Preeti Sawant

Tragedy Inspirational Others

2  

Preeti Sawant

Tragedy Inspirational Others

आठवणीतला सदू

आठवणीतला सदू

2 mins
69


"सदू जा बाजारून कांदे घेऊन ये आणि हो, ते पैसे बघ टेबलावर ठेवले आहेत. कांदे आणल्यावर उरलेले पैसे परत तिथेच ठेव." सुमा स्वयंपाक घरात काम करता करता म्हणाली.

"सदू मला अर्धा लिटर दूध आणि एक नारळ आण. हे घे पैसे. उरलेले १-२ रुपये तुलाच ठेव." राऊत काकू गॅलरीत येत म्हणाल्या.

"सदू इस्त्रीवाल्याकडून माझ्या साड्या घेऊन ये. त्याचे पैसे मी नंतर दुकानात येऊन देईन असे सांग त्याला." मोरे वहिनी म्हणाल्या.

सकाळ झाली की, असे कैक आवाज यायचे चाळीतल्या खोल्यांतून. सगळ्यांच्या तोंडी एकच नाव सदू.

आता हा सदू कोण कुठला कुठून आला कोणालाही माहीत नाही.

मोरे वहिनींचे सासरे म्हणायचे. जेव्हा आम्ही बिऱ्हाड घेऊन ह्या चाळीत आलो त्यानंतर २-३ वर्षात सदू ह्या चाळीत आला. अगदी जेमतेम ७-८ वर्षांचा होता तेव्हा तो. तेव्हापासून तो चाळीतच वाढला. चाळीतल्या लोकांची मिळेल ती कामे तो करायचा. कोणी पैसे द्यायचे तर कोणी जेवण वाढायचे.

झोपायला चाळीतला जिना होताच. तिथेच काय ते त्याचे बस्तान.त्याच्याजवळ स्वतःच सामान असं काय होतं हो, एक अंथरायला फाटकी गोधडी आणि एक पातळ जुनाट चादर. कोणी सणासुदिला नाहीतर क्रियाक्रमाला दिलेले कपडे. तेही जेमतेम ४ जोड.

हा पण एक मात्र खरं होतं की, हा सदू चाळीतल्या प्रत्येक घराच्या सुख-दुःखाचा हा एकमेव साक्षीदार होता.

तो हनुमंताचा अस्सीम भक्त. पारा जवळच्या हनुमंताच्या मंदिरात तो न चुकता जात असे. दर शनिवारी शेंदूर, हार, तेल ही मूर्तीला वाहत असे आणि त्या मंदिरात सेवा ही करीत असे. त्यामुळे दर शनिवारी नैवेद्याची थाळी हनुमंताला अर्पण केल्यावर सदूला दिली जायची.

सदू खूप प्रामाणिक आणि विश्वासू होता. त्यामुळे चाळीतून कोणी सुट्ट्यांमध्ये गावी गेलं. तर ते येईपर्यंत सदूचा मुक्काम त्या खोलीत असे.

मी आणि माझा भाऊ आम्हा दोघांनाही आई सदूच्या जीवावर टाकून कामाला जाई.

सदू म्हणजे आमच्या मुलांत अगदी आवडता. तो नव-नवीन खेळ आम्हाला शिकवत असे. तो शिकलेला नसल्यामुळे त्याला लिहिता वाचता येत नव्हते पण तो तोंडी हिशेब चोख करत असे.कधी क्रिकेटमध्ये आमचा गट जिंकला तर सदू आम्हा सर्व मुलांना त्याच्याजवळ असण्याऱ्या पैशातून चॉकलेट वाटत असे.

सदू सगळ्यांची कामे बिनतक्रार करीत असे. पण दोन वर्षांपूर्वी शहरात जी कोरोनाची साथ आली. त्या साथीच्या भीतीने बरीच बिऱ्हाडे त्यांच्या त्यांच्या गावी निघून गेली. त्यात आमचे कुटुंब ही होते. जवळजवळ अर्धी चाळ रिकामी झाली.

पण सदू मात्र इथेच राहिला. कारण तो त्या साथीला बळी पडला होता.

त्यानंतर काही महिन्यांनी आम्हीं परत चाळीत आलो.तेव्हा जिन्याजवळ सदू नव्हता.

तेव्हा मंदिरातल्या पुजारी काकांकडून कळले की, शेवटी शेवटी त्याची बिकट अवस्था झाली होती आणि त्यातच तो मरण पावला.

मग म्युनिसीपालटीची व्हॅन त्याचे मृत शरीर घेऊन गेली.

अजूनही सकाळ झाली की, सदूची आठवण येते.

कधी न विसरता येणारा सदू हा सगळ्यांच्या हृदयात एक वेगळे घर करून गेला.

~समाप्त~


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy