Aarti Shirodkar

Inspirational

4.0  

Aarti Shirodkar

Inspirational

माणुसकी

माणुसकी

3 mins
300


"क्षिप्रा, अगं खाऊन झाल्यावर चमचा लगेच धुवून ठेवावा. जेवून झाल्यावर जेवणासाठी वापरलेले पेले लगेच घासून ठेवावे. भांडी जरा कमी काढ. कप विसळून ठेवावे हातासरशी. छोटी छोटी भांडी घासून ठेवत जा गं. किती भांडी घासणार रखमा. येते म्हणून काय वाट्टेल तशी भांडी टाकायची का तिला घासायला. ती पण शेवटी माणूसच अ‍ाहे ना. एखाद्या दिवशी अचानक तिने दांडी मारली ना म्हणजे कळेल."


"आई, मला आहे ना कंटाळा आलाय रोजच्या त्याच त्याच तुझ्या बोलण्याचा. मी हजारदा सांगितलंय मी नाही घासणार भांडी. रखमा मावशी येते आपल्याकडे आणि ती दांड्या पण नाही मारत. इतकी वर्ष झाली ती आपल्याकडे काम करते. कधीतरी तिने कटकट केलीय का? आणि अचानक तर ती दांडी नाहीच मारत मुळी. आणि मुळात ती कटकट तरी का करेल? घरच्यासारखं तर वागवतो आपण तिला. दिवाळीला तू तिला तिच्या पगाराएवढाच बोनस देतेस. दरवर्षी कोणतीही कटकट न करता तिला पगार वाढवून देतेस. शिवाय मधेमधे असेच पण पैसे देतेसच की. आमच्या कॉर्पोरेट मधे आहे ना आई काही नियम असतात. जेवढा आम्हाला पगार मिळतो त्याच्या प्रत्येक तासाचा हिशोब आम्हाला द्यावा लागतो. आमच्या बाबतीतही असा कुणी विचार केला असता तर?." आय. टी. कंपनी मधे उच्च पदावर काम करणारी क्षिप्रा आईला जीवाच्या आकांताने सांगत होती.


सप्रेंच्या घरातील हा वादयुक्त संवाद नेहमीचाच होता. क्षिप्राचा रखमाप्रती असलेला आविर्भाव क्षिप्राच्या आईला म्हणजेच सुनंदाला कधीच पटणारा नव्हता. रखमा सप्रेंच्या घरात क्षिप्रा काही महिन्याची होती तेव्हापासून काम करत असे. सुनंदाच्या अशा प्रेमळ आणि समजूतदार स्वभावामुळेच रखमा एवढ्या वर्षांपासून त्यांच्या घरात तग धरून होती. सुनंदा रखमाला आपल्या लहान बहिणीप्रमाणेच वागवत असे. खूप कष्टाळू होती रखमा. सुनंदाने तिचे हलाखीचे दिवस पाहिले होते. तिने कसे कष्ट करून आपल्या मुलांना वाढवले याची सुनंदाला पूर्ण जाणीव होती आणि याच कारणावरून सुनंदाचे आपल्या मुलीबरोबर खटके उडत असत.


सुनंदा बॅंकेच्या कामासाठी काल रात्रीच दिल्लीला रवाना झालेली. क्षिप्राचे बाबा नेहमीच फिरतीवर असायचे. आज क्षिप्राची पण लेट इव्हनींग मिट होती, त्यानंतर आई घरी नाही म्हणून तिने तिच्या फ्रेंड्सना डिनर साठी इन्वाईट केले होते. रात्री सगळं आटपेपर्यंत तसा उशीरच झाला. क्षिप्राने आणि तिच्या फ्रेंड्सनी भरपूर मजा केली. आईही घरी नाही, काहीच काम करायचे नाही हा विचार करून क्षिप्राने दुसर्‍या दिवशी दांडी मारायचा बेत केला आणि सो कॉल्ड सगळं आवरून ती झोपली. झोपेमधे कुणी डिस्टर्ब करू नये म्हणून तिने मोबाईल पण फ्लाईट मोडवर टाकला.


दुसर्‍या दिवशी सकाळी क्षिप्रा अकराच्या सुमारास उठली. चहा करायच्या निमित्ताने स्वारी किचन कडे वळली. किचन काल रात्री तिने जसे आवरलेले तसेच होते. एरवी रखमा लॅच की ने दार उघडून सकाळी नऊलाच घर आवरून जाते. आज सव्वा अकरा झाले तरी रखमा आलीच नव्हती. क्षिप्राला काही सुचेना. तिने आईला फोन केला. आईलाही काही माहित नव्हते. रखमाचा फोनही लागत नव्हता. आता मात्र क्षिप्रा तिला सगळं आवरावं लागणार हा विचार करूनच रडवेली झाली. तिने लागलीच वॉचमनला इंटरकॉम केला आणि रखमाबद्दल विचारले. तेव्हा वॉचमनने तिला सांगितले की रखमाच्या मुलाला बरं नाही, त्याला काल रात्री हॉस्पिटलमधे भरती केलंय त्यामुळे दोन तीन दिवस ती येणार नाही. क्षिप्राला आईची सगळी बोलणी तत्क्षणी जशीच्या तशी आठवत होती आणि आज तिला तिनेच जमवलेल्या भांड्यांचा ढीग घासून, घरातला पसारा आवरून चांगलीच अद्दल घडणार होती.


सगळं घर आवरण्यातच क्षिप्राचा अर्ध्यापेक्षा जास्त दिवस गेला. त्या दिवशी संध्याकाळी तिला रखमाचा फोन आला. रखमाने क्षिप्राची माफी मागितली. खरं तर रखमा क्षिप्राला फोन करत होती पण क्षिप्राने फोन फ्लाईट मोडवर टाकला होता त्यामुळे रखमाचा तिच्याशी संपर्क नाही झाला. मुलगा हॉस्पिटलमधे असल्याने घाबरलेली बिचारी. इथे क्षिप्राला एका दिवसातच रखमाविषयी आदरयुक्त आपुलकी वाटू लागली. कशी दहा घरची कामं करत असेल याचा विचार करूनच आपण तिच्याबद्दल किती चुकीचा विचार करत होतो याची जाणीव तिला झाली. आई घरी आल्यावर घडलेला प्रसंग तिने आईला सांगितला आणि आईची पण माफी मागितली.


वाचकांनो,असं बर्‍याच घरात होत असेल. आपल्या घरात कुणीतरी कामाला येणार म्हणून कळत नकळत आपल्याकडून जास्त भांडी घासायला पडतात, घरातील पसारा तसाच राहतो. त्यामुळे सर्वांना एकच विनंती, घरातील कामवाल्या मावशींना / ताईंना गृहित धरू नका. तिचाही एक व्यक्ती म्हणून विचार करा. धन्यवाद !!


सदर लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव. साहित्यचोरी हा गुन्हा आहे. कृपया पोस्ट नावासकट शेयर करावी.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational