*आठवणीतील श्रावण*
*आठवणीतील श्रावण*
श्रावण महिना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर निरनिराळे सण दिसू लागतात सगळीकडे नवचैतन्य हिरवळ ओसंडून वाहत असतं.
माझ्या आठवणीतला श्रावण म्हणजे लहानपणी शाळेत असताना श्रावणी सोमवारी लवकर सुट्टी होणार याचा अतिशय आनंद असायचा. दुपारी चार वाजता घरी आलो की आईच्या स्वयंपाकाचा घमघमाट अगदी फाटकापासून सुरू व्हायचा. फाटकासमोरच सुंदर रांगोळी आमचे स्वागत करायची मग काय भूक चांगलीच खवळायची. त्यावेळी अख्ख्या घराला श्रावणी सोमवार असायचा. घरी आल्यावर पाट पाणी घ्यायचं आणि आईच्या हातचं गरम गरम जेवायला मिळायचं. आजही ती आमटीची चव जिभेवर रेंगाळते आहे. उपास सोडायचा म्हणून चारोळी वेलची घातलेला सुधारस नाहीतर मुरांबा किंवा गुळांबा असायचा त्याकाळी ते सुद्धा मोठ्ठे पक्वान्न वाटायचं. सकाळी आईची शिवामुठ वाहून झाल्यावर शंकराच्या मंदिरातील गोड प्रसाद पण शाळेतून आल्या आल्याच हातावर मिळायचा त्यामुळे आम्ही सर्व भावंडे जाम खुश तशा श्रावणात आईच्या मंदिरात चकरा जरा जास्तच व्हायच्या त्यामुळे रोज रोज प्रसाद मिळे.
श्रावण आला की जिवतीचा कागद देवघरात स्थानापन्न होत असे तो कागद पुठ्याला चिकटवून छान वर्षभर टिकत असे तसा तो बारा महिने देवघरात ठेवायचा नसतो म्हणून श्रावण संपला की परत कपाटात व्यवस्थित जपून ठेवला जात असे. शुक्रवारी जिवतीची सवाष्ण जेवायला येणार त्या दिवशी तर काय आमचा आनंद ओसंडून वाहत असे अगदी आईला मदतीला पण सारे तत्पर असायचे कारण त्या दिवशी पुरणपोळी खायला मिळणार म्हणून केवढे अप्रूप असायचे. गोड पोळी गरम गरम पानात पडली की जायफळ केशराच्या सुगंधाने मन भरून जायचे. कधी एकदा सवाष्ण काकू जेवायला सुरुवात करतात असे व्हायचे कारण त्यांनी पहिला घास घेतल्याशिवाय कुणालाच जेवायला सुरुवात करता येत नसे त्या पानावर बसल्यावर मुलांचे औक्षण त्यांची पूजा ओटी सगळे होईपर्यंत वाट बघावी लागे. पानाभोवतीच्या रांगोळ्या निरखत उदबत्तीचा सुगंध घेत एकमेकांकडे पाहत आम्ही ताटकळत असू पण खरच किती प्रसन्न वाटायचे तेव्हा सवाष्ण काकू पण अगदी समाधानाने परतायच्या.
नागपंचमी आली की आम्ही सर्वजण नागोबा घरी येणार म्हणून खूप उत्सुक पण असायचो आणि थोडे घाबरलेले पण. मागच्या गल्लीत त्याच्या डमरूचा आवाज आला की आता तो येणार म्हणून अत्यानंद व्हायचा. गोल वेताच्या बंद टोपलीत डमरू वाजवत तो यायचा पूजेचे ताट तयारच असायचे दूध लाह्या औक्षवणाची तयारी आणि शेवटी पैसे दक्षिणा म्हणून. आल्यावर हळूच टोपलीचे झाकण उघडले की डमरू चा आवाज येताच मस्त फणा काढून दाखवायचा नाग. इकडच्या तिकडच्या काही गमती पण नागवाला सांगायचा पूजा आटोपली की त्याच्या मागोमाग आम्हीही शेजारच्या घरी जायचो त्या वयात फार गंमत वाटे या सगळ्याची. किती श्रद्धेने सर्वजणी नागोबाची पूजा करीत असत अजूनही आठवणीत काही चेहरे आहेत.
आमच्या गल्लीतल्या नवीन लग्न झालेल्या मुलीची किंवा कोणाच्या घरची नवीन सुनेची मंगळागौर असेल तर मग काय नुसती धमाल. मला माझीच मंगळागौर आठवते. आठ दहा मुली पूजेला हमखास मिळायच्या. सगळ्यांचे स्वतंत्र बंगले व बगीच्या असायचा, त्यामुळे आदल्या दिवशी पूजेची पत्री, फुले तोडून हार वगैरे तयार करत असू. बाकी पूजेची तयारी सर्वांच्या सहकार्याने अगदी व्यवस्थित होत असे. दुसऱ्या दिवशी सर्व सख्या छान नटून थटून वेळेवर पोहोचल्या की गुरुजी पूजा सांगायला सुरुवात करायचे भल्या मोठ्या चौरंगा भोवती आम्ही साऱ्या जणी बसायचो पूजेच्या वेळी काही लागले तर चिल्लर पार्टी जवळच बसलेली असायची आत स्वयंपाक घरात सर्व काकूमंडळी पूरणावरणाच्या स्वयंपाकात व्यस्त असायच्या. पूजा करता करता खमंग वास येत असे. पूजा व जेवण मिळेपर्यंत उपास असायचा. पूजा आरती झाल्यावर सुंदर रांगोळ्या रेखून पाने मांडली जात असत. मंगळागौरीची पूजा नवऱ्याच्या दीर्घायुष्य च्या प्रार्थनेसाठी करतात आणि या पूजेची नवी नवरी आवर्जून वाट पाहायची. मंगळागौरीच्या सर्व मुलींचा पहिल्या पंक्तीत मान असायचा पानावर बसल्यावर सर्व काकू मंडळी उखाणा घ्यायला लावायच्या सर्वजणी थोड्याशा लाजत बुजतच नवऱ्याचे नाव घेत असत आणि एकदा का जेवायला सुरुवात केली की जेवण संपेपर्यंत "अजिबात बोलायचे नाही बरं का" अशी सक्त ताकीद दिली जात असे मग काय मौनातच जेवण. फक्त एकमेकींकडे पाहून हसायचे. सर्व काकू मंडळींना केवढा हुरूप, उत्साह, आनंद. खरंच काही औरच गंमत होती. संध्याकाळची आरती झाल्यावर रात्री जागरणाला सर्व हजर असायच्या कारण छान छान खेळ खेळायला व बघायला मिळत असत. मला आठवतं माझ्या मंगळागौरीचे काही खेळ आम्ही गल्लीतल्या रस्त्यावर खेळलो होतो मोठा फेर धरून झिम्मा, खुर्ची का मिरची, लाटणे, किकीचं पान, पिंगा, गोफ. गाठोडं वगैरे तर काकू मंडळी आम्हाला असं मस्त करून दाखवायच्या (सफाईने) एवढा दिवसभराचा स्वयंपाक पाणी आवरून सगळे करून परत रात्री केवढा उत्साह असायचा आणि शरीराची एवढी हालचाल की बघतच राहावं खरंच प्रत्यक्षातला अनुभव काही वेगळाच. महिलांच्या सुप्त कला गुणांचं दर्शन व्हायचं. अशी दणक्यात मंगळावर साजरी व्हायची.
तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशीच स्थिती असते बहिण भावांची. आंबट गोड नातं असतं बहिण भावाचं. बहिण भाऊ आपल्या आयुष्यातील पहिले मित्र मैत्रिणी असतात. राखी पौर्णिमेचा सण तसा म्हटलं तर छोटासाच पण आईची गडबड म्हणजे नारळ खवणे तेही विळीवर. केशर वेलची घातलेला नारळी भाताचा सुगंध दरवळायचा. मग त्याला साजेसा बाकीचा स्वयंपाक असायचा. आम्ही बहिणी आंघोळ झाली की नवीन कपडे घालून मिरवत असू. भावाची आंघोळ झाली की तोही नवीन कपडे टोपी घालून तयार होऊन पाटावर बसत असे. त्याला औक्षण करून आम्ही तिघी बहिणी राखी बांधल्यावर आपल्याला किती पैसे मिळाले याचा हिशोब करून काय आणायचे ठरवत असू. त्याकाळी दहा रुपये सुद्धा खूप जास्त वाटायचे. मुख्य म्हणजे त्यादिवशी लुटूपुटूचे सुद्धा भांडण होत नसे. आई आशीर्वाद देत म्हणायची "असाच तुमचा सर्वांचा स्नेहबंध कायम राहो."
मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यावर जन्माष्टमीला आम्ही तिच्या घरी जात असू. त्यांच्याकडे कृष्ण जन्माचा सोहळा खूप सुंदर रीतीने साजरा करीत असत. सगळे मिळून पाळणा छान सजवायचे रात्री बारा वाजता जन्म मग गोपालकाला वगैरे खाऊनच आम्ही सगळे परत यायचो. त्या दिवशीच्या गोपालकाल्याची चवच काही न्यारी असायची.
तसा श्रावण संपता संपता शेवटचा सण म्हणजे पोळा. पूर्वी घरोघरी संध्याकाळी बैल येत असत. आमच्याकडे पण आमचा दूधवाला दादा बैल जोडी छान रंगवून सजवून आणायचा. आई त्यांना औक्षण करून त्यांच्या पायावर पाणी घालून पूजा करायची कारण हा त्यांचा हक्काचा आरामाचा दिवस. त्यांना बाजरी गुळ देऊन दादाला पण दक्षिणा देत असे बैल जोडी अगदी वाजत गाजत दारी आली की खूप प्रसन्न वाटायचे.
तर असा हा श्रावण महिना भरपूर सणवार व्रतवैकल्यांचा. आपले आणि निसर्गाचे नाते सांगणारा. प्रत्येकाकडे देवत्वाच्या दृष्टीने बघण्याचा आणि भाद्रपदातल्या गणपतीच्या आगमनाची चाहूल देणारा. आणि कायम हवा हवासा वाटणारा.
