Poonam Waghmare

Others

3  

Poonam Waghmare

Others

यमुनेच्या तीरी - भाग १

यमुनेच्या तीरी - भाग १

2 mins
251


त्या यमुना बाईला लई.. चांभार चौकश्या व्हत्या. यमुना बाई म्हंजी आमच्या चाळीतलं लई जुनं झाड. समदे केस पांढरे झाले व्हते, त्या 24 तास हालनाऱ्या भाऊली सारखी तिची मान हालत असायची, आयुष्याचं ओझं उचलून उचलून आता कंबरेत थोडी वाकली होती.

म्हातारी असली तरीबी पिक्चर बगायचा लई शौक, जुने नवीन समदे. सिरीयल पण समद्या बगायची. रामायण, महाभारत, विक्रम वेताळ आणि जेवढ्या बघता येईल तेवढ्या समद्या आपली मान हालवत बघत बसायची. पिक्चर बागताना तर तिची लय मज्जा यायची, " हान मेल्याला हान", "बग, बग, कसा करतू भाडखाव तिला", "आता अमिता बच्चन आला की बग कसा हानतोय तुला", आसली बडबड, काय सांगू. बोलून बोलून दुसर्यांचंबी ध्यान हटवायची. तिच्या घरात tv न्हवता. ज्यांच्या घरात tv बगायला जायची ते कधीतरी तिला बोलायचे, "अगं मावशे गप की, बगू दे की जरा, आयकू दे ना जरा". आस बोलून गप करायचे तिला.

नवरा मरुन बरीच वर्षे झाली, दोन मुलं पदरात, एक मुलगा आणि मुलगी. नातेवाईक जवळ न्हवते पण शेजारी चांगले व्हते. तिच्यापेक्षा अर्धवट वयाच्या बायका तिच्या मैत्रिणी व्हत्या. मोठा मुलगा सरकारी नोकरी करत व्हता, अन मुलगी जास्त शिकली न्हवती पण घरकामात लय हुशार व्हती. दोन घरं सोडून अलका ऱ्हात व्हती, अलका म्हंजी तिच्या जीवा भावाची मैत्रीण. तिच्या घरी यमुना आजी गेली नाय आसा एकबी दिस उगवला नाय. अलका आजी पेक्षा आर्ध्या वयाची व्हती तरीबी दोघींचं लय चांगलं जुळत व्हतं. अलकाची मुलं पण मोठी व्हती. मोठा मुलगा आणि दोन मुली. आपल्या मुलांसारखाच अलकाच्या मुलांचा लाड करत व्हती यमुना आजी. दोघींना पण एकमेकींच घरातलं समद म्हाईत असायचं. त्याशिवाय चाळीतल्या समद्या उठाठेवी म्हाईत असायच्या.

मुलं क्रिकेट खेळतांना बॉल तिच्या घरात गेला की त्या मुलांवर संक्रात आलीच म्हणून समजा. "कोणाचा जीव चाललंय रं" इथूनच तिची सुरुवात व्हायची. मुलांचे बॉल घरातच लपून ठेवायची, मुलं मागायला आली तरी नाय द्यायची. चुगल्या करायच्या, हिचं तिला आन तिचं हिला आसं सांगत बसायचं आन मग भांडणं लागली की "नाय बा मी नाय बोलली आशी", त्या बायकांना शिव्या घालायची, आसं तिचं चाललेलं आसायचं. खोड्या काढायच्या आन बाजूला सरकायचं. तिच्या असल्या स्वभावामुळं समदे तिला आगलावी म्हणायचे. 


Rate this content
Log in