अनमोल आईची माया
अनमोल आईची माया


अमोल नुकताच चौथी पास होऊन पाचवीत गेलेला मुलगा. खूप बंड. इकडं धाव, तिकडं धावं. भिंतीवर चढ. उंचावरून उडी मार. सारखा नुसता धांगडधिंगा आणि गोंधळ. प्रत्येक वेळी आईचं रागावणं, कधी कान धरणं तर कधी चांगला धपाटा मारणं सुरूच. हे करू नको, ते करू नको असं सारखं सारखं सांगणं-ओरडणं. अमोलला खूप राग यायचा. वाटायचं आपली आई किती वाईट आहे. सारखी सारखी बंधनं घालते. मनासारखं खेळूही देत नाही. असाच एक दिवस अमोल शाळेतून आला. लगेचच शेजारच्या आकाशनं त्याला खेळायला हाक मारली. तो त्याच्याकडे गेलाही. आपली आई किती वाईट आहे, मनासारखं कशी खेळू देत नाही, हे तो आकाशला सांगत होता. आकाशची आई हे सगळं ऐकत होती. त्याच वेळी एक मांजर आपल्या लहान पिलाची मान आपल्या दातांनी धरून चाललेली तिनं पाहिली. तिनं दोघांनाही हाका मारून बोलावले आणि म्हणाली, ‘पाहिलीत ती मांजर. एवढंसं पिलू. त्याला धड उभंही राहाता येत नाही, पळता येत नाही आणि दातात धरून ती चालली आहे. अशाच प्रकारे ती आपली पिलं एका जागेवरून दुसऱ्या जागी नेणार आहे आणि लपवून ठेवणार आहे. तुम्हाला ती किती दुष्ट, वाईट वाटत असेल नाही का? तिचे टोकदार दात पिलांना लागत-टोचत असतील, जखमा होत असतील. असं तुम्हाला वाटत असेल. पण आपल्या बाळांना असं काही होऊ नये, याची ती पुरेपूर काळजी घेत असते. ती पिलं जोपर्यंत मोठी होत नाहीत, स्वतःचं रक्षण स्वतः करत नाहीत, अन्न मिळवत नाहीत, तोपर्यंत ती त्यांना असंच लपवून ठेवणार
आहे. बंधनात ठेवणार आहे. बाहेर पडूच देणार नाही.’
समोर ती कुत्री आहेत ना, ती पाहा. आपल्या पिलांशी कशी खेळतेय बघा. अरेरे...हे काय? तिनं पिलाला कसा पंजा मारला आणि त्या दुसऱ्या पिलाकडे पाहा, त्याचा गळा आपल्या तोंडात धरून चावतेय ती. तुम्हाला वाटेल काय दुष्ट आहे ती पिलांची आई. पण मुलांनो, तिचं हे सगळं खोटं खोटं चाललेलं असतं बरं का. यातून आपल्या पिलांना मोठेपणी आपल्या रक्षणासाठी, अन्न मिळविण्यासाठी, उपयोगी पडतील, असे डावपेच ती शिकवत असते. मग आता सांगा ती मांजर, कुत्री दुष्ट आहे की आपल्या पिलांवर प्रेम करणारी आई आहे?
‘प्रेम करणारी चांगली आई’, दोघंही एकदमच म्हणाले.
‘मुलांनो, प्राणी असो की माणसं. आपल्या बाळाची त्यांना काळजी असतेच. म्हणून आई कधी ओरडते, दटावते. कधी धपाटाही घालते. म्हणजे ती वाईट थोडीच असते? तुम्हाला कुणाकडूनही अगदी तुमच्या स्वतःकडूनही इजा होऊ नये, म्हणून तर तिची धडपड चाललेली असते. आईला वाईट म्हणून चालेल का?’
‘नाऽऽही,’ दोघंही ओरडले.
‘काय अतुल? मग सांग तुझी आई दुष्ट आहे की चांगली?’
‘काकू, माझं चुकलं. आता मी आईला कधी वाईट म्हणणार नाही आणि त्रासही देणार नाही,’ अमोल म्हणाला.
‘शाब्बास!, कशी शहाणी आहेत माझी बाळं,’ असं म्हणून तिनं दोघांचे लाड केले आणि त्यांना छानसा खाऊही खायला दिला.
अशी ही अनमोल आईची माया.. तिला कोटी कोटी सलाम..