लघु कथा - परिवार
लघु कथा - परिवार


त्या बंगल्याच्या तिसर्या मजल्यावरच्या एक मोठ्या खोलीत नानुकाका गेले तीन महिन्यापासून निजून होते. घरतल्या घरात फिरत असतांना पाणी सांडलेल्या निसरड्या फरशीवरून घसरून पडण्याचे निमित्त झाले. या अपघातात त्यांच्या कमरेखालचा भाग निकामी होता होता थोडक्यात वाचला. वयोमानाप्रमाणे नानुकाकांना यातून दुरुस्त होण्यास बराच वेळ लागणार होता .
अशा अवस्थेत नानुकाका आपल्या गत-दिवसांचा धांडोळा घेत असत .जणू काल घडलंय अस त्यांच्या मनाला वाटत असे . अनेक कडू गोड आठवणी मनात गर्दी करीत .
नानुकाका म्हणजे परिसरातील एक नामवंत , प्रतिष्ठाप्राप्त व्यावसायिक व्यक्तिमत्व, बदलत्या काळात जीवनमुल्यांची झपाट्याने घसरण होण्याच्या काळात ,त्यांच्या नव्या पिढीने मोठ्या निष्ठेने नानुकाकांच्या लौकिकास शोभेल अशाच पद्धतीने व्यवसाय पुढे आणला होता.त्यात भर देखील घातलेली पहाणे नानुकाकांसाठी मोठी समाधानाची गोष्ट होती.
पण अलीकडे आपल्या घरातील वातावरण थोडे थोडे का होईना प्रदूषित झाले आहे, याची त्यांना चाहूल लागली होती , तसे त्यांच्या मनाला काळजीने घेरून टाकले होते
पैशाने , श्रीमंतीने भली भली घराणी , घर आणि कुटुंब ,त्यातील माणसे , ती कशी उध्वस्त होत जातात हे त्यांनी पाहिले होते , अनुभवले होते .
हव्यास , मत्सर , हेवा , स्वप्नाळू महत्वाकांक्षी अशा स्वभावाच्या माणसांनी इच्छापूर्तीसाठी त्यांच्या वाटेत अडथळे ठरतील अशांना कधी वेडे ठरवले , कधी निकामी ठरवले , त्यांच्या असाहाय असण्याचा गैरफायदा घेत त्यांना घराबाहेर काढून देत त्यांच्यावर बेवारस अवस्थेत जगण्याची वेळ आणली ..
कोण होते असे करणारे ..? कुणी पर-ग्रहावरचे नव्हते , अगदी डोळ्यासमोरची माणसे होती ..,दर्शनी रूप वेगळे आणि आंतरिक रूप इतके भयानक ? हीच माणसे स्वार्थापोटी कारस्थानी होऊन काही करण्यास तयार असतात ", ही गोष्ट नानुकाकांना कोड्यात टाकीत असे , आपलीच मूले, शेवटपर्यंत नीटपणे रहातील का सोबत ?
नानुकाका अपघातात शरीराने कमी मनाने जास्त खचले होते
मग त्यांनी ..सर्वांना सरळ सरळ सांगून टाकले की
.ज्यांना हा बंगला , हे घर सोडून बाहेर पडायचे आहे ,स्वंतंत्रपणे राहावे वाटते आहे ..त्यांनी खुशाल स्वेच्छेने बाहेर पडावे , माझी परवानगी आहे ,
घरे स्वंतंत्र झाली पण ,व्यवसाय अजून एकत्र होता , , प्रत्येकाला वाटू लागल , मेहनत, बुद्धी माझी , नफा आणि कमाई मात्र काम न करणार्याला सुद्धा मिळणार , असे कसे ?
नानुकाकांनी हा प्रश्न देखील काळजी घेत सोडवला.याचा एक वाईट परिणाम असा झाला की ..रोज सोबत असणारे भाऊ दुरावले , जणू ते वाटच पाहत होते की कधी आपण वेगळे होतो .
या गोष्टीला आता काही वर्ष होऊन गेली होती .. नानुकाकांच्या सोबत त्यांचा एक जुना नोकर होता , आणि एक नातू त्याच्या बायको -मुलासोबत नानुकाका सोबत राहू लागला
दिवसभर काम-धंद्यात व्यस्त असलेला हा नातू ,घरी आल्यावर सकाळ-संध्याकाळ वर येऊन त्यांच्या जवळ बसे, गावातील सगळ्यांच्या खबर-बात सांगे , त्याची बायको नानुकाका -आजोबांची काळजी घ्यायची.
नानुकाकांना वाटायचे ..आपले पूर्व-जन्मीची पुण्याई असावी, म्हणून ही नातसून आपल्या सोबत राहिली आहे.
, बंगल्याच्या भोवती खूप मोठी रिकामी जागा होती , त्याचा काही उपयोग करावा असे त्यांना सुचले ..
एक दिवस रात्री त्यांनी नातवाला बसवून घेत म्हटले .. बाळासाहेब, आमची एक इच्छा आहे ,पूर्ण करावी ..कराल ना ?
नानुकाका अहो सांगा तर खर ..काहीच अडचण नाही कशाची ..बाळासाहेब मोकळेपणाने म्हणाले .
हे बघा - खाली पूर्वेकडे जी मोकळी जागा आहे ना , तिथे दोन दोन खोल्या ची छोटी घर बांधा ..४-५ कुटुंब राहतील अशी सोय करा ..
बाळासाहेब म्हणाले - नानुकाका ..अहो कशाला हा व्याप डोक्याला वाढवून घायचा ,.आणि तुम्हाला काही उपयोग नाही ,उलट वर्दळीचा त्रासच होईल.
नातवाचा हात हातात घेत नानुकाका म्हणू लागले ,..
बाळासाहेब अहो या घरात कुणी अनोळखी ,परकी माणसे येणार नाहीत हो, कधी वेळच आली तर या घरात माझ्याच मुलांनी येऊन राहावे ,असे मला वाटते उद्याचा भरवसा नाही उरला हो आता ,
माझा परिवार रस्त्यावर येईल " ही कल्पना सहन होत नाही बाळासाहेब..
आपल्या परिवारासाठी , एवढे कराल ना ?
बाळासाहेबांनी नानुकाकांचा थरथरता हात हातात घेतला , त्या स्पर्शाने नानुकाकाना कळून आले ..आपला परिवार आता कधीच रस्त्यावर येणार नाही.