अव्यक्त प्रेम
अव्यक्त प्रेम


रोजच्या प्रमाणेच सूर्यदेव हळूहळू पूर्वेकडच्या डोंगराआडून वर डोकावत होता. त्याच्या आगमनाची वर्दी केव्हाच तांबूस किरणांनी दिली होती. गवतावर पडलेले दवबिंदू मोत्याप्रमाणे चमकत होते. पंकज घराच्या खिडकीत उभा राहून हे सारे दृश्य न्याहाळत होता, मनाला प्रसन्न करणारे हे दृश्य आज मात्र त्याच्या चेहऱ्यावर परिणाम करण्यास असमर्थ ठरत होते.
बरोबरच आहे नाही का? सौंदर्य दृश्यात असते की माणसाच्या मनात? गोडी पदार्थात आहे का आपल्या आत आहे? गुलाबाची फुले कुणाला सुंदर दिसत नाहीत? सर्वांनाच दिसतात. परंतु तीच फुले विरहात मनाला प्रसन्न करण्याऐवजी दुःखीच करतात. पेढा गोड लागतोच परंतु एखाद्या दुःखद घटनेची वार्ता मिळताच तोच पेढा कडू लागतो. तसेच काहीसे आज पंकजच्या बाबतीत झालेले दिसत होते. अरुणोदयाच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न होण्याऐवजी त्याचा चेहरा आणखीच खिन्न दिसत होता. गेल्या आठवडाभरापासून त्याची हीच परिस्थिती झाली होती. तो रोज अरुणोदय पाहण्यासाठी गॅलरीत उभे राहून मनाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्या 'ती'च्या आठवणीने अस्वस्थ होत होता.
पंकज मामाच्या गावाला गेलेला होता. सर्वांचा लाडका, दिसायला गोंडस, गोजिरवाणा, सर्वांना आवडायचा. त्याच्यासोबत खेळण्यासाठी सारीच मुले आनंदाने उड्या मारायची. पंकज मात्र कधीकधी एकटाच नदीकिनारी बसून पाण्याचे खळखळणारे संगीत ऐकत बसायचा, खूप आवडायचे त्याला तसे ऐकत बसायला, फुलपाखरे न्याहाळायला, नदीच्या शांत प्रवाहात दगडाची कपची अलगद पाण्याच्या पृष्ठभागावर मारायची आणि तिच्या होणाऱ्या उड्या बघायच्या. असाच एक दिवस नेहमीप्रमाणे तो नदीवर येऊन बसला, बराच वेळ पाण्याचे मधुर संगीत ऐकले. थोड्या वेळाने हळूच एक खडा (कपची) घेतला आणि जोरात पाण्यावर घसरता मारला. खडा पाण्यावर टप्पे घेत घेत लांबवर गेला तेवढ्यात तिकडच्या तीराहून आलेल्या खड्याला टक्करला. आवाजासरशी त्याचे लक्ष अगदी समोरच्या तीरावर गेले आणि तो पाहातच राहिला. त्या समोरच्या तीरावर एक अल्लड कुमारिका बसून त्याचे खेळ बघत होती. त्याला माहीत नव्हते, ती त्याला आठ दिवसांपासून असे न्याहाळत होती. तो होताच तसा सुंदर. राजबिंडा, रूपवान, तेजपुंज, जणू मदनाचा पुतळा. तिने ज्या दिवशी त्याला पाहिले, त्याच दिवशी स्वतःला मनोमन त्याला समर्पित केले. रोज ती त्या पलीकडच्या किनाऱ्यावर येऊन बसायची तो लवकर आला नाही तर कावरीबावरी व्हायची. तो आला की तिची कळी अलगद खुलायची. पंकजचे मात्र आजच लक्ष गेले आणि तो विचार करायला लागला, 'कोण असेल ती? बालपणी वाचलेल्या परिकथेतील एखादी परी? की स्वर्गातील एखादी अप्सरा? ती इथे का आली असेल? तिलाही असे खेळायला आवडत असेल का? आवडत असेल तर ती रोज इथे खेळायला येईल का?' असे अनेक प्रश्न त्याच्या मनाला हैराण करत होते. बराच वेळ दोघेही जण दोन्ही तीरावर बसून एकमेकांना बघत होते. सावल्या पूर्वेकडे लांबवर गेल्या. दोघेही नाईलाजाने उठले. आपापल्या रस्त्याला लागले.
पंकज घरी आला. पण रोजच्यासारखा प्रसन्न दिसत नव्हता. नेहमी हसत खेळत जेवणारा पंकज आज कसा गुपचूप जेवून लगेच झोपायला गेला. अंथरुणावर पडले म्हणजे झोप लागेल असे थोडेच आहे? झोप लागण्यासाठी डोके रिकामे पाहिजे असते. इथे तर त्या कुमारिकेने डोक्यात घर केले होते. डोळ्यापुढे तिचेच चित्र दिसत होते. प्रयत्न करूनसुद्धा झोप येत नव्हती. कोण असेल ती? मी तिला आवडत असेल का? उद्या ती येईल का? तिची भेट घेता येईल का? अशा अनेक प्रश्नांची मालिका सुरू झाली होती. मग झोप कशी येणार?
तिकडे 'ती'चीही परिस्थिती याहून वेगळी नव्हती. तिलाही झोप येत नव्हती. सारखा त्याचा चेहरा तिला खुणावत होता. माझ्या स्वप्नातला राजकुमार तो हाच असावा नक्की. देवाने त्याला माझ्यासाठीच घडवले असावे, माझ्यासाठीच पाठवले असावे. पण त्याला मी आवडत असेल का? नदीकिनारी तो माझ्यासाठीच येत असेल का? किती दिवस असे डोळाभेट घेत राहायचे? प्रत्यक्ष भेट घडेल की नाही? असे विचार तिला सतावत होते, त्रस्त करत होते.
झोप झाली, नाही झाली तरी दिवस उगवायचा थोडेच थांबणार आहे? तो नेहमीप्रमाणे ठरलेल्या वेळी उगवणारच. तो त्याचं काम न चुकता करत राहणारच. दिवस निघाला, सकाळची कामे लवकरच उरकून पंकज नदीकिनारी जाण्यासाठी पळाला. मात्र समोरच्या तीरावर 'ती' न दिसल्यामुळे नाराज झाला. त्याची नजर 'ती' लाच शोधत होती. तिलाही लवकरच यायचे होते. पण ती पंकजसारखी स्वतंत्र थोडीच होती. घरकामात आईला मदत करावी लागत होती. आईची एकुलती एक लेक होती ती. सासरी गेल्यावर सारी कामे आलीच पाहिजेत त्यासाठी आईच्या हाताखाली ट्रेनिंग घेत होती म्हणा ना. मग उशीरच होणार ना. तिने घाईघाईनेच सारी कामे उरकली. कामे उरकल्याबरोबर तिने कसेबसे दोन घास पोटात ढकलले. समोरचे ताट उचलले, घासून धुवून ठेवले, आणि "आई येते गं शेतात जाऊन" म्हणत, मागे वळूनही न पाहता, आईच्या होकाराची वाटही न पाहता पळालीसुद्धा. तो आला असेल का?, आपली वाट बघत असेल का?, आपण दिसलो नाही तर नाराज झाला असेल का? असा विचार करतच ती तिथे आली. त्याला समोरच्या तीरावर बघितले, खुशीने तिचा चेहरा खुलला. तिने मनोमन उशिराबद्दल क्षमा मागितली.
पंकजच्या आतुर नजरेने तिला येताना बघितले, आणि त्याचा चेहरा एकदम उजळला. किती आतुरतेने वाट पहात होता तो तिची. दोघेही आपापल्या नेहमीच्या जागेवर बसले आणि त्यांच्या रोजच्या खेळास सुरुवात झाली. मात्र आज खेळण्यापेक्षा एकमेकांकडे एकटक बघण्याचाच खेळ चालला होता. दोघेही मनात विचार करत होते, 'प्रत्यक्ष भेट कधी होईल?' नेहमीच्या वेळेला दोघेही उठले अन् रस्त्याला लागले.
दुसऱ्या दिवशी मामाच्या गावात देवीची यात्रा होती. त्यामुळे पंकजला नदीवर जाता आले नाही. त्याला नदीवर जावे असे वाटत होते. त्याची 'ती' नदीकिनारी त्याची वाट पाहात असेल असे त्याला वाटत होते. मात्र तो मामाला नकार देऊ शकत नव्हता, दुखवू इच्छित नव्हता. यात्रेला न येण्याचे काही कारणही सांगता येत नव्हते. मुकाट्याने मामासोबत देवीच्या मंदिराकडे जावे लागले.
दुसरीकडे 'ती'चीही तीच परिस्थिती झाली होती. पंचक्रोशीतील नदी पलीकडच्या गावात वर्षातून एकदाच भरणारी देवीची यात्रा. आजूबाजूच्या साऱ्याच गावातील लहान मोठे, अबालवृद्ध त्या ठिकाणी यात्रेसाठी येत असत. अशावेळी आईला सोडून एकटीने नदीवर जाणे योग्य नव्हते. त्यामुळेच तिला नदीवर जाण्याऐवजी आईसोबत त्या गावाला जावे लागले.
प्रेमात मन किती वेडे झालेले असते नाही का? 'ती' आईसोबत चालत होती. परंतु तिचे एक मन म्हणायचे, आज तो नदीवर वाट पाहात असेल का? गेला असेल का तो नदीवर?' दुसरे मन म्हणायचे, 'अगं, कसा जाईल तो नदीवर? तो ही यात्रेला नाही का येणार?' असा विचार आला आणि क्षणभर तिचा चेहरा खुलला.
'खरंच, किती बरे होईल तो यात्रेला आलेला असेल तर? भेटेल का यात्रेत तो आपल्याला?'
'कसा भेटेल? नाव माहीत नाही, गाव माहीत नाही. चेहराही तेवढासा ओळखीचा नाही. नदीच्या पलीकडून बघितलेला चेहरा ओळखता येईल का?' अशा असंख्य प्रश्नांनी 'ती' त्रस्त झाली होती. पण तरीही आशावादी होती. तिचे अंतर्मन तिला सांगत होते, देवी नक्कीच मदत करेल, देवीला मनापासून काही इच्छा सांगितली तर ती पूर्ण करते अशी आख्यायिका आहे. मग आपले मनोरथसुद्धा माता नक्कीच पूर्ण करेल, त्याची भेट होईलच.
अशा भ्रमित मनानेच ती आईसोबत मंदिरात शिरली. श्रद्धायुक्त अंतःकरणाने देवीच्या चरणी मस्तक ठेवले. हळूच देवीला मागितले, 'त्याची भेट घडव. तुझी खणा-नारळानं ओटी भरीन.' तिनं प्रसाद घेतला अन् बाहेर आली. बाहेर गर्दी वाढली होती. गर्दीतून बाहेर पडणे कठीण झाले होते. आई तिचा हात हातात घट्ट धरून ओढतच निघाली होती. आणि तेवढ्यात...
दर्शनाला येणाऱ्या गर्दीच्या लोंढ्यात 'तो' दिसला. ती निरखून पाहू लागली, 'तोच आहे का?' तेवढ्यात त्याचंही लक्ष गेलं, नजरानजर झाली. ओळखही पटली. पण मामा हात धरून ओढत होते. 'ती'लाही तिची आई, "कांचन, चल लवकर, गर्दी वाढत्येय. आपल्याला बाहेर पडणे मुश्किल होईल." असं म्हणत ओढत घेऊन गेली.
पंकज दर्शन घेऊन घाईनेच बाहेर पडला. त्याला बाहेर कांचनला शोधायचे होते, भेटायचे होते. तो बाहेर आला. 'ती' त्याची प्रेमदेवता 'कांचन' तोपर्यंत गर्दीत हरवली होती. बाहेर त्याचे वडील त्याला घ्यायला उभे होते. दोघांची भेट झाली. मामांचा अन् बाबांचा नमस्कार चमत्कार झाला. मामाच्या घरी छानपैकी पाहुणचार झाला. इकडच्या तिकडच्या ख्याली खुशालीच्या गप्पा झाल्या. नंतर त्याचे बाबा त्याला त्याच्या गावी घेऊन आले होते. रात्रभर त्याला झोप लागली नव्हती. तरीही लवकर उठून सूर्योदय बघण्यासाठी तो खिडकीत उभा होता, परंतु सकाळची सूर्योदयाची किरणे त्याला प्रसन्न करू शकत नव्हती.