मुलगा विरुद्ध मुलगी
मुलगा विरुद्ध मुलगी
लहापणापासूनच अनुराधा मुलगा मुलगी भेद बघत होती, तो मुलगा आहे तू मुलगी हे ऐकतच ती मोठी झाली होती. कपडे वाळत घालण त्यांच्या घड्या करण, भांडी लावणं, पाटपाणी घेणं अशी अनेक छोटी मोठी कामे आई तीला नेहमी कामाची सवय हवी म्हणून सांगत असे.
पण दादाने स्वतः पाणी प्यायलेला ग्लास उचलला नाही तरी त्याला कोणी काही बोलत नसे. तो उशीरा घरी आला तरी चालायचं पण तीने मात्र सातच्या आत घरात यायलाच हवं.
तीला मराठी शाळेत तर दादाला इंग्लिश शाळेत घालण्यात आले,. तो अभ्यासाला बसला की घरात टिव्हीपण लागत नसे. आणि तीने एखाद काम आता अभ्यास करते म्हणत थोड्या वेळाने करते अस म्हंटल तर जशी काही मोठी पीएचडी करणार आहे ?? लग्न होवून चूल आणि मूल तर सांभाळायचय म्हणत तीला त्या कामाला पिटाळल जायचं.
तसे तीचेपण लाड होत, तिचा वाढदिवस, नवीन कपडे, आवडीचा खाऊ सगळकाही मिळायच तरीही झुकत माप भावाला दिलं जायचं, त्याच्या आवडी निवडीला जास्त महत्व दिलं जायचं, जसजशी अनुराधा मोठी होत होती तस हे तीला प्रकर्षानं जाणवायचं आणि खटकायच सुद्धा.
पदवीधर असली की लग्न जमायला जास्त त्रास होणार नाही, लग्नानंतर नोकरी करायची वेळ आली तरी लगेच मिळेल म्हणून अनुराधाने कला शाखेत प्रवेश घ्यावा असे बाबांनी ठरवलं. तिच्या दादाची अभ्यासत जास्त गती नव्हती तरी त्याला भरमसाठ डोनेशन देवून इंजिनिअरींगला ॲडमिशन घेण्यात आली. कारण तो वंशाचा दिवा, इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हायलाच हवा, ती काय शेवटीं परक्याच्या घरी जाणार हा त्या मागचा विचार. अश्या प्रकारचा भेदभाव ती नेहमीच अनुभवत होती.
एकदा तर हद्दच झाली तिच्या मामेबहिणीला मुलगी झाली आणि तिची आत्या पटकन म्हणाली, तिलाही पहिली मुलगीच झाली का ?? "तिलाही" शब्द ऐकून अनुरधाच्या डोक्यात तिडीकच गेली, तिच्या मनात आल एका स्त्रीचा दुसऱ्या स्त्रीच्या जन्मावर कसा काय आक्षेप असु शकतो, एक स्त्री दुसरीच अस्तिव कसं काय नाकारू शकते आणि त्याचवेळी तीने ठरवून टाकलं मला पहिली मुलगीच हवी.
कालांतराने अनुराधाच लग्न झालं, नशिबाने जोडीदार समजूतदार, आधुनिक विचारांचा, तिच्या मतांचा आदर करणारा मिळाला, तीला समजून घेणारा मिळाला. त्याने मला पहिली काय दुसरी मुलगी सुद्धा चालेल अस म्हंटल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.
राजाराणीचा सुखाचा संसार चालू होता, अनुराधा नवीन घरात, सासरच्या मनमोकळ्या वातावरणात छान रूळली होती. तिच्या इच्छेप्रमाणे तीला पहिली मुलगीच झाली. आपल्या सोनुलीच्या संगोपनात तीला दिवस पुरत नव्हता, आपल्या बाळच्या बाललीला, लडिवाळ क्षण अनुभवताना अनुराधा नव्याने बालपण जगत होती. दिवस भुर्रकन उडत होते. काही वर्षांनंतर तीला परत एकदा मातृत्वाची चाहूल लागली. मुलगा, मुलगी काहीही होवो, कसलाच अट्टाहास नव्हता. ह्यावेळी अनुराधाला मुलगा झाला. पुत्रप्राप्तीने ती सुखावली. आपली बॅलन्स फॅमिली पूर्ण झाली म्हणून समाधान पावली...पण त्याचं बरोबर तिच्यातली मुलाची आणि मुलीची आई सुद्धा जागी झाली. आपल्या लहानपणी आपण जे पहिलं, जे आपल्या वाट्याला आलं ते आपल्या मुलांच्या येऊ म्हणून अनुराधा जागरूक झाली.
आपल्या मुलांच्या बाबतीत भेदभाव होणार नाही याबाबतीत काळजी घेऊ लागली. घरात येणारी प्रत्येक गोष्ट दोघांच्या आवडीची येऊ लागली, ती दोन्ही मुलांच्या आवडीनिवडी जपत होती. घरातील प्रत्येक काम सगळ्यांनी मिळून करायची, पुरुषी काम, बायकी काम, स्वयंपाकघर म्हणजे बायकांची जवाबदारी आणि घराबाहेर पुरूषांची मक्तेदारी अस काही नसत, हे मुल मोठी होत होती तस त्यांना समजवत होती. तीने मुलांना निर्णय स्वातंत्र्य दिले, त्यांच्यातील निर्णय क्षमता विकसित केली.अनुराधाच्या बालपणीचा काळ बऱ्याच वर्षापूर्वीचा होता, त्यावेळी सहज बोलले जायचे, पहिला मुलगा झाला सुटलीस, आता दुसऱ्यावेळी काहीही होवो इत्यादी. हल्ली बऱ्यापैकी मुलगा मुलगी भेद होत नाही. मुलगा व्हावा हा अट्टाहास नसतो. पण हे सगळ पूर्णपणे थांबल असही म्हणता येत नाही, अजूनही मुलगा हवा यासाठी सूनेवर दबाव जातों.
कधीतरी मुलगी खूप हुशार असते तर मुलगा साधारण मग नकळतच तुलना होते, बोलताना पटकन बोलले जाते तो हुशार आहे त्यामानाने मुलगी नाही किंवा कधी मुलीला मुलापेक्षा जास्त महत्व दिले जाते. यामुळे बऱ्याचदा मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो राग येतो आणि तो कायम मनात रहातो. जसा अनुराधाच्या मनात होता.
बालपणी जे आपल्या बाबतीत घडल ते अज्ञान, जुन्या विचारसरणीमुळे झालं असावं त्याची पुनरावृत्ती आपल्याकडून होवू नये यासाठी दक्ष रहायच अनुराधाने
ठरवलं, कायद्याने दिलेला मुलगा, मुलगी समान हक्क केवळ कागदोपत्रीच न रहाता प्रत्यक्षात अमलात आणायच ठरवलं. इतरांना बदलता येईल की नाही हे माहीत नाही पण तीने स्वतः मात्र बदलायच ठरवलं. मुलगा विरुद्ध मुलगी हा भेद नष्ट करण्यासाठी एक पाऊल उचलत जनजागृती करायच ठरवलं आणि स्वतःपासून सुरवात करत अमलातही आणल.
