अंतिम इच्छा
अंतिम इच्छा
यशस्वी एक सुशील आणि संस्कारी मुलगी होती. अभ्यासात ती खूपच हुशार होती. वर्गात ती नेहमी पहिला नंबर आणायची. पण ह्या वर्षी तिची आई आजारी असल्यामुळे तिचे अभ्यासात मन लागलं नाही परिणामी तिचा दुसरा नंबर आला. स्वतः दुसऱ्या नंबर मिळवला आहे ते माहित झाल्यावर यशस्वी ढसाढसा रडू लागली. हे पाहून तिची मैत्रीण विमला म्हणाली, “यशस्वी, प्रथम नंबर मिळवण्यासाठी धडपडकरण चांगली गोष्ट आहे... पण तो मिळाला नाही त्यासाठी येवढ मनावर लावून घेण चांगल नाही. शाळेच परिणाम हे जीवनाचे अंतिम परिणाम नाही. तुझी आई आजारी असल्यामुळे तुझा अभ्यास नीट झाला नाही हे सर्वांना माहित आहे. एवढ दु:खी होऊ नको.”
यशस्वी रडमस स्वरात म्हणाली, “विमला, तुला माझ्या घरची परिस्थिती माहित नाही. आम्ही दोन बहिणी आहोत. माझी मोठी बहिण मनस्वी आणि दुसरी मी... माझ्या जन्मावेळेस सर्वांना आशा होती की ह्या वेळेस मुलगाच होईल. पण माझा जन्म होता त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. खास करून माझी आई कमळा नाराज झाली कारण मनस्वीच्या जन्मानंतर तिला माझ्या आजीआजोबांचे टोमणे ठुसके ऐकायला लागायचे. माझ्या जन्मानंतर तिचे जगणच दुश्वर झाले होते. आजीआजोबांचा सर्वा राग ती माझ्यावर काढायची. मुलगा का नाही झाला ह्या बाबतीच माझ्या आईला खूप दु:ख होत. हे पाहून मी पण मनोमनी नक्की केलं.”
विमलाने विचारलं, “काय?”
यशस्वी स्वतःचे अश्रू पुसत म्हणाली, “मी असं कांहीतरी करून दाखवीन की एकदिवशी माझी आई गर्वाने म्हणेल की बरं झाल देवाने मला मुलगा नाही पण मुलगी दिली. अरे! शंभर मुलांना ही एक मुलगी भारी आहे. बघं एकदिवशी माझी आई हे जरूर बोलेल... आणि त्यासाठीच मी ही सर्व धडपड करत आहे.”
दिवस पसार होत गेले...
आता यशस्वीचे आजीआजोबा ह्या दुनियेत राहिले नव्हते परंतु त्यांचे छळ कमळाताई अजूनही विसरल्या नव्हत्या. कदाचित त्यामुळेच मुलगा नसल्याचा रंज त्यांच्या मनात सदैवसाठी राहून गेला होता. तिची मोठी बहिण मनस्वीचे लग्न झाले होते आणि तिचे वडील मनोहरभाऊ आता रिटायर झाले होते.
एकदिवशी समाचार मिळाले की शेजारच्या मोहनने त्याच्या आईबापाला घराबाहेर काढलं. यशस्वीला वाटल की आज तिची आई म्हणेल की, “बरं झाल देवाने मला मुलगा नाही पण मुलगी दिली.” पण ह्या उलट ती म्हणाली, “मुलांना योग्य संस्कार नाही देण्याचे हे परिणाम.”
यशस्वीचे शिक्षण उत्तमरीतेने पार पडले होते. तिला आता चांगल्या स्थळी नोकरी लागली होती. नोकरीच्या पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी ती आपल्या आईवडीलांच्या पाया पडली. हे पाहून शेजारचे कुलकर्णी म्हणाले, “वाह! कमळाताई, तुमचा तर वट आहे. मुलगी आता चांगल्या ठिकाणी नोकरीला लागली आहे.”
यशस्वीला वाटलं की आता तिची आई म्हणेल की, “बर झालं देवाने मला मुला पेक्षा अशी गुणी मुलगी दिली.” पण कमळाताई काही भलतचं म्हणाल्या, “कसला वट??? मुलगी तर लग्न करून दुसऱ्या घरी जाणार. तिला चांगली नोकरी मिळो का नाही यात आमचा काय फायदा? उलट तिच्या शिक्षणा मागे आमचा पैसा गेला आणि आता लग्नातही हुंडा द्यावा लागेल. आमचं तर नसीबचं फुटक आहे. आज जर हाच मुलगा असता तर...”
*****
कमळाताईंची तबियत दिवसांदिवस बिगडत जात होती. यशस्वीने त्यांना एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये भर्ती केलं. यशस्वी सकाळी नोकरीवर जायची आणि संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये येऊन कमळाताईंची काळजी घ्यायची. एक दिवशी डॉक्टर यशस्वीला म्हणाले, “तुमच्या आईला काहीतरी चिंता आहे. जो पर्यंत तिच्या मनातील ती चिंता दूर होणार नाही तो पर्यंत ती बरी होणार नाही.”
हे ऐकून यशस्वी कमळाताईंला म्हणाली, “आई आता तू काहीही चिंता करू नकोस... मी आहेन... मी सर्व ठीक करीन.”
कमळाताई ह्ताशाने म्हणाल्या, “तू आहेस त्याचीच तर मला चिंता आहे... तुझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नामध्ये आणि तुला शिकवण्यामध्ये आमची सर्व जमापुंजी संपली आहे. तुझे वडील पण आता रिटायर झाले आहेत. मनस्वीच्या सासरवाडीला हुंडा देण्यासाठी आम्ही आपलं घर किशनशेठकडे घाण ठेवलं होतं परंतु आम्ही त्यांची रकम आजपर्यंत फेडू शकलो नाही. आता किशनशेठ म्हणतो की पैशे द्या नहीतर घर खाली करा. आता तूच बोली आम्ही एवढी रकम कुठून आणणार? अजून तुझ लग्न घ्यायचं बाकी आहे. माझी तबियत दिवसांदिवस बिगडत चालली आहे. माझ्यानंतर त्यांचे काय. लग्नानंतर तू तर तुझ्या घरी जाशील... जर मुलगा असता तर आज आम्हाला काही चिंता नव्हती.”
कमळाताईंच्या कपाळावर आलेला घाम पुसत पुसत यशस्वी म्हणाली, “आईबाबा, तुम्ही एवढया चिंतेत होते तर मला का काही सांगितलं नाही?”
जवळ उभे असलेले मोहनभाऊ म्हणाले, “तुला काय सांगायचे. मुलगा असता तर त्याला सांगितले असते. तुला सांगून काय अर्थ? तू तर लग्नानंतर तुझ्या घरी जाशील.”
यशस्वी थोड्या रागाने म्हणाली, “बाबा, एकदा सांगून तर बघायचं. आता आजच्या ह्या जमान्यात मुलगा मुलगी असा काही भेद राहिला नाही. तुम्ही पण कुठल्या जमान्यात वावरत आहात!!!”
मोहनभाऊ म्हणाले, “बेटा, हे सर्व ऐकायला गोड वाटत परंतु वास्तविकता वेगळीच असते. ज्यांच्यावर वितते त्यांनाच ती कळते.”
यशस्वी म्हणाली, “आई, सर्व ठीक होईल कांहीही काळजी करू नकोस.”
कमळाताईने हताशाने आपलं तोंडू फिरवून घेतलं.
कमळाताई ऐकेल अश्यारीतेनी मोहनभाऊकडे पाहून आणि यशस्वी म्हणाली, “बाबा, उद्याच किशनशेठला बोलावून ह्या घराचे कागदपत्र त्यांना द्या. पहिले आपल्या डोक्यावरच कर्ज आपण फेडू.”
मोहनभाऊ म्हणाले, “पण आता ह्या वयात तुला सोबत घेऊन आम्ही कुठे जाणार? काय करणार?”
यशस्वी म्हणाली, “कांहीही काळजी करू नका. बस, तुमच्या ह्या मुलीवर विश्वास ठेवा.” पुढे ती कमळाताई ऐकेल अश्यारीतेनी जरा जोरातच बोलली, “मुलगा नाहीये तर काय झाल? तुमची मुलगी तर आहे.. मी सर्व ठीक करून देईन.”
मोहनभाऊने काहीही उत्तर दिलं नाही.
कमळाताईला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला.
यशस्वीला माहित होते की कमळाताईचा विलाज औषधाने नाही पण तिची चिंता दूर केली तरच होईल. तिला बरी करायची असेलं तर तिच्या मनातील ही शंका दूर करावी लागेल की मुलगा असेल तेंव्हाच आईवडीलांच जीवन सुरक्षित असत. तिने मनोमनी काही नक्की केलं.
वेळ कमी होता.
निर्णय त्वरित घ्यायचे होते.
तिने फोन लाऊन आपल्या मित्रांना बोलवून घेतलं. त्याचं सकाळी आपल्या घरचा सर्व सामान टेम्पोमध्ये भरून ती घरच्या चाव्या किशनशेठच्या हातात ठेवत म्हणाली, “घराचा दस्तावेज तुम्हाला उद्या वकील देतील. आतातर तुमचा हिशोब संपला न?”
किशनशेठ म्हणाले, “हो... बेटा, माझा सर्व हिशोब संपला... तुझा खूप खूप आभार.”
मोहनभाऊ म्हणाले, “पण बेटा, आता आपण कुठे रहायला जाऊ?”
यशस्वी म्हणाली, “बाबा, तुम्ही आई जवळ हॉस्पिटलमध्ये रहा आणि कांहीही काळजी करू नका.”
मोहनभाऊ म्हणाले, “तू हॉस्पिटलमध्ये नाही येणार?”
यशस्वी म्हणाली, “नाही... आईला बरी करायची असेलं तर मला हॉस्पिटलमध्ये नाही पण हॉस्पिटलच्या बाहेर धावपळ करावी लागेल.’
संध्याकाळी जेंव्हा यशस्वी हॉस्पिटलमध्ये आली तेंव्हा कमळाताईच्या जवळ उभे असलेले डॉक्टर, नर्सला तातडीने सूचना देत होते. मनोहरभाऊ ह्ताशाने एकाबाजूला उभे होते. हे सर्व पाहून यशस्वीच्या चहेऱ्यावरचा सर्व आनंद ओसरला.
यशस्वीने विचारल, “काय झालं डॉक्टर?”
डॉक्टर यशस्वीला बाजूला घेऊन जाऊन म्हणाले, “यशस्वी, चिंता ही चिते समान आहे. आम्ही तुझ्या आईला वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न करून पाहिले पण आता तुझी आई बरी होऊ शकणार नाही. तुझ्या आईने अखरे पर्यंत तिचे चिंता सोडली नाही परिणामी ती आता तिचे अंतिम श्वास घेत आहे. तुला तिच्याशी अखेरचं काही बोलायचं किंव्हा विचारायचं असेल तर तू ते करू शकते.”
यशस्वी धावत कमळाताईकडे गेली आणि तिची चिंता दूर करून तिला वाचवण्यासाठीचा अखरेचा प्रयत्नकरत म्हणाली. “आई, आता काळजी करण्याची कांहीही गरज नाही. आपल सर्व कर्ज फेडल्या गेल आहे. पगारातून वाचवलेल्या पैस्यातून मी आपल्या जुन्या घरा पेक्षा नवीन चांगले घर विकत घेतले आहे. म्हातारपणी तू आणि बाबा त्या सुंदर घरात आनंदाने रहा.” कमळाताईला नवीन घराचा फोटो दाखवत यशस्वी पुढे म्हणाली, “मस्त आहे न घर... आई? दुसरं तुम्हाला कोणाला माहित नाही पण मी माझ्या पगारातून बाबांच्या नावाने विम्यात पैसे भरत होती. आता दोन वर्षानंतर त्यांना पेन्शन पण चालू होईल... आणि आई माझ्या लग्नाची काहीही काळजी करू नको येवढ शिकल्यावर आणि चांगल्या पगाराची नोकरी असल्यावर मला कोणालाही हुंडा देण्याची गरज नाही. आई आता आपल्या स्वतःच सुंदर घर आहे, डोक्यावर काही कर्ज नाही. बाबांची पेन्शन चालू होईल. माझ्या लग्नाची पण कांहीही चिंता नाही... आतातर तू खुश आहेस न?”
कमळाताईच्या डोळ्यांत अश्रू होते.
त्यांने इशाऱ्याने यशस्वीला आपल्या जवळ बोलवलं.
कमळाताईच्या डोळ्यात प्रेम दिसत होतं.
तेच प्रेम की ज्यासाठी यशस्वी इतके वर्ष तडफडत होती.
हळूच कमळाताई म्हणाल्या, “बेटा, जवळ ये मला तुला काहीतरी सांगायचे आहे.”
हे एकून यशस्वी खुश झाली.
आज इतके वर्ष ज्या गोष्टीसाठी ती तळमळत होती ती घडणार होती.
आज तिची आई तिला म्हणणार होती की, “बरं झाल देवाने मला मुलगा नाही पण तुझ्या सारखी मुलगी दिली.”
मोहनभाऊंचे डोळे पण ओले झाले होते.
यशस्वी धावून आई जवळ गेली.
कमळाताईने तिला जवळ बसवून तिच्या डोक्यावर लाडाने हात ठेवला आणि मंद स्वरात म्हणाली, “यशस्वी...”
यशस्वी म्हणाली, “बोल गं आई... मी ऐकत आहे...”
कमळाताईच्या डोळ्यात अश्रू आले, “बेटा, आज पहिल्यांदा अस वाटत आहे की...”
यशस्वीचं मन आनंदाने झुमून उठलं पण दुसऱ्याचं क्षणी ती आईचे पुढचे बोल एकून खचून गेली, “काश! तू मुलगी नाही पण आमचा मुलगा बनून जन्मली असती...”
कमळाताईने यशस्वीच्या डोक्यावर ठेवलेला हात ढळून पडला.
यशस्वी ह्ताशाने ढसाढसा रडू लागली एकून तिच्या आईची अंतिम इच्छा.
