खजिन्यातले गिफ्ट
खजिन्यातले गिफ्ट
"उपेंद्र अरे नेटवर्कचा गोंधळ, बघ ना जरा मदत कर" भार्गवीने म्हणताच "आई तू शिकून घे काळ बदलला किती अवलंबून राहणार. कुठे कुठे लक्ष द्यायचे."
"अरे तसे नाही मी करून बघितले पण होत नाही, ए राजा थोडी मदत कर" "हं दे लॅपटॉप काय करायचे... "
उपेंद्र आणि भार्गवी बराच वेळ बोलत काम करत राहिले. खोलीतून बाहेर येत भार्गवी म्हणाली "बघा आई कधी या पोरांना आपण बोट धरून शिकवले तेव्हा यांना आपण असे म्हणालो नाही की काय अवलंबून राहतो तुझे तू शिक. अ गिरवण्या पासून कॉलेज पूर्ण होई पर्यंत अभ्यास, शाळा, क्लासला सोडणे आणणे धावत राहिले आणि मुले पटकन बोलतात बिझी आहे. ...पण या बदलत्या टेक्नॉलॉजीच्या काळात आता नवीन आत्मसात करताना यांची मदत लागते तर चार शब्द फेकून जातात....कधी हात द्यायचा तर कधी मदतीला तोच हात धरायचा...., चला स्वयंपाकाचे बघते..." ती निघून गेली. तिची होणारी चिडचिड सुधाताईंनी ओळखली मनात म्हणाल्या आता अजून एक मौल्यवान गिफ्ट द्यावे लागणार खजिन्याच्या पेटीतून.
"आजी काल जमले नाही मला फुले आणायला आत्ता जातो" उपेंद्र कामाच्या गडबडीत विसरला आजीच्या लक्षात आले. पण सुधाताईंनी एक छान स्मितहास्य दिले आणि म्हणाल्या "इट्स ओके."
उपेंद्रच्या लक्षात येत होते "आजी रागवू नको पण हे काय गं नवीन 'इट्स ओके', परवा पण तू म्हणाली सारखे काय चालले काय अर्थ घ्यावा. तू रागावतील का मी फुले विसरलो. अगं लक्षात आले तसे म्हणालो आणून देतो. "
उपेंद्रचा सूर बदलला त्यांच्या लक्षात आले. गेले वर्षभर त्या बघत होत्या खूप धावपळ अनामिक तणाव जाणवत होता. आज हा घरी तर याच्याशी बोलले पाहिजे आत्ता भार्गवीला म्हणाला पण अजून जगाला प्रवास खूप दूरवरचा आज नाही तर कधी.... मनात विचार करत त्या म्हणाल्या "उपेंद्र बस नंतर जा फुले आणायला. अरे माझ्याकडे एक खजिन्याची पेटी आहे त्यातले 'गिफ्ट' देते तुला आणि हे गिफ्ट अनेकदा वापरता येते संपत नाही अनेकांना देता येते. तुला हवे असेल तर उघडून दाखवते नाहीतर राहू दे दुसऱ्या कोणाला देईन ज्याला हवे त्याला. खरचं ऐकायची 'इट्स ओके' कींवा इतर गंमतीशीर काही..." असे म्हणायचे त्याचा चेहरा खुलला आश्चर्याने 'गिफ्ट, खजिन्याची पेटी लहानपणी आजी असेच म्हणायची, परत एकदा बालपण आठवल्या सारखे भाव चेहऱ्यावर होते त्याच्या. तसेही ओव्हरटाईम काम करून प्रोजेक्ट पूर्ण झाला म्हणून ऑफिसमध्ये सरांनी आठवडाभर ब्रेक घे सांगितले होते. पास आऊट झाल्यावर पहिलाच जॉब तसा तो खूश होता काम आवडीने मन लावून करत होता. आता आठवडा रिकामा काय करायचे दोन तीन दिवस कुठेतरी जायचे ठरवत होता.
"ओके आजी सांग" तो आजीच्या खुर्ची शेजारी बैठक मारून विराजमान झाला. "अरे गोष्टी खूप छोट्या असतात पण आपण बाऊ करतो. घाबरतो व्यक्त व्हायला. मनातले बोलले पाहिजे पण तिथे जिथे योग्य समजून घेणारा असेल. दोन्ही व्यक्तींनी समजून घेणे गरजेचे, एका हाताने टाळी वाजत नाही राजा. गेले काही दिवस मी बघते अरे तारेवरची कसरत करत वेळापत्रक सांभाळणे म्हणजे ताण येतो पण ताण चांगला. आपल्या मनात विरूद्ध काही न पटणारे दबावामुळे करावे लागणे म्हणजे तणाव आणि हा तणाव कधी ओझे होतो अतिरेक कोणताच बरा नाही तसा हा ताण वाढला तर थोडी विश्रांती शरीर, मेंदूला हवी. पण तणाव अति श्वास गुदमरतो अन् आत्मविश्वास कमी होत जातो मग यातून तणावाखाली न राहणे काय म्हणता तुम्ही हं आठवले 'स्वीच ओवर' होणे गरजेचे आहे."
सुधाताई सांगत होत्या "प्रत्येक पिढी मध्ये अंतर काल होते आज आहे उद्याही राहणार. विचार, राहणीमान, भोवतालच्या जगातील परीवर्तन घडत राहणार सृष्टीच्या अस्तापर्यंत. 'गरज शोधाची जननी' शोध लागणार त्याप्रमाणे शून्यातून प्रवास झाला आपला पण मानवाने सॅटेलाईट विश्वात पाऊल टाकले. अरे काळ बदलला म्हणजे माणसांच्या विचारांचे आधुनिकीकरण होते माणूस बदलतो. खरतर काळ सरत राहतो घड्याळाचे काटे टिकटिकत राहतात. माणूस बदलला आणि त्यानेच म्हटले काळ बदलला. आमच्या सारख्या मागील पिढीला तुमच्या 'मॉडर्न' जगात धावणाऱ्या मुलांनी हात देऊन पुढे नेले तर 'जनरेशन गॅप' शब्द बाद होईल. बघ तू काम करू लागला तसे तुला नवीन गोष्टी कळल्या काही अडले असेल तर तुझ्या वरिष्ठांनी, सहकारी त्यांनी मदत केली असेलच. मग तुझी ही आजी, आई घरातील इतर आमच्यासाठी हे तंत्रज्ञान नवीन थोडी मदत लागणार. तुझी आई तुमची आबाळ होऊ नये म्हणून चांगली नोकरी सोडून घरी आहे, पण घरातून काही तरी करतेच तुम्ही नोकरी करता पण ती चोवीस तास राबते हे लक्षात येवू नये का बरे. तुम्ही शाळेत गेल्यापासून ते आत्तापर्यंत आई तुमच्याबरोबर सहविद्यार्थी झाली तुम्हाला शिकवायचे समजून सांगायचे तर आधी स्वतः नव्याने प्रत्येक वर्षी शालेय भाषा ते कॉम्प्युटर अभ्यास करू लागली वाचत आली. जीवनाची सुरुवात बोट धरून होते तसेच इतरांना बोट धरून मार्ग दाखवावा लागतो बेटा. "
"हेच बघ तुमचे युग म्हणू आपण रोज होणारे बदल डीजिटल, गॅजेट यांत्रिक सुविधा रोज नवीन अपडेटेड व्हर्जन येते ते स्विकारले जाते पण घरातला होणारा बदल मान्य करणे जमत नाही. बदलणाऱ्या सुखसोयी आत्मसात करता मग त्या बदलांना नोकरी करणाऱ्याला सहज वाटते कारण ते त्याचे रोजचेच 'युज टू' बरोबर न तर हे अंगवळणी पडलेले सहजतेने व्यक्ती करते. पण ज्याला कधीतरी करावे लागते त्याला त्याचे टेन्शन येते. तुला काय कींवा श्रेयाला अभ्यास, खेळ, व्यायाम, छंद वर्गाला भार्गवीने घातले व धावपळ,ओढाताण करत मॅनेज केले का तर तुम्हाला इतर चार गोष्टी यायला पाहिजे. तुमची मेडल्स, सर्टिफिकेट यांमागे एक सक्षम आई आहे विसरूच नका. उद्या तुम्ही जबाबदार व्यक्ती व्हावे म्हणून सांगते. तुला आठवते तू कॉम्प्युटर मास्टर्स करताना फी कमी पडली तर भार्गवीने तिचे स्त्री धन मोडले तू मास्टर्स पूर्ण करावे ती आग्रही राहिली. महागडे क्लासेस सुरू झाले कधी विचार करून बघ कसे निभावते ती घरात. तुम्ही हुकूम सोडून, नावे ठेवून निघून जाता."
अरे घरचेच सांगतात सांभाळ, जप स्वतःला बाहेरचे तुमच्याशी तुलना करतात अनामिक स्पर्धा चालू असते. अर्थात प्रत्येक स्पर्धेत सहभागी व्हावे असे नाही. जगात परीपूर्ण कोणीही नाही किंबहुना अपूर्ण ज्ञान म्हणून जिज्ञासेने सर्व जगण्यात, अनुभवण्यात आनंद आहे. एखादी छोटी वस्तू खरेदी ते अगदी घर खरेदी पर्यंत अशा अनेक गोष्टी घडतात आयुष्यात जिथे वेळोवेळी सल्ले कींवा चार समजुतीच्या गोष्टी उपयोगी पडतात. अर्थात प्रत्येक घरातले जाणकार असे सांगतात तेव्हा काहींना उगाच कटकट वाटते, उपदेशाचे डोस, वैताग, पकावू गोष्ट वाटते. तर तेच काहींना बोधकथा, ज्ञान, सूचक संदेश वाटते. यातून कोणीही सकारात्मकतेने ज्ञान घेतले तर भलेच होईल.
"अगं आजी तू म्हणते पटते पण तसे काही नाही, पण कामे असतात डोक्यात ऑफीसचे विचार मग ती हे सांग ते सांग म्हणते" "अरे गधड्या इंजिनिअर झालास पण पाटीवर 'अ.. आईचा' गिरवत कॉलेज पर्यंत तीलाच प्रश्न विचारले ना. बारावीपर्यंत ती तुला गणित शिकवत होती. मागे लागून तुम्हा दोघांचे एकाच वेळी दोन इयत्तांचा अभ्यास घेत होती. तुमच्या यशामागे बाबा आहे तशी आई आहे. आणि अजून एक मघाशी तू बोलताना म्हणालास ऑफीसचे विचार, आज एक सांगते ऑफीसचे विचार घरात आणि घरचे ऑफीसमधे गल्लत करायची नाही. नीट लक्षात ठेव अरे मोठ्यांचे अनुभव तारतात आणि आज मी सांगितले तसे उद्या तू तुझ्या मुलांना सांग. जो संकटात असेल त्याने विचारले किंवा तुला जाणवले त्याला सांग. "एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ". कोणाला मिळालेला चांगला अनुभव यशस्वी होवू शकतो सूचित करेल तर वाईट अनुभव का कसा मिळाला यातून काय करू नये हे लक्षात येते व व्यक्ती संकटातून वाचते. आपण जे भोगले ते मुलांच्या वाटेस येवू नये प्रत्येक पालकांची भूमिका असते. तुझ्या बाबाला सुमितला हेच सांगते की मुलांना सांग संवाद साधला पाहिजे. अनुभव ऐकून सावधतेने पुढे जाता येते. व्यवहार, नाते, मैत्री यात वावरताना समोरचा व्यक्ती आपल्या बरोबर कसा हे लक्षात घेऊन वाग. कानात शब्दांचे वारे सोडून लोकं निघून जातात पण हलक्या कानाचा राजा होवू नको. उत्तम व्यक्ती व्हायचे तर ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नको. जेवढे दाखवले जाते तेवढे आपण बघतो जे सांगितले जाते ते ऐकतो. जीवनात सावध वागावे. स्पर्धा करून नुकसान होते. प्रसंगावधान हवे अंगी. बऱ्याचदा धोका देते काही म्हणून कधी घटना वाईट घडते कींवा घडवलीही जाते पण विचार विवेकाने करून निर्णय घ्यावा व निर्णय घेताना घरच्यांना विश्वासात घ्यावे. तसे आपल्या घरात सगळे हुशार व गुणी आहेत." सुधाताई बराच वेळ प्रणवला समजवत होत्या... "अच्छा आले हं माझ्या लक्षात आजी तुझे खजिन्याच्या पेटीतले मौल्यवान गिफ्ट, पण हरकत नाही सुंदर गिफ्ट, थॅक्स आजी...मी हे जपून ठेवेन आणि हे असेच गिफ्ट कोणालातरी नक्की देईन " उपेंद्र हसला. आज मौल्यवान गिफ्ट त्यांनी न मागताच प्रणवला दिले.
दारावरची बेल वाजली उपेंद्र उठला "आई, मी दार उघडतो" शेजारचा अविनाश आत येतच सुधाताईंना म्हणाला
"काकू तुमच्यामुळे काम झाले, तुम्ही म्हणालात गावाला जावून आलो आत्ताच येतोय, मी बोललो मुलीबरोबर प्राॅब्लेम सुटला.... आधी तुम्हाला सांगावे म्हणून आलो. चला येतो" अविनाश निघाला तसा सुमित आला. "काय आई हा कसा इकडे हा तर सहलीला गेला होता" "अरे काही नाही त्याची लेक मला प्रायव्हसी नाही म्हणत इतर मैत्रिणींशी स्पर्धाच जणू करत होती. आणि म्हणूनच तो आदिवासी भाग व इतर आश्रम वगैरे ठीकाणी सह कुटुंब भेट देवून मुलांना वेगळे जग, वास्तव दाखवून आला चला त्याचा प्रश्न मार्गी लागला." सुधाताई हसल्या समाधानाने.
भार्गवी चहा दे सुमितने म्हणताच थोडा वेळ थांब ती कामात आहे सुधाताईंनी सांगताच "इटस् ओके" तो म्हणाला आणि समोर बसलेला उपेंद्र जोरात हसला "बाबा तुम्ही पण, म्हणजे आजीने तुमचीही शाळा घेतली तुम्हाला खजिन्यातले गिफ्ट दिले आहे" "अरे नाही माझ्या आई व बाबांनी अनुभवाचे गिफ्ट मला दिले वेळोवेळी बेटा, तुला सांगतो खूप उपयुक्त मी पण देणार तुला अशीच उपयुक्त मौल्यवान भेट"
सगळे हसू लागले भार्गवी चहा घेऊन आली "काय झाले"
"आई आज मला खूप छान आजीकडून गिफ्ट मिळाले. ए आई मी चुकलो पण तुला कधीही काही अडले तू मला सांग मी आहे तुझ्याबरोबर नेहमी. आई, बाबा, आजी आपण दोन -तीन दिवस सहलीला जाणार आहोत तयारी करा. आजी मी फुले घेऊन येतोच. आई तुला काही आणायचे सांग, आठवले तर फोन कर मी आणतो" भार्गवी बघतच राहिली, उपेंद्रचा सूर बदलला उत्साह जाणवत होता. सुधाताईंनी तिच्या खांद्यावर थोपटले सगळे व्यवस्थित, काळजी करू नको आता हिरा चमकेल खऱ्या अर्थाने".
सुधाताईंनी शबनम घेतली आणि देवळात निघाल्या न जाणो आज कोणाला द्यावे लागेल आपल्या खजिन्यातले गिफ्ट...
