मृणाल महेश शिंपी

Inspirational Others

3  

मृणाल महेश शिंपी

Inspirational Others

ओझ मोठेपणाचं

ओझ मोठेपणाचं

3 mins
178



अग तुला कळत नाही का ? आता लहान नाही राहिलीस, तो इतका रडतो तर दे ना त्याला ? तो लहान आहे अस म्हणत गिरिजाच्या पाठीत धपाटा घालत आईने तिच्या हातातलं खेळणं ओढून लहानग्या गिरिशच्या हातात दिलं.

तुला कळायला हवं गिरिजा, जरा मोठ्या मुलासारखं वागायला शिक, समजूतदारपणा दाखव. छोट्या छोट्या गोष्टीत भांडण बरी नाहीत, त्याला एक कळत नाही पण तू तर मोठी आहेस.

हळूहळू प्रत्येकवेळी हेच होत गेलं, गिरीश लहान त्यात नवसाचा मुलगा, मग झुकत माप त्याला मिळत गेलं. आणि गिरिजा तू मोठी आहेस हे प्रत्येकाच्या तोंडचं पालुपदच झाल.

गिरिजाला हवी असलेली गोष्ट तीला मिळत नव्हती अस नाही, मोठेपणाच्या उपदेशाचे डोस पाजल्या शिवाय मिळत नव्हती एवढे मात्र नक्की. ह्या सगळ्यामुळे मुळातच समजूतदार असलेली गिरीजा अजूनच समजूतदारपणे वागू लागली आपल्याला हवी असलेली गोष्ट मागताना घाबरू लागली. अगदी खाऊ खाताना सुद्धा पहिले लहान भावंडांचा विचार करू लागली. उरल सुरल तर आपण घेऊ लागली.


अपेक्षांचे ओझं पांघरत मोठ्या झालेल्या गिरिजाच्या वाट्याला लग्न झाल्यावर सुद्धा नेमका हाच नको असलेला मोठेपणाच वाट्याला आला. गिरिजाचे मिस्टर सगळ्यात मोठे घरचे कर्ते, मग काय गिरीजालाही थोरल्या सूनबाई, थोरल्या जाऊबाई, मोठी वहिनी, मोठी आई हा मान मिळू लागला.

पण हा मान फक्त नावाचा, काम करून घेण्याचा हे तीला लवकरच उमगले. पण करणार काय ? एकत्रित कुटुंबात रहाताना मोठी म्हणून नवऱ्याच्या बरोबरीने सगळ्या जबाबदाऱ्या निभावत गेली. पुढे दिरांची लग्न झाली, जागा लहान, वाढता संसार या कारणाने कुटुंब विभक्त झाल, सगळे वेगळे राहू लागले, पण देव, कुलाचार मोठा या नात्याने, हक्काने मोठ्या लेकाकडेच असतील व मी ही मोठ्या मुलाकडेच राहील हे सासूबाईंनी ठणकावले. मग काय, सगळे सणवार, आलागेला, कुलाचार गिरिजाच्याच माथी आले. ती सगळ हौसेने करत होती. पण करणाऱ्याला सगळ करावं लागत असेच काहीसे होत होते.

वहिनी तुम्ही मोठ्या तुम्हाला छान जमत म्हणत सुट्टीच, नोकरीच कारण देत जावा नावाला हजर होत होत्या, अंग काढून घेत होत्या, तर दादा वहिनी करतात ना करू देत म्हणत दिर खर्चातून... आता गिरिजाच्या मुली मोठ्या होवू लागल्या, मुल म्हटलं की करबुरी होणारच, असच एकदा काहीतरी झाल असताना तिच्या मोठ्या लेकीला सासूबाई म्हणाल्या, तू मोठी ना तुला कळत नाही, कस वागायचं...ती लहान आहे तुझ्यापेक्षा... त्यांचा वाढलेला आवाज, संवाद ऐकून गिरिजा धावत बाहेर आलेल्या गिरिजाच्या डोळ्यापुढे अंधारीच आली, इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय ? आपल बालपण तिच्या डोळ्यापुढे तरळल.

माझ्या मुलींच्या बाबतीत लहान, मोठ हा फरक मी करणार नाही आणि कोणी केलेला मला खपणार नाही, मोठी समजूतदारपणे वागेलच पण लहानी सुद्धा तेवढाच समजूतदारपणा दाखवत आपल्या ताईची काळजी घेईल. सगळी कामे दोघी मिळून करतील. घरात येणारी प्रत्येक गोष्ट दोघींच्या आवडीची, समान असेल, मोठ्यांनी फक्त जवाबदारी निभावयाची, लहानांनी आपली मनमानी करायची हे चालणार नाही.

आपल्या बाबतीत जे झालं ते आपल्या मुलीच्या बाबतीत होवू नये म्हणून कधीच कोणाला उलटून न बोलणारी, कोणाला न दुखवणारी गिरिजा यावेळी मात्र जरा स्पष्टपणे बोलली. तिच्या बोलण्याने अचंभित झालेल्या सासूबाई काहीश्या गांगरल्या पण तिचं म्हणणं पटल्याने गप्प झाल्या.आपल बालपण जस मोठेपणाच्या ओझ्याखाली दबून होरपळून गेलं तस आपल्या मोठ्या लेकीच होवू नये ह्यासाठी गिरिजा आता खंबीर झाली, तसेच मोठे करतात म्हणून त्यांचा गैरफायदा घेऊ नये, कुटुंबातील लहानांना आपल्या जबाबदारीची, कर्तव्याची जाणीव व्हावी यासाठी काहीस कठोर होत हे अनेक वर्षापासून वागवलेल हे मोठेपणाचे ओझे भिरकवण्यासाठी सज्ज झाली.


कथा आवडल्यास लाईक करून कमेंटद्वारे नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रीया नवीन लेखनाचा उत्साह द्विगुणित करतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational