STORYMIRROR

Varsha Nerekar

Drama

3  

Varsha Nerekar

Drama

असेही रक्ताचे नाते...

असेही रक्ताचे नाते...

6 mins
171

"अरे विशाल दादा, तू निघ मला उशीर होईल" समीरचा फोन आला. दोघे एकत्र येत जात थोड्याच अंतरावर समीरची कंपनी होती. फोन झाला तसा विशाल बॅंकेतून निघाला. घर तर आतुरतेने वाट बघत असेल त्यालाही हल्ली कधी घरी जातो असे व्हायचे. जाताना खरेदी ठरलेली. लिफ्ट मधे जाणार तोच जाधव काका भेटले "अरे कसा आहेस येतोस घरी चहा घेऊन जा. खूप धावपळ होत असेल आता" " नाही हो काका हे रोजचे रूटीन आता काही वाटत नाही आणि धावपळ सगळे करतात विशेष काय. बरे तुम्ही भेटलात काकूंनी फुलवाती मागितल्या होत्या घेऊन जा." काका हसले "हो निघ ती तुझी वाट पहात असेल". विशालने बेल वाजवली आणि बॅग ठेवत क्षणात बाजूला झाला. अपेक्षेप्रमाणे दार हळू उघडले दाराचा आधार घेत एक पाऊल पुढे आले मग डोकावली "बाबा..." परी धावली शोधत तसा लपलेला विशाल खळखळून हसला. तिला उचलून कुशीत घेत फिरवत घरात शिरला. "हं... झाली का बाप लेकीची गळाभेट. जणू काय जंगलात होती तुझी लेक. हल्ली वेध लागतात ताईसाहेबांना तू येण्याची चाहूल घेत लक्ष दाराकडे असते बाबा बाबा जप सुरू होतो बेल ऐकली की." आईने पाणी दिले. परी दोन वर्षांची झाली तिच्या बाललीलांनी घर हसतखेळत गोकुळ. तो ऑफीसमधून आला की तिच्याशी मस्ती थकवा क्षणात दूर वेळ कसा जायचा कळायचे नाही. 


विशाल हसतमुख सारे दुःख हसऱ्या मुखावट्याआड दडवायचा. हुशार स्वकष्टाने शिक्षण पूर्ण केले. बॅकेची परीक्षा उत्तीर्ण झाला त्यानंतर पाच वर्षांनी घर घेतले बॅंकेतल्या मित्राने मदत केली घरासाठी. आप्पा बघायला नव्हते आप्पा गेले आणि त्याच्या खांद्यावर जबाबदारी पडली. वाताहात झालेली कौशल्याने सावरले त्याने. भुतकाळाची आईला झळ लागू द्यायची नाही ठरवले. समीरचे शिक्षण होवून तोही मार्गी लागला. लग्नानंतर भार्गवीने परिस्थिती समजून घेत परीच्या वेळी चांगली नोकरी सोडली तिची उत्तम साथ मिळाली. भार्गवीची नोकरी सुटली तसे तिने घरूनच पुजा साहित्य, लोणची, पापड विक्री सुरू केली. शिकवणी घेत होती, पोस्टाची, एलआयसी कामे करत हातभार लावत होती. मुख्य म्हणजे भार्गवी समंजस सगळ्यांचे छान जमले सूर. आता थोडे सुख आयुष्यात आले. अडीच अडचणीत प्रत्येकाला मदत करणे विशालचा स्वभाव. काही जीवाभावाचे मित्र होते. जीवनातल्या संघर्षाने आपला परका दाखवला होता कधी काळी. तेंव्हापासून अनुभवाने समीर सारखा संपर्कातील काही गरजूंना योग्य मार्गदर्शन करत आला. 


आई आज समीर नाही जेवायला आईला सांगत तो परीला घेऊन चक्कर मारायला गेला. शेजारच्या मंदिरात सायंकाळी थोड्यावेळ परीला न्यायचा तोवर भार्गवी स्वयंपाक करून घ्यायची. आई सांजदिवा लावून बाकी आवरायची. "अरे विशाल दादा मला रविवारी गावाला जायचे हि यादी वहिनीला दे तिला सांग सामान काढून ठेव, मी येवून घेऊन जाईन." परीशी खेळत शेजारच्या बिल्डिंगमधल्या अनुजाने यादी हाती दिली. 


भार्गवीच्या मालाची ऑर्डर फोनवर देऊन बरीच कामे हातावेगळी करत तो म्हणाला "अरे समीर चल जरा एक दोन कामे करून येऊ, आई यादीत अजून काही लिहायचे सांग. " 

दोघे बाहेर पडले हवेत गारवा जाणवू लागला. किराणा घरी टाकायला सांगून पुढे निघाले. खरेदी करून मॉलमधे एका ठिकाणी काही वेळ थांबले. समीर थोडे बोलायचे आहे मी तुझा भाऊ असलो तरी आप्पांची भूमिका कधी बजावत आलो. बोलतो ते योग्य अयोग्य माहिती नाही मलाही फारसे कोणी शिकवले नाही. " "अरे दादा आज असा सूर का, काही विशेष आहे का? " समीर गोंधळला. "अरे तुझे सेविंग सुरू आहे न. आता नोकरी व्यवस्थित तर तुझ्या लग्नाचे बघावे का विचारायचे होते. काही असेल तू ठरवले तर सांग मला, तुझे लग्न झाल्यावर तू एकत्र कींवा स्वतंत्र राहण्याचा जो निर्णय घेशील तो आम्हाला मान्य असेल." "दादा अरे असे का म्हणतो, मी कुठेही जाणार नाही." सध्या नको हा विषय समीरने त्याला थांबवले, दोघे माघारी फिरले. "अरे थांब हे बघ कीती छान आहे, पॅक करा" समीरला तो पिंक ड्रेस आवडला घरी जाताच त्याने भार्गवीला दिला, परी सुंदर दिसत होती पिंक ड्रेसमधे मग काय काका पुतणीचे सुरू झाले फोटो सेशन. 


"अरे समीर बघ रे विशाल आला नाही खूप उशीर झाला चंद्र आकाशी आला आज कोजागिरी" अरे "आई जरा बाहेर जावून आलो आज शरद पौर्णिमा येताना दूध वगैरे घेऊन येतो" सांगून बाहेर पडला. कुठे राहिला. समीरने फोन लावला पण फोन लागेना. रात्र थोर होता घोर लागला सर्वांना आईने देवापुढे दिवा लावला. 


रात्रीचे साडे अकरा झाले बेल वाजली विशाल आणि राघव दोघे आत आले "वहिनी पाणी द्या" आई, समीर काळजी करत धास्तावलेले. "राघवदादा काय झाले कुठे होता दादा", डॉ राघव विशालचा खास मित्र. "हो हो सांगतो काळजी करण्यासारखे खरचं काही नाही. मावशी, समीर रिलॅक्स व्हा. मावशी भूक लागली आम्हाला आपण जेवू या एकत्रच. भार्गवीने जेवणाची तयारी केली. दोघे शांतपणे जेवले. हातावर पाणी पडले बाबांनो सांगा काय झाले जीव टांगणीला लागलाय आई ओरडली. "मावशी तुम्हाला माहित आहे विशाल युनिव्हर्सल डोनर आहे. तो घरातून निघाला मला वाटेत भेटला. आम्ही बोलत होतो तेवढ्यात फोन आला. मी त्याच्या बरोबर गेलो बरे झाले, आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो तोच वेटींग रूममध्ये विज्याकाकांचा मुलगा प्रताप व काकू दिसले." तो म्हणताच "अरे देवा का भेटतात हे, काही केले नाही न तुम्हाला" आईला श्वास लागला समीरचा हात तिने घट्ट पकडला राघव, विशाल त्यांचा इनहेलर पंप शोधू लागले. 

 

आप्पा सरकारी शिक्षक होते खरेतर जे घडले विशालच्या चुलत काकामुळे अप्पांच्या काकाचा मुलगा. विज्याकाका बेजबाबदार, गावातच रहायचा काही घरे सोडून तो, माधवी काकू आणि मुलगा प्रताप. पण विज्याकाकाने कर्ज करून ठेवले ते फेडायचे म्हणून त्याच्याच वडीलांना पैसे मागायला आला. भांडणे झाली जमीन विकणार नाही त्याचे वडील म्हणाले त्यांना व बहिणीला घराबाहेर काढले. आप्पांनी आसरा दिला विज्याकाकाच्याच बहिणीचे लग्न तोंडावर होते. पण जमीनीचे कागद मिळवण्यासाठी प्रतापच्या मदतीने स्वतःच्या वडीलांनाच मारहाण केली कपाटातून कागदपत्रे, लग्नासाठी ठेवलेले पैसे घेऊन परागंदा झाले. काकांना वाचवताना आप्पांना लागले आणि झटापटीत कुऱ्हाडीचा घाव विशालच्या पायावर पडला रात्र कशीबशी गेली. आप्पांचे काका जबर जखमी चार दिवसांत गेले. विशालला दवाखान्यात भरती केले. पोलीस आले गाव जमला आईला त्या धसक्याने दम्याचे ॲटॅक येऊ लागले. समीर लहान होता. दुसऱ्या दिवशी विशालची सख्खी आत्या आली, आत्याला सरपंचांनी कळवले ती त्यांना सर्वांना तिच्याकडे घेऊन गेली. आप्पांनी गावासाठी खूप कार्य केले गावकरी, तलाठी, सरपंच मदत करत होते. "पोरांचा विचार करतोय तुम्ही आहात पण इथे राहवे वाटत नाही." आप्पांनी सरपंचाना स्वतःची जमीन व स्वहक्काचे घर विकून त्या बदली शहरात घर विकत घेतले. पुढे चुलत बहिणीचे कसेबसे लग्नही लावून दिले तिच्याकडे कोण बघणार. सरकार दरबारी अर्ज करून शहरात बदली घेतली. मिळाले ते पैसे, सामान घेऊन शहरात आले. आत्या व तिच्या मिस्टरांनी खूप आधार दिला. आत्या दोन महिने येऊन राहिली. सर्व स्थिर जाणवले तेव्हा परतली. अजूनही सरपंच, गावकरी भेटून जात होते. सरपंचांनी सांगितले विज्याकाका, प्रतापला अटक झाली पण त्यांनी तोवर वडीलांचे जमीन, घर विकले होते. बरीच वर्षे संपर्क नाही मग आज का? त्यांना पत्ता लागला तर काय वाढलयं पुढ्यात. नको नको लांबच बरे. क्षणात विशालच्या आईच्या नजरेसमोरून प्रसंग गेला. 


