STORYMIRROR

Aarti Shirodkar

Children

3  

Aarti Shirodkar

Children

अपेक्षांचा समतोल

अपेक्षांचा समतोल

5 mins
136

शेखर रावंना कॉल आला आणि समोरचं बोलणं ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. थोड्यावेळासाठी ते खुर्चीवर तसेच स्तब्ध बसून राहिले. सुमा - त्यांची बायको, कार्तिकी - त्यांची मुलगी, दोघींनाही काही कळत नव्हते. त्यांच्या प्रश्नांचा भडिमार चालू होता पण शेखर रावांसाठी जणू संपूर्ण जग थांबलं होतं. आजूबाजूला काय चाललंय, आपली बायको, मुलगी आपल्याला प्रश्न विचारतायत याची त्यांना जाणीवच होत नव्हती. शेवटी सुमाने त्यांच्या तोंडावर पाणी मारलं तेव्हा कुठे ते भानावर आले आणि ओक्साबोक्शी रडू लागले. बायकोला म्हणाले,


"चल! आपल्याला समरच्या हॉस्टेलला जावं लागेल."


"अहो पण आता एवढ्या रात्री? का? काय झालं?" - सुम।


"बाबा, मी पण येणार. काय झालं ते सांगा प्लीज...." - कार्तिकी.


" समरच्या हॉस्टेलवरून फोन आला होता. अगं आपल्या समरने सुसाईड अटेम्प्ट केलाय. त्याला असं करताना हॉस्टेलमधल्या काकांनी पकडलं. फोनवर एवढंच सांगितलं त्यांनी. चला, आपल्याला निघावं लागेल."


एवढं बोलून शेखरराव, सुमा, कार्तिकी, समरच्या हॉस्टेलला निघाले.


'समर' - एक अतिशय हुशार आणि गुणी मुलगा. आई-वडीलांच्या आज्ञेचं पालन करणारा. छोट्या कार्तिकीला जीव लावणारा. आई-वडील सांगतील त्याच वाटेने चालणारा आणि आपल्या मनातल्या गोष्टी आपल्या मनातंच ठेवणारा. शाळेत कायम पहिल्या पाचात. आई बाबाच अभ्यास घ्यायचे त्याचा.त्यामुळे घरात पण बर्‍यापैकी शाळेसारखं वातावरण. टाईमटेबल, खेळायच्या, टी.व्ही. बघायच्या निवडक वेळा, जेवायच्या वेळा, सगळं सगळं काही ठरलेलं. जसजसा तो मोठा होत होता, त्याचा अभ्यास वाढत होता तसंतसं सुमा आणि शेखरला खरं तर जमेनासं झालेलं त्याचा अभ्यास घेणं. तो सांगायचा तो एकटा करेल अभ्यास त्याच्या इतर मित्रांसारखा पण सुमा आणि शेखरच्या पचनी नाही पडायचं ते! स्पर्धा केवढी वाढलीय, कसा तू एकटा करणार अभ्यास? या प्रश्नाचा सतत भडिमार व्हायचा त्याच्यावर. नकळत प्रत्येक मार्का-मार्काचा हिशोब घेतला जाई त्याच्याकडून. म्हणजे शंभरापैकी नव्वद जरी मिळाले तरी पुढच्या वेळी हे दहा मार्क नाही गेले पाहिजेत इथून सुरूवात होई, नव्वद मिळाले म्हणून कौतुकाची थाप सगळ्यात शेवटी पाठीवर पडे आणि आता त्याची सवय झालेली समरला. तसं काही खूप कडक वातावरण नव्हते घरात पण समरची कधीच मनमानी, मनमानीच काय, त्याला हवं तसं काहीच झालं नाही. सगळे लाड आपसुकच पुरत होते, आई बाबा सगळं काही प्रेमानेच सांगत होते, त्यामुळे तो कधी काही बोललाच नाही. कारण त्याला माहित होते, तो काहीही बोलला तरी आई बाबा प्रेमाने समजावणार आणि त्यांना हवं तसंच होणार. त्याला नेहमी वाटायचं, या सर्वाबरोबर आपल्यालाही थोडी मोकळीक मिळावी, मित्रांबरोबर फिरायची, मजा मस्ती करायची पण त्या सगळ्यावर आई बाबांचं एकच उत्तर, "हे सगळं करायला आयुष्य पडलंय बाळा. आता फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित कर."

आई बाबांचं हे उत्तरही बरोबरच होतं म्हणा.त्यामुळे समरच्या आई बाबांप्रतीच्या अपेक्षा त्याने कधी बोलूनच नाही दाखवल्या.


शेखर राव आणि सुमा - दोघंही उच्च शिक्षित. दोघंही कष्टाळू कुटुंबात लहानाचे मोठे झालेले. शाळेनंतरचं शिक्षण त्यांनी आपलं आपणच पूर्ण केलेलं. त्यामुळे कष्टाचे चटके, फसवी दुनिया सगळ्याचे अनुभव त्यांनी घेतलेले. आपल्याला जो त्रास झाला तो मुलांना होऊ नये एवढीच त्यांची माफक अपेक्षा. त्यांनी उत्तम शिक्षण घ्यावं,मोठं व्हावं, त्यांना चांगली नोकरी मिळावी म्हणजे चांगल्या आर्थिक परिस्थितीत ते स्वावलंबी होतील हाच त्यांचा निव्वळ विचार. आजूबाजूच्या तरूण पिढीला पाहता आपलं मूल चुकीच्या मार्गावर जाऊ नये, त्यांना वाईट संगत लागू नये हीच त्यांची इच्छा! त्यासाठीच ते दोघंही सर्वोतपरी प्रयत्न करत होये. मुलांना धाकात ठेवणे हा त्यांचा उद्देश्य कधीच नव्हता पण मुलं काय करतात हे सगळं आपल्याला माहिती असायला पाहिजे ही त्यांची अपेक्षा होती. समर जसा मोठा होत होता, त्याचा अभ्यास जसा वाढत होता, शेखर आणि सुमाला नव्हतं जमत ऑफिस-घर सांभाळून त्याचा अभ्यास घेणं. त्यामुळे सुमाने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला जेणेकरून ती समरवर जास्त लक्ष ठेवू शकेल. कार्तिकी तशी लहान होती आणि समर त्यांच्या शब्दाबहेर नव्हता. पुढचं पाऊल तसं मागचं पाऊल हा शेखर आणि सुमाचा विश्वास, त्यामुळे कार्तिकीला या बंधनांची झळ नव्हती लागत.


समर दहावी उत्तम मार्कांनी पास झाला. त्यातही सुमाचं गेलेल्या मार्कांवर थोडं फार भाषण होतंच पण तो मेरिटमधे आल्याचं कौतुकही होतं. समरला मुंबईतल्या उत्तम कॉलेजला ऍडमिशन मिळालं. त्याचा येण्या जाण्यात वेळ जाऊ नये यासाठी त्याने हॉस्टेल ला राहावं हा निर्णय सुमा आणि शेखरने परस्पर घेतला. यात समरचं मत नकळत विचारायचं राहूनच गेलं. नेहमीप्रमाणेच समर आई बाबांच्या हो ला हो बोलून गेला. त्याला काय वाटतंय हे त्याने कुणालाही सांगितले नाही आणि त्याच्या अपेक्षा पुन्हा एकदा मनातंच विरल्या.


सुमा, शेखर राव आणि कार्तिकी हॉस्टेल ला पोहोचले. समर, त्याचे मित्र, हॉस्टेलचे प्रिंसिपल सगळे समरच्या आजूबाजूला बसलेले. आई बाबा येताच समरने मान खाली घातली. सुमा आणि शेखर रावांना कळतंच नव्हते आपलं काय चुकलं. सगळंच तर समरला हवंय तसं झालं पण चित्र खरं तर तसं नव्हतं. समरच्या या वागणुकीचं स्पष्टीकरण जेव्हा सुमा आणि शेखर रावांना त्याच्या जवळच्या मित्राकडून मिळालं तेव्हा तर त्यांना आभाळ कोसळल्यागत झालं.


हॉस्टेलला आल्यावर समर त्याला मिळालेल्या मोकळीकीचा पुरेपूर आनंद घेत होता. मित्रांबरोबर मजा, मस्ती, पार्टी सारं काही नित्यनियमाने सुरू होतं. जणू काही त्याला पंखच मिळालेले. पण त्याचबरोबर त्याचा अभ्यासही सुरू होताच.एक अनामिक भीती त्याच्या मनात घर करून होती. साहिल, त्याचा जवळचा मित्र, त्याला त्याने ही भीती बोलून सुद्धा दाखवलेली. त्यावर साहिलने त्याला त्याच्या परीने समजावायचा प्रयत्न केला.


"आत्ता नाही मजा करणार तर केव्हा करणार रे! आणि अभ्यास तर आपण करतोय ना. काही होत नाही, नाही ओरडणार रे तुला काका काकू."


"तुला माहित नाही रे साहिल. मला माहितेय ना आई बाबा ओरडणार. भले प्रेमाने ओरडतील पण ओरडतील. चांगले मार्क मिळाले म्हणून मला ती कौतुकाची थाप कधी मिळणार काय माहित." - समर म्हणाला. दरवेळी एवढं बोलून समर विषय बदलायचा पण त्याच्या मनात ही सल कायम होती.


पहिल्या सेमिस्टरचा रिझल्ट होता आज. एरव्ही नव्वद ब्याण्णव टक्के मिळालेल्या समरची गाडी अठ्ठ्यांऐंशी ला येऊन धडकलेली आणि त्याच्याकडे आई बाबांना द्यायला कोणतंही स्पष्टीकरण नव्हतं म्हणून त्याने हा मार्ग अवलंबला.


आज सुमा आणि शेखर नि:शब्द होते. त्यांना काय बोलावे सुचत नव्हते. समरला त्यांच्याकडून असलेल्या आणि त्यांना समरकडून असलेल्या, दोघांच्याही अपेक्षा रास्त होत्या. कदाचित या सर्वामध्ये हवा असलेला संवाद कुठेतरी हरवलेला. आई बाबा आपल्याला असंच वागायला लावणार हा समरचा समज कुठेतरी दूर व्हायला हवा होता.


वाचकहो,हे स्पर्धेचं युग तर आहेच पण त्याचबरोबर जग ही फसवं आहे. आपलं मूल चुकीच्या मार्गाला जावू नये ही प्रत्येक पालकांची रास्त अपेक्षा आहे. त्यासाठी प्रत्येक पालक आपल्या पाल्याचं कवचकुंडल बनू पाहतो जे खूप स्वाभाविक आहे. पण मग पिल्लांच्या पंखात बळ येण्यासाठी त्यांना कडू गोड सगळेच अनुभव सहन करता आले पाहिजेत ना? हल्ली आपण आत्महत्येच्या बर्‍याच बातम्या वाचतो त्यात बहुतेक वेळा विद्यार्थ्यांच्या बातम्यांमधे कमी गुणाच्या भीतीने केलेल्या आत्महत्येच्या बातम्या ऐकिवात येतात. खरंच मुलांची गुणवत्ता फक्त मार्कांवर अवलंबून असते का? त्यांचा सर्वांगीण विकास महत्वाचा नाही का? विचार करण्यासारखे प्रश्न आहेत. तुमची मतं मला नक्की कळवा.


धन्यवाद !

सदर लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. मी सर्वसामान्य विचार करून हा लेख लिहिलेला आहे. साहित्य शेयर करायचे झाल्यास नावासकट शेयर करा. साहित्यचोरी हा गुन्हा आहे हे ध्यानात असू द्या


Rate this content
Log in

Similar marathi story from Children