STORYMIRROR

Savita Tupe

Romance

3  

Savita Tupe

Romance

अतूट नाते प्रेमाचे !

अतूट नाते प्रेमाचे !

8 mins
307

  आज बरोबर पाच वर्षांनी निखिल आपल्या गावी परत येत होता . इतके दिवस भूतकाळाला मागे टाकत त्याने भविष्यकाळ उज्ज्वल तर केला होता , पण त्याचा वर्तमान मात्र त्या प्रत्येक क्षणांनी अस्वस्थ होत होता .

   गाव सोडून जाताना जी हुरहूर त्याच्या मनात दाटली होती , तीच आज परत येताना मनाला अस्वस्थ करत होती .

    त्याचे विश्व त्याची मनू . जाणत्या वयापासून त्याच्याशी जोडलेली त्याची बालमैत्रिण . एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते प्रेमी जीव . 

   काळाच्या ओघात कुटुंबाच्या अहंमपणामुळे हे अभागी जीव एकमेकांपासून दूर झाले. तेही एकमेकांच्या सुखी भविष्यासाठी, परस्परांचा एकमेकात गुंतलेला जीव वाचवण्यासाठी. निखिलला तिथेच राहून मनूला न पाहता रहाणं केवळ अशक्य होतं. एक क्षण सुध्दा तो तिच्याशिवाय एकटं राहू शकत नव्हता पण ती वेळ अशी होती की त्याला आता फक्त तिच्याचसाठी तिच्यापासून दूर होणं जास्त महत्त्वाचं होतं .

   मनूला विसरता यावं म्हणून मग निखिलने ते गावच सोडले .

   आजही त्याला तो दिवस आठवून खुप वेदना होत होत्या. पण मनुचे आयुष्य अबाधित असावे म्हणून तो तिला सोडायला राजी झाला होता .

  मनूच्या घरी त्यांच्या प्रेमाची भनक लागली होती . मनुचे बाहेर पडणे तिच्या घरच्यांनी बंद करून टाकले .निखिल तिला भेटू शकत नव्हता . त्याने त्याच्या वडिलांना मनूच्या घरी मागणी घालायलाच पाठवले . पण तिच्या घरचे काही त्यांच्या प्रेमाला स्वीकारायला तयार झाले नाही . मनूच्या वडिलांनी निखिलच्या वडिलांना एक भयानक धमकी दिली की , " आता इथून पुढे मनूला आम्ही आमच्या नजरेसमोरून एकही क्षण दूर होवू देणार नाही, जर निखिलने मनूला भेटायचा प्रयत्न केलाच तर तिथेच मनूला जीवे मारून टाकू . "

   निखिलचे वडील अगदी घाबरून गेले. एका असंभव गोष्टीसाठी मनुसारख्या निष्पाप जीवाचा बळी देणं नक्कीच योग्य नाही. त्यांनी निखिलला खुप समजावून सांगितले . तिच्या जीवाची भिक मागितली आणि म्हणाले , " तिचे प्रेम मिळावं म्हणून काही पाऊल उचलशिल आणि जर तीच राहिली नाही तर काय मिळेल मग तुला ?"

  " प्रेम केले तर ते मिळालेच पाहिजे असे नाही , जोडीदाराच्या सुखासाठी त्याग करणे म्हणजे सुध्दा आपले निर्मळ प्रेमच तर असते ."

  " ती जर जिवंत असेल तर निदान कधीतरी तिला पाहू शकतोस . पण जर ती या जगात राहिलीच नाही तर तिच्या मृत्यूला तू स्वतः कारणीभूत असशील आणि ही सल मात्र तुला नीट जगू सुध्दा देणार नाही की शांतपणे मरूही देणार नाही ."

  निखिलच्या बाबांनी महत्प्रयासाने त्याला तिच्या पासून दूर केले .

   त्यांच्या मनाने त्यांनी निखिलला शरीराने दूर तर केले पण मन वळवण्याचा प्रयत्न मात्र असफल होत होता . शेवटी त्याला त्या गावापासून दूर असणाऱ्या ठिकाणी नोकरीसाठी पाठवून दिले . परत इथे कधीही न येण्याचे वचन घेवून .

    इकडे मनुलाही तिच्या घरच्यांनी निखिल जिवंत रहावा असे वाटत असेल तर परत कधीही त्याला भेटायचे नाही असे वचन घेतले . मनूनेही निखिल वरच्या निस्सीम प्रेमापोटी घरच्यांना वचन दिले आणि आपल्या प्रेमाला जीवदान मिळावे म्हणून आपल्याच प्रेमाचा त्याग केला .

   असे हे दोन्ही प्रेमी युगुल आपापल्या परीने स्वतःच्या प्रेमाचा बळी देवून , मन मारून फक्त आयुष्य आहे म्हणून दिवस कंठात राहिले .

   मनूच्या घरच्यांना निखिल इथून दूर गेल्याचे कळताच त्यांनी मनुची मात्र पळपुट्या मुलावर प्रेम केले असे बोलून खिल्ली उडविली . पण मनुचा निखीलवर आणि त्याच्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता . 

   थोड्या दिवसांनी सगळं शांत झाल्यावर आणि तीच्यावरचा पहारा बंद झाल्यावर ती निखिलच्या वडिलांना भेटली त्यांच्याकडून सत्य गोष्ट कळल्यावर मात्र तिला घरच्यांचा खुप राग आला पण आता तिच्या हातात काही नव्हते . निखिलच्या वडिलांनी तिला," सुखी रहा !" असा मनापासून आशीर्वाद दिला आणि तिला घरी पाठवले .

   एका वर्षात मनुसाठी तिच्या घरच्यांनी स्थळ पाहून लग्न करून टाकले. मनूच्या जबाबदारीतून ते मुक्त झाले .

   आपल्या प्रेमाला मनाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त करून मनू संसाराला तर लागली , पण ना मनाने ना शरीराने या बळजबरीने लादलेल्या संसारात एकरूप होणे काही तिला जमेना .  

   तिच्या घरी सासू सासरे आणि हे दोघे असे चौघेच. सगळी माणसे अगदी सोन्यासारखी. आपल्या घरात ही मुलगी खुश नाही हे पाहून त्यांचा जीव कळवळत होता . एक दिवस मनूला मायेने जवळ घेत सासूने आस्थेने विचारपूस करत तिचे मन जाणून घ्यायचा प्रयत्न केला . 

     अश्या जीव लावणाऱ्या माणसांना कसे फसवायचे ? असा विचार करून मनूने त्यांना सगळं सांगितलं आणि ह्या नव्या नात्याला स्वीकारायला वेळही मागितला . मनूच्या सासूला हे फार थक्क करणारे होते . तिने मनूला आश्वासन दिले की ," तुला हवा तेवढा वेळ घे आणि जोपर्यंत तुझ्या मनाची तयारी होत नाही तोवर माझा मुलगा सुध्दा तुला सांभाळून घेईल ." 

" हे घर आजपासून तुझे माहेर आहे असे समज . इथे अगदी मनमोकळे पणाने रहा ."

  मनूला खुप मोठा आधार मिळाला त्यांच्या पाठिंब्याने . त्या दिवसांपासून मनू मात्र स्वतःला त्या घरात छान सामावून घ्यायचा प्रयत्न करत राहिली .

   निखिल घरी आला. पाच वर्षांनी सगळ्यांना भेटून त्याला खूप आनंद झाला . त्याने वडिलांना मनुबद्दल विचारले . वडिलांनी सांगितले की , " तिचे लग्न करून दिल्यावर मनू पुन्हा माहेरी आलीच नाही. गावामध्ये कोणालाच काही माहीत नाही . 

दोन वर्षापूर्वी तिचे आईवडील सुध्दा हे गाव सोडून निघून गेले ."

   निखिल मनातून दुःखी झाला पण वरवर तसे न दाखवता तो आपल्या रूममध्ये निघून गेला. त्याची मनू बद्दल काहीतरी कळेल ही वाटणारी आशा संपून गेली . घरी परत आल्यापासून तो पुन्हा भूतकाळ आठवून दुःखी होत होता . पण आता हाती काही उरले नव्हते .

     निखिलने पुन्हा परत न जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निर्णयाने सगळे खुश झाले .  

   थोडे दिवस गेल्यावर त्याच्यासाठी वडिलांनी एक स्थळ आणले . निखिल कसाबसा या लग्नाला तयार झाला पण मनातली मनुची प्रतिमा मात्र काही जात नव्हती .

   घरातल्या सगळ्यांसोबत तो मुलगी बघायला गेला. मुलीकडे त्याने पाहिलेच नाही , त्याचे मन तयारच होत नव्हते की आपणही लग्न करावे. त्याला वाटत होते असे करून आपण स्वतःसोबत या मुलीचीही फसवणूक करणार . मी लग्न केले तरी हिला स्वीकारू शकणार आहे का ? भलेही मनू लग्न करून मला विसरली असेल पण तिच्या मनात कुठेतरी मी असेनच ना ! 

   निखिल मनूच्या विचाराने अगदी व्याकूळ झाला . मनु एकदातरी भेटावी असे त्याला मनापासून वाटत होते . तो या विचारात हरवला होता तेवढ्यात त्याच्या वडिलांनी त्याच्या पाठीवर हलकेच थोपटले . ते म्हणाले , " निखिल मी समजू शकतो तुझ्या वेदना . मी त्या थांबवू नाही शकत पण तुला मात्र यातून बाहेर काढायचा मी कायम प्रयत्न करत राहीन . चल आतमध्ये , असे मधूनच उठून बाहेर आला आहेस , ती लोकं नको तो अर्थ लावतील . चल ! "

   ते त्याला घेवून आत गेले. मुलगी बघण्याचा कार्यक्रम उरकून , दोन दिवसांनी निरोप देतो असे त्यांना सांगून ते सगळे तिथून बाहेर पडले .

   जवळच एका स्वामींच्या मंदिरात पाया पडायला म्हणून ते थांबले . मंदिर मोठे होते आणि जवळ एक आश्रम पण होता . निखिलच्या आईची स्वामींवर खुप श्रध्दा होती . पाया पडताना तिने स्वामींना निखिलच्या सुखासाठी प्रार्थना केली .सगळेच पाया पडून जरावेळ मंदिराच्या गाभाऱ्यात बसले .

    निखिल आजूबाजूचे निरीक्षण करत होता . त्याचे लक्ष तिथे असणाऱ्या स्वामींच्या मठावर पडले तिथे बऱ्याच स्त्रिया भगव्या कपड्यांमध्ये वावरताना दिसत होत्या. गुरुदिक्षा घेतलेल्या असाव्यात .

   निखिलने एका स्त्रीकडे बघताच तो आश्चर्याने चकित झाला . क्षणभर तो निःशब्द झाला .

 त्याच्या तोंडून अचानक , " मनू ? " हे शब्द बाहेर पडले .

 तो तसाच पटकन उठून त्या स्त्रीकडे धावला , हा असा का पळत सुटला म्हणून त्याचे आई वडील सुध्दा त्याच्या मागे धावले .

 निखिल त्या स्त्रीच्या समोर येवून उभा राहिला , त्याच्या आनंदाला पारावर उरला नव्हता .

" हो तू मनुच आहेस , माझी मनू !" 

 "आई बाबा , ही माझी मनू आहे ." 

निखिल त्या दोघांकडे आणि मनुकडे आळीपाळीने बघत विस्मयचकित होऊन आनंदाने बोलत होता .

  ती स्त्री थोडी धास्तावली होती . मंदिराच्या आवारात सगळे जण जमा झाले , ती स्त्री घाबरून तिच्या कुटी मध्ये गेली . निखिल आणि त्याचे आईबाबा पण आत गेले. आत गेल्यावर तिथे बरेच जण साधनेला बसले होते . तिथल्या एका ऋषीने त्यांना तिथे बसायला सांगितले .

 त्यांची साधना झाल्यावर मग ते ह्या तिघांनाही म्हणाले , 

" कोण आहात तुम्ही ? आणि असे एकदम आतमध्ये कसे आलात ? "

 त्यांची माफी मागून निखिल म्हणाला ,

 " मी मनूला इथे पाहिले म्हणून तिच्यामागे आत मध्ये आलो ."

 मग त्यांना काय काय घडले ते सगळे सांगून निखिल म्हणाला, 

" स्वामी , तुम्ही मनूला बोलवा , मला तिला विचारायचे आहे , ती इथे अश्या अवस्थेमध्ये का ? "

  ऋषींनी मनूला बोलावले . त्यांनाही तिचा इतिहास माहीत होता , इथे आल्यानंतर त्यांनीच तर तिला वडिलांच्या मायेने आधार दिला होता .

   त्यांनीच मग निखिलला तिची इथे असण्याची व्यथा त्यांना ऐकवली .

  मनु लग्न करून याच गावात आली होती. सासूला तिने सगळंच सांगितलं होतं. नवरा आणि सासरा पण तिला समजून घेत होता. नवऱ्याने तिच्या मनाविरुद्ध तिला साधा अपशब्द पण उच्चारला नाही . ती घरात सून नाही तर मुलगी बनून रहात होती . दोन वर्ष झाल्यावर मात्र नवरा जरा आपला हक्क गाजवायचा प्रयत्न करू लागला होता . पण आई आणि वडिलांच्या पुढे त्याचे काही चालत नव्हते. शेवटी बायको जुमानत नाही म्हणून तो आई वडिलांना सोडून गेला आणि त्याने दुसरे लग्न करून आपला संसार थाटला . 

   मनु खुप दुःखी झाली , तिला ही टोचणी लागून राहिली की तिच्यामुळे एका मुलाला आपल्या आई वडिलांना सोडावे लागले . तिने मग नवऱ्याच्या घरी जावून त्याची माफी मागितली आणि परत त्याच्या घरी नव्या बायकोसह यायला सांगितले . नवरा यायला तयार तर झाला पण त्याने एक अट घातली की जर मनू ते घर सोडून निघून जाणार असेल तरच तो त्या घरात परत येईल . मनूने त्याची अट मान्य केली आणि तो यायच्या आधीच तिने ते घर सोडले .

   या मठामध्ये ती नेहमी यायची त्यामुळे इथे सगळ्यांना ती ओळखत होती . नवऱ्याचे घर सोडल्यावर ती सरळ इथेच आली , कारण तिला पुन्हा तिच्या माहेरी जाणं शक्य नव्हतं . इथे तीने स्वतःला स्वामी सेवेत गुंतवून घेतले . 

   निखिल आणि त्याचे आई वडील हे सगळं ऐकून स्तंभित झाले .

 त्या तिघांनीही मग त्या मठाधिपतींना नम्र विनंती केली की ते मनूला घेवू जावू इच्छितात . तिच्यासोबत निखिल अजूनही लग्न करायला तयार होता .

    निखिल अजूनही अविवाहित आहे हे ऐकून मठाधिपती आनंदाने म्हणाले , 

" हेच तर खरे प्रेम आहे. जे कितीही काळ लोटला तरी मनामधे रुजून रहातं ." 

 त्यांनी मनूला बोलावले , तिची संमती आहे का तेही विचारले . मनूने स्वामींच्या पायावर डोके टेकवले , ती म्हणाली ," आता माझा माझ्या या देहावर काही अधिकार उरला नाही आणि मन तर कधीच स्वामी चरणी अर्पण केले आहे , मग आता मी कशी काय माझ्या बद्दल काही निर्णय घेवू शकते ? जे तुम्हाला योग्य वाटेल ते सांगा ."

  स्वामी हसले आणि म्हणाले , " मनू अग सीतेलही वनवास चुकला नाही मग आपल्या सारख्या पामराची काय कथा ! तुझी ही तपश्चर्या तर होती , जी आज पूर्ण झाली आणि आज तुझा राम तुझ्या समोर उभा आहे . जा मुली , तुमच्या दोघांचाही वनवास आता संपला , लग्न करून सुखाने संसार करा ."

 मनुचे डोळे भरून आले . तिने निखिलला आणि त्याच्या आई वडिलांना एक विनंती केली की जर त्यांना मान्य असेल तर त्यांचे लग्न इथेच स्वामींच्या समक्ष त्यांच्या आशीर्वादाने व्हावे . नाही म्हणायचं काही प्रश्नच नव्हता . अगदी थोड्याच दिवसात सगळी तयारी करून मनू आणि निखिल स्वामींच्या आशीर्वादाने जन्म - जन्मातरीच्या पवित्र बंधनात एकत्र गुंफले गेले .

  एकमेकांच्या सुखासाठी आपल्या प्रेमाचा खुप मोठा त्याग करूनही शेवटी या नियतीने त्यांना एकत्र आणलेच . 

   त्यागाचे दुसरे नाव सुध्दा प्रेमच तर आहे .

 तर असे हे प्रेमी जीव खुप दिवस विरह वेदीवर जळत राहिले आणि शेवटी मग सगळी बंधनं पार पाडून एकत्र आले .


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance