आजची शिक्षण पद्धती
आजची शिक्षण पद्धती
पूर्वीच्या काळी शिक्षण पद्धती ही गुरुकुल पद्धती होती. त्यामध्ये आई-वडिलांचे पाशी जसे राहतो, तसेच गुरूगृही जाऊन राहायचे. आपले घर समजून, गुरूची सर्व आज्ञा पाळून, त्यांची कामे करायची, त्यासाठी कितीही शारीरिक कष्ट झाले किंवा कधी गुरूंनी अपमान जरी केला तरी तो सहन करायचा, आणि गुरुनी देखील हातचे काहीही राखून न ठेवता येणारे सर्व ज्ञान शिष्याला प्रदान करायचे. अशी ती गुरुकुल पद्धती होती.
अशा पद्धतीमध्ये पौराणिक काळामध्ये,
सांदिपनी आणि श्री कृष्ण
वशिष्ट आणि श्रीराम
गुरु द्रोण आणि अर्जुन
आजच्या काळातील एक गुरु शिष्य जोडी म्हणजे रमाकांत आचरेकर सर आणि सचिन तेंडुलकर
अशा जोड्या घडत गेल्या. त्यानंतरच्या काळामध्ये
स्वामी परम हंस आणि विवेकानंद
त्यावेळचे गुरु "शिष्यात इच्छिते पराजय "असा विचार करत असायचे. म्हणजे माझा शिष्य इतका मोठा व्हावा कि त्याने माझा देखील पराभव करावा. अशी इच्छा बाळगणारे असायचे.
त्यानंतरचा जो काळ आहे, त्यामध्ये देखील गुरूंना खूप महत्त्व दिले जात होते.
गुरु म्हणजे शिक्षक या अर्थाने आपण पाहत आहोत ,तेव्हा जरी गुरुकुल पद्धती नसेल तरी शाळेमध्ये, आमच्या काळात देखील आम्ही "गुरूजी" म्हणत होतो. आणि त्याच्या मध्ये जो सन्मान होता, तो आजच्या "सर "या शब्दांमध्ये नाही. तेव्हादेखील गुरूंना, गुरुजींना, विद्यार्थी पुज्य मानत होते .आणि गुरुजी देखील मनापासून तळमळीने शिकवणारे होते.
म्हणजे अगदी थोडेसे पगार असले तरी, तेव्हा कोणतेही गुरुजी, शिक्षक, खाजगी ट्युशन नावाचा प्रकार घेत नव्हते.
अगदीच विद्यार्थ्याला काही अडचणी आल्या, तरी घरी मला येऊन विचार आणि घरी मोफत शिकवत होते. आणि अशा रीतीने सौहार्दाचे प्रेमाचे गुरू-शिष्य संबंध होते.
तेव्हा सार्याच गोष्टी पैशात मोजल्या जात नव्हत्या, बहुदा शिक्षक हे गरीबच असत.
आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षा केली म्हणून आईबाप कधीही शाळेत उलटी तक्रार घेऊन जात नव्हते .
गुरुजींनी मारलं म्हणजे तूच काहीतरी चूक केली असशील, असं म्हणून उलट घरी मार पडायचा.
हा ! सगळीकडे जसे अपवाद असतात, तसे काही एक-दोन शिक्षक असे होते, की बाबा उगाचच विद्यार्थ्यांना मारणे, कुठला तरी राग कुठेतरी काढणे, त्यांच्यावरती एखाद्या गोष्टीची खुन्नस ठेवणे .
पण हे अत्यंत अल्प प्रमाणात होते.
त्यानंतरचा काळ आला आणि खाजगी शिक्षण संस्था, खाजगी क्लासेस जसे सुरू झाले तसे शिक्षण कमर्शियल झाले. आणि त्यामध्ये विद्यादानापेक्षा कमावण्याची गोष्ट जास्त झाली.
पालकांमध्ये देखील जिथे जास्त पैसा ,तो क्लास चांगला जिथे जास्त फी,
ती शाळा चांगली जिथे जास्त फी, आणि शिक्षणापेक्षा चकचकाट, आणि दिखावा जास्ती, आणि सगळ्याची मेंढरा सारखी गत,
एकाने खड्ड्यात उडी मारली की, सारी तेथेच ऊडी मारू लागले ,
आता कायदे देखील बदलले आहेत. आता विद्यार्थ्यांना शिक्षा नाहीच ,एखादा फटका जरी मारला,
तरी शिक्षकाला तुरुंगवास होऊ शकतो.
अशा वेळी शिक्षक देखील स्वतः विचार करणार की, विद्यार्थ्यांचे भले व्हावे असा विचार त्याने तरी का करावा? जर विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी एखादा फटका मारुन, जर त्याला तुरुंगात जायची वेळ आली, तर त्याने तरी तो विचार का करावा?
शेवटी जो काही उपक्रम आहे ,त्याप्रमाणे आम्ही शिकवणार !तुम्ही घ्या नाही तर नका घेऊ.
अशी परिस्थिती झाली.
एवढंस काही मुलाला एक बोट लावलं, तर आईबाप शाळेत जाऊन शिक्षकांच्या तक्रारी करू लागले.
त्याला कारणही तसंच आहे आमचा एकुलता एक प्रिन्स असतो ,त्यामुळे त्याला कोणीही अरे म्हणायचं नाही.
जगाच्या व्यवहारात कसं पडायचं याचं त्याला शिक्षण त्यामुळे मिळतच नाही. आणि आम्ही इतके लाख रुपये भरून खासगी क्लास लावला आहे ना! मग आम्हाला शाळेच्या शिक्षकांची फारशी पर्वा नाही.
त्याउलट बर्याचशा कॉलेजमध्ये असं दिसून येतं की, तिथले प्राध्यापक शिक्षक अगदी कोरडेपणाने अलिप्त पणाने शिकवणे एवढेच काम करतात .
तुम्हाला समजो अगर न समजो, तुम्ही उपस्थित रहा अगर नका राहू, आम्ही आमचा पोर्शन पूर्ण करणार.
आता तर काय! त्याहीपुढे काळ गेलेला आहे.
आता या ऑनलाइन शिक्षणपद्धतीमध्ये तर, शिक्षक विद्यार्थी संबंध, पूर्वीच्या काळा सारखे प्रेमाचे आदराचे राहणे शक्यच नाही.
उलट शिक्षण ऑनलाइन असल्यामुळे, त्याच शिक्षकाचे स्टेटस चेक करता येते ,त्याच्या छोट्या-मोठ्या गोष्टी वरती लक्ष ठेवता येते, त्यामुळे दोघांनाही आपला वेगळे आयुष्य राहत नाही. एका पातळीवर जरी मैत्री संबंध असले, तरी त्यामध्ये आदर युक्त धाक असं काहीही राहिलेलं नाही.
जसे एखाद्या फॅक्टरी मधून प्रोडक्शन काढावे तद्वत आताची शाळा-कॉलेजे झालेली आहेत.
फक्त वर्षाला हजारो शिकलेली मॉडेल्स त्यातून बाहेर पडतात. पण ती सुशिक्षित आणि सुसंस्कारीत होत नाहीत.
पुलंच्या काळातले" चितळे मास्तर" आता फक्त कथेतच राहिले आहेत.
