बास्स! ..आता अजून नाही.
बास्स! ..आता अजून नाही.


आज अण्णा फारच खुशीत होते त्यांच्या लाडक्या लेकीने आज त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार केले होते. अण्णा सोलापूरच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात क्लर्क म्हणून गेली वीस वर्ष नोकरीला होते. ते त्यांच्या कर्तव्यनिष्ठ आणि स्वाभिमानी स्वभावामुळे आपल्या सहकारी मित्रांमध्ये प्रसिद्ध होते. कुठल्याही प्रकारचा अन्याय ना स्वतः सहन करायचे ना की इतरांवर होऊ द्यायचे अशी त्यांची वृत्ती होती.
अण्णांचे लहानपणापासूनच वकील बनण्याचे स्वप्न होते. परंतु घरच्या परिस्थितीमुळे त्यांचे ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. परंतु आज अस्मिताने त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण केले होते. अण्णांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. आपल्या मुलीला त्या वकिली वेशभूषेत पाहून त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
अस्मिताने वाकून त्यांना नमस्कार केला तसे अण्णा म्हणाले, बेटा आता तुझ्या पुढे एकच ध्येय ठेव, कुणावरही अन्याय होऊ देऊ नकोस. नेहमी सत्याची कास धर. अस्मिता आपल्या बाबांप्रमानेच ध्येयवादी आणि स्वाभिमानी वृत्तीची होती. अगदी बालपणापासून तिला वकील होण्याचे वेध लागले होते आणि कित्येकदा ती घरी बहिणीबरोबर कोर्ट कचेरीचा लुटूपुटू खेळ खेळी. आणि आज ती खरोखरच वकील झाली होती.
हळूहळू तिच्या अभ्यासू आणि कामसू वृत्तीमुळे तिने काही काळातच या क्षेत्रात खूप प्रगती केली आणि आज एक यशस्वी वकील म्हणून मुंबई च्या हाय कोर्टात ती कार्यरत होती. शिवाय एक नामांकित वकील म्हणून तिची सगळीकडे ख्याती झाली होती. कितीतरी अबला नारींना तिने न्याय मिळवून दिला होता. स्त्रियां वर होणाऱ्या अत्याचार विरूद्ध तिने बंडच पुकारले होते. त्यांची ती जणू रक्षकच बनली होती. तिची ही प्रगती पाहून अण्णांचे मन समाधानाने तृप्त झाले होते. आपल्या मुलीचा त्यांना खूप अभिमान वाटायचा.
आज नेहमीप्रमाणे अस्मिता तिच्या ऑफिसमधे कामात गर्क होती तेवढ्यात बाहेरून खूप गोंगाट ऐकू आला. ती चौकशी करणार इतक्यात तिच्या समोर चित्रपट क्षेत्रातील एका प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्रीचे वडील उभे ठाकले. आपले दोन्ही हात जोडून त्यांनी तिला अगदी कळवळून आपल्या मुलीची केस हाती घेण्याची विनंती केली. त्या तरुण अभिनेत्रीने एकाएकी आत्महत्या केल्याच्या बातमीने सिने जगतात एकच खळबळ माजली होती.
अस्मिताने त्यांची बाजू शांतपणे ऐकून घेतली. ते मोठ्या आशेने तिच्याकडे आले होते. हा एक फारच मोठा लढा अस्मिताला लढायचा होता. त्यांनी चित्रपट जगतातील दिग्गजांना आपल्या मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत मानले होते. इथे चालणाऱ्या वशिलेबाजी मुळे तिच्यासारख्या कितीतरी गुणवान कलाकारांचे काम त्यांच्यापासून हिरावून घेतले जात होते आणि या सगळ्याला बळी पडल्याने शेवटी हतबल होऊन तिने ही टोकाची भूमिका घेतली असा त्यांचा आरोप होता.
अस्मिताला पक्के माहिती होते की ही केस तिच्या समोर अनेक मोठे आव्हाने उभी करणार आहेत. पण तिला आधीच हार मानायची नव्हती. पूर्ण जोमाने ती या केस मध्ये जुंपली. बरेच महत्त्वाचे साक्ष, पुरावा तिने गोळा केले. हे सर्व करताना तिला मिळणाऱ्या अनेक धमक्यांना पण सामोरे जावे लागले. परंतु ती तिच्या निर्धारावर अटळ होती. कुठल्याही धमक्यांना न भिता तिने ही केस लढण्याचा आपला निर्णय कायम ठेवला होता. एवढ्या सगळ्या प्रयत्नानंतर शेवटीं या केस ची आज कोर्टात सुनावणी होती.
आज अस्मिताच्या साऱ्या वकिली ज्ञानाचा कस लागणार होता. सिने दुनियेतील तथाकथित दिग्गजांविरूद्ध तिने बंड पुकारले होते. बाहेरून कितीही झगमगणाऱ्या या फिल्मी दुनियेचं काळे वास्तव तिला उघड करायचे होते. आपल्या खऱ्या गुणवत्तेच्या आधारावर या मायावी जगात आपल्या कलागुणांची छाप पडणाऱ्या नवजात कलाकारांचे पंख ते आकाशात उंची गाठण्याआधीच छाटले जात होते. आतापर्यंत कितीतरी नवकलाकार त्या बड्या दिग्गजांच्या तानाशाही आणि वशिलेबाजीला बळी पडून निराशेच्या गर्तेत जाऊन आपले आयुष्य संपवत होते. नुसती कोरडी सहानुभूतीने त्यांच्या वरचा हा अन्याय संपणार नव्हता. याला कुठेतरी संपवावेच लागेल या निर्धाराने तिने आज कोर्टाची पायरी चढली.