Poonam Waghmare

Inspirational

3.5  

Poonam Waghmare

Inspirational

आजोबांची समज

आजोबांची समज

4 mins
313


सकाळी ऑफिसला जाताना स्वप्निलच्या आईने त्याच्यासाठी टेबलवर नाष्टा ठेवला होता. आजोबासारखे त्याच्याकडे बघत, त्याला नाष्टा करायची आठवण करुन देत होते पण स्वप्निल 'हो खातो' म्हणत नेहमीप्रमाणे मोबाईल मध्ये गेम खेळण्यात व्यस्त होता. थोड्या वेळाने, अचानक स्वप्निलने चिडून मोबाईल सोफ्यावर आपटला आणि तो उठून चालू लागला पण तेवढ्यात त्याला चक्कर आली आणि तो खाली पडला. आजोबा खूप घाबरतात. स्वप्निलला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न करतात, पण स्वप्निल काही उठत नाही. आजोबा स्वप्निलच्या तोंडावर थोडं पाणी शिंपडतात, स्वप्निलला जाग येते आणि आजोबा त्याला आधार देऊन सोफ्यावर बसवतात. तितक्यात स्वप्नीलच्या फोनवर त्यांच्याच कॉलनीतल्या एका मित्राचा फोन येतो, आजोबा फोन उचलतात आणि अंकीतला स्वप्निल बद्दल सांगतात आणि त्याला लगेच घरी बोलावतात. थोड्या वेळातच अंकित त्याच्या आईसोबत स्वप्नीलच्या घरी पोचतो. तोपर्यंत आजोबा स्वप्नीलला मीठ व साखरेचे पाणी देऊन शुद्धीवर आणतात.


अंकीतची आई आजोबांना विचारते तेव्हा आजोबा सांगतात, "काय सांगायचं लेकी, काल दुपारी पण ह्या मुलानं अर्धी चपाती खाल्ली, रात्री थोडासा वरणभात खाल्ला आणि आत्तापण सकाळपासून मागे लागलोय पण नाष्टयासाठी उठायलाच तयार नाही. चक्कर येईल नायतर काय?. ह्या सगळ्या मुलांना मोबाईलच इतकं वेड लागलंय की त्यांना खाण्या पिण्याची सुध्दा आठवण नाय -हात. सांगितलं तरी ऐकायचं म्हाईत नाय. कोण बोलणार ह्यांना". अंकीतची आईपण आजोबांच्या बोलण्याला होकार देते आणि स्वप्निलला विचारते, "काय रे बरं वाटतंय का बाळा आता?, चल तो नाष्टा खाऊन घे आधी, मी दूध गरम करुन देते ते पिऊन घे. अंकीतला सांगते, "बस रे त्याच्या बाजूला आणि खायला सांग आपल्या मित्राला". अंकीतची आई स्वप्नीलला व्यवस्थित खाऊ-पिऊ घालते आणि अंकीतला त्याच्याजवळच थांबायला सांगून आपल्या घरी जाते. स्वप्नीलला दमल्यासारखे झाल्यामुळे तो झोपतो, अंकित पण आपल्या घरी जेवायला जातो. आजोबा स्वप्नीलच्या आईला फोन करुन लवकर घरी बोलावून घेतात. आजोबा शांत झोपलेल्या आपल्या नातवाकडे बघून विचार करत असतात, हल्ली आई - बाप दोघांनाही काम करावं लागतं, घरी कुणी नसलं की ती पोरं तरी बिचारी काय करतील. स्वतःचं खाणंपिणं करायला मुलाना भारी कंटाळा असतो. 


   स्वप्निलची आई ऑफिसमधून लवकर घरी आलेली असते. संध्याकाळी स्वप्निलचे कॉलनीतले सगळे मित्र त्याला भेटायला येतात. स्वप्निल आता आधीपेक्षा जास्त फ्रेश दिसत होता. सगळे मित्र स्वप्निलकडे तब्बेतीची चौकशी करत असतात. तेवढ्यात आजोबा पण त्यांच्यासोबत येऊन बसतात. आजोबा मुलांशी सहज बोलू लागतात, मुलांना त्यांच्या लहानपणाचे किस्से सांगू लागतात, "तुम्हाला सांगतो मुलांनो अरे मी लहान असताना आम्ही सगळे मित्र मैदानी खेळ खेळायचो. खो - खो, विटी दांडू, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कोयबा असे बरेच खेळ होते, आमच्या वेळेला मोबाईल नव्हते, आणि खरी मजा त्यातच यायची. घरातून खाल्ल्याशिवाय बाहेर पडायचो नाहीत आणि मग खेळून आलो की परत तेवढीच भूक लागायची, मी तर एकटाच दोन माणसांचं जेवण जेवायचो. खाल्लेल्या अन्नाचं चीज व्हायचं.


मग कसले आजार नि काय नाय, तेव्हा आम्ही सगळे मित्र खाऊन पिऊन धष्टपुष्ट असायचो. पण तुम्हा हल्लीच्या मुलांना नुसतं मोबाईल खेळायला मजा येते, एकदा का हातात मोबाईल घेतलात की खायच - प्यायच, कोण काय बोलतंय ते ऐकायचं, काही म्हणजे काही कळत नाही, कारण तो मोबाईल तुमची सगळी शक्ती त्याच्या ताब्यात घेतो आणि तुम्ही मुलं मंत्र मारल्ययासारखी त्यात घुसून जाता. त्यात आता तर शिक्षण पण मोबाईल वरूनच घ्यावं लागतंय म्हणजे त्यात आणखी भर. अरे तुम्ही आठवी - नववीतली मुलं ना, जरा समजुतदारीने वागायला नको का तुम्हांला? मोबाईल वर शिकायची वेळ का आली आज, कारण त्यावर उपाय नाही, आपण सुखरुप राहावं आणि सोबत आपला अभ्यास पण थांबू नये, मुलांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू असतात. आपल्या आई वडिलांनी आपल्याला मोबाईल दिला याचा अर्थ त्याचा सतत वापर झालाच पाहिजे असं काय नाय. अभ्यास झाला की मित्रांसोबत मैदानात जाऊन खेळावं, थोड्या गप्पा माराव्यात, गोष्टी सांगाव्यात, अभ्यासबद्दल बोलावं, कधी कधी एकत्र बसून अभ्यास करावा, म्हणजे आपोआपच अभ्यासातली आवड वाढते.


आणि बरं का, मित्रांसोबत अभ्यास करण्यात काही वेगळीच मजा असते एकदा करुन तर बघा. मैदानी खेळ खेळालात तर तुमची भूक पण वाढेल, अभ्यासात मन लागेलं. आणि सर्वात मुख्य म्हणजे तुम्हाला सर्व सुखसोयी मिळाव्यात म्हणून तुमचे आई वडील जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना आपल्या वागण्यातून आनंद मिळेल. नाहीतर आपल्या आई वडिलांना आपण दोघेही कामावर जाऊन चूक करतोय का अस वाटायला लागले, तुम्ही काही आता इतके लहान नाही आहात मुलांनो, इतके तर तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी नक्कीच करु शकता, स्वतःच्या तब्येतीची, खाण्यापिण्याची काळजी घेऊन आपल्या पालकांना आपल्या काळजीतून निर्धास्त करु शकता. काय मुलांनो जमणार का? मुलं एकमेकांकडे बघतात आणि आजोबांना 'हो, हो, आजोबा आम्ही नक्की प्रयत्न करु' म्हणतात. स्वप्नीलची आई किचनमधून सगळं ऐकत असते, तिलाही आजोबांनी मुलांना दिलेली समज एकून खूप समाधान वाटते. मुलं स्वप्नीलला 'काळजी घे' सांगत आपापल्या घरी निघून जातात. त्यादिवशी कुणीच मोबाईलवर गेम खेळण्यासाठी स्वप्नीलला फोन केला नाही.

दुसऱ्या दिवशी ऑनलाईन क्लास झाल्यानंतर 4 वाजता स्वप्नीलच्या घराची बेल वाजते, आजोबा दरवाजा उघडतात तर समोर सगळे मित्र आपापल्या वह्या पुस्तके घेऊन दरवाजात उभे असतात, त्यांना बघून आजोबांना खूप आनंद होतो, आजोबा त्यांना आत यायला सांगतात आणि म्हणतात, वा मुलांनो तुम्ही इतक्या लवकर माझं ऐकाल अस वाटलं नाय मला. पण तुम्ही माझं ऐकलं हे बघून मी खूप खूश झालो बाळांनो. सगळे एकत्र अभ्यासाला बसतात आणि ते बघून आजोबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू येते. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational