sunil sawant

Tragedy

4.6  

sunil sawant

Tragedy

अन्न-ग्रहण (लघुकथा)

अन्न-ग्रहण (लघुकथा)

2 mins
480


रात्रीचे अंदाजे नऊ वाजले असतील. एक खडतर दिवस संपला होता. बारा तास काम करून अंग दुखत होतं. काय होणार आपलं? आयुष्यभर असंच चालणार काय? या विचारांनी स्वत: अजून दु:खी होत होता. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. जेवणासाठी हा एका एकदम साध्याश्याच हॉटेलात शिरला. नित्यनेमच होता ह्याचा. फक्त अजून स्वस्त जेवण कुठे मिळू शकतं तेवढं शोधत रहायचा. आज बर्‍याच दिवसांनी हा जुन्याच हॉटेलात आला होता. चार-सहा गिर्‍हाईकं होती. एका कोपर्‍यातील टेबलावर जाऊन बसला. वेटर पाणी ठेवून, दाल-रोटीची ऑर्डर घेऊन जातो. पाण्याचा भरलेला ग्लास पहातांना गावची कोरडीठाक विहिर आठवली. म्हातार्‍या आईवडलांची आठवण झाली. मोठ्या अाशेने तो या शहरात आला होता. पण. . .जसजशा आठवणी येऊ लागतात तसा हा व्याकुळ होतो. ग्लासातलं पाणी डोळयांत उतरतं.

" इथं बसू का? " समोरच्या प्रश्नाने भानावर येतो. एक टोपीवाला त्याला विचारत असतो. हा नकळत होकारार्थी मान हलवतो. टोपीवाल्याला दिसणार नाही, कळणार नाही अशा पध्दतीने डोळे पुसतो. टोपीवाला बहुतेक कोल्हापुरी किंवा सातारा-सांगलीचा असावा. कदाचित नेहमीचंच येणारं गिर्‍हाईक असावं. वेटर त्याच्यासाठी पाणी आणि रिकामी प्लेट आणतो. टोपीवाला आपली पोटली उघडतो आणि त्या प्लेटमध्ये ज्वारीच्या चार-पाच भाकर्‍या ठेवतो, त्यांवर डब्यातले वांग्यांचे भरीत ठेवतो. दोनतीन भाकर्‍यांच्यामध्ये लसणाची चटणी ठेवलेली सुध्दा दिसते. वेटर ह्याची दाल-रोटी घेऊन टेबलावर मांडतो. रोटीचा तुकडा तोडताना चुकून दोघांची नजरानजर होते. टोपीवाला मिशीभर हसतो आणि म्हणतो, "पावनं, घेणार का? " हा चमकतो. दिग्मुढ होतो. अनपेक्षित आग्रहाने एकदम संकोचतो. "अवो, खाऊन तर बगा, कारबारीन बेस बनवते हे वांग्यांचं भरीत. मी हात लावायच्या आगुदर घ्या काडून." "अं. .अं. ."आता हा स्वत:ला सावरतो. त्याच्याकडे बघत हसून म्हणतो, " अहो, मस्तच असणार ह्यात शंकाच नाही. वासानेच कळंलं होतं. पण. . . नको? तुम्ही करा सुरूवात." टोपीवाला खुशीत येवून भाकरीचा घास घेतो. हाही शांतपणे डाळ-रोटीचा घास तोंडात घालतो. पण आज, का आणि कशामुळे ते कळत नाही पण बर्‍याच दिवसांनी घास फारच रुचकर लागतो. . . . .


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy