Anil Kulkarni

Inspirational

2  

Anil Kulkarni

Inspirational

अशी शाळा व असे शिक्षक

अशी शाळा व असे शिक्षक

6 mins
120


शिक्षकांमुळे शाळेला ओळख मिळते व शाळेमुळे विद्यार्थ्यांनाओळख मिळते. अशीच ओळख सुनील खेडकर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडी या शेवटच्या टोकावरच्या गावाला मिळवून दिली. महाराष्ट्रातील कायम दुष्काळी छायेत असणारा पाथर्डी तालुका व या तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात छोटीशी लोकवस्ती असणारे मौजे जोगेवाडी गाव,तालुक्यापासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. या गावात बहुसंख्येने भटक्या जमातीतील लोक राहतात. यात वंजारी, मागासवर्गीय यांचा प्रामुख्याने समावेश होतो.गावात विकासाच्या मागासलेपणा सोबतच मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक अनास्था होती.


सतत दुष्काळअसणाऱ्या या गावात १००% ऊसतोड कामगार व सहा महिने स्थलांतर करणारे लोक होते. कायम दुष्काळी, दुर्गम, डोंगराळ, कमी लोकवस्तीच्या या भागात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे हे नोंद घेण्यासारखे आहे. या गावामध्ये शाळेची स्थापना १९५१ साली झाली. त्या वेळेस एक ते चारचे वर्ग भरत होते. शिक्षणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन सतत नकारात्मक होता. शिक्षकांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आज या शाळेची पटसंख्या १२० आहे व चार शिक्षक कार्यरत आहेत. २०१२साली मुख्याध्यापक म्हणून सुनील खेडकर रूजू झाले आणि शाळेचा कायापालटही रूजू लागला. २०१२ ते २०१९ या काळात त्यांनी शाळेला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.


एकेकाळी शाळेकडे न फिरकणारे विद्यार्थी व पालक असे चित्र होते, पण पाच वर्षात चित्र पालटले. विद्यार्थी शाळेत येऊ लागले.हे कसेघडले? त्याचीच ही यशोगाथा आहे. मुख्याध्यापक म्हणून सुनील खेडकर रुजू झाले आणि चित्र पालटायला सुरुवात झाली.ऊसतोड कामगारांच्या वाडीतील ही शाळा अनेक अभावांनी ग्रस्त होती.मुलांना पिण्यासाठी पाणी नव्हते. जनावरांचा मुक्काम शाळेतच असे. शाळेत मुलांना आणि पालकांना यायची इच्छा होत नसे. शाळेच्या परिसरात सुरुवातीला वृक्षारोपण केले पण लोकांनी व जनावरांनी एकही झाड ठेवले नाही.लोकसहभागातून ८५ हजार रुपये जमा करून शाळेसाठी जागा खरेदी केली व संरक्षक भिंत बांधली. हिरवळ व वाढलेली झाडे टिकवली.


मुले मुली शाळेकडे येऊ लागली. शाळेतील निधीमधून पाचशे मीटर अंतरावरून गावातील जुन्या बोअरवेल मधून शाळेत पाण्याची सुविधा निर्माण केली. दर शनिवारी दुपारनंतर दानशूर व्यक्तींना भेटून शाळेतील विद्यार्थ्यांना भेटायला बोलावले जाई. २०१५ ते २०१९ दरम्यान पालक सहभागातून पाच लाख रुपये जमा केले व शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ केली. लोकवर्गणीतून व दानशूर व्यक्तींच्या मदतीतून शाळेसाठी वस्तूंच्या स्वरूपात मदत मिळाली. यातून हॅन्डवॉश स्टेशन, आर.ओ. वॉटर सिस्टिम, शाळेची रंगरंगोटी, साऊंड सिस्टम, कॉम्प्युटर, डिजिटल शाळेला लागणारे साहित्य खरेदी करण्यात आले.


एकेकाळी वंचित घटकातील शिक्षणाविषयी अनास्था असलेले विद्यार्थी आता नियमित शाळेत येवू लागले.गावातीलच नव्हे तर बाहेर गावातूनही विद्यार्थी या शाळेत शिकण्यासाठी येवू लागले. ही शाळेसाठी मोठी उपलब्धी होती. मुलांमध्ये आधी स्वच्छतेचा अभाव होता. मग परिपाठातून शिक्षकांनी मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे सुरू केले, नंतर मुले दररोज टापटीपपणे शाळेत नियमित येऊ लागली. आज महाराष्ट्रात जवळपास दोनशे साखर कारखाने आहेत साधारणपणे पंधरा जिल्ह्यातून ऊसतोड कामगार स्थलांतर करून कुटुंबकबिल्यासह कारखान्यात कामाला जातात त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडतो, या मुलांना शालेय प्रवाहात आणण्याचे काम आव्हानात्मक आहे.


स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्या ओळखून त्यावर उपाययोजना केली तर मुले शाळेत नक्की येतील हे ओळखून स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न केले. कारण जोगेेवाडीतील मुलांचे पालक स्थलांतर करायचे, त्यामुळे विद्यार्थ्यी शाळेत नसायचे. पटसंख्या कमी व्हायची. यावर उपाय म्हणून पालकांची मते, अडचणी जाणून घेऊन त्यांचे मतपरिवर्तन केले.शिक्षकांनी पालकांची भेट घेतली व पालक शिक्षक यांनी एकत्र येऊन ५० टक्के स्थलांतर रोखले. २०१५ पासून हंगामी वस्तीगृह योजना सुरू झाली या माध्यमातून शंभर टक्के स्थलांतर रोखता आले. अशा रीतीने २०१५ते २०१९मध्ये स्थलांतर थांबले. मुले रात्री शाळेतच राहायची व त्यांच्या देखरेखीसाठी एक स्वयंसेवक नेमलेला असे. त्याला १०००रुपये मानधन असे. प्रत्येक विद्यार्थ्या मागे शासन ६०० रुपये खर्च करीत असे, त्यातून त्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय शाळेतच होई.२०१९नंतर ही योजना बंद पडली.

 

महिलाही शाळेतील कार्यक्रमासाठी येत नसत. त्यांचा सहभाग मिळवण्यासाठी महिलांसाठी हळदीकुंकू, संगीत खुर्ची, पालक मेळावे इ. उपक्रम घेतले. त्यामुळे त्या शाळेतील कार्यक्रमाला हजर राहू लागल्या. विद्यार्थ्यांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन घ्यायला सुरुवात केली. त्याच प्रमाणे पटनोंदणी कशी वाढवायची याचे मार्गदर्शन केले, त्यामुळे २०१२ मध्ये ९० पटनोंदणी होती ती १२० झाली. सेमी इंग्रजीचे वर्गही शाळेत सुरू केले. चांगले उपक्रम राबविले तर शाळेची पटसंख्या वाढते आणि शाळा नावारूपाला येते. बाहेरगावचे विद्यार्थी या शाळेत शिकण्यासाठी येतात हीसुद्धा मोठीच उपलब्धी आहे.

उपक्रम राबविण्यात नाविन्यता असेल तर मुले त्यात सहभागी होतात. शाळेने खालील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले.

१)फळा माझा मित्र-

वंचित घटकातील व ऊस तोडकामगारांंची मुले नियमित शाळेत येत नसायचे. अभ्यासाबद्दल त्यांच्या मनात भीती असे.बहुतांश मुलांचे सर्व विषयाचे संबोध स्पष्ट नसायचे म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. दोन वर्ग खोल्या मधील मोकळ्या जागेत एक फलक तयार केला. सुरुवातीला मुले यावर मनमोकळेपणाने हाताने स्वतःला आवडणारी चित्रं काढायला लागली, मुली रांगोळी काढायला लागल्या, अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांना फळा मित्र वाटायला लागला. दुपारच्या मधल्या सुट्टीत ही मुलं आपल्याच हुशार मित्राकडून संख्याज्ञान, संख्या वरील क्रिया शिकायला लागली. मराठीतील मुळाक्षरे, इंग्रजीतील सोपे शब्द देखील मुले शिकायला व लिहायला लागली.इयत्ता पहिली ते चौथी सर्व वर्गातील मुलांचा समावेश असल्यामुळे आपोआपच वर्ग ही संकल्पना न राहता मुलं लहान मोठ्या सर्वांकडून शिकू लागली.याचा फायदा असा झाला की तीन महिन्यात अभ्यासात मागे असणारी मुलं हुशार मुलांसोबत आली. या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या व्यक्त होण्याची ऊणीव भरून काढली.


२) परिसराशी नाते जोडू या:

शालेय परिसर मुलांच्या जडणघडणीवर सकारात्मक परिणाम करत असतो. याचा आधार घेत मुलं शाळेत अधिकाधिक रमण्यासाठी व टिकण्यासाठी हा उपक्रम राबविला.यात मराठी, गणित इंग्रजी, विज्ञान या विषयातील शब्द, वाक्य, अनेक संबोध २×१च्या बोर्डावर हे शब्द लिहून झाडावर तसेच परिसरात लावले. मुलं सकाळी शाळेत आल्यानंतर परिसरातील हे सर्व बोर्ड वाचत बसत. त्या उपक्रमाचा फायदा असा झाला की मुलांच्या मनातील अभ्यासा विषयाची भीती दूर झाली. हसत-खेळत विविध विषयातील अनेक संबोध पहिली ते चौथीच्या मुलांना समजायला लागले. भिलार हे वाचनाचे गाव आहेच.नुकतेच अभ्यासाचे गाव म्हणून एक गाव चर्चेत आहे. गावातील सर्व भिंतीवर अभ्यासक्रमातील संकल्पना लिहिल्यामुळे मुले जाता येता ती वाचतात व संबोध स्पष्ट होण्यास त्याची मदतच होते. वारंवार सातत्याने एखादा मजकूर किंवा आशय आपल्या समोर जर आला तर आपल्या चांगला लक्षात राहतो.असे प्रयोग अनेक गावातून व्हायला हवेत. शाळेच्या भिंतीवर आता सुविचारा बरोबर संबोधही स्पष्ट होतील अशा काही गोष्टी यायला हव्यात.


३) चला मुलांनो व्यक्त होऊ या:

वंचित घटकातील मुलांना आपले कलागुण सादर करण्यासाठी घरी संधी मिळत नाही. या उपक्रमातून मुलांनी स्वतः मधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बालसभा हा उपक्रम राबविला. या मध्ये मुलेच सर्व नियोजन करतात.दरमहा होणाऱ्या बाल सभेसाठी वर्गावर्गात नोटीस काढून वर्गातून मुलांची नावे व ते काय सादर करणार याची माहिती मागवली जाते. नंतर ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी ही मुलं गाणी नकला, गोष्टी, प्रश्नमंजुषा, प्रयोग सादर करतात. अशा रीतीने मुलें व्यक्त होऊ लागली व नवीन नवीन घडामोडीचा त्यांचा अभ्यास होऊ लागला. हाताची घडी तोंडावर बोट हे तत्वआता वापरून चालणार नाही, तर मुलांना बोलतं करणं, व्यक्त होऊ देणं हे महत्त्वाचं आहे.


४) स्वच्छ मुलगा, स्वच्छ मुलगी व शालेय मंत्रिमंडळ:

मुलांना वैयक्तिक स्वच्छतेची सवय लागावी या हेतूने हा उपक्रम सुरू केला. दररोज परिपाठात असा एक मुलगा व एक मुलगी निवडले जातात, ज्यांचा गणवेश स्वच्छ धुतलेला, तसेच व्यवस्थित नखे व केस असलेले,बेल्ट वओळखपत्र व्यवस्थित लावलेले आहेत अशा नीटनेटकी रहाणीच्या मुलांना फूल व बक्षीस रूपात वस्तू देऊन गौरविले जाउ लागले. आपले कौतुक करून घेण्यासाठी सर्व मुले प्रयत्न करायला लागले. मुलांची कमी होत असणारी पटसंख्या ही जि.प शाळेतील समस्या आहे. यावर उपाय म्हणून शालेय मंत्रिमंडळ तयार केले. यात सर्व मंत्री मुलेंच असतात.जी मुलं काही कारणास्तव शाळेत येऊ शकले नाहीत अशा मुलांच्या घरी मंत्रिमंडळातील सदस्य जाऊन शाळेत कां आला नाही याची विचारणा करून ती माहिती सरापर्यंत पोहोचवतात. तसेच स्वच्छता मंत्री, गुणवत्ता मंत्री हे आपापली कामे चोख बजावतात.


विद्यार्थी गुणवत्ता व उपस्थिती वाढविण्यासाठी या उपक्रमा सोबतच मुलांसाठी बाल नर्सरी, बाल ग्रंथालय स्वयंअध्ययन फळा, आदर्श  परिपाठ,इंग्रजी शब्द, तारखेनुसार पाढे, सामान्यज्ञान, बोधकथा, विद्यार्थी वाढदिवस, स्वच्छ मुलगा वा मुलगी यांचे स्वागत, स्पर्धात्मक गणेशोत्सव, शालेय मंत्रिमंडळ, विद्यार्थी बचत बँक,बेटी बचाव बेटी पढाव, निबंध स्पर्धा, शैक्षणिक साहित्य कार्यशाळा, वृक्षदिंडी, विज्ञानकरिअर मार्गदर्शक, वेगवेगळ्या स्पर्धेत सहभाग, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम, लोकसभा अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे संस्कार दिले जातात.

या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढील फायदे झाले.


१) शाळेची पटसंख्या वाढली, २)गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू लागले.

३) शंभर टक्के विद्यार्थी स्थलांतर रोखता आले, ४)दिव्यांग विद्यार्थ्यांना शासनांच्या योजनांचा लाभ मिळाला

५) विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला.

६) पालकांचा शाळेकडे मदतीचा ओघ वाढला व नकारात्मक दृष्टिकोन बदलला.

७) विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक,भावनिक विकास झाला.

८) शाळेतील मुलींची संख्या येण्याची संख्या वाढली.

९) वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य झाले.

१०) दानशूर व्यक्तींचा मदतीचा ओघ वाढला.


करोना काळात शिक्षकांनी गावातील कोवीड सेंटरला पन्नास हजारांची मदत केली. शाळा समाजासाठी काय करते याचे हे आदर्श उदाहरण आहे.

आमिर खाननेही पाणी फाउंडेशन कार्यक्रमाच्या वेळी या शाळेला भेट दिली व शाळेबद्दल गौरवोद्गार काढले. वरवर पाहता हे छोटे उपक्रम असले तरी नाविन्यपूर्ण आहेत म्हणूनच वेगळी ओळख निर्माण करू शकले.असं प्रत्येक शाळेत व्हायला हवं. प्रत्येक शाळेतल्या शिक्षकाने स्वत:चे विचार व आपले उपक्रम अंमलात आणले तर त्यांची व शाळेची चांगली प्रतिमा निर्माण होईल. यामुळे दर्जेदार शिक्षणाचं अस्तित्व टिकणार आहे व वाढणार आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational