Poonam Waghmare

Tragedy

3  

Poonam Waghmare

Tragedy

कर्मचाऱ्याची व्यथा

कर्मचाऱ्याची व्यथा

2 mins
135


साहेब,

मी माझ्या संसारातून सन्यास घ्यायचा विचार करतोय. त्याच कारण असं की, आठवड्याचे ५ दिवस इतरांप्रमाणे मी ही काम करतो, कदाचित माझ्या सहकाऱ्यांपेक्षा जास्त तास काम करतो. मला काम करायला जरा जास्तच आवडत. सकाळी कधी एकदा घराबाहेर पडतोय आणि कामावर जातोय असं वाटतं. जेवढा उत्साह मला कामावर येण्याचा असतो तेवढा घरी जायचा नसतो. मला माझ्या घरातल्या माणसांपेक्षा बाहेरच्या माणसांना खुश ठेवण्यात जास्त आनंद वाटतो. म्हणून मी जास्तीत जास्त वेळ बाहेर घालवण्याचा प्रयत्न करतो. मी ऑफिसला नीट पोहोचलो की नाही हे कळण्यासाठी बायको फोन करुन विचारते. नंतर दुपारी मी जेवलो की नाही फक्त इतकंच विचारण्यासाठी ती मला उत्तर मिळेपर्यंत थोड्या थोड्या वेळाने फोन करत राहते. पण माझ्याकडे तिच्यासोबत बोलायला दिवसातला फक्त 1 मिनिट असतो, तो ही मी वाटून ठेवलेला असतो. सकाळी मी पोचलो इतकच बोलतो आणि दुपारी मी जेवलो, तुम्ही जेवलात का इतकच बोलतो. बाकी सगळ्यांशी बोलायला माझ्याकडे भरपूर वेळ असतो पण मी फक्त कामाच बोलतो असंच मी तिला नेहमी सांगतो. संध्याकाळी ऑफिसमधून निघायला वेळ होत असेल तरी मी तिला कधी कळवत नाही किंवा मला त्या गोष्टींची गरज वाटत नाही. बायकोला काय सांगायचंय त्यात म्हणून माझा ego आडवा येतो कधी कधी. पण तरी बायको फोन कडे लक्ष लावून असते की आत्ता फोन येईल. पण मी क्वचितच फोन करतो. माझी लहान मुलगीसुद्धा माझी वाट पाहत असते. ७ पर्यंत मी घरी नाही पोचलो तर ती रडायच्या सुरातच विचारु लागते, " का पप्पा आज घरी नाही येणार का?, का आज तो ऑफिसमध्येच राहणार का?" आणि मग वैतागून तीच फोन घेऊन मला फोन करते. घरी गेल्यानंतर पण मी आधी माझ्या मुलीला जवळ घेत नाही, कामाचे फोन असतात ते आधी घेतो, कधी कधी तासनतास बोलत बसतो, ह्याचा झाला की त्याचा फोन असे एक दोन तास घालवतो. मुलीसोबत खेळायला वेळ मिळत नाही, लगेच आपला लॅपटॉप घेऊन काम करत बसतो. मी स्वतः कामात इतका रमतो की मला आता त्यांच्या भावनांची जास्त कदर उरली नाही. बरं, मला काही झालं तर माझी बायकोच मला सांभाळते, रात्री झोपताना जरा जरी खोकला आला तर माझी मुलगी लगेच उठून "पाणी देऊ का पप्पा" विचारते. इतकं प्रेमळ कुटुंब असताना देखील मी त्यांच्यासाठी पैसे कमवण्याखेरीज जास्त काही करतो असे मला वाटत नाही. जोपर्यंत एखादी इमर्जन्सी येत नाही तोवर मी त्यांच्यासाठी कधी सुट्टी सुध्दा घेत नाही, डिसेंबर महिन्यात बहुतेक सगळे सहकारी रजा घेऊन सुट्टी संपवतात पण मी ते ही करत नाही. बायकोने सांगितलं तरी नाही. ह्या सगळ्यात माझाच स्वार्थ आहे, बाहेरचे वातावरण मी इतके आपलेसे करुन घेतले आहे की जे आपले आहेत त्यांच्यापासून मी दुरावत चाललो आहे म्हणून मी माझा सगळा वेळ हा आपल्या कामाला द्यायचा ठरवला आहे आणि उरेल तो वेळ स्वतःसाठी वापरायचा पण त्यातही मला कामाचे आणि संबंधित लोकांचेच विचार जास्त असतात त्यामुळे पूर्ण वेळ कामालाच घालवावा आणि त्यासाठी तुम्ही माझ्या राहण्या - खाण्याची सोय आपल्या कार्यालयातच करावी ही विनंती. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy