विसरली.तिनेही त्याच्या मिठीला प्रतिसाद दिला..आयुष्यात प्रथमच काव्याला कोणीतरी एवढी कडकडून मिठी मारली होती...अंकितच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते..काव्या त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होती.काव्याला आज खूप आनंद झाला होता अंकितच्या मिठीतून बाहेर येऊच नये.हा क्षण इथेच थांबावा अस तिला मनोमन वाटत होत. काही वेळाने ती भानावर आली आणि मिठी सोडवत त्याला बाजूला केलं.

काव्या-अंकित, नको ना रडूस.शांत हो.हे बघ,मी तुझी परिस्थिती समजू शकते,अस नाही बोलणार.सांभाळ स्वतःला. त्याची नजर तिच्याकडे गेली. तिच्या डोळ्यात बघू लागला.ते जिथे उभे होते तिथे वाहनांची वर्दळ कमी होती. काळोख झाला होता. प्रकाश होता तो फक्त पौर्णिमेच्या चंद्राचा आणि चमकणाऱ्या चांदण्यांचा. दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत होते.आज वेगळीच चमक होती दोघांच्या डोळ्यात.त्यांने हळूच तिच्या गालावरून आपली बोटं फिरवली.त्याचा स्पर्श होताच काव्याने डोळे मिटून घेतले.त्याची बोटे तिच्या नाजूक गुलाबी ओठांना स्पर्श करू लागली. तिच्या अंगावर शहारे येऊ लागले. हृदयाची धडधड वाढू लागली. श्वासोच्छ्वास वेगाने होऊ लागले.ती मान खाली घालून उभी होती.त्याने तिच्या हनुवटीला धरुन तिचा चेहरा वर केला आणि हळूच तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. काव्या त्याच्या स्पर्शाने सुखावली होती.ती देखील त्याच्यात सामावली होती.दोघांचे उष्ण श्वास एकमेकांत गुंतले होते.नभीचा चंद्र जणू दोघांकडे पाहत होता.

काही सेकंदातच काव्याला भान आलं.आपण हे काय करतोय या जाणिवेने ती अंकितपासून दूर झाली. तिला स्वतःचीच लाज वाटू लागली.अंकितचे लग्न झालंय आणि आपण हे काय करून बसलो.म्हणून किळस वाटू लागली.

अंकित-काव्या, तुझा सहवास हवाहवासा वाटतो मला.दोन वर्षांमध्ये आपण खूप जवळ आलो ना ग आपण. किती समजूतदार आहेस तू, प्रेमळ आहेस.तू का नाही आलीस माझ्या आयुष्यात आधी,रोहिणीच्या पण आधी?

काव्याला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. ती फक्त त्याच्याकडे पाहत होती.

तिच्या डोळ्यात पाणी आलं.तिला काही बोलता येत नव्हतं. ती अंकितपासून लांब जाऊ लागली.तस त्याने तिला स्वतःकडे ओढलं.

अंकित-काव्या,नको ना लांब जाऊस माझ्यापासून प्लिज.आयुष्यात सगळं मिळालंय ग.पण खरं प्रेम नशीबातच नाहीये माझ्या. तू करशील का माझ्यावर प्रेम?

काव्या-तू वेडा झाला आहेस का तुझं लग्न झालंय. लाज कशी वाटत नाही तुला हे विचारायला.काव्या रागाने बोलली.

अंकित-लग्न,काही नाहीये त्या लग्नात.बाबांना दिलेल्या वचनाच ओझं घेऊन वावरतोय मी इतकी वर्ष, नवरा बायकोसारख नात नाहीये आमच्यात.मला गरज आहे तुझी.तुझ्या साथीची.प्लिज, नाही म्हणू नकोस.

अस म्हणून त्याने पुन्हा तिला मिठी मारली.मिठी सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच अंकित अजूनच मिठी घट्ट केली.ती मिठी सोडवण्याचा प्रयत्न करत बाजूला झाली.

अंकित-प्लिज मला अस झिडकरू नकोस.

तो अगतिकपणे म्हणाला.

काव्या- लग्न, प्रेम या गोष्टी तुला काय पोरखेळ वाटतात.एकीबरोबर प्रेम करायचं, दुसरी बरोबर लग्न करायचं आणि तिसरी बरोबर अफेअर करायचं.तुला काहीच कसं वाटत नाहीये बोलताना.जरा तरी विचार करून बोल आणि आता खुप उशीर झालाय आपल्याच निघायला तुझी बायको तिथे वाट बघत असेल.

अंकित-अफेअर नाही आपण लग्न करू.मी कार्तिकीला सोडतो.

काव्या - प्लिज, अंकित मला मोहात पाडू नकोस.खूप प्रयत्नांनी मी विसरू शकले आहे.आता पुन्हा नाही.

अस म्हणून ती रडू लागली.

अंकित- काय विसरू शकलीस ?

काव्या - काही नाही. (मनातल्या मनात,काय बोलून गेले मी)

ती काही बोलण्यास टाळाटाळ करू लागली.

अंकित - सांग ना प्लिज.

अस म्हणून त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि गयावया करू लागला.

काव्या - कस सांगू तुला.(मोठा उसासा टाकत) मला आवडला होतास तू, ज्याक्षणी मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच. बघतच बसले होते तुझ्याकडे.तुझं बोलणं, तुझं वागणं याच एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं माझ्या मनात.दिवसरात्र फक्त तुझाच विचार यायचा.वाटायचं आपल्या आयुष्यात कोणीतरी असाच यावा.कदाचित प्रेम ही नाजूक भावना माझ्यात जन्म घेत होती.पण मला जाणीव होती सत्याची.काय असत ना आपल्याला तेच आवडत जे आपल्या नशिबात नसत.असच झालं माझं ही.पण मी तुला माझ्यासाठी मिळवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.कारण कितीही केलं तरी तू आणि रोहिणी सोबत होतात.थोडं weird होतात तुम्ही दोघे.पण ती खुश होती तुझ्यासोबत.मी notice केलंय तुझ्याशी बोलताना ती फक्त तुझी असायची.काळाच, वेळेचं, काही भान नसायचं तिला. कदाचित म्हणूनच मला ही त्यावेळी असा वाटायचं माझं ही कोणीतरी असावं जो माझ्यावर आणि मी ज्याच्यावर प्रेम करेन. कधी कधी हेवा वाटायचा तुम्हा दोघांचा.

अंकित - मग आता तुझी इच्छा पूर्ण करू का मी?

काव्या - तू खरच वेडा आहेस मला आता तुझ्याशी काही बोलायचं नाहीये प्लिज,आपण इथून जाऊया.खूप उशीर झालाय, खरच.

काव्या खूपच रागावली होती.म्हणून अंकितने आता काही न बोलता तिथून निघण्याचा निर्णय घेतला.

अंकित ने तिला घराजवळ सोडलं मागे वळून न बघता काव्या तशीच तावातावाने घरी निघून गेली.तिला भूकच नव्हती म्हणून ती सरळ जाऊन झोपली. झोपच येत नव्हती.डोळ्यासमोर फक्त त्याचा चेहरा त्याचे डोळे आणि त्याचा स्पर्श आज इतक्या वर्षांनी त्याचा स्पर्श झाला होता तिला.ती विचार करत बसली होती.

कस रिऍक्ट करू माझ पहिलं प्रेम माझ्या आयुष्यात परत येऊ पाहतय याचा आनंद व्यक्त करू की ते प्रेम दुसऱ्याच आहे आणि त्याला सोडून त्याचा संसार मोडून माझ्याकडे येतंय याच दुःख व्यक्त करू.खूप कठीण हे सगळं स्वीकारणं. त्या दिवसानंतर काव्याने ठरवलं होतं अंकितला बघायचं नाही भेटायचं नाही.त्याच्याकडे सरळ दुर्लक्ष करायचं.त्यादिवशी जे झालं ते झालं.चूक दोघांची होती, आता पुन्हा ते उगळण्यात काही अर्थ नाही म्हणून तिने ठरवलं त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यानेच सगळं काही व्यवस्थित होईल.

दिवसांमागून दिवस जात होते.अंकितला तिच्या वागण्यातला फरक कळत होता.काव्या त्याच्याशी बोलत नव्हती त्यामुळे तो अस्वस्थ होता.घरी कार्तिकी त्रास देत होती आणि ऑफिसमध्ये काव्याच्या मनाचा काही थांगपत्ता लागत नव्हता.त्याला कळून चुकलं होतं की आपल्या वागण्यामुळे काव्या दुखावली आहे.कदाचित त्याच्यामुळे ती आपल्यापासून दूर ही जाईल म्हणून त्यांनी तिला तिची माफी मागायची ठरवलं.

ऑफिसमध्ये तो तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा पण काव्या त्याच्याकडे दुर्लक्ष करायची.मग अंकित तिला कॉल करायचा.ती त्याचा फोन ही घ्यायची नाही.

पंधरा दिवसांनंतर

त्या दिवशी अंकित ऑफिसला आला नाही.काव्याच्या हे लक्षात आलं तेव्हा ती काळजीत पडली.काय झालं असेल. तिचं कामात लक्ष लागत नव्हते.दोघांचं भांडण तर झालं नसेल ना.तो आजारी तर नसेल ना, या विचारातच तिचा संपूर्ण दिवस गेला.गेल्या काही दिवसांत तिने त्याला पूर्णपणे टाळलं होत पण आज तो दिसला नाही तर ती अस्वस्थ झाली.

'हे काय होतंय मला.अंकितचा विचार का करतेय मी.मला नको ना फरक पडायला, तो येवो नाहीतर न येवो. मला काय त्याच', काव्या मनातल्या मनात बोलत होती.

आज तिच्या डिपार्टमेंट मध्ये निनाद नवीन जॉईन झाला होता.टीम लीडरने सगळ्यांशी त्याची ओळख करून दिली आणि सगळे आपापल्या कामाला लागले.

जेवणाच्या वेळेत निनाद काव्याशी स्वतःहून बोलायला आला.दोघांनी एकत्र लंच केलं.सकाळपासून अस्वस्थ असलेली काव्या निनादशी मोकळेपणाने बोलत होती.थोड्या वेळासाठी का होईना अंकितचा विचार तिच्या मनातून निघाला होता. निनाद होताच तसा. उंच, गोरा, मनमोहक हास्य, कोणालाही आपलस करेल अस लाघवी बोलणं.

दुसऱ्या दिवशी अंकित लिफ्टजवळ उभा राहून काव्याची वाट पाहत होता. ती त्याला जाणूनबुजून टाळत होती, हे त्याच्या लक्षात आलं होतं म्हणून ऑफिसमध्ये जाण्याअगोदर तिच्याशी त्याला बोलायचं होत.

काही वेळातच काव्या येते.लिफ्टजवळ अंकितला पाहून पुढे जायला कचरते.दोघांची नजरानजर होताच ती खाली मान घालून लिफ्टसमोर उभी राहते.

अंकित - काव्या, जरा थांबशील का.मला बोलायचंय तुझ्याशी.

काव्या- मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये.

अंकित- मला कळतंय तू मला टाळतेयस.माझी चूक झाली.भावनेच्या भरात मी,पण प्लिज तू माझ्याकडे अस दुर्लक्ष करू नकोस.मला नाही सहन होत आहे तुझं हे वागणं.काल घरी होतो पण एक क्षण असा नाही गेला की तुझी आठवण नाही आली, मी.

काव्या - अंकित, हे सगळं बोलायची ही वेळ नाही.

दोघ बोलत असताना निनाद तिथे आला.त्याला काव्या थोडी अस्वस्थ वाटत होती.

निनाद - हाय काव्या, गुड मॉर्निंग.इज एव्हरीथिंग ओके?

काव्या - येस, फाईन.गुड मॉर्निंग.निनाद , थिस इज अंकित.

अंकित-निनाद,आपल्या डिपार्टमेंट मध्ये कालपासून जॉईन झाला.

काव्याने दोघांची एकमेकांना ओळख करून दिली.दोघांनी हात मिळवले.तेवढ्यात लिफ्ट आली.काव्या लिफ्टमध्ये जाणार इतक्यात अंकितने तिला ओढलं आणि आपण स्टेप्सने जाऊ, अस म्हणत तिला घेऊन गेला.निनाद शांतपणे लिफ्टमधून गेला.

चौथ्या मजल्यावर कोणी नाही असं पाहून एका कोपऱ्यात तिला घेऊन गेला.ती दचकते.ऑफिस असल्यामुळे ती ओरडूही शकत नव्हती.

काव्या - तुला काय वेड लागलंय का.इथे का घेऊन आला आहेस मला.

अंकित - इथे कोणी नाही म्हणून (अस म्हणून तो तिचे दोन्ही हात पकडून तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो) मला बोलायचय तुझ्याशी.

काव्या- ( त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत) सोड मला, झालं ना आता बोलून,अजून काय बोलायचय आणि काय घाई आहे तुला बोलायची ऑफिस सुटल्यानंतर बोललो नसतो का? प्लिज, अंकित सोड मला.

त्याचा हात सोडून जाण्याचा प्रयत्न करते पण तो तिचा हात पकडून ठेवतो.

अंकित- काव्या, प्लिज मला झिडकारून जाऊ नकोस.

काव्या - संध्याकाळी बोलू प्लिज,आता मला जाऊ दे.

ती जायला निघताच तो तिला जवळ ओढतो.पुन्हा तिच्या चेहर्‍यावरून हात फिरवायचा प्रयत्न करतो.तिच्या केसांवरून हात फिरवतो.

कसबस ती स्वतःला सोडवून तिथून निघते.

काव्या डेस्कवर येते.तिचं कामात लक्ष लागत नव्हतं.तिला सतत त्याचा स्पर्श तिचा जाणवत होता.ती गुंतत चालली होती त्याच्यामध्ये.जेवढा त्याचा विचार करायचा टाळत होती तेवढा तो जवळ येण्याचा प्रयत्न करत होता.ऑफिसमध्ये असताना सतत तो तिला मॅसेज करायचा.त्याच तिच्यावर किती प्रेम आहे, याची जाणीव करून द्यायचा. त्याच्या अश्या वागण्यामुळे काव्या खूप डिस्टर्ब असायची.

काव्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून निनादच्या लक्षात आलं होतं की अंकित आणि काव्यामध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे.तो दोघांनाही विचारू शकत नव्हता म्हणून आपणच शोधून काढायला हवं असा त्याने विचार केला.

तो मुद्दाम काव्याशी बोलण्याचा, तिच्याशी थट्टामस्करी करण्याचा प्रयत्न करायचा.काव्याही त्याला प्रतिसाद द्यायची.त्याच्या सोबत लंच करायची.हे सगळं पाहून अंकितचा जळफळाट व्हायचा.निनादला हे सगळं कळत.

ऑफिस सुटल्यानंतर अंकित काव्याला सोबत येण्याबद्दल विचारतो. काव्याच एक मन बोलत असते की जावं आणि एक मन बोलत असते की जाऊ नये.अंकित खूपच गयावया करतो म्हणून ती त्याच्याबरोबर जाते.

निनाद त्यांच्यावर पाळत ठेवून असतो.ते दोघे निघतात तस तो त्यांच्या पाठी जातो.पुन्हा अंकित त्याच ठिकाणी गाडी थांबवतो जिथे काही दिवसांपूर्वी ते आले होते.काव्या थोडी घाबरते.

काव्या - इथे का गाडी थांबवली?

अंकित - उतर ना, इथे बोलत बसू आपण.

काव्या उतरते.अंकित ही उतरतो आणि कट्टयाजवळ चलण्याबद्दल हाताने खुणावतो.

अंकित-बस ना,अस म्हणत तिचा हात पकडून तिला बसवतो.

काव्या-प्लिज, माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस.जे काही बोलायचंय ते लांबूनच बोल.

अंकित-काव्या, प्लिज मला समजून घे.माझ्या प्रेमाचा स्वीकार कर.

काव्या-अंकित, किती समजावू तुला? कळत कस नाही, मी तुझी फक्त मैत्रीण आहे.तू विवाहित आहेस.कार्तिकीचा तरी विचार कर.

अंकित-आणि माझ्या मनाचं काय? माझा विचार करत का? ना कार्तिकी ना तू. त्या दिवशी जे काही झालं ते तुला आवडलं नाही का आणि तुझं तर प्रेम होतं ना माझ्यावर.मी तुझं पहिलं प्रेम आहे.सांग मला. मी तुला जवळ घेतल्यावर, तुला मिठीत घेतल्यावर शहारे नाही का येत? आपलं पहिलं किस आठव.किती रमली होतीस तू?माझ्या डोळ्यात बघ आणि सांग.

काव्या-अंकित, काय करू मी.नाही राहू शकत तुझ्याशिवाय वेड लागलय मला.मला माहिती आहे हे चुकीचं आहे.आपलं नातं आपलं प्रेम, सगळं चुकीच आहे.कसं दूर ठेवू स्वतःला तुझ्यापासून.माझं पहिलं प्रेम होतास तू.पण आता आपलं नातं शक्य नाहीये. तुझं लग्न झालंय.म्हणून मी तुला रिक्वेस्ट करते तू नको मला फोर्स करूस.मी या नात्याला न्याय नाही देऊ शकत.आपण इथेच थांबूया.आपण जे क्षण एकत्र घालवले ते स्वप्न समजून विसरून जाऊ.हेच आपल्या दोघांच्या आयुष्यासाठी चांगला आहे.मी हात जोडते तुझ्या समोर, प्लिज यापुढे मला प्रेमाची गळ घालू नकोस.खूप त्रास होतोय मला या सगळ्याचा.तुझ्या जबरदस्तीच्या प्रेमाचा, तुझ्या वागण्याचा असा वागू नकोस की मी तुझा द्वेष करायला लागेल.खूप सुंदर खूप गोड प्रेम होतं माझं तुझ्यावर.ते असंच राहू दे.माझ्या मनात.मी कायम प्रेम करीन तुझ्यावर.माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवीन तुझं प्रेम.इतकी वर्ष तेच करत आली आहे.पण माझ्याकडून प्रेमाची अपेक्षा करू नकोस आता परिस्थिती खूप वेगळी आहे.

अंकित- ठीक आहे.मी यापुढे तुला प्रेमाचं काही बोलणार नाही पण तू माझ्याशी अशी तुसडेपणाने वागू नकोस.माझा द्वेष करू नकोस,मला टाळू नकोस प्लिज.एवढं करशील.आपण पुन्हा नव्याने आपल्या नात सुरू करू.आपली मैत्री सुरू करू.पण तू माझ्यापासून लांब जाऊ नको प्लिज.

काव्याने होकारार्थी मान हलवली आणि ते दोघे जायला निघाले.

काही अंतरावर उभ्या असलेला निनाद दोघांचं बोलणं ऐकतो.

ते दोघे निघतात तस निनाद पण जायला निघतो.

दुसऱ्या दिवसापासून काव्या आणि अंकित पुन्हा बोलायला लागतात.पण अंकितचा स्वभाव थोडा बदलतो. तो काव्यावर आपला हक्क दाखवण्याचा प्रयत्न करतो.तिने त्याला प्रेमासाठी नाही तर मैत्री साठी होकार दिलेला असतो हे तो विसरून जातो.रात्री अपरात्री तिला मॅसेज करणं, कधीही कॉल करणं, आणि नाही उचलला तर तिला रागावणं. तिला भेटायला बोलावणं.काव्याला त्याच हे वागणं अजिबात आवडत नाही. पण त्याच्या आनंदासाठी ती सगळं सहन करते.त्याला भेटते.काही दिवसात तिला या सगळ्याचा खूप त्रास व्हायला लागला होता.

काव्या हतबल झाली होती.ती जेवढा अंकितपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती तेवढी अजूनच त्याच्याकडे ओढली जात होती.अंकित तिला स्वतःपासून दूर होऊच देत नव्हता.

काव्याची मनस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली होती.

शेवटी निनाद ने ठरवलं.काव्याशी बोलायलाच हवं.

निनादने काव्याला ऑफिस सुटल्यानंतर कॉफी प्यायला जाऊ असा मॅसेज केला.काव्यानेही जाण्याची तयारी दाखवली.

ऑफिस जवळच्या कॅफेमध्ये निनाद काव्याची वाट बघत बसला होता.आज काहीही झालं तरी सगळं काही सांगून टाकायचं, असे मनोमन ठरवलं होतं त्याने.

१० मिनिटांनी काव्या आली.निनादला इकडे तिकडे शोधलं आणि तो दिसला तस टेबल जवळ जाऊन उभी राहिली, निनादने बसण्याचा इशारा केला.काव्याने मोबाईल बॅग मध्ये ठेवला आणि खुर्चीवर बसली.

निनादने दोघांसाठी कॉफी ऑर्डर केली.बराच वेळ काव्या शांत होती,निनादने बोलायला सुरुवात केली.

निनाद- काव्या

काव्या- ह.तुला काही बोलायचंय का??

(काव्याने त्याच्याकडे पाहिले तेव्हा निनादला बोलताच येईना.खूप प्रयत्नांनी त्याने विषयाला सुरुवात केली)

निनाद - हो म्हणजे.अंम.कस बोलू हेच कळत नाहीये (दीर्घ श्वास घेऊन) काव्या हे तू काय करतेयस.वेडी झाली आहेस का तू?

काव्या - कशाबद्दल बोलतोयस तू??

निनाद - अंकितबद्दल,मला सगळं कळलंय.

काव्याला घाम फुटतो.कारण आजपर्यंत तिच्या आणि अंकितच्या नात्याबद्दल तिने कोणालाही सांगितलं नव्हतं.सांगण्यासारख नात नव्हतंच त्यांचं.

काव्या - तुला कस काय कळलं?

(काव्या अडखळत विचारते)

निनाद - मी जॉईन झाल्यापासून बघतोय तू खूप डिस्टर्ब असायचीस.तुझ्या वागण्याचा काही अर्थ लागत नव्हता आणि मी तुला अस बघू शकत नव्हतो.म्हणून त्या दिवशी मी अंकितचा आणि तुझा पाठलाग केला.तुम्हा दोघांना एकत्र पाहिलं आणि मग तुझ्या अस्वस्थतेच कारण कळलं.काव्या, मी जरा स्पष्टच बोलतो.तो फक्त तुझा वापर करतोय.त्याची गरज संपली की तो तुला सोडून जाईल.

काव्या- मग काय करू मी.(अस म्हणत ती रडायला लागते)

निनाद - कधी कधी आपण आयुष्यात असे काही निर्णय घेतो की ज्यामुळे आणि आपल्या आयुष्यात अशी माणसं येतात की ज्यांच्यामुळे आपण सुखी नाही राहू शकत.तेव्हा अश्या व्यक्तींना आपल्या आयुष्यातून कायमच काढून टाकण्यातच शहाणपणा ठरतो.

काव्या-निनाद, तू कधी कोणावर प्रेम नाही केलंस म्हणून तू हे बोलू शकतोस.मला सगळं कळतंय ज्या वाटेवर मी उभी आहे तिथून पुढे गेल्यावर मला सुख कधीच नाही मिळणार.कारण ते सुख कधी माझं नव्हतंच.तो फक्त भास होता आणि भास फक्त वेदना देऊ शकतो सुख नाही.आजपर्यंत मी जे अनुभवलं ते मला मिळावं याची खूप इच्छा होती माझी.पण अंकित सोबत आयुष्य घालवाव अस मला कधीच नाही वाटलं.जे माझं नव्हतं आणि यापुढे माझं कधी होणार नाही, त्याची अपेक्षा का करू?

या सगळ्याची जाणीव आहे रे मला पण म्हणतात कळतंय पण वळत नाही.खूप प्रयत्न केला स्वतःला समजवण्याचा.त्याच्यापासून दूर जाण्याचा.त्याला झिडकरण्याचा.पण नाही होत माझ्याकडून काहीच.

पण तू का माझ्या आयुष्यात इतका इंटरेस्ट घेत आहेस.(डोळे पुसत काव्या त्याला विचारते)

निनाद - कारण मला तू खूप आवडतेस.मला लग्न करायचंय तुझ्याशी.

काव्या- निनाद, हे काय बोलतोयस तू?अरे आता तर भेटलो आपण.आणि इतक्यात प्रेम, लग्न?

(काव्यालाही काय बोलावं हे सुचत नव्हतं.निनाद फक्त तिचा मित्र होता.आपल्याबद्दल अस काही त्याच्या मनात असेल,अस तिला वाटलं नव्हतं.)

निनाद - काव्या, कदाचित तू मला ओळखत नाहीस.आपण एकत्र कॉलेजमध्ये होतो.कॉलेजमध्ये असल्यापासून आवडायचीस तू मला.कॉलेजच्या पहिल्या दिवशी तुला पहिल्यादा पाहिलं आणि तेव्हापासून फक्त तुझाच विचार.पण कधी तुझ्याशी बोलण्याची हिम्मत नाही झाली.थोडा घाबरट होतो आणि मुलींशी काय तर कोणाशीच बोलायला जमायचं नाही. तुला मी आवडलो नाही तर,पण दुरूनच बघायचो तुला.येता जाता.कॅन्टीनमध्ये, लायब्ररीमध्ये, कॉलेजच्या प्रोग्राम मध्ये तू साडी नेसून यायचीस ना तेव्हा तर रात्रीची झोपच लागायची नाही मला.कॉलेजची तीन वर्ष ते आजपर्यंत मी फक्त तुझा आणि तुझाच विचार केला.तुझ्यावर खरं प्रेम केलं.

ऑफिसमध्ये आलो त्या दिवशी तुला पाहिलं आणि वाटलं की मला नशिबाने अजून एक संधी दिली आहे.कॉलेजमध्ये असताना मी तुझ्याशी बोलू शकलो नाही माझ्या प्रेमाबद्दल सांगू शकलो नाही.म्हणून जॉईन झाल्याबरोबर मी स्वतःहून तुझ्याशी बोलायला आलो.बऱ्याचदा प्रयत्न केला तुला माझ्या मनातल सांगायचा.पण तू कोणत्यातरी दडपणाखाली वाटायचीस.

काव्या - निनाद,मला वाटलं ही नव्हतं.माझ्यावर कोणी इतक्या वर्षांपासून प्रेम करतय.प्रेम, किती सुंदर भावना आहे ना.पण याच प्रेमाने आता माझं जगणं कठीण करून ठेवलंय.हेल्पलेस झाल्यासारखं वाटतंय मला.काहीच निर्णय घेता येत नाहीयेत.माझ खूप प्रेम आहे त्याच्यावर. मी त्याला नाही विसरूही शकत नाही आणि त्याला स्वीकारूही शकत नाही.खूप त्रास होतोय मला या सगळ्याचा.

निनाद - काव्या, मी तुला अस नाही बघू शकत ग. माझी फक्त एकच इच्छा आहे की तू आनंदात राहवस. हे बघ मी तुला जबरदस्ती नाही करणार की तू मला होकार द्यावा.पण त्या अंकितचा विचार तू मनातून काढून टाक प्लिज. नेहमीच तुम्ही सोबत असाल याची शाश्वती आहे का? त्याच्यासाठी तू नेहमीच दुसरी स्त्री असशील. तो त्याच्या बायकोला तर कधीच सोडणार नाही आणि तो तुझ्याशी कधी लग्नही करणार नाही काय करणार आहेस मग? आयुष्यभर त्याची दुसरी स्त्री म्हणून राहणार आहेस? एवढं लक्षात ठेव तो तुला कधीच बायकोच स्थान देणार नाही. मी जरा स्पष्टपणेच बोललो,माझ्या बोलण्याचा तू थोडा तरी विचार करावा अस वाटत मला.जो काही निर्णय घ्यायचाय तो तुला घ्यायचाय.शेवटी आयुष्य तुझं आहे.

अस बोलून तो निघून जातो तो गेल्यानंतर काव्या त्याच्या बोलण्याचा विचार करते.निनाद जे बोलला ते खरंच आहे. दुसऱ्यांचा संसार मोडून मला माझा संसार करायचं नाहीये.मला या सर्वातून बाहेर पडायला हवं.मान्य आहे मला की माझं प्रेम होतं या अंकितवर.पण जर का प्रेम इतका त्रास देत असेल तर मला नको असलं प्रेम.चार पाच दिवसांनी ऑफिसमध्ये गेल्यावर काव्या मनाशी काहीतरी ठरवते आणि निनादला मॅसेज करते की आपण संध्याकाळी कॉफी प्यायला जाऊ मला बोलायचंय तुझ्याशी.

ती पुन्हा अंकितला टाळते कारण त्याच्याशी बोलली तर ती पुन्हा अस्वस्थ होते.त्याचा विचार करणं बंद करून ती कामाकडे लक्ष देते.आनंदी राहण्याचा प्रयत्न करते.

संध्याकाळी काव्या सर्वात आधी निघते आणि कॉफी शॉप मध्ये जाते.निनादही येतो.तो थोडा टेन्शनमध्ये असतो.काय बोलायचं असेल काव्याला याच विचारात येऊन तिच्यासमोर बसतो.

तो आल्यावर लगेचच काव्या बोलायला सुरू करते.

काव्या - निनाद किती प्रेम करतोस माझ्यावर?

निनाद - (तिच्याकडे पाहून) मला चंद्र सूर्य तारे यासारखं काही नाही बोलता येत किंवा अलंकारिक भाषा नाही वापरता येत.पण मी वचन देतो की तुझ्या डोळ्यातून कधी पाणी नाही येऊ देणार.तुझ्या चेेहर्‍यावरचा आनंद नाही कधी कमी होणार.आयुष्यभर तुला साथ देईन आणि फक्त तुझ्यावर प्रेम करत राहीन.असं बोलून त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि तो खाली मान घालून बसला.

काव्या - त्या दिवशी तू जे काही बोललास याचा खूप विचार केला.प्रेम किती सुंदर भावना आहे.पण ती जर योग्य व्यक्तीवर केली तरच.प्रेमातून आनंद मिळायला हवा.त्याचा त्रास नको व्हायला.काही वेळासाठी मी विसरले होते.नको त्या वाटेवर जात होते, मला मदत करशील या सगळ्यातून बाहेर पडायला? मदत करशील मला पुन्हा पूर्वीसारखी आनंदी बनायला?

निनादच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात.काय बोलावं हे सुचत नव्हतं त्याला.ती त्याच्या हातावर हात ठेवते आणि त्याला विचारते ," विल यू मॅरी मी?"

निनाद होकारार्थी मान हलवतो.दोघ कॉफी पितात आणि एकत्र निघतात.

निघताना काव्याला काहीतरी आठवत.ती पर्समधून मोबाईल काढते आणि अंकितला कॉल करते.

काव्या - हॅलो अंकित, एक गुड न्युज द्यायची आहे तुला.मी आणि निनाद लग्न करतोय.अस म्हणून तिने कॉल कट केला.

काव्याच्या चेहऱ्यावर एक समाधान होत आणि निनादच्या चेहऱ्यावर आनंद.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama