Arun V Deshpande

Inspirational

1.3  

Arun V Deshpande

Inspirational

बालकुमार कथा - परोपकारी अंजू

बालकुमार कथा - परोपकारी अंजू

4 mins
9.3K


संध्याकाळची शिकवणी संपवून अंजू नुकतीच घरी आलेली होती. यंदा ती दहावीची विद्यार्थिनी असल्यामुळे सगळ्यांचे लक्ष अंजू आणि तिच्या अभ्यासाकडे होते.. अंजू तशी बर्यापैकी हुशार असल्यामुळे व्यवस्थित अभ्यास करून उत्तम टक्केवारीने ती पास होणार याची सर्वांना खात्री होती.

रोजच्या वर्तमानपत्रातून येणाऱ्या मार्गदर्शिका , साप्ताहिकातून येणाऱ्या आदर्श प्रश्न-पत्रिका या शिवाय अनेक गाईड ,नोट्स ,यांचा ढिगारा अंजूच्या टेबलावर नेहमीच दिसत असायचा .

अंजू घरात आली त्यावेळी आई कुणाशी तरी बोलते आहे हे पाहून ती किचन मध्ये आली. रोज कामा साठी आलेल्या मंजुळाबाई दिसल्या. अंजूला आलेली पाहून त्या म्हणाल्या, अंजू ताई ,माझी संगीता पण या वर्षी दहावीच्या वर्गात आहे बरं का , खूप हुशार आहे संगीता .असे तिचे सर आम्हाला नेहमी सांगत असतात ,, तिच्या अभ्यासाकडे लक्ष द्या, तिला पुस्तके आणून देत जा ,असे ते सांगून गेलेत .

अन्जुताई, तुम्हाला सगळ्यांना आमची परिस्थिती माहिती आहे.पैश्या अभावी आमच्या हुशार मुलीला आम्ही मदत करू शकत नाही, याचे खूप वाईट वाटते .पण काय करावे..पैश्याचे सोंग कसे जमणार आम्हाला ? संगीता मेहनतीने अभ्यास करते आहे बघा ,.आता देवावर हवाला ठेवून.जे होईल तितके करायचं.बाकी संगीताचं नशीब.

मंजुळाबाईनी सांगितलेले ऐकून अंजूच्या आई म्हणाल्या..एक काम करा .एकदा तुम्ही संगीताला आमच्याकडे घेऊन या, तिच्याशी बोलून,काही करता येते का ते पाहूया आपण.

मंजुळाबाई गेल्यावर आई म्हणाली- अंजू- तुझ्याजवळ खूप गाईड आहेत, नोट्स आहेत , पेपरचे सेट आहेत, तू एकाचवेळी हे सगळं साहित्य थोडेच वापरणार आहेस ? यातले काही तरी संगीताला देता आलं तर बघ.

आईच्या या सूचनेवर अंजू काही बोलली नाही. तिला वाटले, मंजुळाबाईची संगीता खरंच एव्हढी हुशार असेल का ? आणि आपल्याजवळ एवढी पुस्तके आहेत.हे मंजुलाबाई नेहमीच पहातात , यातली काही फुकट मिळाली तर ,का घेऊ नये ? असा विचार त्यांनी केला असेल . जाऊ द्या ..पुढचे पुढे बघू.

दुसरे दिवशी .गणिताच्या क्लास मधली गोष्ट .सर सर्व मुलांना उद्देशून म्हणाले -

मुलांनो , परीक्षा ही आपल्या जीवनातील महत्वाचा टप्पा असते .वेळीच याचे महत्व ओळखून तयारी केली तर उत्तम यश मिळत असते. वेळ आणि संधी या दोन्हींचा योग्य उपयोग करून घेणे आपल्याला जमले पाहिजे, तरच उपयोग.

माझीच गोष्ट ऐका - माझ्या दहावीच्या वर्षातली गोष्ट आहे ही - मी गरीब आई-बापाच्या घरात वाढलेला मुलगा. पुस्तके घेण्याची आमची ऐपत नव्हती, म्हणून अभ्यास करणे थोडेच थांबणार ? अशावेळी माझ्या मित्राने मोठ्या मनाने मदत केली. त्याने त्याच्या जवळची पुस्तके परीक्षेच्या दिवसात मला वापरू दिली. त्याच्यामुळे मी अभ्यास करू शकलो . मी भले कितीही हुशार असेन, माझ्याजवळ पुस्तके तर असायला पाहिजे होती, ती माझ्या मित्राने दिली, आणि त्याला माझ्या परिस्थितीची जाणीव होती..म्हणून तो माझ्याशी चांगला वागत होता.

तो म्हणायचा .माझी पुस्तके घेऊन तू अभ्यास कर. मात्र, तू गरीब आहेस म्हणून मी तुला मदत करतो आहे असे समजू नकोस. तुझा स्वाभिमान दुखावण्याचा माझा हेतू मुळीच नाही. उलट तुझ्यासारख्या योग्य आणि हुशार मुलाला वेळेवर मदत करण्याचा आनंद मला मिळेल .

मित्रांनो - त्याच्या बोलण्यात निर्मळपणा होता.त्याच्या स्वच्छ बोलण्याचा मला राग आला नाही.त्याची मदत मी आनंदाने घेतली. मी भरपूर परिश्रम घेतले,उत्तम मार्क घेऊन मी पास झालो. माझ्या यशाचे सारे श्रेय आयुष्यभर माझ्या या परोपकारी मित्राला देणार.

सरांनी सांगितलेली गोष्ट ऐकून मुले भारावून गेली. "निर्मळ भावनेने दुसर्यांना मदत करावी ", सरांचे हे वाक्य अंजूच्या कानात सारखे घुमत होते. दुपारी येऊन गेलेल्या मंजुळाबाई आणि संगीताची तिला आठवण होत होती.

दुसर्या दिवशी नेहमीप्रमाणे मंजुळाबाई कामासाठी तिच्या घरी आल्या त्यावेळी.अंजू त्यांना म्हणाली..आज तुमच्या संगीताला घेऊन या..तिला म्हणवे- ये आणि पुस्तके पहा,पाहिजे ती पुस्तके आणि गाईड ,नोट्स घेऊन जा ..!

अंजूचे बोलणे ऐकून मंजुळाबाईना आनंद झाला आहे हे पाहून अंजूच्या आईला समाधान वाटले.

दोन-तीन दिवसांनी मंजुळाबाई सांगितला घेऊन आल्या त्यावेळी अंजू घरी नव्हती .पण, अंजूने सांगून ठेवलेले होते .भेट झाली नाही तरी काळजी करू नको..तुला आवश्यक ती पुस्तके - नोट्स घेऊन जावे. संगीताने त्या प्रमाणे घेतले आणि काय काय घेऊन जात आहोत.याची लिस्ट अंजूच्या टेबलावर लिहून ठेवली.

पहाता पाहता दिवस कसे गेले कळालेच नाही. अभ्यासाच्या ओझ्यातून मोकळी झालेली अंजू आता निकालाची उत्सुकतेने वाट पहात होती. अखेर तो दिवस उजाडला , प्रथम श्रेणीत पास झाल्याचा आनंद अंजू घेत होती.

खुशीत ती आपल्या घरी आली. आनंदात सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या ,त्याच वेळी मंजुळाबाई आणि संगीता पेढ्यांचा पुडा घेऊन आल्या . संगीताने अंजूच्या आई-बाबांना नमस्कार केला आणि पेढा दिला व म्हणाली..

आमच्या शाळेत सर्व मुलींमध्ये मी सर्व प्रथम आले आहे .हा मान आणि हे यश तुमच्या आशीर्वादाने आणि अंजू ताईने केलेल्या मदती मुळे मला मिळाले आहे.

अंजू ताईला पेढा देत मंजुळाबाई बाई म्हणाल्या - अंजू ताई -तुम्ही खूप मोठ्या मनाच्या , माझ्या संगीताला तुम्ही मदत केलीत म्हणून माझ्या पोरीला हा दिवस दिसलाय . माझी पोरगी तुमचे हे उपकार कधीच विसरू शकणार नाही.

संगीताच्या चेहेर्यावरचा आनंद पाहून अंजूच्या मनाला खूप समाधान वाटत होते . तिच्या सरांचे वाक्यच आज पुन्हा आठवत होते ..."निर्मळ भावनेने मदत करावी ".


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational