आठवणीतला. पाऊस
आठवणीतला. पाऊस




आज मन खूप उदास होतं. आयुष्यात स्वतःला काय हवं हे कधी बघितलेच नाही. आयुष्य हे एखाद्या पत्त्याप्रमाणे निसटून जावं तसं निसटत चाललंय. समोरच्याला आपण समजण्यात खूप मोठी चूक करतो.
माझ्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग आले . त्या प्रसंगाने माझ्या मनावर खूप मोठा आघात केला. असा विचार करत सहज मी खिडकीबाहेर बघत होती. बाहेर एक धुंद प्रसन्नता होती. रिमझिम पाऊस पडत होता. अधून मधून बाहेर पडणाऱ्या पावसाचे थेंब, गारवा घेऊन आलेला वारा गालावरुन मोरपीस फिरवाव तसा स्पर्श करत होता. डोक्यावरील पावसाळी आभाळाचा तुकडा माझ्या मनाच्या गाभाऱ्यात साठत होतं. गालावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांनी माझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या आसवांना मोकळी वाट करून देत होता. तो जणू सांगत होता की मनसोक्त रडून घे. मनात दाटलेल्या गडद आभाळ रुपी भिजलेल्या विचारांना मोकळी वाट करून दे. किती दिवस अन् कितीतरी वर्ष मनाच्या विस्तीर्ण आकाशात साठवून ठेवलेल्या हिशोब जणू काही हा पाऊस विचारत आहे असं वाटतं होतं.
आजच्या स्वतःभोवतीच्या ह्या चार भिंतीच्या चौकटीतला हा पाऊस मावत नाही. आठवणींचा हा पाऊस मनात दाटत जातो. आठवणींच्या ओथंबलेल्या झाडाखाली हा पाऊस जणूकाही विसावा घेत आहे असं मनात वाटतं. ह्या भिजलेल्या सहवासाच्या नात्यात माणूस ह्या पावसाप्रमाणे मुक्तपणे का नाही बरसत. का आपल्या मताचे बंधन लादण्याचा प्रयत्न करतो. जगण्यातला सहजपणा मात्र ह्या पावसात हरावल्यासारख वाटतं. शहराच्या मध्यामवर्गिय चार भिंतीच्या चौकटीत आकाशातून डोक्यावर पडणाऱ्या ह्या पावसाला मनाच्या कोंदट मनात जपणं कठीण झालं आहे. माणूस शिकून शहाणा बनतो पण ते ज्ञान तेवढ्या पुरत मर्यादित राहत. जीवनात एखाद्या पत्त्या प्रमाणे ते निसटत जातं, हरवत जात. माझ्या आनंदाचा झरा व्यावहारिक शहाणपणाच्या सानिध्यात कुठेतरी हरवत चालला आहे.
बाहेर पडणाऱ्या पावसाला मनात चाललेल्या विचारांचा जणू काही गंध आला असावा म्हणून तो माझ्या गालावर पडून जणू काही मला दिलासा देत होता आणि सांगत होता की ह्या मनात चाललेले भावनेचे तुझे विचार मला तू देऊन टाक आणि ते मुक्तपणे ओघळू दे. पुरून टाक ह्या कोंदटपणी जगणाऱ्या माणसाचे लांच्छन जे तुला घायाळ करीत आहे. ओघळू दे अश्रू आज तुझे मन मोकळे कर. पुन्हा नविन आयुष्य जगायला हेच जणू तो पाऊस मला सांगत होता. मनावर झालेला आघात कितीही विसरायचं तरी तो विसरता येत नव्हता.
खिडकीत बाहेर बरसणाऱ्या पावसाला जणूकाही मी प्रश्न विचारात आहे तो थोडा बरसतो पण सगळं कसं स्वच्छ हिरवगार करून जातो. त्याचप्रमाणे माणसाच्या मनाची स्थिती होतो पण ती स्थिती कायम राहते ते पावसाप्रमाणे मन स्वच्छ करत नाही काही काही आठवणी या मनावर कायम कोरल्या जातात असो. पावसाप्रमाणे मनाच्या हिंदोळ्यावर नाचलेल्या या पावसाला काय बरे कळणार दिवसभर तापलेल्या या सूर्याला हा पाऊस जणूकाही निरोप देत असतो जणू काय तो माणसांना बाय-बाय करतो. परंतु आयुष्याच्या घाई गर्दीत माणसाला बघायला वेळ नसतो पण मला या ऊनपावसाच्या खेळात कोणाची तरी आठवण येते. ती आठवण मला लहानपणीच्या हिंदोळ्यावर नेऊन सोडते. लहानपणी पावसाची चाहूल लागताच हातातील काम बाजूला सारून बाहेर अंगणात मनमुराद नाचायचं. पावसाचे फिल्म अंगावर घेत तो आनंद मनमुराद घ्यायचा. मातीचा सुगंध घेत घरकुल पावसात नाचायचं आणि मनसोक्त भेटल्यावर आईचा ओरडा खात मस्त मस्त कांदा भजी आल्याचा मस्त गरम गरम चहा घेत हा आनंद मनात जपून ठेवायचा खरच किती मस्त दिवस होते ते.
श्रावणातल्या अनेक सणात स्त्रिया मस्तपैकी हिरव्या साड्या नेसून फर धरूनझडाखली खेळताना दिसायच्या. आता हे काही खेळ फक्त टीव्हीवर बघायला मिळतात आणि हळूच लहानपणीचे ते श्रावणातले गाणं ओठावर येतं...
"श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे"
लहानपणी बागडत असताना डोळ्यासमोर झालेल्या वडिलांचा अपघात माझ्या मनावर कायम कोरला गेला. ते पावसाळ्याचे दिवस होते. वडिलांजवळ खाऊचा हट्ट धरला. खाऊ आणायला म्हणून बाबा बाहेर गेले आणि येत असतात माझ्या डोळ्यादेखत त्यांच्या अंगावर गाडी गेली. ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हा प्रसंग माझ्या मनावर कायम कोरला गेला.
जोरात आवाज आला आणि पहाटे तर काय वीज कडाडत होती आणि मी भूतकाळातून वर्तमानात जगू झाले. तो पाऊस मी कधीच विसरणार नाही. तो कायमचा माझ्या मनावर कोरला गेला.