STORYMIRROR

मृणाल महेश शिंपी

Others

4  

मृणाल महेश शिंपी

Others

लगबग फराळाची

लगबग फराळाची

3 mins
448

यावर्षी सगळा फराळ घरीच बनवायचा विचार सुखदाच्या मनात आला आणि तीने लागलीच फराळाच्या रेसिपीज, वाचायला, व्हिडिओ बघायला सुरुवात केली.कोण म्हंणतय तूप आधी घाला तर कोण म्हंणतय तूप नंतर घाला. काहीजण सांगतात वाटीच प्रमाण तर काही टेबलस्पून. ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या पद्धती, जाम डोक्याचा भुगा झाला सुखदाच्या. नक्की कशाप्रकारे करावं ह्या विचारात पूर्ण दिवस गेला.


त्यात मुलांच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालणाऱ्या परीक्षा, त्या झाल्या की साफसफाई, खरेदी, ऑफिसला एक दिवसही सुट्टी मिळण मुश्किल, एका रविवारमध्ये काय काय करणार ? समान कधी भरणार ? कधी फराळ करणार, बहुतेक यावर्षी सगळा बेत नेहमीप्रमाणे बारगळणार अशी चिन्हं सुखदाला दिसू लागली.


तशी सुखदाला फारशी स्वयंपाकाची आवड नव्हती त्यामुळे लग्नाआधी तीने कधी स्वयंपाकाचं मनावर घेतलं नव्हत, ती मक्तेदारी तिच्या ताईकडे तर सुखदा साफसफाई, स्वच्छ्ता विभाग सांभाळायची. हल्ली दाण्याचं कूटापासून ते खिसलेल्या खोबऱ्यापर्यंत सगळं विकत मिळत, कशाला करा ह्या मतावर ती ठाम असायची. कसं होणार आपल्या लेकीच आईला काळजी वाटायची, तर जवाबदारी पडल्यावर करेल बरोबर म्हणत ताई तीची बाजू घ्यायची. लग्न ठरल्यावर बळेबळे‌ हसू होवू नये म्हणून अगदी मोजून चार पदार्थ सुखदा शिकली.

सासरी सासूबाई खमक्या होत्या, त्याच सगळं करत होत्या. सुखदा आपली दोन चमचे तिखट घाल, कडकडीत मोहन घाल, पीठ सैलसर मळ अश्या फक्त त्यांच्या सूचना पाळत, त्या सांगतील तेवढं आणि तेवढंच‌ करत होती. मुलं लहान, इतर सबबी सांगत फारशी जवाबदारी ओढवून घेत नव्हती.पण तीन वर्षापूर्वी सासूबाई गेल्या आणि त्यांचं अधिराज्य असलेल्या स्वंयपाकघरात तीला पाय टाकवेना, काही करावंस वाटेना, म्हणून मग सरळ सगळ्या कामाला मुख्य म्हणजे स्वयंपाकाला तीने बाईच लावून टाकली.


ऑफिसमध्ये सुद्धा सुखदा आता ब्रांच मॅनेजर पदापर्यंत पोहोचली होती, मोठ्या पदाबरोबर आर्थिक सुबत्ता, जवाबदारी सुद्धा वाढली होती, खूप उशीर व्हायचा घरी यायला, आल्यावर मुलांचा अभ्यास, त्यांच्याकडे लक्ष देता यावं हे सुध्दा एक महत्वाचं कारण होत स्वयंपाकाला बाई लावण्याचं. तशी वेळ मिळेल तेव्हा ती किचनमध्ये खुडबुडत होती, लॉकडाऊनमध्ये बरेच काही शिकली होती तरीही सगळा फराळ स्वतः करायची काही केल्या हिंमत होत नव्हती.


पण एकदा सहज बोलता बोलता नवरा बोलला, आई गेली आणि घरी फराळ झाला नाही, माझ्या आईच्या हाताची चव बाहेरच्या पदार्थांना नाही. सुखदाच्या जीभेवर सुद्धा आपल्या आईच्या, सासूच्या हातची चव नकळत रेंगाळून गेली. कधी नव्हे ते नवऱ्याचं पटलं तीला. आपल्या पश्चात आपल्या हाताची चव आपल्या मुलांच्या जीभेवर रेगाळायला हवी हा विचार सुद्धा मनात आला तिच्या आणि म्हणूनच तीने यावर्षी घरी फराळ बनवायचा घाट घातला.


सहज शेजारच्या काकूंना आपला विचार बोलून दाखवला..."अग, मुलगी सासरी, मुलगा, सून अमेरिकेत, इथे आम्ही दोघंच, त्यात पथ्यपाणी, काही करावसं वाटतं नाही, तुझ्या निमित्ताने मी ही करेन" आधीच शिकून घ्यायला हवं होत म्हणणाऱ्या सुखदाचे डोळे पुसत काकू आनंदाने मदतीला तयार झाल्या.


मग काय वेळात वेळ काढून, लवकर जेवण आटपून, भाजणी केली गेली, लाडवाचा घाणा घातला गेला, कधी काका, तर कधी सुखदाचा नवरा तर कधी मुलांच्या लुटूपुटूच्या मदतीने चार दिवसात चकलीपासून करंजीपर्यंत एकूण एक फराळ तयार झाला.

खूप वर्षांनंतर सुखादामुळे या वर्षीची दिवाळी आनंदात जाणार म्हणून काकू गहिवरल्या. तर छान झालाय हो फराळ !! ह्या कौतुकाने सुखावलेल्या सुखदाला सगळंकाही विकतच ह्या नादात काय गमावत होतो ह्याचा साक्षात्कार साक्षात्कार झाला.काहीही असो, स्वार्थ परमार्थ साधत एकमेकींच्या मदतीने लगबगीने केलेला हा फराळ दोन्ही कुटुंबीयांना आगळंवेगळं समाधान देत दिवाळीची रंगत वाढवून गेला एवढं मात्र नक्की.


Rate this content
Log in