असं माझ्याबरोबरच का? (भाग २)
असं माझ्याबरोबरच का? (भाग २)
सुमाला लगेच तिच्या आईने बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या कुमुद काकूकडे राहायला पाठविले.
सुमाला अजिबात जायचे नव्हते. तिच्या मनात विचार आला, "एकतर बाप्पा वर्षातून एकदा घरी येतो आणि ह्या वर्षी मला त्याला बघता ही येणार नाही. असं हे माझ्याबरोबरच का?"
सुमा खूप उदास झाली. कुमुद काकूच्या बिल्डिंगमध्ये ही २-३ जणांकडे गणपतीचे आगमन व्हायचे. त्यामुळे जेव्हा आरतीचा आणि टाळ वाजवण्याचा आवाज तिच्या कानावर पडला. तेव्हा तर तिचा जीव कसानुसा झाला. तिला एकवार असे वाटले की धावत जावे घरी आणि बाप्पाला विचारावे हे माझ्याच नशिबी का?
पण ती गप्प बसली. कारण ह्याचे उत्तर तिला माहीत नव्हते. सगळा दिवस तिचा रडण्यात गेला. कुमुद काकूने तिला जवळ घेतले आणि ती म्हणाली, "बाळ अशी उदास होऊ नकोस. फक्त पाच दिवस. मग तू तुझ्या घरी जाऊ शकशील. आपल्या बाप्पाला नाही चालत ना ग हे."
तरीपण सुमा उदास होती. तिला तिच्या बाप्पाना बघता ही येत नव्हते. ती विचार करत होती. देवाने असे का केले असेल बरे. मासिक पाळी तर नैसर्गिक देणे आहे. मग ती फक्त मुलींनाच का येते आणि आली तर त्या देवाची पूजा का नाही करू शकत. असा विचार करून ती पुन्हा रडू लागली.
तेव्हा तिथे कुमुद काकूंची मुलगी रेणुका आली. तिला बघितल्यावर तर सुमाला खूपच रडू आले. सुमाला वाटले आता रेणुका ताईच आपल्या प्रश्नांची उत्तरे देईल. कारण जेव्हा पण सुमा ला कोणत्याही गोष्टीत अडचण येई तेव्हा ती रेणुका कडे जात असे. पण मागच्या एक वर्षा पासून रेणुका दुसऱ्या शहरात शिकण्यासाठी गेल्यामुळे तिची भेट क्वचितच होत असे.
आज किती तरी महिन्यांनी रेणुकाला बघून सुमाला फार बरे वाटले. रेणुकाने तिला जवळ घेतले आणि मग काय झाले रडायला असे प्रेमाने विचारले.
सुमाने आतापर्यंत घडलेले सर्व काही तिला सांगितले. मग रेणुकाने तिला समजावले की, "ह्या दिवसात आपली स्थिती खूप संवेदनशील असते. तसेच ह्या दिवसात जितका आराम करता येईल तितका करावा. जितके मला समजते ते मी तुला सांगते. आपण देवळात अस्वच्छ जातो का? नाही ना. मग ह्या दिवसात आपल्या ला कन्टीनू रक्तस्राव होत असतो. मग अश्या अवस्थेत तू जर देवळात गेलीस तर तुला आवडेल का?
तरी तुला घरी जायचे असेल तर तू जाऊ शकतेस.
पण तुला तरी पटेल का असे त्या पवित्र वातावरणात राहायला? त्यापेक्षा तू लांबूनच जर त्यांच्या पाया पडलीस तरी काही वाईट नाही. त्यांच्याजवळ तुझा नमस्कार नक्की पोहोचेल आणि तसेच घरी गणपती बाप्पा पाच दिवस आहेत म्हणजे जेव्हा तुझा रक्तस्त्राव थांबेल तेव्हा तू बाप्पाला नक्कीच भेटू शकशील.
आता उदास होऊ नकोस. सध्यातरी तू ह्या दिवसात जास्त मनावर ताण न आणता आराम कर. जशी जशी तू मोठी होशील तेव्हा तूच तुझ्या प्रश्नांची उत्तरे शोधशील. सो चिअर अप आणि मी आहेच की तुझ्याबरोबर आता"
असे म्हणून रेणुकाने सुमाला मिठी मारली. सुमाच्या शंकांचे पूर्णपणे निरसन जरी झाले नसले तरी तिने मनाशी ठरविले की, ह्याबाबत हळूहळू सगळी माहिती मी नक्कीच मिळवेन आणि माझ्यासारख्या असंख्य मुलींना मार्गदर्शन करेन. असे मनातल्या मनात ठरवून तिने डोळे पुसले. तेवढयात तिला आरती आणि टाळाचे आवाज यायला लागले. तिने तिथूनच गणरायाला वंदन केले.असेच पाच दिवस निघून गेले. सुमाचा रक्तस्त्राव ही थांबला. मग तिने घरी जाऊन तिच्या गणपती बाप्पाची खूप गप्पा मारल्या. आनंदाने आरती आणि प्रसाद खाऊन. गणपती बाप्पाला निरोप दिला.
मासिक पाळी बद्दल असे अनेक प्रश्न सगळ्यांच्याच मनात उद्भवतात. पण ते आपण समजू शकतो. पण लहान मुलींना हे कसे समजवणार. माझ्या माहितीप्रमाणे पहिली सगळीकडे जंगले होती, त्यामुळे जंगली प्राण्यांपासून स्त्री चे रक्षण व्हावे म्हणून तिला घरातून बाहेर पडायला मनाई होती. कारण प्राण्यांची वास घेण्याची क्षमता ही जास्त असते. त्यामुळे जर ती बाहेर पडली तर तिच्या जीवाला धोका असू शकतो. तसेच त्यावेळी खूप मेहनतीची कामे सुद्धा स्त्रीला करावी लागत आणि ह्या दिवसात तरी तिला आराम मिळावा म्हणजे इन शॉर्ट सुट्टी. म्हणून तिला बाजूला बसविले जाई. पण आता जमाना फार बदलला आहे. त्यामुळे शहरात कोणीही बाजूला बसत नाही. पण गावात अजूनही ही प्रथा पाळली जाते.
सखींनो, तुम्हाला ही ह्याबद्दल काही सांगायचे असेल किंवा असे समजा तुम्ही रेणुकाच्या जागी असता तर तुम्ही सुमाच्या शंकांचे निरसन कसे केले असते. मला कंमेंट बॉक्स द्वारे नक्की लिहून कळवा. मला ही अजून नवीन काहीतरी माहिती मिळेल.
समाप्त
