STORYMIRROR

Anagha Kulkarni

Classics

3  

Anagha Kulkarni

Classics

जागर आदिशक्तीचा

जागर आदिशक्तीचा

6 mins
170


" अगं शुभ्रा आपली नवरात्राची सगळी तयारी झाली ना आता, अगदी परवावर येऊन ठेपले हो " शुभ्राच्या सासूबाईंनी विचारले. 

" हो आई, आज आमची गरब्याची प्रॅक्टिस संपणार आहे आणि उद्याचा दिवस मोकळा आहे तरी तेव्हा करते, बाकी बरीचशी तयारी झाली आहे." मीनाताईंना माहित होते की आपली सून शुभ्रा तशी सगळे व्यवस्थित करते तरी पण राहवेना म्हणून विचारले. मीना ताईंना त्यांचे दिवस आठवले. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस अगदी गडबड असायची. घटस्थापना झाली की नवमीपर्यंत सप्तशतीचा पाठ, रोज 108 सुगंधी फुलांची माळ, अखंड नंदादीप  तसेच घटाच्या बाजूने सप्त धान्य पेरून वर परडीवर देवीचा टाक चांदीच्या वाटीत ठेवायचा. रोज अभिषेक तर असतोच शिवाय नऊ दिवस कुमारीका आणि मग नवमीला पारणे. सगळे जवळचे नातेवाईक जेवायला असत. अष्टमीला संध्याकाळी आरतीला पण सर्वजण येत असत. रोज सकाळ संध्याकाळ पंचारती, धूप, रोज वेगळा नैवेद्य सकाळ संध्याकाळ पूजा यातच पूर्ण दिवस कुठे निघून जायचा कळायचे नाही पण मीनाताईंना नऊ दिवस उपास असला तरी कुठेही थकवा जाणवायचा नाही उलट खूप प्रसन्न वाटायचे घरी येणाऱ्याला पण खूप मंगलदायक वाटायचे. अष्टमीच्या दिवशी गोंधळी घरी येऊन देवी समोर गाणी म्हणायचे. खरंच किती सकारात्मक कंपनं जाणवायची. मीनाताई आपल्याच विचारात हरवून गेल्या होत्या. तेवढ्यात शुभ्रा आली " आई आमची गरब्याची तयारी मस्त झाली आहे. जरा थकायला होतं, गरबा म्हटलं की शारीरिक हालचाली खूप होतात पण तेवढाच व्यायाम. एरवी काय नुसतं लॅपटॉप समोर बसून असते. आता आई उद्या रंगीत तालीम आहे आणि नंतर नऊ दिवस नऊ रंगाची वस्त्रे परिधान करून गरबा खेळायचा आहे"

"हो का अरे वा" मीनाताई म्हणाल्या. तेवढ्यात तिथे शुभ्राची मैत्रीण क्षिप्रा आणि अजून दोघी तिघीजणी आल्या. 

" अगं बरं का मुलींनो गरब्याचा अर्थ पण जर समजून तुम्ही खेळलात तर अधिक चांगले." 

"सांगा ना काकू" सगळ्या जणी एकदमच म्हणाल्या. "ऐका तर मग, 

गरबा म्हणजे मडके.  आणि हे मडके ब्रम्हांडाचे प्रतीक आहे. गरब्याला २७ छिद्र असतात. नऊ छिद्रांची एक अशा तीन ओळी असतात. नऊ गुणिले तीन म्हणजे २७ नक्षत्र. एक नक्षत्र म्हणजे चार चरण. २७ गुणिले चार १०८.नवरात्रात गरबा म्हणजे मडके मध्यभागी ठेवून त्याच्याभोवती १०८ वेळा गोल फेर धरायचा असतो त्यामुळे आपल्याला ब्रम्हांडाची प्रदक्षिणा घातल्याचे पुण्य मिळते. 

" खरंच काकू ही पौराणिक माहिती आम्हाला माहीतच नव्हती. आता आम्ही हा अर्थ मनात ठेवून गरबा खेळू." क्षिप्रा म्हणाली. " अगं आम्ही पूर्वी रात्री विविध प्रकारचे खेळ खेळत असू. एकूण काय देवीचा जागर महत्त्वाचा. शारदीय नवरात्र म्हणजे सळसळत्या चैतन्याचा उत्सव. भारतीय संस्कृतीने योजलेला अंतर्बाह्य शुद्धी करणारा व शक्ती वाढवणारा उत्सव. खरं म्हणजे शक्तीच्या विविध स्वरूपांनाच आपण वेगवेगळ्या देवींची नावे दिली आहेत जसे की विद्येची देवता म्हणजे सरस्वती, संपत्तीची देवता म्हणजे लक्ष्मी आणि दुष्ट शक्तीचा नाश करणारी दुर्गा. 

" हो काकू ही सगळी नावे आम्हाला माहित आहेत" स्नेहल बोलली

"आणि बरं का मुलींनो एक रंजक नऊच्या आकड्याचे महत्त्व आहे.  जीवाच्या जन्मासाठी नऊ महिने नऊ दिवस नऊ तास सांगितले आहेत तसेच या नऊ चे महत्त्व शरद ऋतू मध्ये नऊ रात्री म्हणजे नवरात्र. आहे की नाही गंमत? "

" काकू आता परत उद्या थोडी माहिती सांगा" सर्वजणी म्हणाल्या. 

दुसऱ्या दिवशी शुभ्रा आणि तिच्या सर्व मैत्रिणी केशरी रंगाचे कपडे घालून छान तयार होऊन आल्या. शुभ्राने तर पिवळी सोन्याचाफ्याची फुले पण माळली होती.मीनाताई तर तिच्याकडे पाहतच राहिल्या.आज काकूंच्या मैत्रिणी पण त्याच वेळेला आल्या होत्या त्यांना पण भजनाला छान केशरी रंगाची साडी नेसून जायचे होते जाता जाता त्या मुलींना म्हणाल्या, "अग पोरींनो प्रत्येक रंगाचे वैशिष्ट्य जाणून आपण वस्त्र परिधान केले तर एक वेगळेच समाधान मिळते बरं का. आता हा केशरी रंग म्हणजे ज्ञान व तेजाचे प्रतीक आहे आणि दुर्गा देवीचे पहिले रूप शैलपुत्री आहे खरं म्हणजे शक्तीच्याच विविध स्वरूपांना आपण वेगवेगळ्या देवींची नावे दिली आहेत कारण शक्तीलाच देवता स्वरूप मानले आहे. अगदी रामरक्षा म्हणताना सुद्धा आपण " सीता शक्ती:" असे म्हणतो प्रत्यक्ष श्रीरामांनी सुद्धा सीताला शक्ती रुपात पाहिले. तीच त्यांची प्रेरणा आणि तुम्ही पण सगळ्याजणी शक्ति रूप प्रेरणाच आहात. तर आता बाकीच्या रंगांबद्दल नंतर आपण आम्ही भजनाहून आल्यावर निवांत बोलूया. तोपर्यंत तुम्ही गरबा किंवा रिंगण नृत्य खेळून या." त्यादिवशी काकूंना उशीर झाला म्हणून दुसऱ्या दिवशी सर्वजणी गरबा संपल्यावर व काकूंचे भजन आटोपल्यावर निवांत माहिती मिळवायला किंवा महत्त्व ऐकायला आल्या. आज सर्वजणी पांढऱ्या वेषात खूपच सुंदर दिसत होत्या. काकू लगेच म्हणाल्या" खरंच किती शुद्ध, निर्मळ आणि शांत रंग आहे हा पांढरा. हेच गुण आहेत या रंगाचे. हा रंग विद्येचं प्रतिनिधित्व करतं.असंच आपलं मन सुद्धा शुद्ध, निर्मळ आणि सात्विक व्हायला हवं.

विद्येची देवता सरस्वतीकडे पाहून आपण असंच म्हणतो ना

*पावित्र्याची प्रतिमा म्हणोनि | शुभ्र वस्त्र परिधान करोनी | वीणा करी तव दिसते शोभूनी | त्यात सुखाचे स्वर झंकारत ||"*

" काकू बाकीच्या रंगांचे पण महत्त्व आत्ताच सांगाल का ? कारण आम्हालाही तुम्हाला पुन्हा पुन्हा त्रास द्यायला आवडणार नाही" क्षिप्राने विचारले

"अग त्रासाचं काय एवढं, ठीक आहे तरी पण सांगते आत्ताच" सगळ्याजणी छान जरा आरामातच बसल्या. काकूंनी सुरुवात केली. "आता पुढचा रंग तुमचा लाल आहे ना? तो रंग उत्कटता दर्शवतो शिवाय शौर्याचे प्रतीक आहे. नवीन सुरुवात आणि विकासाचे प्रतीक आहे पण रागाचे पण प्रतीक आहे बरं का! आपण सर्वांनी रागावर नियंत्रण मिळवायला शिकलं पाहिजे. 

आता चौथ्या दिवसाचा रंग निळा आहे. निळा रंग हा दैवी ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतो. या ऊर्जेचे उत्थान व्हावे व ती ऊर्जा शरीरात चलित व्हावी या हेतूने एकत्र जमून स्वतःभोवती किंवा वर्तुळात घड्याळाच्या दिशेने अथवा विरुद्ध दिशेने गोल गोल नृत्य करण्याची पद्धत आहे. या क्रिया तुम्ही गरबा खेळताना करतच असाल. निळा रंग सुख समृद्धी व प्रगतीचे पण प्रतीक आहे. 

आता पाचवा रंग पिवळा आहे. पिवळा रंग आनंदाचे प्रतीक आहे म्हणजे आपण आनंद लुटायचा आणि आनंद घ्यायचा म्हणजे सर्वांचे आयुष्य आपोआपच आनंदी होईल. 

आता सहावा रंग हिरवा आहे ना? "

" हो काकू" माधुरी म्हणाली "आणि काकू हा सृजनाचे प्रतिक आहे बरोबर आहे ना? "

" अगदी बरोबर, सृष्टीतील कार्यकारण भाव जाणून सृष्टी कशी तयार होते याची प्रचिती यावी म्हणून आपण घटाभोवती माती घेऊन त्यात सप्तधन्य पेरतो सृजनाची आठवण राहावी हा मुख्य हेतू. "

आता सातवा रंग आहे राखाडी. राखाडी म्हणजे वाईटाचा नाश. आपण आपले जे काही वाईट गुण असतील ते नाश करून चांगले गुण जोपासावे. 

आता आठव्या दिवशीचा रंग आहे जांभळा. कधी गुलाबी पण असतो. तो स्त्रीत्व आणि शुद्धता दर्शवणारा आहे आपण सात्विक गुणांचा समतोल आचार विचारात जोपासावा. 

नववा रंग मोरपंखी म्हणजे इच्छापूर्ती करणारा. देवी दुर्गा माता आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. तेज आणि शक्तीचं लेणं ल्यायलेली आदिमाता निरनिराळ्या रुपात भक्तांना भेटायला येते. प्रत्येक गोष्ट ईश्वराने दिली आहे या कृतज्ञ भावनेतून आपण सर्वजण एकत्रित आणि आनंदाने सण समारंभ साजरे करतो. मग आता तुम्ही या गरब्याला नुसते नटून थटून न जाता त्या मागच्या भावना समजून मग खेळाल हो ना बरोबर?"मीनाताईंनी विचारले. 

क्षिप्रा म्हणाली " काकू नवरात्री सणाचे तुम्ही इतकं छान आणि मुख्य म्हणजे रंगांचे महत्त्व सांगितले की प्रत्येक रंग परिधान करताना एक वेगळीच ऊर्जा तयार होईल "

" शाब्बास! असेच होवो "

सर्वांनी काकूंना नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला.  सर्वजणी अगदी तृप्त मनाने पण उशीर होईल म्हणून भराभर निघाल्या. 

आज काकूंच्या मैत्रिणी स्वातीताई, विणाताई आणि अजून काही जणी भजनासाठी काकूंची वाट पाहत होत्या म्हणून त्याही निघाल्या. नऊ दिवस काकूंच्या ग्रुपला पण बरेच ठिकाणी भजनासाठी आमंत्रणे होती. 

असे नऊ दिवस झाल्यावर शेवटच्या दिवशी पुन्हा सगळ्या जणी काकूंना व त्यांच्या मैत्रिणींना भेटायला आल्या. काकूंनी विचारले " मग काय मुलींनो, आज शेवटचा दिवस ना? गरब्याच्या वेळी टाळ्यांच्या माध्यमातून दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करण्यासाठी भक्तीने तिचे गुणगान करणे हे अपेक्षित आहे हो की नाही विणाताई? "

"हो ना, आणि टाळ्यांच्या माध्यमातून तेजाची निर्मिती होते आणि बरं का मीनाताई शुभ्रा आणि तिच्या सर्व मैत्रिणी मला तर या नऊ दिवसात अगदी देवीचे रूपच वाटत होत्या. "

मीनाताईंनी पण दुजोरा देत म्हटले, "मी हेच म्हणणार होते, अहो, शुभ्रा रोज नव्या रंगात व नव्या रूपात देवीच भासत होती."

आदिशक्तीचा उत्सव संपला. खरंच ती स्वामिनी असते, धारिणी असते, आपली प्रेरणा असते. आपण सर्वांच्या धैर्याचा शौर्याचा अस्मितेचा व जाणिवेचा आदर करूया व नारी शक्तीचा सन्मान. 

खरंच आपण एकमेकांनी नारी शक्तीचा आदर करायला हवा नाही का? 

 हेच अभिप्रेत आहे. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics