असे पाहुणे येती आणिक स्मृती देऊनी जाती
असे पाहुणे येती आणिक स्मृती देऊनी जाती
"हॅलो राधा, हां, मी मामा बोलतोय. आहेस का घरी? अगं मी इथे मुंबईला आलेलो एका कामासाठी, म्हंटलं तुम्हाला भेटून जाऊ. बरेच दिवस झाले नातीला भेटून. येतो संध्याकाळी, जेवायलाच येतो हां"
अचानक आलेल्या मामे सासर्यांच्या फोनमुळे राधा बावचळलीच. आज नेमकी एक लेट इव्हीनिंग मिट होती जी टाळणं राधाला कठीण होतं. मुलगी जुई, बारा वर्षाची, फार मोठीही नाही, तिच्याकडून राधा कशी अपेक्षा ठेवणार. सासूबाई पाच सहा महिन्यापूर्वीच निवर्तल्या होत्या. त्यामुळे कुठूनच आयत्या वेळी मदत मिळणारी नव्हती. राधाने राघवला फोन करून लगेच घडलेला प्रकार सांगितला. राघवने तर तिला अपेक्षेबाहेरचे उत्तर दिले,
"सांगायचं ना उशीर होईल म्हणून. असं एकतर एवढ्या दिवसांनी येणार आणि असा गोंधळ घालणार? ते काही नाही मी सांगतो मामाला आज नको येऊ म्हणून."
"राघव! अरे तुझे मोठे मामा आहेत ते. असं कसं तू नाकारणार? आणि आई गेल्यावर पहिल्यांदाच ते येणार आहेत. बरं नाही दिसत असं" राधा म्हणाली.
" मग येऊदे त्यांना, बाहेरून मागवू जेवण" , राघव म्हणाला.
" नाही रे, आई नेहमी म्हणायच्या, मामांना नाही चालत बाहेरचं जेवण. मग माहित असून कसं मागवणार बाहेरचं?" - राधा
" मग तुझं तू ठरव" - असं बोलून राघवने फोन ठेवून दिला.
राधा मात्र द्विधा मन:स्थितीत! आई गेल्यावर मामा एवढं आवर्जून आपल्या घरी येतायत आणि आपण असं वागणं योग्य नाही. तिने लागलीच तिच्या मुलीला, जुईला फोन केला आणि घर आवरून ठेवायला सांगितलं. थोडीफार भाजी आणून ठेवायला सांगितली. लकीली तिची इव्हिनिंग मिट पण कॅन्सल झाली आणि खुशीमधे स्वारी निघाली घराकडे. मनातल्या मनात जेवणाचा छान बेत तिने आखला होता. पण ते म्हणतात ना, नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न तसं काहीसं झालं. लवकर पोहोचावं म्हणून तिने ट्रॅफिक कमी असेल समजून दुसरा मार्ग निवडला तर रस्ता नेमका खोदून ठेवलेला! शेवटी व्हायचा तो उशीर झालाच तिला. घरी पोहोचायला रात्रीचे आठ वाजले राधाला!
घराजवळ पोहोचली, आतून सर्वांच्या गप्पांचा आणि हसण्याचा आवाज येत होता. राधाने जरा अपराध्यासारखंच घरात पाऊल टाकलं, घरात भज्यांचा खमंग दरवळत होता. घर नेहमीपेक्षा जरा जास्तच व्यवस्थित दिसत होतं. राधा घरात येताच मामांनी तिचं एकदम फक्कड स्वागत केलं,
" सूनबाई! तू आणि राघव नव्हते तरी आमचं फार छान स्वागत केलं बरं का जुईने. एवढा फक्कड चहा तर तुला आणि तुझ्या सासूलाही कधी जमला नाही. आणि भजी तर अप्रतिम केलीत तुझ्या लेकीने. आणि तिच्याशी गप्पा मारताना पण खूप मजा येतेय हो! आनंद वाटला घरी येऊन. मला वाटलेलं आता माझी बहिण नाही तर घरात फरक पडला असेल. तिची कमी जरूर आहे पण पाहुणचारात तसूभरही फरक नाही जाणवला. घरात अजूनही तसंच आदरातिथ्य होतंय." बोलताना मामांचा आवाजही जड झाला होता. राधाने आवरून लागलीच किचनचा ताबा घेतला. जुईने तिथेही बर्यापैकी तयारी करून ठेवली होती. भाज्या चिरून ठेवलेल्या, खीर केलेली, कुकर लावलेला. राधाचा विश्वासच बसेना! मुलगी मोठी होतेय आणि आपणच तिला अजून लहान समजत होतो हे तिला जाणवले.
राधाने पटपट स्वयंपाक आटोपला, सर्वांनी एकत्र भोजनाचा कार्यक्रम पार पाडला. आजही मामांनी राघवला आवडतात म्हणून कडक बुंदीचे, राधाला आवडणारे शेवेचे लाडू आणले होते. जुईला आवडणारा खाऊ तर एवढा आणला होता की आता हा सगळा खाऊ ठेवायचा कुठे हा राधासमोर प्रश्न उभा होता.
सकाळ झाली, मामांचा आवडता नाश्ता झाला. मामा निघाले गावाला. एका दिवसाचा पाहुणचार पण त्यांच्या डोळ्यात समाधान दिसत होतं, आनंदी मनाने त्यांनी राधा, राघव आणि जुईचा निरोप घेतला.
मामांचा निरोप घेतल्यानंतर राधाने मोर्चा जुईकडे वळवला. कालपासून अनेक प्रश्न राधाच्या मनात पिंगा घालत होते. राधाला जुईने हे सगळं केलं हे काही पचनी पडत नव्हते. तिने जुईला भरपूर प्रश्नांनी भारावून सोडले. त्यावर जुईने सांगितले, "तुझं आणि बाबाचं बोलणं झाल्यानंतर तुझ्याआधी मला बाबाचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं की मामा आजोबा येणार आहेत, तुला उशीर होणार आहे आणि तुला नेहमीप्रमाणे घरीच जेवण करायचंय. मग मी शेजारच्या काकूंची मदत घेतली आणि भजीची तयारी करून ठेवली आणि बाबाने आल्यावर तळली. भजीची तयारी करताना मला मज्जा वाटली म्हणून मी काकूंना विचारून त्यांच्या मार्गदर्शनाखाली खीर बनवली. बाकी बाबा आल्यावर त्याने आणि मी भाज्या कापल्या मामा आजोबांशी गप्पा मारत. आणि बाकी तर आज्जी आणि तू नेहमी जसं सांगायची तसंच मी केलं. म्हणजे आजोबा आले, त्यांची चौकशी केली, त्यांना पाणी दिलं, चहा बनवून दिला. चहा पण मला आज्जीने शिकवलेला पण मी कधी केला नव्हता, आज केला आणि आजोबांना आवडला." जुई भडाभडा बोलत होती, जसं काही तिने काही वेगळं केलंच नाही आणि राधा तिच्याकडे कौतुकाने पाहात होती. कळत नकळत आपले किती छान संस्कार लेकीवर रूजलेत याचा मनोमन आनंद घेत होती.
वाचकहो, असं बर्याचदा होतं, अचानक पाहुणे येतात आणि आपला गोंधळ उडतो. पण पाहुणे आल्यावर आपण त्यांच्यासाठी काय बनवतो याहीपेक्षा जास्त आपण त्यांचा पाहुणचार कसा करतो हेच जास्त महत्वाचे असते, बरोबर ना? आणि शेवटी आपले हेच संस्कार आपण आपल्या पुढील पिढीकडे सुपूर्त करत असतो. मामा एक दिवसासाठी आले खरे पण जाता जाता राधाला ते एक छान आठवण देऊन गेले ,जुईने त्यांच्या केलेल्या पाहुणचाराच्या रूपात
अतिथी देवो भव: !!
धन्यवाद !!
( वरील लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. लेख शेयर करायचा झाल्यास नावासकट शेयर करावा)
