बालपणीचा काळ सुखाचा...
बालपणीचा काळ सुखाचा...
बालपणीचा काळ सुखाचा, ना कसलं टेन्शन, ना कसली चिंता, फक्त आणि फक्त निरागसता. मनोसक्त खेळायच, बागडायच, स्वतःच्याच विश्वात रमायच आणि कोण काय सांगेल ते खर मनायच.
लहानपणी आईचं ऐकावं, दंगामस्ती करू नये, हट्ट करू नये यासाठी तसेच शहाण्या सारखं वागावं म्हणून बागुलबुवाची भीती दाखवली जायची, बागुलबुवा पकडुन नेईल या भीतीने शहाणं असलेलं बाळ मग अजूनच शहाण्यासारख वागायचं.
फळ खाताना सगळेजण गमतीने म्हणायचे, नीट खा, बी चुकून खाल्लीस तर झाड येईल. मला तर ही कल्पना फारच आवडली होती, पोटातून झाड येणारी. बी न खाता पण मला दिवसांढवळ्या माझ्या नाकातोंडातून फांद्या बाहेर आल्या आहेत, याच अवस्थेत मी दप्तर घेवून शाळेत गेले आहे, सगळी मुलं मला लगडलेली फुल तोडत असून, फळ खात आहेत, मला स्पेशल ट्रीटमेंट मिळत आहे अस दिसू लागल. काही दिवसांनी माझ्या मामेबहिणीने बी गिळली, आई ओरडेल म्हणून तीने आईला न सांगता मला सांगितलं, अग बरेच दिवस झाले अजून झाड कस आलं नाही, अग तू फक्त बी खावून पाणी प्यालीस, खत, माती थोडी खाल्लीस, उन्हात कुठे उभी राहिलीस, झाड येण्यासाठी हे सगळपण आवश्यक आहे अस तीला सागितलं, तू हे केलं नाहीस ना ? मग घाबरायच कारण नाही. झाड येणार नाही म्हणून ती खुश, मला जस कोणीतरी उल्लू बनवलं तस मी कोणालातरी बनवलं म्हणून मी...
लहानपणी विजा चमकायला लागल्या, ढग गडगडायला लागले की आजी म्हणायची, म्हातारी दळण दळते वरती, गप्प बसायचं शुभंकरोती, श्लोक, पाढेपलाखे म्हणत देवासमोर, जागच हलायच नाही. कोण ही म्हातारी फक्त पावसाळ्यातच दळण दळते ? वर्षभर काय करते ? तीला एकदा दळलेल वर्षभर कस पुरत, असे अनेक प्रश्न पडायचे. पण आजीने सांगितलं म्हणजे शंभर टक्के असणार याची खात्री असायची, आणि मनातले प्रश्न मनातच रहायचे. पुढे मोठं झाल्यावर कळू लागले पावसाळ्यात लाईट गेले की खूप वेळ येत नसत, मग आजी आम्ही मुल शांत बसाव म्हणून काहीतरी गोष्टी रचायची.
थोड मोठं झाल्यावर, राजाराणी, राक्षस, परीकथा वाचून मला वाटू लागले, गोष्टीतील राक्षसाचा प्राण खोल विहिरीतील सोनेरी माश्याच्या पोटात, उंच टेकडीवरील लाल गुलाबाच्या फुलात असतो, तसा माझा कुठे असेल ? आईला मी विचारले सुद्धा होते, "आई तुझा प्राण कशात आहे " ? तीने हसून जवळ घेत म्हटले तुझ्यात आहे, ऐकून किती भारी वाटल होत राव.
लहानपणीची अजून एक भाकड कथा, एक साळुंकी दिसली की वाईट, दोन दिसल्या की गोड खाऊ मिळणार, तीन दिसल्या की शुभ संदेश, कोणाच तरी पत्र येणार. मग एक साळुंकी दिसली की, कितीही अभ्यास केला तरी पेपर अवघड जाणार, मार्क कमी पडणार अस टेन्शन यायचं. मग एका मैत्रिणीने यावर उपाय सांगितला, एक साळुंकी दिसली की उडता कावळा बघायाचा. मग सगळेजण उडत्या कावळ्याच्या शोधत फिरायचो, कावळा उडत नसेल तर हुस्कवून उडवायचो.
असो, हळूहळू जस मोठं होऊ लागल्यावर कळू लागलं, लहानपणी ऐकलेल्या, सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात, प्रत्येक गोष्टीचा शेवट राजाराणीच्या गोष्टीसारखा गोड होत नाही, सगळ्या काल्पनिक कथा, भाकड कल्पना. आजही सगळ आठवलं की हसू येत, कसा या सगळ्यांवर, लहानपणीच्या कधीच नसणाऱ्या कसा गोष्टींवर विश्वास ठेवला याच नवल वाटत.
पण जेव्हा जेव्हा हे सगळ आठवत तेव्हा काही काळासाठी का होईना पुन्हा बालपणीच्या सुखद काळात रेंगाळता येत, आठवणीच्या रूपात सगळ लहानपण अनुभवता येत. आजी, आईने सांगितल्या गोष्टीत अजूनही मायेचा स्पर्श जाणवतो, नकळतच आईच्या कुशीत विसवल्याच सुख, समाधान मिळत.