विशालच्या आई राघवच्या आवाजाने परत भानावर आल्या. "नाही त्यांनी बघितले नसावे बहुतेक मी विशालला मागे ओढले. आम्ही मागे फिरलो तर माधव भेटला, तुम्हाला माधव आठवतोय तो इन्स्पेक्टर आहे योगायोगाने भेटला. त्याच्याकडून कळले विज्याकाकाला ट्रकने धडक दिली गंभीर जखमी झाले म्हणून इथे शहरातील हॉस्पिटलमध्ये आणले, आईसीयूत त्यांनाच ब्लड हवे होते. डॉक्टर आले विशालशी बोलणार तेवढ्यात मी त्यांना, विशालला, माधवला घेऊन केबिनमधे गेलो." डॉक्टर सांगत होते "इमरजेंसी आहे रक्ताची गरज आहे. विशाल तुम्ही तयार आहात का सांगा नाहीतर दुसरे बघायला. चेकअप करू मगच फॉर्म भरा ऑपरेशन उद्या सकाळी आहे तुम्हाला वेळ सांगतो तुम्ही याला ना". "डॉक्टर आपण डोनरचे नाव कधीच सांगत नाही बरोबर न. मी रक्त देईन पण इथे नाही तुमच्याच दुसऱ्या बिल्डींगमध्ये किंवा अन्यत्र चालेल. मला कोणी भेटायचे नाही आणि माझा पत्ता तुम्ही द्यायचा नाही. तरच मी येईन." डॉक्टरांना सांगून आम्ही तिथून निघालो थेट घरी आलो. "खरे सांगतो आई मी सुन्न झालोय त्याला तिथे बघून, पण संयम ठेवून होतो. राघव आणि माधव बरोबर होते खूप आधार वाटला". समीर, भार्गवी सारेच शांत अनामिक दडपण जाणवत राहिले रात्र जास्त गडद वाटली. "दादा, नको जाऊ उद्या आपल्याला खूप त्रासातून जावे लागले. तुझा पाय...मरू दे बरी देवाने शिक्षा दिली." समीर हळवा होत पण आवेशात बोलला. कोणाला काही सुचत नव्हते. "मावशी मी आज इथेच थांबतो" राघव. रात्रभर कोणाचाच डोळ्याला डोळा नव्हता रात्र खूप मोठी भासत राहिली. 


विशाल फोनवर कोणाशी तरी बोलत होता. दोन तीन फोन झाले त्याचे. सकाळचे सहा वाजले फोन वाजला तसे सगळे चपापले आता काय. विशालने फोन घेतला हॉस्पिटल मधून फोन "ऑपरेशन नऊ वाजता आहे, सात वाजता तुम्ही या." "भार्गवी नाष्टा कर आमच्यासाठी. आई मी डोनर आहे मी विसरू शकत नाही. माझे कर्म मी करतो माणूस म्हणून रक्ताचे नाते जपतो. माधवला फोनवर कल्पना दिली तो लक्ष ठेवेल. मला डॉक्टरांनी त्यांच्या मित्राच्या हॉस्पिटलमधे बोलावले. चल राघव.." 


थोड्याच वेळात विशाल बाहेर पडला असेही रक्ताचे नाते जपण्यासाठी...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama