Pranjali Lele

Inspirational

3  

Pranjali Lele

Inspirational

आयुष्याचे नवे वळण

आयुष्याचे नवे वळण

5 mins
268


सायलीचे शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या एक चांगले स्थळ येताच तिच्या आईवडिलांनी तिचे मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले..मुलगा चांगला शिकला सावरलेला शिवाय मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता.. तेव्हा जास्त विचार न करता त्यांनी हाती आलेले स्थळ जाऊ दिले नाही. लग्न होताच आठ दिवस सासरी राहून सायली आणि समीर त्याच्या नोकरीच्या गावी गेले आणि दोघांच्या नवीन संसाराला सुरुवात झाली.


लग्नानंतरचे नवे नवलाईचे दिवस सायली चे खूप मजेत जात होते. स्वैपाकाची विशेष सवय नसलेली सायली हल्ली नवनवीन डिशेस यू ट्यूब वर बघत शिकून समीर साठी बनवायला लागली..तो ही आपल्या बायकोचा उत्साह बघून त्यात थोडे कमी जास्त झाले तरी तिचे भरभरुन कौतुक करत असे..


काही ना काही सणानिमित्त तिचे माहेरी पण अधूनमधून जाणे होई तेव्हा आईला पण ती आपल्या नव्या पदार्था च्या प्रयोगाचे यथेच्छ वर्णन करी..नवऱ्याला खुश ठेवणं जमतंय तर आपल्या सायलीला हे बघून आईला पण बरे वाटे..आई वडील चांगला जावई मिळाला म्हणून निश्चिंत होते. सगळा अगदी आनंदी आनंद होता..


सायली आणि समीर बहुतेक वीकेंडला त्याच्या आईबाबांकडे जात असत. तेव्हा मात्र सायलीला सगळ्यांचा व्यवस्थित स्वैपाक करावा लागे आणि त्यात तिची खूप तारांबळ उडत असे..त्यातल्या त्यात सासू बाईंना थोडेही कमी जास्त खपत नसे..त्यामुळे तिच्या स्वैपाक का वर त्या बऱ्याचदा टीका करत..अग डाळ जरा आधी भिजवावी म्हणजे छान एकजीव शिजते..आईने शिकवले नाही वाटत या लहान सहान गोष्टी..फारच मीठ पडत भाजीत तुझ्या हातून..अश्या प्रकारची वाक्ये त्या सहज बोलून जात..आणि सायलीला मात्र मनातल्या मनात खूप वाईट वाटत राही.


इकडे घरी आल्यावर हळूहळू समीरदेखील हल्ली त्याच्या आईसारखाच तिच्या स्वयंपाकाला नावे ठेवू लागला होता... माझ्या आईकडून शिकून घे जरा.. काही महिन्यांपूर्वी आपल्या हातचे काहीही केलेलं गोड मानून अगदी प्रेमाने खाणारा नवरा किती बदलला याचे तिला वाईट वाटत पण मुळातच शांत, सुस्वभावी सायली उलट तोंडाने कुणालाही उत्तर देत नसे. पण या अश्या बोलण्याचा तिला फार त्रास होई.


कधी सासू सासरे इकडे राहायला आले की तिला फार भिती वाटे. तिच्या प्रत्येक कामात सासू खोट काढी..आमच्या समीरला खाण्याची एवढी हौस पण काय करणार बिचाऱ्या चे खाण्याचे नुसते हाल होताहेत इथे...सायली ला ऐकू जाईल असे उपरोधिक पणे सासऱ्याना सांगे..सासरे शांत स्वभावाचे असल्याने त्यांना पटो न पटो तरी सासू म्हणेल ते निमूटपणे ऐकत असे आणि गप्प बसत. सायलीचे डोळे रडून लाल होई पण नवऱ्याजवळ बोलण्याचीदेखील सोय नव्हती कारण तो आईच्या शब्दाबाहेर नव्हता.


एव्हाना लग्नाला वर्ष झाले तरी हीची कुस उजवली नाही म्हणून तिला वरचे वर टोमणे ऐकायला लागत होते..समीर चे वागणे तरी फारच विचित्र झाले होते..ऑफिस हून खूप उशिरा तो घरी येत असे आणि हिने जेवायला वाढले की बाहेरूनच जेवून आलो असे सांगून झोपायला निघून जाई..दोघांमध्ये कसेल संभाषण नाही की काही नाही.


हल्ली घरी दारू घेण्याचे पण व्यसन त्याला लागले होते.. कधी कधी एखादा पेग तो घेत असलेला तिला माहित होते पण आता आता त्याचे ड्रिंक्स घेण्याचे प्रमाण फार वाढले होते. ही काही बोलायला गेली की सायलिवर तो चिडे.. तूच याला कारणीभूत आहेस असा तो तिच्यावर उलट दोषा रोपण करी..हे सगळे आता सायलीच्या सहनशील ते पलीकडचे होते. तरी ती मुग गिळून गप्प बसत होती.


आपल्या आईबाबांना उगाच कसला त्रास नको या विचारानं ती सगळ निमूटपणे. सहन करत होती. बाळ झाल्यावर सगळं ठीक होईल हा विश्वास तिच्या मनात होता. मनातल्या मनात ती देवाला प्रार्थना करी की लवकर एक बाळ आमच्या घरी येऊ दे आणि सगळं ठीक होऊ दे. तिच्या शेजारीच राहणारी तिची मैत्रीण सविता आणि ती एकत्र बाजारात खरेदीला जात. एकमेकींची सुखदुःखे शेअर करत. सायलीला सविताचा खूप आधार वाटे.


सविताला मात्र सायलीची ही दशा पाहून खूप वाईट वाटत असे. ती तिला म्हणे, "माझी सासू जरी समजूतदार नसली तरी नवरा मला समजून घेतो म्हणून तर निभावते नाही तर एक क्षण ही मी या घरी राहू शकले नसते. "अगं किती सहन करतेस तू..भलेही तो हात उगा रत नसेल पण किती भावनिक छळ चालवला आहे त्याने तुझा..त्याला काय हक्क आहे तुझ्याशी असे वागायचा...त्याला स्पष्टपणे सांग हे दारूचे व्यसन घरी चालणार नाही..हल्ली ती रात्री पण बराच उशीर येताना दिसतो.तुमच्यात सर्व ठीक आहे ना..तशी रडवेली होऊन तिला म्हणाली, हल्ली आमच्यात कसलच बोलणं नाही की काही नाही..दोन अनोळखी व्यक्तीसारखे दोन वेगळ्या रूम मध्ये आम्ही राहतो..त्याला मी अगदी नकोशी झालिये हे सांगत सांगता तिचा अश्रूंचा बांध फुटला आणि सविताने अलगद तिला मायेने थोपटले आणि मनाशी काहीतरी निश्चय करून ती घरी गेली.


दुसऱ्या दिवशी सायलीच्या आईला फोन करून तिने सविस्तर सर्व सांगितले आणि सायलीला भेटायला या कारण ती तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून काहीही सांगत नाहीये पण तिची परिस्थिती मला बघवत नाही..पार ढासळली आहे ती..सविताचे बोलणे ऐकून लगेच तिचे आईबाबा दुसऱ्याच दिवशी तिच्या गावी पोचले..आई बाबांना असे अचानक आलेले बघून तिला खूप आनंद झाला..समीर तेव्हा घरी नव्हता..आईने ही संधी साधून तिला बोलत केलं..आम्हाला सविताने सगळं सांगितलय तू उद्याच आमच्या बरोबर घरी चलते आहेस असे बाबा तिला स्पष्ट म्हणाले.


रात्री उशिरा समीर नेहमीप्रमाणे दारुच्या नशेत घरी आला. घरी येताच त्याने तिला उपरोधिक बोलणे सुरू केले तेवढ्यात तिचे बाबा समोर आले..त्यांना बघून तो अजुनच चिडला आणि त्याचंही त्याने अपमान केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच सायलीला घेऊन ते निघाले. घरी आल्यावर सायली आईजवळ मनमोकळ रडली..आईला पण आपल्या लेकीचे हाल बघून खूप वाईट वाटले. त्यांना वाटल आपण घाईच केली हिच्या लग्नाची..मुलाची नोकरी शिक्षण बघितलं पण घरच्यांचा स्वभाव मात्र आपल्याला कळला नाही..पण आता अजून आपल्या मुलीला त्रास सहन करू द्यायचा नाही याची खूणगाठ बांधली.


इकडे आठ दिवस झाले येऊन आणि समीरचा ना फोन ना कसले बोलणे..उलट ती आपणहून घर सोडून गेली आहे तर तिनेच सासरच्यां ची माफी मागावी आणि मग घरी यावे असा सासर हून पत्र आलं. ते बघून सायली चे बाबा संतापले आणि त्यांनी लिहिले की, " तुमच्या मुलाने तिची माफी मागावी त्याच्या गैर वर्तन बद्दल आणि तरीही तिने परत यायचे की नाही हे तिचं ठरवणार.

आमची मुलगी तिचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे."


सायलीला त्या नरकयातना भोगायला परत जायचे नव्हते. तिने समीरला घटस्फोट द्यायचा निर्णय घेतला. आईबाबा तिच्या निर्णयाशी ठाम राहिले..आणि त्यांनी तसे तिच्या सासरी कळविले. पण पोटगी द्यावी लागणार म्हणून ते घटस्फोट द्यायला तयार होत नव्हते. त्यांचा हा मनसुबा ओळखून शेवटी त्यांनी मुलाकडून काहीही ना घेता पुढची सगळी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली कारण त्यांना सायलीला या त्रासातून लवकर मोकळे करायचे होते.


इकडे सायलीला काही महिने लागले त्या धक्क्यातून सावरायला..पण हळूहळू तिने हा बदल स्वीकारला आणि बीएडला एडमिशन घेऊन कोर्स पूर्ण केला आणि शाळेत टीचर म्हणून नोकरीला लागली. आई बाबांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि सविताच्या प्रोत्साहनामुळे ती त्या सर्व भयानक परिस्थिती तून बाहेर पडू शकली. आणि स्वतः च्या पायावर उभी राहिली..आज एक आवडती शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांमध्ये तिची ओळख होती. आणि पुढे मग तिच्याच शाळेत नोकरीला असलेल्या एका होतकरू, प्रामाणिक शिक्षकाशी ती प्रेमबंधनात आणि पुढे विवाहबंधनात अडकली.. या बदलाने तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आणि तिने आयुष्याच्या एका नव्या वळणावर पाऊल टाकले.


लग्नानंतर असा अनुभव काही मुलींच्या वाट्याला येतो...तेव्हा ते मूकपणे सहन करत कुढत आयुष्य जगायचे की आलेल्या परिस्थितीशी दोन हात करून आपल्या आयुष्यात चांगला बदल घडवयाचा हे ज्याच्या त्याच्या हातात असते. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला की आयुष्य जगणे सुकर होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational