ऐतिहासिक..चाफेकर बंधू..
ऐतिहासिक..चाफेकर बंधू..
जगाच्या इतिहासातील एकमेव उदाहरण .. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणारे एकाच कुटुंबातील तीन सख्खे भाऊ म्हणजे क्रांतीवीर चाफेकर बंधू.. त्यांपैकी दामोदर चापेकर यांचा आज जन्मदिवस..
हरिभाऊ चापेकर या एका कीर्तनकारांच्या घरी दामोदर चाफेकर यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच टिळकांच्या विचारांचा प्रभाव दमोदर यांच्यावर होता. लहानपणापासूनच दामोदर चापेकर यांना व्यायामाची आवड होती. समवयस्क मित्रांना संघटित करून त्यांनी एक व्यायामशाळा सुरू केली. इंग्रजांकडून करण्यात येणार्या अत्याचाराची दामोदरपंतांना मनस्वी चीड होती. दामोदरपंतांचे लहान भाऊ बाळकृष्ण हरि चापेकर व वासुदेव हरि चापेकर दोघेही त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी होत होते.
तिन्ही भावांना चापेकर बंधू नावाने ओळखले जाते. हे तिन्ही भाऊ लोकमान्य टिळक यांच्या संपर्कात होते. टिळकांना ते गुरू मानत असत. त्यांचे वडील हरिपंत हे पुणे व मुंबई येथे हरिकथा सांगायचे. बालवयात तिघेही भाऊ हरि कीर्तनात वडिलांना मदत करायचे. त्यामुळे चापेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला. विठ्ठलभक्ती करणार्या या मराठी कुटुंबाने देशासाठी प्राण अर्पण करणारे 3 तरणीबांड मुलेही दिली.
पुण्यामध्ये १८९७ मध्ये प्लेगची साथ आली. प्लेगपीडित रुग्णांना शोधून उपचार करण्याच्या नावावर इंग्रजांनी पुण्यातील घराघरात शोध मोहीम उघडली आणि अत्याचाराचा कहर केला. यामुळे इंग्रजांविरोधात असंतोष पसरू लागला. तत्कालीन जिल्हाधिकारी वाल्टर चार्ल्स रँड हा अत्यंत क्रूर, खुनशी होता. पुण्याच्या नागरिकांवर अत्याचार करण्यात तो सर्वात पुढे होता. बाळ गंगाधर टिळक आणि आगरकर यांनी या अत्याचाराविरोधात टीका केली. यामुळे त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. दरम्यान, दामोदरपंतांनी रँडची हत्या करण्याची योजना आखली. पुण्यातील गणेशखिंडीत रँड आणि त्याचा सहकारी लेफ्लनंट आयस्टर यांची एका कार्यक्रमाहून परतत असताना गोळ्या झाडून हत्या केली.
गणेश आणि रामचंद्र या द्रविड बंधूंनी केलेल्या गद्दारीमुळे इंग्रजांना हल्लेखोरांची नावे कळाली आणि त्यांनी दमोदरपंतांना अटक केली. त्यानंतर काही दिवसातच बाळकृष्ण व वासुदेव चापेकर, तसेच महादेव रानडे या सर्वांनाच पकडण्यात आले. इंग्रजांनी दामोदरपंतांना पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी दिली. त्यानंतर वासुदेव चापेकरांना तर बाळकृष्ण चापेकरांना आणि महादेव रानड्यांना फाशी देण्यात आली.
येरवडा तुरुंगात असताना त्यांनी आपला जीवन प्रवास आणि क्रांतीकार्याचे तपशील नमूद करणारे १०० पानी आत्मवृत्त मोडीत लिहून काढले. ते वि.गो.खोबरेकर यांनी संपादित करून मराठीत आणले. ते राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई या संस्थेने प्रकाशित केले. मुळात हे आत्मवृत्त म्हणजे खून करण्यास चापेकर का व कसे प्रवृत्त झाले याची हकीकत लिहिण्यास त्यांना सांगण्यात आले व येरवडा जेलमध्ये असताना त्यांनी ते पूर्ण केले. हे आत्मवृत्त एकूण मराठी साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. एक तर एका निधड्या छातीच्या क्रांतिकारकाचे मोकळे ढाकळे आत्मवृत्त आहे. आपण क्रांतिकारक कसे होत गेलो, त्याचे क्रमवार वर्णन चापेकरांनी त्यात केले आहे.
