नशीब
नशीब
ऋताच्या मैत्रिणी तिला आयफोन नाही म्हणून चिडवायच्या. ऋता आठ दिवसांसाठी गावी मामे बहिण स्नेहाकडे गेली. ऋताला जाणवले सर्वसाधारणपणे फोन घेणे परवडत नाही. शाळा, बाजार लांब ज्याच्याकडे फोन असतो त्याला फोन केला जातो मग निरोप त्या घरी देतात. स्नेहाकडे फोन नाही, ऋता मनात विचार करू लागली मी कीती लकी आहे मला बाबांनी फोन दिला.
"अरे यश बरे झाले तू आज जाणे रद्द केले तू ज्या रेल्वेने जाणार होतास त्या रेल्वेला अपघात झाला. नशीब बलवत्तर तू वाचलास"
प्रियाची नोकरी सुटली खूप नाराज झाली आता परत नव्याने सुरूवात, तिला नोकरी मिळाली पण विशेष आनंदी नव्हती. एक निर्णय घेतला स्वतःचा छोटा बिझनेस सुरू केला, सहा सात वर्षात खूप प्रगती झाली उद्योजक पुरस्कार मिळाला. काही विशेष तिच्याकडून घडणार होते. एक संधी असेही नशीब.
देवा माझे नशीब असे का? बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो....कदाचित आपण म्हणत असतो देवा हे नको काही चांगले दे, कदाचित तेव्हा तो विश्वाचा पालक म्हणूनच बदल घडवून आणतो. तू एक सोड मला देवून टाक मी दुसरे देतोय. विनाकारण परिवर्तन घडत नाही. प्रत्येक बदल काही अंशी आधीपेक्षा सुखाचा ठेवा ओंजळीत देतो.
असे आपण अनुभवतो, ऐकतो. एखाद्या कडे जे नाही त्या सुखसोई आपल्याकडे आहेत विचार व्यक्तिला सुखावतो नशीब मानले जाते. कधी वाईट घडता त्रास करून घेण्यापेक्षा नशीब म्हणा सोडून द्यावे हे बरे जाणकार सांगतात. मनाप्रमाणे कींवा अपेक्षेप्रमाणे कींवा अपेक्षेपेक्षा चांगले तर *नशीब बलवान* आणि याच्या विरूद्ध अपेक्षित घडले नाही की "नशीब माझे फुटकं..." सहज म्हणत असा कींवा तसा नशीबाला दोष देतात. अनेक भाव तरंगातील वाक्ये हमखास बोलतात. अवती भवतीच्या घटनेमुळे पडसाद उमटतात.
अनेक फाटे फुटतात नशीब शब्दाला बरं जीवन मरणाचा प्रश्न हातावर मोजण्या इतपत बाकी सर्व दैनंदिन व्यवहार तरी नशीब शब्द तोंडी अन् भावनांची कोंडी. योग्य विचार केला जे झाले ते योग्य म्हणून पुढे प्रवास करत जावे. कालांतराने लक्षात येते खरेच वाचलो, कींवा खूप बरे झाले आज इथवर आलो. सो... नशीब खराब म्हणू नये कारण साध्या घटनेतून चांगले घडते. काळाच्या पावलांचा आवाज होत नाही आणि संधी, संकट जीवन नकाशावर दिसत नाही.
आपण सर्वजण नशिबवान आहोत असे वाटते, असे ऐकीवात की चौऱ्याऐशी लक्ष जीव जन्म फिरून मग मानवी देह लाभतो म्हणून मानव जन्म श्रेष्ठ मानला. जीवाचा उदय भाग्योदय मानवी जन्म मिळणे, श्वास सुरू राहणे. नवजात बालक आजारास बळी न पडता सुदृढ प्रकृतीने बालपणातून संघर्ष करत वास्तवात जीव होतो सक्षम. सर्वसामान्यत: आई वडील होण्याची अभिलाषा त्यांना संतान होते ती भाग्यकारक घटना म्हणजे अवनी वर जन्मलेला *मानवी जीव* हा *भाग्यशालीच*. सृष्टीने सगळे मानवावर सोडले बघा, 'तू तुझा शिल्पकार' असे गुरू वचन तेच साधेपणाने 'तू बघ तुझे काय ते....' शब्द बदलले अर्थ, भाव बदलला. नशिबवान, भाग्य अशा शब्दांत खूप गहन अर्थ पण विचारसरणी अशी झालीय नशीब म्हणजे पैसा, प्रतिष्ठा, ऐषोआरामाचे राहणीमान, परदेशी जाणे, परदेशी नोकरी इ. इ.
कोणी कोणा पोटी जन्माला यावे हे हातातच नाही आई वडीलच काय पण नातेसंबंध हे प्राक्तन ते बाय डिफॉल्ट निसर्गदत्त इथे चॉइस कुठे होता कींवा आहे हेच नियती विधात्याने निर्माण केले भाळी लिहिले आपल्याला सांगण्यात आले. असिम महाशक्ति या सजीव सृष्टीवर नियंत्रण ठेवून आहे हे मान्य करावेच लागते. सृष्टीत सर्वच अद्भूत, अनाकलनीय अविष्कारी कुतूहल निर्माण करणारे आहे. मग असे असताना यत्किंचित अणू रेणू आपण अट्टाहास कसला करतो असाही प्रश्न मानवी मेंदूला सतावतो. गरज ही शोधाची जननी, अदृश्य काल्पनिक आभासाचा ध्यास लागतो काही ध्येयवादी जगाच्या भवितव्यासाठी शोधातून नवनिर्मिती करतात मग हे भाग्यच.
कुठेतरी झोपडी होती तिथून प्रवास छप्पराच्या घरात, वस्ती ... वाडा, चाळी.. राजमहाल काळानुसार परिवर्तन आणि आता गगनचुंबी इमारती. ज्याकडे एक रूम त्याला दोन रूम होणे. दोन रूम चे वन बीएचके, वन बीएचके चे दोन ते बंगला बांधणे नशिब वाटते म्हणजे जीवन प्रगत, समृद्ध होत जाणे. एखाद्याचे छोटे दुकान भाड्याचे ते कंपन्या इ. इ. स्वकर्तृत्वावर नशिबाची साथच वाटते. गुंठेवारी असणाऱ्याने एकर, हेक्टर मधे जमीन घेणे. पावलोपावली व्यक्तिच्या कर्तबगारीच्या कक्षा रुंदावतात शोध लागता काळ, राहणीमान बदलते त्याप्रमाणे नशिबवान संकल्पना बदलते. पायी चालणारा ते आता विमानप्रवास सुख पुढे हवेत उडणाऱ्या गाड्या, कदाचित सॅटेलाईट व्यवसाय होईल ते त्या त्या काळानुसार भाग्य.
जे आहे त्यापेक्षा सुधारीत कींवा स्वप्नवत मिळण्याची आशा भाग्य. हा विषय नशीब या तीन अक्षरी शब्दाचा पण महासागरात उठणाऱ्या लाटा, भोवऱ्या सारखा विचारांना भिरभिरत नेणारा. आता जे लोक सतत माझे काहीच चांगले झाले नाही, नशीब फुटके म्हणतात त्यांनी पुढीलप्रमाणे विचार करावा. नुकत्याच झालेल्या कोरोनाच्या महामारीतून आपण वाचलो श्वास घेतोय हे भाग्य. कधीतरी परत नशिबावर रडणारा भेटला तर सांगता येईल. नशीब न म्हणता बाबा रे तुझी क्षमता बघ प्रयत्न कर थांबू नको याही पेक्षा चांगले तुझ्या हातून घडणार असेल. कामाचे क्षेत्र काहींचे एकच असते काहींचे बदलते. शिक्षण वेगळे तर कर्म, उपजिविकेचे काम वेगळे असे बघतो आपण. कधी चुकतो मार्ग तर कोणी खेळी खेळून जातो अन् आपले नुकसान होते, विश्वासाला तडा जातो पण न हरता पुढे जाणे प्राक्तन कारण जीवन प्रवास बाकी, एक अडथळा होता रस्त्यावर वळण घेत दुसरा मार्ग.. एवढाच विचार करावा.
विचारांच्या दलदलीत अडकता बाहेर कोणी काढणार नाही अन् बाहेर पडायचा मार्गही नाही वेळीच सावध असाही यू टर्न घ्यावा. सृजनहो विचार करा प्रत्येकाची स्वक्षमता, स्वप्रयत्न मिळणारे थोडे नशीब समोरच्याची साथ कींवा प्रतिसाद याची बेरीज आणि उत्तर यशस्विता. स्वतःवर विश्वास व अथक प्रयत्न महत्त्वाचे.
जीवनात प्रत्येक पायरीवर प्रत्येक घटक, घटना, भोवतालचे वातावरण यांतून जडणघडण होते व्यक्तीची भावनिक, मानसिक, वैचारिक इ. इ. कोणी दाखवलेल्या प्रसंगावधानाने मदतीमुळे अपघातात जखमीचा जीव वाचतो भाग्य. माता-पिता लाभणे, आई वडील असणेही भाग्य हे कळत नसेल त्यांना अनाथ दाखवा. शिक्षण - परिस्थिती सदृश तरीही व्यक्ती कौशल्यावर शिक्षण म्हणजे शाळेत जाणे अपवाद सोडला तर जगाच्या क्षितिजावर अगणित ज्ञानाचे विषय संदर्भ आहेत. व्यक्ति स्वच्या शाररीक, मानसिक, वैचारिक कुवतीप्रमाणे निवडते कर्म (काम), कधी मिळालेली संधी कर्म ठरते त्यात कुशल होता ते कर्म ठरते उपजिविकेचे साधन. परत स्वक्षमता स्वप्रयत्न काहीतरी प्रतिसाद(भाग्य) = यशस्वीता जीवनात.
चांगले माता पिता, बहिण-भाऊ , स्वसंस्कार, मित्र परीवार, शेजारी, ऑफीसमधले सहकारी इ. इ......चांगले मिळणे नशीबच. स्वभाव जुळणे हे बालपणीच शिकतो प्रत्येक जीव, कसे वागावे सर्वोतोपरी हे कळते हेही नशीब. कोणत्याही वयाच्या व्यक्तिच्या स्मृतीत बालपण जास्त कोरलेले असते. मग जसे विचारपूर्वक स्वक्षमता ओळखून स्वप्रयत्नांनी कार्य करू पुढच्या पिढीचे चांगले बालपण जाईल हे आपल्या हाती कळल्यानंतर. पाया चांगला, त्यांच्या पुढे आम्ही चांगले ठेवले तर भावी पिढी उत्तम तर राष्ट्र सर्वोत्तम प्रगती करेल देशाचे भाग्य सर्व जनतेवर आहे. तसा प्रत्येक घटकांतून प्रतिसाद यशस्वी, पद, प्रतिष्ठा लौकिक दृष्टीने प्रगतीपथावर व्यक्तिचा प्रवास.
एवढेच नव्हे दिवसागणिक स्वतःमधे वैचारिक बदल हे आपलेच नशीब आपली मनाची, भावनिक, वैचारिक बैठक इतकी चांगली की बऱ्याच वावटळी, वादळे, संकटे, संघर्ष काहीही म्हणा इतके होवून आपण वाईट विचार करून चुकीचा मार्ग अवलंबत नाही याला काय म्हणायचे "नशीब वाचलो, बरे झाले मी घाईत निर्णय घेतला नाही, ती कंपनी बुडली ऑफर नाकारली नाहीतर हि नोकरी सोडली असती अवघड झाले असते." ते अगदी "बरे झाले मी पटकन निर्णय घेतला ऑपरेशनचा ते वाचले" नुकतीच घडलेली घटना एका व्यक्तीवर इतरांचे नशीब. एसटी ड्राइवरला आपल्याला हार्ट अटॅक येतोय जाणवले त्याही अवस्थेत गाडी त्यांनी बाजूला घेतली त्यांचे निधन झाले पण सगळे वाचले. गाडी वळवली टळले भीषण. स्वपलीकडे आशा, अपेक्षांचे ओझे कार्य प्रवाहित ठेवताना प्रत्येकावर दडपण असते. असे अनेक अनुभव जे आपल्या मानवी क्षमतेपलीकडे त्यातून वाचतो आणि मिळालेला भल्याचा प्रतिसाद हेच खरोखर भाग्य. त्यावेळची घटना, आजूबाजूचे वातावरण अर्थातच परत तिथे उपस्थित व्यक्तींचा तो दृष्टीकोन व प्रतिसाद बघा परत फिरून आलो. कळत नकळत एखादी गोष्ट घडणे व जाणूनबुजून त्रास देणे यातूनही बघा भावनांचा गोंधळ समजतो. किचकट विषय बापरे केवढी चर्चा मग म्हणूनच मन संतुलित ठेवा. जेव्हा कधीकधी द्विधाा मनस्थिती होईल तेव्हा थोडा विचार जरूर करा, थोडे थांबा कुठून कसा प्रवास करत आलो. जे घडूू गेले त्याची खंत नको कारण ते सुधारता येणार नाही, भुतकााळातल्या आठवणी त्रास देतात काळाचे काटे पुढ
जा सांगतात मग मागे राहून कसे चालेल. आपणच जिद्दीने उभे राहिले पाहिजे, इतरांना काही पडले नसते. उदास न होता नवा मार्ग शोधायचा, संघर्ष तोवर जीवन जीवन तोवर संघर्ष म्हणून श्वासाचे तोवर वरदान असावे. कदाचित खूप धावलो तर थोडी विश्रांती गरजेची असते ना. एक विचार अंतरी जागृत असावा जे झाले ते चांगले जेे होतेय चांगले व जे होईल ते चांगले, तू प्रवासी चालत रहा मार्ग निश्चित मिळेल असा सकारात्मक विचार करा, योग्य निर्णय घ्यावा. शरीरात योग्य पित्त असते, खिशात पुरेसे वित्त हवे तसे संतुलित चित्त हवे. शांत चित्त योग्य निर्णय आणि उत्तम प्रयत्न, नशीबाची चांगली साथ उत्कर्ष होणार. चांगल्या नशीबाची साथ सर्वांना मिळो... शुभ घडो सदैव...
*देवा आभारी आहे*
अति पैसा दिला नाही - पण चांगले मन दिले
गर्विष्ठ भावना नाही - विश्वासाचे खांदे दिले
घेण्यासाठी नाही - देण्यासाठी समृद्ध कर दिले
कुविचार जरा नाही- सुसंवादासाठी सुविचार दिले
सौंदर्याची खाण नाही- औदार्य गुण अंगी दिले
घाव घालणे नाही- संकटी मदतीचे कर्म दिले
मोहाचे पसारे नाही- तृप्ततेचे अमृतदान दिले
ऐश्वर्य झगमग नाही- संयमी शांत चित्त दिले
कोटी कोटी धन्यवाद देवा जीवनदान दिले
